Monday, April 30, 2018

ढोंगी बाबा आणि आपण


     आजच्या कलियुगच्या जमान्यात फक्त दोनच असे व्यवसाय आहेत, जे अगदी गरिबातल्या गरीब माणसालादेखील गरिबीतून वर काढतात. ते व्यवसाय म्हणजे नेतागिरी आणि बाबागिरी. या स्पर्धेत कधी काळी नेता मंडळी पुढे होते. त्या काळी साधूसंत खरोखरच साधूसंत होते. धर्माच्या नावावर व्यापार करणारे बाबा नव्हते. गेल्या वीस-तीस वर्षात मात्र सर्व काही बदलले आहे. बाबा लोकांची इतकी ताकद वाढली आहे की, त्यांनी नेतागिरी करणार्यांनाही आपला अनुयायी बनवले आहे. उत्तराखंडमधला एक बाबा तर इतका मोठा उद्योगपती बनला आहे की, आज मोठमोठ्या परदेशी कंपन्यादेखील त्यांना घाबरत आहेत. बाबा रामदेव यांचा पंतजली समूह आज लाखो-कोट्यवधींचा व्यवसाय करत आहे. फारच कमी लोकांना ठाऊक असेल की, कधी काळी बाबा रामदेव टीव्हीवर फक्त योगा शिकवायचे.
   
 योग शिकवणारे आणखी एक बाबा होते. सत्तरच्या दशकात धीरेंद्र ब्रम्हचारी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना योग शिकवायला पंतप्रधान निवासस्थानी जायचे, बघता बघता ते इतके मोठे योगाचार्य बनले की, दिल्लीतल्या लुटियंस परिसरातल्या एका मोठ्या सरकारी बंगल्यात त्यांना त्यांचा आश्रम उघडण्यास परवानगी मिळाली. नंतर त्यांची मैत्री इंदिरा गांधी यांचा धाकटा मुलगा संजय गांधीशी झाली. मग तर काय, त्या बाबाची इतकी प्रगती झाली की, त्यांनी जम्मूमध्ये बंदुका बनवण्याचा कारखाना उघडला. त्यांची संपत्तीदेखील प्रचंड प्रमाणात वाढली. असे असले तरी ते योगा विसरले नाहीत. जम्मूजवळ मन्तलय नावाच्या एका सुंदर घाटावर त्यांनी एका आधुनिक आश्रमाची निर्मिती केली. तिथे स्वामी महाराज आपल्या खासगी विमानाने जात, तेव्हा मोठमोठ्या उद्योगपतींना आपल्या स्वत:च्या मालकीचे विमान खरेदी करण्याची क्षमता नव्हती. त्या आश्रमात स्त्रिया आणि मुलींना राहण्यासाठी आश्रमात सोय केली जायची तर मुलांना किंवा पुरुषांना तंबूत सोय असायची.
     स्वामींच्या आजूबाजूला सुंदर मुली वावरायच्या,पण त्यांच्यावर कधी बलात्काराचा आरोप झाला नाही. आजचा काळ इतका बेकार आहे की, एका पाठोपाठ एक बाबा बलात्कारी सिद्ध होत आहेत आणि तुरुंगाची हवा खात आहेत.गेल्यावर्षी बाबा रहिम तुरुंगात गेले आणि आता गेल्याच आठवड्यात बाबा आसाराम तुरुंगात गेले. तुरुंगात गेल्यावर या दोन्ही बाबांची संपत्ती उघड झाली आहे. ती ऐकून लोकांना चक्कर यायची वेळ आली आहे. मोठमोठ्या उद्योगपतींपेक्षाही अधिक संपत्ती या लोकांकडे सापडली आहे.
     खरे तर या बाबांनी नेतागिरी करणार्या लोकांना आपल्या दरबारात शरण देऊन इतके मोठे झाले आहेत. पण याला खरे दोषी आपणही आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. आपण वर्तमानपत्रे वाचतो, टीव्ही पाहतो, यात आपल्या लक्षात येते की, चांगले शिकले-सवरलेले लोकदेखील बाबांच्या तावडीत सापडले आहेत. त्यांच्यासाठी आपली संपत्ती उधळली आहे. कुणी आपला जमीन-जुमला दिला आहे. आपली धन-संपत्ती बाबांकडे सोपवली आहे. मानसिक, शारीरिक आजारावर आज आधुनिक उपचार निघाले आहेत, पण तरीही माणसे अशा बाबांच्या शरण जाऊन आपले सर्वस्व गमावून बसतात. के मोठे धक्कादायक आहे.
     बाबा आसारामबापूला आज जी शिक्षा झाली, ती एका मुलीमुळे! ती आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यानेच बाबा आसाराम तुरुंगात गेला. एक एक साक्षीदार आपला जीव गमावत गेले. तिच्या आई-वडिलांना बाबाच्या समर्थकांकडून धमक्या मिळाल्या,पण ती मुलगी बधली नाही. पण याच मुलीच्या आई-वडिलांनी बाबाच्या आश्रमासाठी आपली जमीन दिली होती.   शेवटी या ढोंगी बाबाचे पितळ उघड पडले आणि तो तुरुंगाची हवा खायला गेला. त्याने ज्या मुलीशी दुर्व्यवहार केला होता, तिच्या ठामपणामुले ते शक्य झाले. आज अशा मुलींची देशाला गरज आहे. अर्थात त्यांच्याशी होणारा संघर्ष हा दीर्घ काळ असणार आहे,कारण आपल्या महान देशात अंधश्रद्धा इतकी फोफावली आहे की, ढोंगी बाबांनाच आपण देव मानायला लागलो आहोत.

Sunday, April 29, 2018

अनाथांचा नाथ: लामा थुपटेन फुंसोक


     अरुणाचल प्रदेशातलं तवांग हे एक अतिशय सुंदर शहर आहे.नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या प्रदेशातील बहुतांश लोक शेती आणि पशुपालनाचा व्यवसाय करतात. याशिवाय पर्यटन हादेखील इथल्या लोकांचा प्रमुख्य उत्पन्न स्त्रोत आहे. लामा थुपटेन फुंसोक यांचा जन्म तवांगमधल्या एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण सरोवर आणि पहाडी इलाक्यादरम्यान अगदी मजेत चाललं होतं. पाच वर्षे झाली, तेव्हा त्यांच्या वडिलांनी गावातल्या शाळेत त्यांचं नाव दाखल केलं. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं आणि अचानक त्यांचं जीवनच बदलून गेलं. तेव्हा ते फक्त नऊ वर्षांचे होते. आई आजारी पडली आणि त्यातच ती सगळ्यांना सोडून गेली. थुपटेन अनाथ झाले. त्यांच्या मनातली गोष्ट जाणून घ्यायला कुणी शिल्लक उरलेच नव्हते.

     आईच्या जाण्याने ते खूप उदास राहू लागले. कुठेच मन लागत नव्हते. एके दिवशी ते शाळेतून घरी परतत होते. वाटेत त्यांना दोन बौद्ध भिक्षू भेटले.भिक्षूंनी त्यांना पाहिले आणि उदासीचे कारण विचारले. बोलता बोलता ते भिक्षू त्यांना म्हणाले, तुला बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायला हवी. भिक्षूंची ही गोष्ट ऐकून त्यांना फार मोठा आनंद झाला. त्यांनी निश्चय केला की, आपण लामा बनायचे. दुसर्या दिवशी ते मठात पोहचले. यानंतर त्यांचे जीवनच बदलून गेले. त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. सुरुवातीला भिक्षूचे जीवन कठीण वाटले.घरापासून लांब राहून कडक शिस्तीत जगावं लागलं. पण त्यांनी आपल्या जीवनाची दिशा निश्चित केली होती. हळूहळू मठ हेच त्यांचे कुटुंब बनले. एका बुद्ध भिक्षूचे आयुष्य सामान्य लोकांच्या जीवनापेक्षा फारच वेग़ळे असते, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. सुरुवातीचे काही महिने त्यांना कठीण गेले. पण नंतर मात्र त्यांना ते आवडू लागले.
     थुपटेन पुढील शिक्षणासाठी दक्षिण भारतात निघून गेले. तिथली संस्कृती त्यांना मानवू लागली. परंतु, ते आपल्या हृदयातून तवांगला कधी दूर करू शकले नाहीत. काही दिवसांनंतर त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. ते गरीब कुटुंबातले असल्या कारणाने त्यांना तिथल्या गरीब आणि अनाथ मुलांची ओढ लागली. त्यांच्यासाठी काही तरी करावसे वाटू लागले. याच निश्चयाने  ते पुन्हा आपल्या शहरात परतले. मठ आणि प्रवासादरम्यान त्यांनी कित्येकदा बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना ऐकले होते. ते आपल्या गृहक्षेत्रासाठी काही तरी करायला हवे, असे आपल्या बोलण्यातून अधिक जोर देऊन सांगत असत. त्यांची व्याख्याने ऐकून त्यांच्या अंतर्मनात तवांगमधल्या अनाथ मुलांसाठी काही तरी करण्याची प्रेरणा जागी झाली.
     परत आल्यावर थुपटेन एका पब्लिक स्कूलमध्ये शिकवू लागले. शाळेकडून चांगले वेतन मिळत होते. शिक्षक असल्याकारणाने परिसरात मानसन्मान मिळत होता. पण त्यांचे मन त्यात रमत नव्हते. त्यांना नेहमी त्या मुलांची काळजी सतावत होती, जे फी देऊ शकत नसल्याने शाळेत जाऊ शकत नव्हते. त्यांच्या मनाला याची चुटपूट लागून राहत होती की, आपण नोकरी करायला तवांगला आलेलो नाही. तर आपल्याला गरीब आणि अनाथ मुलांसाठी काही तरी करायचे आहे. ते ज्या शाळेत शिकवत होते, त्या शाळेत श्रीमंत कुटुंबाची मुले शिकायला येत. ते त्या अनाथ आणि दिव्यांग मुलांना पाहून दु:खी व्हायचे, ज्या मुलांना शाळेला जाता येत नव्हते. शेवटी त्यांनी नोकरी सोडून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला.
     शाळा सुरू करायची म्हटल्यावर त्यासाठी जमीन हवी. त्यांनी तवांगमध्ये स्वस्तात जमीन मिळते का, याचा शोध सुरू केला. जमीन खरेदी करण्यासाठी त्यांनी त्यांच्याजवळ जी काही संपत्ती होती, ती डावावर लावली. यानंतर शाळेची इमारत उभी करण्यासाठी पैशांची चणचण भासू लागली. अनेकांना त्यांनी मदतीची हाक दिली. 1993 मध्ये स्थानिक प्रशासन आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून शाळेची इमारत तयार झाली. शाळा पूर्णपणे गरीब लोकांसाठीच होती. पण अडचणी काही कमी झाल्या नाहीत. गावातल्या मुलांना शिक्षणासाठी एकत्र गोळा करण्याचं कामदेखील कठीण होतं. बहुतांश गरीब मुलं मोलमजुरी करायचे. जर ते शिकायला शाळेत येऊ लागले तर त्यांचे घर कसे चालायचे? त्यामुळे अशी कुटुंबे आपल्या मुलांना शाळेत कशी पाठवणार? त्यांच्या अडचणी योग्य होत्या. पण त्यांना असेच वार्यावर  सोडून कसे चालणार?
     थुपेटन यांनी गावोगावी जाऊन लोकांशी संवाद साधला. गरीब शेतकरी,मजुरांना भेटले. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करू लागले. गरिबीपासून सुटका करून घ्यायची असेल तर मुलांना शिकवणे गरजेचे आहे, हे ते लोकांना सांगत.  शेवटी मोठ्या मुश्किलीने 17 मुलं शिकायला तयार झाली. अशा प्रकारे त्यांच्या शाळेची सुरुवात झाली. शाळेत शिकवण्याबरोबरच मुलांना राहण्या-खाण्याची व्यवस्थाही करण्यात आली. हळूहळू संख्या वाढत गेली. 1998 मध्ये त्यांनी मंजूश्री विद्यापीठाची स्थापना केली. या शाळेत अनाथ आणि दिव्यांग मुलांसाठी प्राधान्य देण्यात आले. थुपटेन यांनी त्यांच्या बालपणीच त्यांच्या आईला गमावले होते. त्यामुळे अनाथ होण्याच्या वेदना काय असतात,याची कल्पना त्यांना आली होती. त्यांनी असा प्रयत्न केला की, अशा मुलांना शाळा आपली वाटली पाहिजे,मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे आणि त्यांना एक प्रामाणिक, चांगला नागरिक बनवले पाहिजे. पुढे जाऊन हीच मुले अनाथ, गरीब आणि असहाय्य लोकांना मदत करू शकतील. थुपटेन आपल्या परीने आणि सावकाशीने समाजसेवेला लागले. हळूहळू त्यांच्या या कामाची दखल घेतली जाऊ लागली. आज मंजूश्री विद्यापीठात जवळपास शेकडो मुले मोफत शिक्षण घेत आहेत. 2004 मध्ये प्रदेश सरकारने त्यांचा सामाजिक कार्यासाठी गोल्ड मेडल देऊन गौरव केला. 2006 मध्ये त्यांना उत्तर-पूर्व अॅवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले आणि 2007 मध्ये केंद्र सरकारने त्यांचा मानाचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला.

