माणसाचं आयुष्य विचित्रच आहे. त्याला कधी काय भोगायला लागेल किंवा त्याला कधी कशाची
लॉटरी लागेल सांगता येत नाही. पण परिस्थिती ओळखून जो आपला मार्ग
सोडत नाही,त्याच्या पदरी यश पडतच पडतं. 7 जुलै 2006 मध्ये मुंबईत झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोटात
हात असल्याचा खोटा आरोप लागल्याने अब्दुल वाहिद शेख( वय
38) या युवकाने आयुष्याची नऊ वर्षे तुरुंगात काढली. सप्टेंबर 2015 मध्ये त्याच्यावरचा आरोप खारिज करण्यात
आला. आज याच माणसाने बेगुनाह कैदी या नावाचे उर्दू भाषेत जवळ्पास
400 पानांचे पुस्तक लिहिले आहे. शिवाय तुरुंगवासात
त्याने वकिली आणि पत्रकारितेचा कोर्सदेखील पूर्ण केला आहे.
पेशेने शिक्षक असलेल्या या अब्दुलने
तुरुंगातून वकिली आणि पत्रकारितेची पदवी मिळवली आहे. मात्र त्याची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे त्याने दहा महिन्यात उर्दू भाषेत
सुमारे चारशे पानांचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकातून त्याला
तीन गोष्टी लोकांना सांगायच्या आहेत. पहिला मुद्दा म्हणजे मुंबई
रेल्वे बॉम्ब स्फोटातील कित्येक प्रकरणे ही खोटी आहेत. कित्येक
निर्दोष लोकांना यात विनाकारण गुंतवले आहे. दुसरे म्हणजे आपल्या
देशात पोलिसांचे राज्य आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही खोट्या
दहशतवादी प्रकरणात अटक करण्यात आलेला माणूस काय करू शकतो? या
तीन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. खोट्या आंतकवादी केसेसमध्ये
अडकलेल्या लोकांनी अत्याचाराला कसा विरोध करावा, न्याय प्रणालीद्वारा
कशी मदत घ्यावी, याचा परामर्श या पुस्तकात घेण्यात आला आहे.
अब्दुलने आपल्या पुस्तकात लिहिले आहे, आतंकी हल्ल्यानंतर कथित रुपात अशा लोकांना पकडलं जातं,
ज्याच्यावर लहान-मोठे गुन्हे असतात. अब्दुलवर एका विवादीत संघटनेचा सदस्य असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
2012 मध्ये त्यातून तो निर्दोष सुटला. अब्दुल सांगतो
की, खोटा कबूलीजबाब घेण्यासाठी थर्ड डिग्री टॉर्चर केलं जातं.
पहिल्यांदा कपडे उतरवणं, दुसर्यावेळेला बेल्टने मारणे, थर्ड डिग्रीमध्ये नको त्या ठिकानी
विजेचा शॉक देणे,एकदा तर त्याच्या हाताचे हाडच मोडले होते,पण पंधरा दिवस त्याच्यावर उपचार केले गेले नाहीत.
अब्दुल सांगतो की,त्याच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत पोलिसांच्या विरोधात
केस करण्याचा काहींनी सल्ला दिला. पण मला असे काही करायचे नाही.
आता मला आणखी 12 लोकांना मिळालेल्या शिक्षेच्या
विधात लढा द्यायचा आहे. अब्दुल त्यांना निर्दोष मानतो.
या रेल्वे बॉम्ब स्फोटात 188 जणांचा मृत्यू झाला
होता. तर 800 लोक जखमी झाले होते.
अब्दुलसह 13 जणांना पकडण्यात आले होते.
त्यांच्यावर पाकिस्तानी आतंकवादींना आश्रय दिल्याचा आरोप होता.
9 वर्षानम्तर मुंबईच्या एका विशेष कोर्टाने त्याला सोडून बाकीच्यांना
दोषी ठरवले होते. आपण निर्दोष असल्याचे स्पष्ट मांडताना जिद्द,चिकाटी महत्त्वाची आहे. खरे तर अनेक गुन्ह्यात पोलिस
स्वत:ची टिमकी वाजवून घेण्यासाठी अनेकांना खोट्या गुन्ह्यात गोवतात,
हा अनुभव काही नवा नाही. त्यामुळेच पोलिसांवर समाजाचा
विश्वास राहिला नाही. (मच्छिंद्र ऐनापुरे)
No comments:
Post a Comment