Saturday, April 28, 2018

चांगल्या नेतृत्त्वाची लक्षणे


      लोक नेहमी विचार असतात की, एक चांगला वक्ता आणि एक चांगला लिडर यांच्यात काय फरक असतो? ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि लेखक स्वप्निल कोठारी याचं उत्तर मानसिकतेत असल्याचे सांगतात. एका चांगल्या वक्त्त्याचे अस्र आणि शस्त्र हे त्याचे  फक्त शब्द असतात. त्याचे विचार असतात. पण एक चांगला लिडर सर्वात पहिल्यांदा शब्द आणि विचारांना स्वत: आपल्या जीवनात आत्मसात करतो. त्यानंतरच तो दुसर्यांना तसे वागण्याविषयी सांगतो. आपल्या सगळ्यांना एका महात्म्याची एक गोष्ट माहित आहे. ती बर्याचदा महात्मा गांधींपासून सुकरातपर्यंत कुणाकुणाच्या नावावर खपवण्यात आली आहे. असे जरी असले तरी त्या कथेचे महत्त्व काही कमी होत नाही. ती गोष्ट अशी आहे: एक महिला आपल्या शाळकरी मुलाला घेऊन एका महात्म्याकडे जाते. त्या मुलाला गूळ फार आवडत असतो आणि तो साहजिकच जास्त गूळ खात असतो. त्याची ती सवय बंद करण्यासाठी त्याची आई त्याला घेऊन त्या महात्म्याकडे घेऊन आलेली असते. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की, त्या महात्म्यालादेखील अधिक गूळ खाण्याची सवय असते. अर्थात महात्मा लोक स्वत: आचरण असल्याशिवाय तसे करायला कुणाला सांगत नाहीत. त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक असा प्रकार नसतो. साहजिकच ते महात्मा त्या महिलेला आठ दिवसांनंतर पुन्हा यायला सांगतात. या आठ दिवसात ते गूळ खाण्याचे सोडतात आणि ती महिला आपल्या मुलाला पुन्हा येते, तेव्हा मग ते त्या मुलाला गूळ न खाण्याचा सल्ला देतात. जास्त गूळ खाल्ल्याने काय परिणाम होतात, तेही सांगतात.

     म्हणजेच जो लिडर असतो, तो जे सांगतो, ते अगदी मनापासून सांगतो. त्यामुळे त्याचे बोलणे अगदी हृदयात उतरते. आपण इतिहास धुंडाळून पाहिला तर आपल्या लक्षात येईल की, सर्वच महापुरुष आपल्या विचारांना पहिल्यांदा आचरणात आणत, मग अन्य लोकांना ते त्याच्याबाबत सांगत.ज्याचे आचरण शुद्ध असते, लोक त्यालाच मान देतात. ही माणसे स्वत: आचरण करीत,मग तसे करायला सांगत. मग ते राम असतील, कृष्ण असेल, बुद्ध किंवा महावीर असतील. त्याचबरोबर महात्मा गांधी,सुभाषचंद्र बोस अथवा मार्टिन लूथर असतील, या सगळ्यांच्या बोलण्यात वजन, सांगण्यात प्रेरणा आणि हृदयात उतरणारा विशेष गुण असतो. स्टीव जॉब्सचे जीवन जर नवयुवकांना प्रेरणादायी असेल तर ते यासाठी की, ते स्वत: 18 ते 20 तास सतत काम करीत असत. फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग आपल्या प्रोजेक्टसमध्ये स्वत:ला अगदी झोकून देत असतात. विश्वप्रसिद्ध अँकर ओफ्रा स्वत: जीवनातले सर्व कटू प्रसंग झेलून पुढे आले आहेत.
     वॉरेन बफेट रोज पाचशे पानं वाचतात आणि भाषणापूर्वी फक्त आऊटलाइन बनवतात. ते व्यासपीठावर बोलत असतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यात अगदी सहजता असते. ते श्रोत्यांवर आपली छाप सोडतात. प्रत्येक यशस्वी व्यक्ती आपली स्वत:ची एक स्वतंत्र  शैली बनवतात. कारण ते स्वत: तसे दिवस-रात्र जगत असतात. त्यामुळेच ज्यावेळेला ते दुसर्याला सांगतात, तेव्हा ते अनुकरणीय बनलेले असते.
     खरे तर खरी ताकद शब्दांमध्ये नसते तर त्याच्या मागे असलेल्या कर्मात असते. त्याच्या जीवन दर्शनमध्ये असते. तसे जीवन जगून त्याला जीवंत करतात. काही शब्दांची आठवण जरी काढली तरी त्यासंबंधीत महान पुरुषांची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर येते. कारण त्यांनी त्या शब्दांना जीवन देण्यासाठी आपले जीवन पणाला लावलेले असते. जर तुम्हाला या जगात बदल हवा असेल, तर पहिल्यांदा स्वत: ला बदला. जर निखार्याचे चटके कसे असतात, ते दुसर्याला सांगायचे असेल तर पहिल्यांदा ते आपल्या हातात पकडून ठेवायला हवेत.

Friday, April 27, 2018

... आणि शंकर-जयकिशन संगीतकार बनले


      ही घटना साधारण 1948-49 ची असावी. पृथ्वीराज कपूर यांच्या थिएटरमध्ये एक तबलावादक एक बंदिश सारखा गुणगुणायचा, ती बंदिश होती अशी: अमुआ का पेड है वो ही मुंडेर है, आजा मेरे बालमा अब काहे की देर है...  हा तबलावादक हैद्राबादहून साधारण चार-पाच वर्षांपूर्वी मुंबईला आला होता. तो तबला वाजवण्यात प्रवीण होता. त्याला आशा होती की, या शहरात त्याच्या कलेची कदर केली जाईल. योगायोगाने त्याला पृथ्वीराज कपूर यांच्या थिएटरमध्ये काम मिळाले होते. इथे त्याचे काही मित्रही बनले होते. यात तबलावादक चंद्रकांत भोसले आणि गुजरातचा हार्मोनियम वाजवणारा जयकिशन यांचादेखील समावेश होता. या दरम्यान पृथ्वीराज कपूर यांच्या अभिनेता मुलाने आग (1948) नावाचा पहिला चित्रपट सुरू केला होता. या चित्रपटाचे संगीत राम गांगुली यांच्याकडे सोपवण्यात आले होते. आणि शंकर-जयकिशन त्यांचे सहाय्यक होते.

     आग बनवताना प्रशिक्षित गायक असलेले राज कपूर यांनी कित्येकदा शंकर यांच्या तोंडून अमुआ का पेड है वही मुंडेर है... ही बंदिश ऐकली होती. आग नंतर राज कपूर यांनी बरसात बनवायला घेतला. याचे संगीतदेखील राम गांगुली यांच्याकडेच सोपवण्यात आले.यातील एका गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान राम गांगुली आणि राज कपूर यांच्यात मतभेद झाले. त्यावरून वादही झाले. याचा परिणाम असा झाला की, राज कपूर यांनी बरसात चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी काढून घेतली आणि ती शंकर यांच्याकडे सोपवली. शंकर यांनी राज कपूर यांना विनंती केली की, माझ्यासोबत जयकिशन यांनादेखील घेतल्यास चांगले होईल. अशा प्रकारे 1949 मध्ये बरसात मध्ये पहिल्यांदा शंकर-जयकिशन यांची संगीतकार जोडी बनली.
     शंकर बरसातच्या गाण्यांवर काम करीत असताना राजकपूर यांना ते गुणगुणत असलेली बंदिश अमुआ का पेड है... आठवली. त्यांनी ही बंदिश चित्रपटात वापरण्याचा निर्णय घेतला. आणि महिन्याला 11 रुपये पगारावर मुंबईतल्या बेस्टमध्ये कंडेक्टरची नोकरी केलेल्या हसरत जयपुरी यांना यावर गाणे लिहायला सांगण्यात आले. गाण्याचा मुखडा खरे तर शंकर यांनी ऐकवलेल्या बंदिशीवर आधारित होता. यात जयपुरी यांनी थोडा फार बदल केला. जयपुरी यांच्या गाण्याचा मुखडा होता, जिया बेकरार है, छाई बहार है, आजा मेरे बालमा तेरा इंतजार है... जयपुरी यांचे पहिले गाणे रिकॉर्ड झाले, ते फारच गाजले. याबरोबरच बरसात ची सगळीच गाणी लोकांच्या ओठांवर राहिली. सगळ्याच गाण्यांना लोकांनी डोक्यावर घेतले.
     बरसात च्या यशानंतर शंकर-जयकिशन यांच्या जोडीने नंतर असा काही धुमाकूळ घातला, त्यांना जवळपास 20 वर्षे कोणी त्यांच्या स्थानापासून हटवू शकले नाही. त्यांचा आवारा, श्री 420, बसंत बहार, अनाडी, चोरी चोरी, मेरा नाम जोकर, दाग,यहूदी सारख्या चित्रपटांनी यशाचा झेंडाच गाडला.  चित्रपटसृष्टीत त्यांना पर्यायच नव्हता. शंकर-जयकिशन म्हणजे हिट चित्रपटाची गॅरंटी! निर्माते त्यांच्या नावामुळे पैशांची थैली मुक्तहस्ते खोलायचे. शेवटी यश हा एक असा पतंग आहे, ज्याला शेवटी खाली यावेच लागते. हा नियतीचा खेळ आहे. 1966 मध्ये सूरज या चित्रपटानंर्ईंर ही जोडी फुटली. शारदा ( तितली उडी... या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली) या नव्या नायिकेला शंकरद्वारा प्रोत्साहन दिल्याचे कारण या मागे असल्याचे सांगितले जाते. 1971 मध्ये जयकिशन आणि 1973 मध्ये शैलेंद्र यांच्या मृत्यूनंतर शंकर एकट्याच्या जीवावर यश कायम ठेवू शकले नाहीत. त्यांच्या अहंकारी स्वभावामुळे निर्माते त्यांच्यापासून दूर होत गेले. आर. के. कँपने बॉबी चित्रपटासाठी त्यांच्या जागी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना घेतले. 26 एप्रिल 1987 मध्ये शंकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या नातेवाईकांनी सिनेसृष्टीला दिली नाही. राज कपूर यांनाही सांगण्यात आले नाही. अनेकांना त्यांच्या मृत्यूची बातमी दुसर्यादिवशी वर्तमानपत्रातच वाचायला मिळाली.

शंकर (जयकिशन)
15 ऑक्टोबर 1922- 26 एप्रिल 1987
बरसात प्रदर्शित झाल्यावर याच्या गाण्याने संपूर्ण देशाला वेड लावले. सिनेमा- संगीत एका वेगळ्या वळणावर पोहचला. बरसात मागे आठ माणसांचे कष्ट होते. आणि विशेष म्हणजे यातील एकही व्यक्ती 30 वर्षे वयाच्या पुढचा नव्हता. यात हसरत जयपुरी आणि शंकर यांचे वय सर्वात अधिक म्हणजे 27-27 होते. सगळ्यात कमी वय निम्मी(16 वर्षे) होते. जयकिशन (20), लता मंगेशकर (20), मुकेश (26), शैलेंद्र (26), राज कपूर (25), नरगिस (20) यांची एक टीम तयार झाली होती. शंकर-जयकिशन आरके स्टुडिओचे अविभाज्य भाग होते. या जोडीतील शंकर यांचा काल स्मृतिदिन होता

उद्योगपतींची देशनिष्ठा कुठे गेली?


     आपला देश कृषीप्रधान असला तरी इथे उद्योगपतींचेच चोचले पुरवले जात आहेत. त्यांनाच अधिक गोंजारले जाते. त्यांच्यासाठीच सवलतींच्या पायघड्या घातल्या जात आहेत. आणि हीच मंडळींनी सरकारच्या मेहरबानीवर प्रचंड पैसा कमवून देशाचा त्याग करून अन्य देशांचे नागरिकत्व स्वीकारत आहेत. देशातला प्रचंड असा पैसा परदेशात गुंतवून आपल्या देशाला मात्र कंगाल करून सोडत आहेत. आधीच देशातल्या बँकांना बुडवून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करून सोडणारे विजय मल्ल्या, नीरव मोदीसारखे उद्योजकांनी परदेशात पळ काढला आहे. या उद्योजकांमुळे किती तरी कोट्यवधींचे नुकसान होत असताना सरकार मात्र सवलतींच्या पायघड्या त्यांच्यासाठीच घालत आहे. हा प्रकार आता तरी बंद होणार आहे की नाही असा प्रश्न आहे. देशाला किती लुटू द्यायचे यालाही काही मर्यादा आहेत.

     देशातला सर्वसामान्य महागाईच्या खाईत भरडला जात आहे. शेतकरी तर देशोधडीला लागला आहे. देशातली 65 टक्के लोकसंख्या अजूनही शेतीवर अवलंबून आहे.पाणी,वीज, रस्ते, शेतीमाल प्रक्रियेअभावी शेती तोट्यात चालली आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या काही थांबण्याचे नाव घेत नाहीत, अशा परिस्थिती खरे तर शेतीकडे आणि त्याच्या अर्थकारणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असताना कोणतेही नियोजन न करता केवळ शेतीचे उत्पन्न दुप्पट करू म्हणून ते तसे होणार आहे का, याचा विचार व्हायला हवा आहे. देशभरातून शेतकरी उठाव करीत आहे. आंदोलन करीत आहे. फक्त त्यांच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी फसव्या घोषणा करणे खरे तर योग्य नाही. तोंडदेखलेपणा करून एकाला गोंजारायचे आणि एकाला फटकारायचे याच्याने लोकांचा सरकारवरचा विश्वास राहणार आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर फिरत आहेत. त्यांनी आपल्या विश्वभ्रमणीतून देशाचा काय लाभ केला किंवा मिळवून दिला हे खरे तर सांगण्याची गरज आहे. देशातले धनदांडगे उद्योजक देश सोडून का जात आहेत, याचे उत्तरदेखील लोकांना मिळायला हवे. देशातले करोडपती लोक देश सोडून जात असतील तर देशात राहणार कोण? देशाचा विकास कसा साधला जाणार?
     आपल्या देशातल्या जवळपास सतरा हजार श्रीमंत उद्योजकांनी 2015 ते 2017 अखेर देशाचा त्याग केला आहे. चीननंतर भारत हा दुसरा देश आहे, ज्या देशातले श्रीमंत लोक देशाला सोडून जात अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारत आहेत. एक साधे फक्त उदाहरण मोठे बोलके आहे. अलिकडेच मुंबईतले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हिरानंदानी समुहाचे संस्थापक सुरेंद्र हिरानंदानी यांनी आपल्या देशाचा त्याग करून सायप्रस देशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. सुरेंद्र यांचा मुलगा हर्ष हाच तेवढा भारतात राहणार आहे. भारतला व्यवसाय पाहण्यासाठी तो इथे थांबणार आहे. हळूहळू तोदेखील देशाला सोडून जाईल. कारण त्यांचा व्यवसाय अन्य देशात स्थीरस्थावर झाल्यावर त्यांना आपल्या मातृभूमीचा उबग येण्याची शक्यता आधिक आहे.  जगप्रसिद्ध फोर्ब्स नियतकालिकानुसार सुरेंद्र हिरानंदानी यांचा भारतातील पहिल्या शंभर श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे. ज्यांच्याकडे देशाभिमान, देशनिष्ठा नावाची चीज नाही, अशा लोकांवर सवलतींची खैरात करणे सोडून तर द्यायला हवेच शिवाय देशाशी गद्दारी करणार्यांवर कठोर कारवाईदेखील करायला हवी आहे. निवडणुकीसाठी मूठभर देणगी देणार्या लोकांच्या बाजूने कायदे करून देश विकायला काढण्याचाच प्रकार असून सरकारने वेळीच सावध होऊन, यावर उपाययोजना करायला हवी आहे. आपल्या देशात श्रीमंतांच्या केसालाही इथला कायदा धक्का लावू शकत नाही, मात्र गोरगरीबाला शिक्षेच्या तोंडी दिले जाते. हा अजब न्याय फक्त भारतात घडू शकतो.
     देशातला गरीब हा आणखी गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होत चालला आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिक यांनाच नेहमी अधिक झुकते माफ दिले जात आले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या कचाट्यात फक्त सर्वसामान्य आणि शेतकरीच अडकत चालला आहे. महागाई वाढीची झळ फक्त यांनाच सोसावी लागते. शेतकरी तर पुरता कोलमडून पडला आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या हाताला काम नसल्याने डिप्रेशन, गुन्हेगारीमध्ये जात आहे. ज्या वयातील मनुष्यबळाचा उपयोग देशाने करून घ्यायला हवा आणि देश विकास साधायला हवा, तेच बेरोजगार पदव्यांच्या भेंडोळ्या हातात घेऊन कामासाठी वणवण हिंडत आहेत. अकुशल कामगारांचाही मोठा प्रश्न आहे. त्यांच्या पोटापाण्याला पुरेल इतकी मजुरी त्यांच्या तेवढ्या कामाच्या मोबदल्यात मिळत नाही. अतिश्रम करूनही त्यांचे पोट भरत नाही. अशीच परिस्थिती आणखी काही वर्षे राहिली तर देशात अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही. लोकांना आपले पोट भरण्यासाठी लुबाडण्याशिवाय काहीच पर्याय राहणार नाही. आणि ज्यांना लुबाडायचे तेही देश सोडून चालले आहेत,मग लुबाडायचे कुणाला? इथे चोरी या गुन्ह्याचे समर्थन करायचे नाही पण आजची वाढलेली गुन्हेगारी,चोर्या हे कशाचे द्योतक आहे.      लोकांना पोटभर खायला मिळाल्यावर कोण या कुप्रवृत्तीकडे वळणार आहे? माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांनी 2020 ला भारत महासत्ता बनेल, असे म्हटले होते. पण महासत्तेची चिन्हे अजून कुठेच दिसत नाहीत. देशहित आणि सकारात्मक विचारसरणीच्या डॉ. कलाम यांना काय माहित की, आपल्या देशात चालले आहे काय? देश महासत्ता होऊ दे अथवा न होऊ दे, पहिल्यांदा इथल्या सर्वसामान्य लोकांना, शेतकर्यांना सुखासमाधाने चार घास अन्न खायला मिळावे, हीच खरी अपेक्षा आहे. देशाचे अर्थकारण बदलायचे असेल तर उद्योजकधार्जिण नितीचा त्याग देशाने करून सर्वसमावेशक धोरण राबवायला हवे.

Wednesday, April 25, 2018

... आणि ती वेश्यालयात पोहचली


     ती फक्त तेरा-चौदा वर्षांची होती. आपलं चांगलं वाईट कशात आहे, हे कळण्याइतपत तिच्या बुद्धीचा विकास झालेला नव्हता. या वयात तिचं लग्न लावून दिलं. तिला विचारण्याचा तर प्रश्नच नव्हता. ती आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात राहणारी! अर्थात तेरा-चौदा वर्षे वयात मुलींची लग्नं होणं, ही त्या परिसरातील सर्वसामान्यच गोष्ट होती. फक्त सामान्य नव्हता तो तिच्या सासरचा तिच्याशी असलेला व्यवहार! सासरी गेलेल्या पहिल्या दिवसापासूनच तिला नरक यातना द्यायला सुरुवात झाली. तिचा नवरादेखील तिच्याशी अगदी क्रूर माणसासारखा वागायचा. ती गरोदर होती, त्या दिवसांतही तो तिला मारहाण करायचा. अवघ्या पंधरा वर्षाच्या वयात ती एका मुलीची आई झाली. मूल झालं आहे, म्हटल्यावर तरी सासरची मंडळी आपल्याला छळायचे बंद करतील असे वाटले होते,पण त्यांच्यावर कशाचाच परिणाम झाला नाही. त्यांचा छळ चालूच राहिला.ही कथा आहे, मानवी तस्करी विरोधात लढा उभारणार्या रमा देवीची!

     सासरच्या मंडळींच्या नरक यातना तिला असह्य झाल्या. पाणी डोक्यावरून गेलं. शेवटी तिने आपल्या तानुल्या मुलीसह सासरचं घर सोडलं. पण तरीही त्या हैवानी माणसांवर कसलाच फरक पडला नाही. इकडे माहेरी आई-वडील मोलमजुरी करायचे आणि आपले पोट भरायचे. त्यात आता रमादेवीची आणि तिच्या मुलीची भर पडली. आई-वडील दिवसभर कामाला बाहेर जायचे. घरी फक्त ती आणि तानुली. या काळात तिच्या शेजारी राहणार्या एका मुलीशी ओळख झाली. ती तिची चांगली मैत्रीण बनली. याशिवाय शेजारीच तिच्या आईच्या वयाच्या दोन महिला राहत होत्या. त्यांना रमा देवीच्या दिवसभराची खडानखडा माहिती होती. काही दिवसांत त्यांच्याशीही रमादेवीचे चांगले पटायला लागले.
     एके दिवशी त्या महिलांनी तिला आणि तिच्या मैत्रिणीला सिनेमाला जाण्याचा प्रस्ताव ठेवला. महिलांनी त्यांच्यावर अशी काही जादू केली की, त्या दोघीही त्यांच्या लाघवी बोलण्याला फसल्या. रमादेवी तर लहानग्या म्हणजे अवघ्या पाच महिन्याच्या  मुलीला घरीच सोडून सिनेमाला जायला तयार झाली. या बायकांवर संशय घ्यावा, असे काही वाटण्यासारखी परिस्थिती नव्हती. एकदम अगदी शेजार्यांसारखा त्यांचा व्यवहार होता. वागणे होते. सिनेमाचा मध्यंतर झाला. या कालावधीत दोघी मैत्रिणींना कोल्ड ड्रिंकमधून बेशुद्धीचे औषध पाजण्यात आले होते. शुद्धीवर आल्यावर त्यांना मुंबईतल्या एका वेश्यालयात असल्याचे समजले. तिच्या डोळ्यांवर दिवसा चांदण्या दिसायला लागल्या. त्यांचा सौदा करण्यात आला होता. रमा देवीने तिथल्या कित्येक लोकांना सोडून देण्याची विनंती केली. आक्रोश केला. पण त्याचा काही एक फायदा झाला नाही. रमादेवीने तिथल्या नरक यातनेतून सुटका करण्याचा प्रयत्न केला, पण तो विफल ठरला.
     तिथल्या लोकांच्या सांगण्यानुसार न वागल्यास तिला मारहाण करण्यात येत असे. डोळ्यांत मिरचीपूड टाकली जायची. जवळपास एक वर्ष असाच प्रकार चालला. तरीही ती तेथून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतच राहिली. के करत असताना ती अन्य मुलींनादेखील वेश्यालय प्रमुखांविषयी भडकवून द्यायची. शेवटी दुसर्या मुली तिच्या जाळ्यात अडकू नयेत म्हणून तिला सोडण्यात आले. अमादेवीला सोडल्यावर ती तडक आपल्या गावाकडे आली. इकडे तिच्या घरच्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. तिने तिच्या मुलीला विचारले, तुझी आई कुठे आहे? तर तिने उत्तर दिले, माझी आई मेली. हे ऐकून ती आतून पूर्णपणे तुटली. तिला जगण्यातच रस वाटेना. आत्महत्या करण्याचे विचार तिच्या डोक्यात घुमू लागले. पण नंतर तिला जाणीव झाली की, आपण मरून गेल्यावर काय? आपली मुलगीदेखील त्याच वाटेवर जाणार? त्यापेक्षा या सिस्तीम विरोधात लढले तर? किती तरी मुली, बायका नरक यातना भोगत असतील. वेश्यालयांच्या कैदेत किती तरी मुली अडकून पडल्या आहेत. त्यांची सुटका केली तर...? त्यांच्यासाठी काम केले तर...? शेवटी मनाची तयारी करून ती अशा मुलींना अशा नरकातून बाहेर काढण्यासाठी बाहेर पडली. तिने पोलिसांना माहिती दिली. सुरुवातीला पोलिसांनी कानाडोळा केला. पण रमादेवीला स्थानिक मिडियांची साथ मिळाली. आणि शेवटी तीन मानवी तस्करांना पकडण्यात आले आणि त्यांना सात वर्षांची शिक्षा झाली.
   रमादेवी एवढ्यावर समाधानी झाली नाही. ती पुन्हा एकदा एनजीओ आणि पोलिसांच्या मदतीने भिवंडीतल्या वेश्यालयात गेली. तिथून तीस महिलांची सुटका केली. आज रमादेवी मोलमजुरी करण्याबरोबरच आंध्र प्रदेशातल्या तिच्या इलाक्यातल्या मानवी तस्करांविरोधात लढा देत आहे. ज्या भागात मानवी तस्करी होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी जाऊन महिलांना जागृत करण्याचे काम करत आहे. तिने आपले संपूर्ण आयुष्य यासाठीच वेचण्याचे ठरवले आहे

यशस्वी माणसांची समान आठ गुणवैशिष्ट्ये


     रिचर्ड सेंट जॉन या अत्यंत यशस्वी लेखकाचे यशाची अष्टसूत्री हे पुस्तक एकदा वाचून भागणारे नाही. पुन्हा पुन्हा वाचावे किंवा त्याचे पारायण करावे, असे हे पुस्तक आहेयात त्यांनी यशस्वी व्यक्तींमध्ये आढळणारी आठ समान गुणवैशिष्ट्ये शोधून काढली आहेत. वास्तविक यशस्वी व्यक्तींची गुणवैशिष्ट्ये शोधून काढणे तसे फारच कठीण आहे,पण त्यांनी आपल्या अथक प्रयत्नांनी, अभ्यासाने आणि मुलाखतीने ती मिळवली आहेत. यशस्वी व्यक्तींविषयी आपल्याला वाचायला आणि ऐकायला फार आवडते. कारण माणसे कशी यशस्वी झाली, हे जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडत असते. त्याविषयी उत्कंठा असते. हे पुस्तक यशस्वी होऊ इच्छिणारांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. यशस्वी होणार्या व्यक्तींमध्ये फक्त आठच गुण असतात, असे नाही. यापेक्षाही अधिक गुण असतात. वेगवेगळे गुणही असतात. व्यावसायिक,कलाकार, उद्योजक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांमध्ये वेगवेगळे गुण असतात. असे जवळपास 300 गुण यशाला कारणीभूत असणारी असतात. मग या गुणांनी काय पेंड खाल्लीय? पण यात लेखकाने समान आणि महत्त्वाचे गुण वेचले आहेत, जे यशस्वीतेसाठी गरजेचे आहेत. यासाठी रिचर्ड सेंट जॉन यांनी तब्बल 500 यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

     लेखकाने यशाची जी अष्टसुत्रे काढली आहेत, ती म्हणजे झपाटलेपणा, काम, केंद्रित लक्ष, जोर, कल्पना, सुधारणा, सेवा आणि चिकाटी होय. यशाला कारणीभूत ठरणारी आणखीही काही गुण वैशिष्ट्ये आहेत, यात सकारात्मक दृष्टीकोन, ध्येयनिश्चिती, मार्गदर्शक मिळवणे, जोखीम स्वीकारणे, अशी 300 घटक आहेत. तंत्र, लोकसंग्रह,संवाद, नैतृत्व ही कौशल्येदेखील यासाठी उपयुक्त आहेत.मात्र या सगळ्यात ही आठ गुणवैशिष्ट्ये सर्वात वर येतात. त्यामुळेच लेखकाने या आठ वैशिष्ट्यांवर अधिक चर्चा केली आहे. मुलाखत देणार्या लोकांनी या आठ वैशिष्ट्यांना प्राधान्य दिल्याचे यातून स्पष्ट होते.
     झपाटलेपणा हा अंगी हवाच आहे. त्याशिवाय माणूस यशस्वी होऊच शकणार नाही. यशस्वी व्यक्तींसाठी, ते जे करतात, ते अतिशय प्रिय असते.म्हणूनच ते झपाटून काम करतात. दुसरे म्हणजे ते खूप काम करतात. कामाशिवाय यश कुणाला मिळत नाही, याची कल्पना आपल्याला आहे. आणि काम करताना अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा एका गोष्टीवर अधिक लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे केंद्रित लक्ष महत्त्वाचे आहे. साहजिकच त्यावर अधिक जोर दिला जातो. म्हणूनच चौथे गुणवैशिष्ट्य जोर. एकादे काम पूर्ण करण्यासाठी एकाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा यशस्वी लोकांचा हातखंडा असतो. यशस्वी लोक नेहमी नवनव्या आणि चांगल्या कल्पना लढवित असतात. माणूस जसजसा पुढे जात असतो,तसतसा त्याच्यात बदलही होत असतो. कारण त्याला अनुभव येत राहतो. या अनुभवातून तो स्वत:मध्ये, आपल्या कामांमध्ये सातत्याने बदल म्हणजेच सुधारणा करत असतो. ही माणसे सेवा देत असतात. इतरांना कायम मूल्यवर्धन होईल, अशी सेवा देत असतात. अशी माणसे अपयशाने किंवा वाटेत आलेल्या समस्यांनी खचून जात नाहीत, ती आपल्या चिकाटीपणामुळे ही वादळे पचवत टिकून राहतात.
     इथे लेखकाने यशाची काही गुपिते नसतात, हे स्पष्टपणे सांगितली आहेत.  यशाची काहीही गुपिते नसतात, हेच यशाचे खरे गुपीत आहे, असे ते सांगतात. त्यांनी सांगितलेली आठ गुणवैशिष्ट्ये विकसित करणे, हाच मूलभूत पाया आहे. ती आपल्याकडे नसतील तर जगातील सर्व गुपिते जरी आजमावून पाहिली तरी आपण कुठेच पोहचू शकणार नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यशाची गुणवैशोष्ट्ये अनुवंशिक नसतात. तर ती कृतीतून मिळवावी लागतात. यश उपजत असते. ते पालकांकडून त्यांच्या पाल्यांमध्ये अनुवंशिकतेने उतरते, असे एक मिथक आहे. पण्अ संशोधन सांगते ते खरे नाही. हे स्पष्ट करताना लेखक मुलाखतींचा आधार घेतात. त्यांनी 500 मुआखती घेतल्या,त्यात एकाही यशस्वी माणसाने अनुवंशिकतेचा संबंध असल्याचे स्पष्ट केले नाही.
     आपल्याजवळ कामाविषयी तळमळ महत्त्वाची आहे. झपाटलेपणा आवश्यक आहे. यशस्वी माणसासाठी झपाटलेपणा ही सुरुवात आहे. महत्त्वाचे म्हणजे यशस्वी व्यक्ती जे करतात, ते त्यांना मनापासून आवडत असल्याने करतात. एकदा का त्यांना झपाटलेपण सापडले तर सुमार कामगिरी करणारादेखील असमान्य कामगिरी करू शकतो. फक्त त्याला ते सापडणं महत्त्वाचं आहे. आपली आवड शोधताना सुरुवातीला त्रास होतो. कारण आपली आवड कशात आहे, हे कधी कधी अणि कुणाकुणाला सापडतच नाही. त्यामुळे ते आवड शोधण्यासाठी अनेक वाटा धुंडाळतात. आपल्या आतल्या आवाजाची हाक ऐकतात. महत्त्वाचे म्हणजे इथे आपल्या खिशातल्या पैशाचे ऐकायचे नाही. आपल्या मनाचे ऐकायला हवे. माणूस पैशांसाठी सर्व काही करत असतो,पण आवडीसाठी काम करायला लागला तर पैसादेखील आपोआप येतो, हे मुलाखत देणार्या व्यक्तीच्या यशावरून लक्षात येते.
     यशस्वी माणसे ही कामाला अधिक महत्त्व देतात. जीव तोडून मेहनत घेतात. मेहनत हेच यशस्वी व्यक्तींमधले समान असलेले दुसरे महत्त्वाचे गुणवैशिष्ट्य आहे. लेखकाने होममेकिंग गुरु मार्था स्टुअर्ट यांना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की, मी खूप कष्टाळू आहे. मी सतत काम करीत असते. दुसरे कुणीतरी तुमचे काम करेल, यावर विश्वास ठेवू नका. महत्त्वाचे असे की, ही यशस्वी माणसे कार्यव्यसनी नव्हे तर कार्यप्रवण असतात. कामात त्यांना आवड असते. काम करताना तुम्हाला निश्चित आनंद व्हायला हवा. चिआट/डे जाहिरात कंपनीचे सहसंस्थापक जे चिआट सांगतात, तुम्हाला कामातून आनंद मिळत नसेल तर तुम्ही चुकीच्या कारणासाठी काम करत आहात, असे समजा. कारण यशस्वी लोकांना काम करताना मजा येत असते. पण हे कोणासाठीही सोपे नाही.
     श्रेष्ठ व्यक्ती सहसा खूप वेळ काम करत असतात. नशीब,उद्या सुट्टी आहे, असे म्हणण्यापेक्षा, असे विचार करा नशीब मी काम करतोय.काम कधीही गुणवत्तेपेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मेहनतीचे चीज होईल यावर विश्वास ठेवा, हे सांगायला लेखक विसरत नाही.
     लक्ष्यकेंद्रित वृत्ती हे यशस्वी व्यक्तींमध्ये आढणारे तिसरे समान गुणवैशिष्ट्य आहे. एखाद्या कामात स्वत:ला झोकून देणे आणि त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.एकच गोष्ट लक्ष देऊन उत्तम करणे,यातून समाधान तर मिळतेच,पण आत्मविश्वासही वृद्धिंगत होतो. आपण एक काम उत्तम करू शकतो, ही गोष्ट आपल्याला खूप आत्मविश्वास देणारी असते. कोणतेही काम कधीही वरवरचे करू नका. उलट यामुळे कमालीचा कंटाळा येतो. यश म्हणजे तर काय? नुसते भरकट राहण्यापेक्षा हळूहळू एका गोष्टीपर्यंत येऊन त्यावर लक्ष केंद्रित करणे. म्हणजे लगेच एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू नका.ही प्रक्रिया हळूहळू व्हायला हवी.कारकीर्द, ध्येय,प्रकल्प यापैकी कशाच्याही सुरुवातीला आपल्याला लक्ष केंद्रित करण्याच्या बरोबर विरुद्ध गोष्ट करावी लागते. आपल्याला थोडा चौकस,व्यापक विचार करावा लागतो.
सीड या विज्ञान नियतकालिकाचे संस्थापक अॅडम ब्लाय सांगतात की, भविष्यातील आपल्या लक्ष्यासाठी आपण कोणती बीजे रोवली आहेत,हेच आपला व्यापक विचार ठरवतो. आपल्याला जेथे जायचे आहे, तेथे पोहचण्याचा मार्ग धुंडाळण्यासाठी तुम्हाला आधी बरेच फिरावे लागते. पण प्रत्यक्षात तेथे पोहचण्यासाठी तुम्हाला त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागते. आपण इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे यशस्वी व्यक्ती या अनेक गोष्टींत श्रेष्ठ नसतात. ते एकाच कोणत्या तरी बाबतीत श्रेष्ठ असतात. संगीतकार क्विन्सी जोन्स यांचे इथे लेखकाने उदाहरण दिले आहे. त्यांना साधी गाडीही चालवता येत नाही,पण त्या त्यांचे पूर्ण लक्ष उत्तम संगीत तयार करण्यावर केंद्रित करतात. आणि त्यांच्यासाठी तेच जास्त महत्त्वाचे आहे. यशासाठी एकमेव उद्दिष्ट असणे महत्त्वाचे आहे.  यशस्वी कंपन्या या लक्ष्यकेंद्री असतात. ही माणसे एकाग्र होण्याची क्षमता विकसित करतात. या क्षमतेवर विजय प्राप्त करायचा असेल तर विचलित करणार्या गोष्टी टाळायला हव्यात.
     चौथे समान गुणवैशिष्ट्य जे यशस्वी माणसांच्या अंगी असते, ते म्हणजे जोर. की माणसे स्वत:ला सतत ढकलत राहतात. प्रेरित करत राहतात. प्रसिद्ध सागरतज्ज्ञ डेव्हिड गॅलो सांगतात, स्वत:ला ढकलत राहा. हे खूप मोठे आहे. नेहमीच. तुम्ही स्वत:ला शारीरिकरित्या, मानसिकरित्या आतून ढकलत राहणे खूप महत्त्वाचे आणि गरजेचे आहे.  यशस्वी व्हायचे असेल तर भिडस्तपणावर मात करायला शिकले पाहिजे. अनेक यशस्वी व्यक्ती मूळच्या भिडस्त स्वभावाच्या असतात, मात्र त्यातून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी त्या कायम धडपडत असतात. आणखी एक मुद्दा इथे स्पष्ट करण्यात आला आहे, तो म्हणजे भिडस्तपणावर मात करताना भिडस्तपणामुळे ज्या काही चांगल्या गोष्टी साध्य होतात, त्या मात्र कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण भिडस्त व्यक्ती (बहुतेकदा) आपला वेळ वाचन, शिक्षण,एकाग्रता, श्रवण, निरीक्षण, कल्पकता यात घालवताना दिसतात. यातूनच त्यांचे ध्येय त्यांना मिळते. सापडते.
     भिडस्तपणाचे फायदे असले तरी आपण आपल्या कोशातच राहिलो तर फुलपाखरू होऊन विविध ठिकाणी विहारायला आपल्याला होणारच नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे भिडस्तपणावर मात करता आले पाहिजे. यावर मात करण्यासाठी सराव सर्वात महत्त्वाचा असल्याचे लेखक सांगतो. यासाठी अतिशय धिटाईने इतरांशी बोलायचा प्रयत्न करायला हवा. लोकांसमोर आले पाहिजे, त्यांच्यासमोर बोलले पाहिजे. आणखी एक अडथळा आहे. त्याकडेही लक्ष द्यायला हवे. स्वत:बद्दल, स्वत:च्या क्षमतेबद्दल असलेल्या शंका हा एक अंतर्गत अडथळा आहे. यातून आपण बाहेर पडणे आवश्यक आहे. यासाठी आतून रेटा देणे महत्त्वाचे आहे. या जगात आपण एकटेच असे नाही की, स्वत:वर स्वत: शंका घेणारे! त्यामुळे थोडे आपल्याच यशाकडे किंवा या आधी साध्य केलेल्या काही गोष्टींकडे मागे वळून पहा. त्यामुळे तुम्हाला धीर येईल. शंका मागे ठेवून पुढे जात राहा. कामास प्रवृत्त होण्यासाठी ध्येय निश्चित करायला हवे. शिवाय स्वत:ला कार्यप्रवण ठेवण्यासाठी एखादे आव्हान स्वीकारा. आव्हाने ही ध्येय गाठण्यासाठीची उद्दिष्ट्ये असतात. स्वत:ला आतून रेटा देण्यासाठी अंतिम मुदत ठरवून घ्यायला हवे. यासाठी अंगी शीस्त हवी नाही का? 
   
 पाचवा महत्त्वाचा गुण आहे कल्पना. यशाचा मार्ग प्रकाशित करण्याचे काम करतात. यशस्वी माणसे खूप चांगल्या कल्पना लढवतात. कल्पना या मानसिक ऊर्जेचा शक्तिशाली स्त्रोत आहे. तुम्ही जर उत्तम कल्पना लढवू शकलात तर तुम्हाला यातून आयुष्यात पुढे जाण्याची ऊर्जा मिळते. आपल्याला माहित आहे की, प्रत्येकजण हा सर्जनशील असतो. त्यामुळे कल्पनेकडे लक्ष द्यायला हवे. शिवाय या कल्पना कशा मिळतात,याचाही विचार करायला हवा. एकादी समस्या घेऊन पाहा, भोवताली, आजूबाजूला पाहा, इतरांचे ऐका, प्रश्न विचारा, कल्पनेची प्रेरणा घ्या, संगती लावा. यातून कल्पनाशक्ती वाढीस मदत होते. चुका आणि अपयश या गोष्टीदेखील महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी तुम्हाला चांगल्या कल्पनांकडे घेऊन जातात. आणि महत्त्वाचे म्हणजे कल्पना मनात आली तर ती लगेच कागदावर उतरवा नाही तर ती लगेच उडून जाते. एकदा का ती उडून गेली की पुन्हा हाताला गवसत नाही.
     सर्व यशस्वी व्यक्तींमध्ये समान असलेले सहावे गुणवैशिष्ट्य म्हणजे सुधारणा. सतत स्वत:ला आणि स्वत: करीत असलेले काम, मग ते स्वत:ची कारकीर्द असो, एखादा प्रकल्प असो, सेवा असो- सुधारत राहण्याचा प्रयत्न करतात. सुधारणा गरजेची आहे. काळाबरोबर जाताना काही गोष्टींमध्ये बदल करणे महत्त्वाचे आहे. पूर्वी साधी बैलगाडी तयार करून माणूस एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाऊ लागला. मात्र यात त्याचा वेळ जास्त होता. खर्चिक होते. मात्र माणूस सतत सुधारणा करत गेल्याने मग गाडी आली. विमानाचा शोध लागला. सुधारणेच्या मागे लागल्याने माणूस बदलत गेला. माणसाचे जीवनदेखील बदलले. आता तर तंत्रज्ञानाचा जमाना आहे. सुधारणा करण्याशिवाय गत्यंतर नाही. पण आपण जे काही करतो, ते उत्तम करण्याचा प्रयत्न करायला हवा. सारखे सारखे चांगले करत राहण्याचा तोटा कधी होत नाही, फायदाच होतो. यासाठी सराव एके सराव महत्त्वाचा आहे.
     आपण आपल्या कामातून दुसर्याला एक प्रकारची सेवा देतो. ही सेवा उत्तम असायला हवी. कोण काय देतो,या कडे थोडा दृष्टीक्षेप टाकू. विक्री प्रतिनिधी ग्राहकांना सेवा देत असतो. व्यावसायिक अशिलांना सेवा देत असतो. डॉक्टर रुग्णांना सेवा देतो, कलाकार प्रेक्षकांना सेवा देत असतो. शिक्षक विद्यार्थ्यांना सेवा देत असतो, अभिनेते दिग्दर्शकाला सेवा देतात, राजकारणी मतदारांना सेवा देतात, लेखक वाचकांना सेवा देत असतो आणि पोलिस नागरिकांना सेवा देत असतो. म्हणजे आपण सर्वजण कोणी ना कोणी कोणाला तरी सेवा देत असतो. त्यामुळे तुम्ही कोणाला सेवा देता, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.  कारण कोणत्याही क्षेत्रातील यश हे तुम्ही नक्की कोणाला सेवा देता, ते तुम्हाला माहित असण्यामध्ये आहे. व्यवसायातील यश हे ग्राहकाला सेवा देण्यावर अवलंबून असते. त्यामुळेच तर जनरल इलेक्ट्रिकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक वेल्श म्हणतात, आम्हाला अशी कंपनी हवी आहे, जी केवळ ग्राहकांना सेवा देण्यावर लक्ष केंद्रित करेल. इथे महत्त्वाचे म्हणजे इतरांना मूल्यवान वाटेल, अशी सेवा देणे गरजेचे आहे. तुम्ही कोणाला सेवा देता, कोणत्या मूल्याची सेवा तुम्ही देता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण त्यामुळे तुम्हाला एक समृद्ध आयुष्य लाभणार आहे. यातून एक गोष्ट आपण शिकली पाहिजे, हे लेखकाने आपल्यापुढे नमूद केले आहे. यातून श्रीमंत होण्याचे सूत्र लेखकाने मांडले आहे. उत्तम सेवेकरी होताना काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. स्वत:ला विसरा आणि इतरांकडे लक्ष द्या, इतरांच्या जागी स्वत: ला ठेवून पाहायला शिका, दुसर्या व्यक्तींचा दृष्टिकोन समजून घ्यायला हवा. महत्त्वाचे म्हणजे आपण ज्यांना सेवा देणार आहे, त्यांचे म्हणणे ऐकायला शिका. मी खूप मोठा आहे हा अहंकार तुम्हाला कमी प्रतीचा सेवेकरी बनवतो. सेवा देताना द्राविडी प्राणायाम महत्त्वाचा आहे.
     यशस्वी व्यक्तींमधील सर्वात शेवटचा आणि समान असणारा आठवा गुणधर्म म्हणजे चिकाटी! हा गुण टिकून राहण्यासाठी महत्त्वाचा आहे. चिकाटी खरोखरीची महत्त्वाची असली पाहिजे. कारण म्हणूनच चिकातीसाठी अनेक समानार्थी शब्द आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर टिकून राहण्याची क्षमता याचे देता येईल. ठामपणा, दृढनिश्चयी वगैरे वगैरे! आपल्याला आपण स्वीकारलेल्या वाटेवर टिकून राहण्यासाठी वेळ, अपयश, चुका, टीका, नकार यातून शिकले पाहिजे. या प्रवासात टिकून राहण्यासाठी खालील उपायांकडे लक्षपूर्वक पाहायला हवे. 1) छोटी पावले टाका,2) माघार घेण्याची वृत्ती सोडा,3) हार मानू नका, 4) पुन्हा उसळण्याची क्षमता अंगी बाणायला हवी,5) दुराग्रहीपणा सोडा,6) उतावळ्यावर संयम थेवा,7) मागे वळून पाहू नका 8) असमतोल काळात टिकून राहा. आणि 9) सातत्यपूर्ण पुढे चालत राहा.
     यशाची अष्टसूत्रे हे पुस्तक अनेकांना लाभाचे ठरले आहे. स्वत:ला लेखकालाही ते फायद्याचे ठरले आहे. त्यामुळे आपल्याला आयुष्यात अलौकिक यश मिळवायचे असेल तर या पुस्तकाचे पारायण करायला हवे.

Monday, April 23, 2018

अभिनेता रहमान


     आपल्याला एखाद्या गोष्टीत कारकीर्द करायची आहे, असा दृढनिश्चय केल्यावर आणि त्यावर प्रचंड मेहनत घेतल्यावर ती गोष्ट साध्य होऊन जाते. हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळवायला आलेले रहमान यांना एका शॉटसाठी तब्बल 50 टेक घ्यावे लागले. दिग्दर्शकाची सडकून बोलणी खावी लागली. एवढा मोठा अपमान झाल्यावर दुसरा कोणी असता तर त्याने आपल्या अंगातले अभिनयाचे भूत कधीच उतरवून टाकले असते.पण रहमान यांनी त्याकडे कानाडोळा करत यासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि एक चांगला अभिनेता म्हणून नाव कमावले. 1944 मध्ये चित्रपटसृष्टीत पर्दापण करणारे अभिनेता रहमान यांनी अनेक संस्मरणीय चित्रपट दिले आहेत.

     अभिनेता रहमान यांनी सुरुवातील गेस्ट आर्टिस्ट म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. यापूर्वी त्यांनी पायलटचे रॉयल इंडियन एयर फोर्समध्ये प्रशिक्षण घेतले होते. पण त्यांनी लवकरच आपला इरादा बदलला आणि चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. कामासाठी ते थेट मुंबईत दाखल झाले. दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांच्यासोबत ते सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. चांद या चित्रपटात एका गाण्याच्या दरम्यान दिग्दर्शकांना फेटा बांधण्यासाठी एका माणसाची आवश्यकता होती. रहमान यांना फेटा बांधायला येत होता. दिग्दर्शकांना रहमान फेटा बांधतात, हे कळल्यावर त्यांनी त्यांनाही चित्रपटात एका ओळीत उभा केले. चित्रपटात त्यांना एक डॉयलॉगही देण्यात आला होता. मात्र तो डॉयलॉग बोलायला त्यांना 50 टेक घ्यायला लागले दिग्दर्शक तर त्यांच्यावर अक्षरश: ओरडले. खूप वाईटसाईट बोलले. कसा तरी तो चित्रपट पूर्ण झाला. यात त्यांना कसलेच काही क्रिडेट मिळायचा प्रश्न नव्हता.पण त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
     प्रभात स्टुडिओने पुन्हा एकदा पी.एल. संतोषी यांच्या हम एक है (1946) या चित्रपटासाठी कास्ट केले. या चित्रपटात त्यांच्या आईची भूमिका साकारली होती दुर्गा खोटे यांनी! चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं आणि रहमानने कधी मागे वळून पाहिले नाही. या नंतर त्यांनी शाहजहां (1946), नरगिस (1946), तोहफा (1947), इंतजार के बाद (1947), रुपरेखा ( 1948), सारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. 1948 मध्ये प्यार की जीत मध्ये नायकाच्या भूमिकेत त्यांना पसंद करण्यात आले. चित्रपटात सुरैय्यासोबतच्या त्यांच्या जोडीला चांगलीच वाहवा मिळाली. नंतर मग 1949 मध्ये बडी बहन या चित्रपटातदेखील सुरैय्या त्यांच्यासोबत होती. हाही चित्रपट हिट ठरला. रहमान आणि गुरु दत्त खूप चांगलेच दोस्त होते. त्यामुळे गुरुदत्त यांच्या चित्रपटांचे ते अविभाज्य भाग होते. प्यासा,चौदहवी का चांद, साहब, बीवी और गुलाम, दिल ने फिर याद किया, छोटी बहन,फिर सुबह होगी आणि वक्त इत्यादी त्यांचे संस्मरणीय चित्रपट आहेत.
(त्यांचा जन्म 23 जुलै 1921 आणि मृत्यू 5 नोव्हेंबर 1984)

रेल्वेच्या चाकांनी पाय हिरावून घेतले,पण स्वप्न नाही


     मुंबईच्या जोगेश्वरी चाळीत राहणार्या रोशन जावेदला लहानपणापासूनच पुस्तकांवर प्रेम होतं. तिचे अब्बू घराशेजारीच भाजीपाल्याचे दुकान लावायचे. अम्मीदेखील शिकली-सवरलेली नव्हती. मुलगी 92 टक्क्यांनी दहावी उत्तीर्ण झाली,तेव्हा तिचा वर्तमानपत्रात फोटो छापून आला. अब्बू- अम्मीचा आनंद गगनात मावेना. शेजारी-पाजारीदेखील तिला शुभेच्छा द्यायला,तिच्या घरी गर्दी करू लागले. त्याचवेळेला रोशनने घोषणा करून टाकली,मला डॉक्टर व्हायचं आहे. अब्बूने तिला छातीशी धरलं आणि आश्वस्त करत म्हणाले, हो गं,पोरी तुला डॉक्टरच करीन.

     रोशन बांद्राच्या अंजुमन--इस्लाम डॉ. इशाक जमशानावाला कॉलेजमध्ये शिकू लागली. ती अवघी सोळा वर्षांची होती. 11 वीच्या परीक्षा चालू होत्या. ही घटना 2008 ची आहे. संध्याकाळची वेळ होती. परीक्षा झाल्यावर नेहमीप्रमाणे ती लोकल रेल्वेने घरी जायला रेल्वे स्थानकावर गेली.  नेहमीप्रमाणे लोकलला गर्दी होती. एका हातात पुस्तकं सांभाळत कसे तरी स्वत:ला सांभाळत लोकलच्या गर्दीत घुसली. गर्दी वाढतच जात होती. अचानक तिला कुणाचा तरी धक्का बसला आणि ती दरवाजाच्या दिशेने फेकली गेली. ती स्वत:ला सांभाळणार तोच तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. तिचा आक्रोश लोकलच्या आवाजात दबून गेला. लोकल गेल्यावरचे चित्र भयानक होते. तिच्या दोन्ही पायांवरून लोकलचे बारा डबे गेले होते. तिचे दोन्ही पाय दुसर्या बाजूला तिच्या धडापासून निर्जीव निपचिप पडले होते. ती मोठमोठ्याने रडू लागली. आक्रोश करू लागली. प्रवाशांना माझ्या घरी फोन लावा,म्हणून ओरडू लागली. कुणीच तिला मदत केली नाही. अर्ध्या तासानंतर मेडिकल टीम आली आणि तिला दवाखान्यात घेऊन गेले.
     बातमी मिळताच अम्मी आणि अब्बू धावतच दवाखान्यात पोहचले. मुलीची ती विदारक अवस्था पाहून दोघेही गर्भगळीत झाले. थरथर कापू लागले. डॉक्टरांनी थोड्या वेळांनी सांगितले की, तिचे दोन्ही पाय कापावे लागतील, नाही तर गँगरीन होईल. रोशनला तर मोठा मानसिक धक्का बसला होता. तिच्या मनात क्षणभर विचार आला, आता सगळं संपलं! जगून तरी काय करू? जवळपास तीन महिने तिला दवाखान्यात काढावे लागले. या दरम्यान तिला नातेवाईक, शेजारीपाजारी भेटायला येत होते. प्रत्येकालाच तिची दया येत होती. सगळे म्हणत, बिच्चारी रोशन! आता तिचं कसं होणार? आता हिचे आयुष्यच संपले.प्रत्येकाच्या तोंडात हेच शब्द! 16 वर्षांच्या रोशनची अवस्था अगदी लहान मुलासारखी झाली होती. ती स्वत:चं कोणतं काम करू शकत नव्हती. पण तिच्या अम्मीनं सांभाळ केला. तिला धीर दिला. ती म्हणते, अम्मीने धीर दिला नसता तर मी कधीच मरून गेली असते.
     दवाखान्यातून घरी गेल्यावर रोशनला निराशेने घेरले. तिने विचार केला होता की, आता ती शिकू शकणार नाही. पण आईने तिला शिकण्यासाठी प्रेरित केले. ती व्हीलचेअरवर बसून 11 वीची परीक्षा द्यायला परीक्षा हॉलमध्ये गेली. 11 वीला तिला चांगले गुण मिळाले. आशा जागली. 12 वीची तयारी तिने घरी राहूनच केली. या खेपेलाही तिला चांगले गुण मिळाले. या दरम्यान ती कृत्रीम पायांवर हळूहळू चालू लागली होती. आता अम्मी प्रत्येक क्षण तिच्या सावलीसारखी तिच्यासोबत राहत होती. 12 वीचा निकाल लागल्यावर अम्मीने तिला तिची डॉक्टर होण्याच्या इच्छेचे स्मरण करून दिले. मग तिने मेडिकल परीक्षेची तयारी सुरू केली. 2011 मध्ये मेडिकल प्रवेश परीक्षेमध्ये रोशन तिसर्या रँकने उत्तीर्ण झाली. आता खात्री पटत चालली होती की, तिला आता डॉक्टर होण्यापासून कुणी रोखणार नाही. पण काउंसलिंगमध्ये गेल्यावर तिला मोठा धक्का बसला. काउंसलिंग टीमने तिला 88 टक्के दिव्यांग असल्याचे साम्गून मेडिकलला प्रवेश नाकारला. रोशन सांगते, अल्लाहने पुन्हा एकदा माझी परीक्षा घेतली. तिला वाटलं की, आपल्या आयुष्यातील सर्व काही हिरावून घेतलं गेलं आहे. तिने मनातल्या मनात मान्य करून टाकलं होतं की, आपण डॉक्टर होण्याच्या लायकीचे नाही आहोत. पण या दरम्यान तिच्या डॉक्टरांनी कोर्टात जाण्याचा सल्ला दिला.
     आता पुढचा सर्वात मोठा प्रश्न होता, तो म्हणजे केस कशी लढाईची याचा! घरची परिस्थिती इतकी हालाकीची होती की, वकिलाचे पैसे कसे चुकते करायचे? शेवटी रोशनच्या अम्मी- अब्बूने त्यांच्या इलाख्यातील एक ज्येष्ठ वकिलाची भेट घेतली. वकील रोशनच्या जिद्दीपुढे नतमस्तक झाले. त्यांनी केस लढवायची तयारी तर दाखवलीच पण एक पैसाही घेतला जाणार नाही, असे जाहीर करूनही टाकले. प्रकरण कोर्टात गेले. तिचे मेडिकल आणि शाळेचे दस्तावेज कोर्टात सादर करण्यात आले. रोशनने मोठ्या धीराने आपली बाजू मांडली. आपण अन्य सामान्य मुलींप्रमाणेच घरी आणि बाहेर वावरते, आपण कृत्रीम पायांवर चालत-फिरत असलो तरी बस आणि रेल्वेने प्रवासदेखील करू शकतो, याची कोर्टाला खात्री दिली.  मेडिकलचे शिक्षण आणि ते पूर्ण झाल्यावर रुग्णांवर उपचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, हे पटवून दिले. कोर्टात ज्यावेळेला केस चालली होती, त्यावेळेला ती लोकल ट्रेननेच ये-जा करत होती. न्यायाधीशांनी तिचे म्हणणे ऐकल्यावर मेडिकल कॉलेजला आदेश दिला की, रोशनचा प्रवेश निश्चित करावा.
     न्यायाधीश म्हणाले होते, हीतिला मेडिकलचे शिक्षण घेण्याचा तिचा हक्क आहे. मुलगी कोर्टात सुनावणीला येऊ शकते तर ती कॉलेजला का नाही जाऊ शकत?  तिच्या संघर्षाची कथा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली. काही सामाजिक संघटनांनी तिचा पुरस्कार देऊन सन्मान केला. गेल्या वर्षी केईएम हॉस्पीटल अँड कॉलेजमधून तिने एमबीबीएस झाली. आता ती एम.डी. करत आहे. शेवटी रोशन जावेदला एकच सांगायचे आहे की, गरिबी आणि लाचारीचा बहाणा करू नका. अडचण कितीही असली तरी आपल्या ध्येयावर कायम राहा. यश आपोआप मिळते.

Sunday, April 22, 2018

1988 आणि 2018 मध्ये साम्य काय आहे?


     मोदी सरकार केंद्रात येऊन चार वर्षे होत आली आहेत. ज्या अपेक्षा ठेवून लोकांनी मोदी सरकारला सत्तेवर बसवले, त्या अपेक्षांचा भंग झाल्याचेच चित्र सध्या दिसत आहे. महागाई कमी झाली नाही, पेट्रोल-डिझेलचे दर उतरले नाहीत. बेरोजगारांना रोजगार दिला जाईल. परदेशातला काळा पैसा आणला जाईल आणि तो लोकांच्या बँक खात्यावर टाकला जाईल, अशा बर्याच वल्गना करण्यात आल्या होत्या. मात्र यातले काही एक झाले नाही. भ्रष्टाचार तरी कमी होईल, अशी अपेक्षा होती. ना खाऊंगा, ना खाने दुगां यावर लोकांचा पक्का विश्वास बसला होता. त्यामुळेच मोदी सरकार 282 चा जादुई आकडा पार करू शकले होते. मनमोहनसिंह यांच्या आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराला लोक अक्षरश: कंटाळले होते. नरेंद्र मोदी यांचा प्रसार माध्यमांमध्ये चाललेला उदोउदो देशाला एक मसिहा सापडल्याचा साक्षात्कार काही लोकांना झाला होता. देशात भाजपला म्हणून मतदान झाले नाही. नरेंद्र मोदी हा एकच चेहरा सर्वत्र दिसत होता. लोकांनी त्यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली आणि लोक परिवर्तनाची वाट पाहू लागले. एक वर्ष गेले,दुसरे गेले. लोकांना वाटले, थोडा अवधी द्यावा लागेल. 60 वर्षे काँग्रेस सत्तेवर होती. तिने इतक्या वर्षात काही केले नाही, त्यामुळे आपल्याला आणखी वेळ द्यावा लागेल. असेच लोकांना वाटू लागले. असे म्हणत आता चौथे वर्षही सरत आहे. लोकांच्या मात्र पदरात निराशेशिवाय काहीच पडलेलं नाही. आता लोकांना अपेक्षाभंग झाल्यासारखे वाटू लागले आहे. 2019 मध्ये निवडणुका झाल्या तर मोदी सरकार 120 जागा तरी जिंकेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

     ठीक अशीच परिस्थिती 1988 मध्ये होती. त्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान होते. काही राजकीय तज्ज्ञ या दोन वर्षांचा तुलनात्मकदृष्ट्या अभ्यास करत आहेत. 1988 मध्येदेखील राजीव गांधी सरकारविरोधात देशभर रान उठले होते. भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. अर्थात त्यावेळची आणि आताची पिढी भिन्न आहे. पिढ्यांमध्ये बदलाचे अंतर भिन्न आहे. मोदी आणि गांधी यांची राजकीय, सामाजिक पृष्ठभूमीदेखील भिन्न आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन टोकाचे, भिन्न स्वभावाचे पक्ष आहेत. अत्यंत विरोधाभास असलेल्या या भाजप-काँग्रेस पक्षांच्या पंतप्रधानांमध्ये मात्र भारतीय लोकशाहीच्यादृष्टीने काही साम्ये आहेत. पहिले साम्य म्हणजे या दोघांनीही आपल्या पक्षाच्या इतिहासात स्वत:साठी विशिष्ट जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राजीव गांधी यांच्यासाठी ही गोष्ट सहजशक्य होती कारण ते पंतप्रधान होण्यापूर्वी फक्त तीन वर्ष अगोदर पक्षात सामिल झाले होते. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी एकमेका सहाय्य करू... या संस्कृतीला विरोध केला होता. काँग्रेसच्या पूर्वीच्या सरकारांना भ्रष्टाचारासाठी जबाबदार धरण्यास त्यांनी कधी मागेपुढे पाहिले नाही. ते म्हणत असत की, विकास निधीचा 15 टक्के पैसा गरिबांपर्यंत पोहचतो.
     दुसरीकडे मोदी यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे. कारण काही दशके ते राजकारणात आहेत. त्यांनी पंतप्रधान पदासाठी अभूतपूर्व अशी तयारी करून अभूतपूर्व असे यश मिळवले. असे यश भाजपला अजपावेतो कधी मिळाले नाही. अर्थात केवळ मोदी म्हणूनच यश मिळाले असल्याने भाजपमधील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेतेमंडळींची कारकीर्द झाकोळली गेली. मोदी यांनी त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर करत हे यश संपादन केले आहे. प्रसारमाध्यम आणि सोशल मिडियात भारताचा तारणहार अशा पद्धतीची प्रतिमा पद्धतशीरपणे निर्माण केली. आज त्यांची पक्षात एकाधिकारशाही आहे. त्यांच्याशिवाय कुठे पान हालत नाही. त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना विविध विकास कामे केली. भारतात सर्वचदृष्ट्या अव्वल राज्य म्हणून गुजरातला पुढे आणले. याशिवाय गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दीर्घ कारकीर्द सांभाळली होती. 2014 च्या निवडणुकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल देण्यात आली. उदाहरणच द्यायचे झाले तर हिंदू गौरव मुद्द्याचा देता येईल.
     या दोघांमध्ये दुसरी समानता कोणती असेल तर ती युवकांना आकर्षित करण्याची! राजीव गांधी यांच्यासाठी ही गोष्टदेखील सहजसोपी होती.कारण ते स्वत: युवा होते. मोदी साठ वर्षांपेक्षा अधिक वयाचे असले तरी त्यांनी आपल्यापेक्षा अधिक वय असलेल्या पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यावरही अगदी कुशलपूर्वक निशाना साधला. रोजगार निर्मिती हा मुद्दा युवकांना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोघांनीही स्वत:ला असा उमेदवार म्हणून पुढे आणले, जो लोकांमध्ये आशा जागवू शकतो. या धर्तीवरच दोघांनीही लोकसभेत अभूतपूर्व यश मिळवले. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यावर काही दिवसांतच झालेल्या निवडणुकीत राजीव गांधी यांनी चारशेपेक्षा अधिक जागा मिळवल्या होत्या. अर्थात मोदींसाठी अशी कोणती सहानुभूतीची लाट नव्हती. पण तरीही ते पक्षाला 282 जागा मिळवून देण्यात यशस्वी झाले. सहयोगी पक्षांकडून आणखी 50 जागा त्यांना मिळाल्या. त्यामुळे सरकार सहजपणे सत्तेवर येऊ शकले.
      चौथी समनता ही की, पंतप्रधानपदावर विराजमान  झाल्यावर राजीव आणि मोदी या दोघांनीही सत्तेची सूत्रे आपल्या हातात ठेवली. आपल्या सध्याच्या पंतप्रधानांच्या अहंकाराची काही उदाहरणे आपल्याला माहित आहेत.पण राजीव गांधी यांच्या आठवणी आज लक्षात राहिल्या असतीलच असे नाही. शिवाय आजच्या युवापिढीला त्याची माहितीदेखील असणार नाही. इतिहासाच्या माहितीचे जाणकार रामचंद्र गुहा यांनी काही आठवणी सांगितल्या आहेत. त्यांनी एका विदेश सचिवाला आणि एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्रकारपरिषदेतच बरखास्त करून टाकले होते. मोदी यांनीही काही देशासंबंधीत महत्त्वाच्या गोष्टींसंदर्भात आपल्या स्वत:च्या खासदार किंवा मंत्रिमंडळाला विश्वासात घेतले नाही. राजीव गांधी यांनी आपल्या काही जुन्या मित्रमंडळी आणि काही विश्वासू अधिकार्यांच्यामदतीने देश चालवण्याचा प्रयत्न केला. मोदी यांनीदेखील काही प्रमाणात हाच फार्म्युला वापरला आहे.
     याच अहंकार आणि व्यापक विचारसरणीचा अभाव यामुळे सांगितले जाते की, राजीव गांधी यांना इतक्या उंचीवरून खाली यावे लागले. असे सांगितले जाते की, राजकारणात एक आठवडादेखील खूप मोठा असतो.दीर्घ असतो. पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या काही उरलेल्या आठवड्यात बरेच काही घडू शकतं. इतिहासकार सांगू शकतील का की, कठुआ आणि उन्नवचे मुद्दे  मोदींसाठी घातक ठरू शकतील का, जसा राजीव गांधींसाठी बोफर्स मुद्दा घातक ठरला होता. अर्थात हे सगळे काळच ठरवणार आहे.
     मात्र 2014 च्या आणि आजच्या परिस्थितीत फारच फरक जाणवतो आहे. आज सोशल मिडियावर 80 टक्के लोक मोदी यांच्या विरोधात असल्याचे सांगितले जाते. मी काही वॉट्स अप ग्रूपच्या लोकांशी बोलल्यानंतर हीच परिस्थिती असल्याचे ऐकायला मिळाले आहे. 1984 मध्ये चारशेपेक्षा अधिक जागा पटकवणारी राजीव गांधी यांची काँग्रेस पाच वर्षांनंतर 197 जागांवर येऊन थांबली होती. आताचे सरकार 2014 च्या 282 जागांच्या आकड्यांवरून किती खाली येईल, असा काही अंदाज आता सध्या तरी बांधला जाऊ शकत नसला तरी जागा या कमी होणार, हे निश्चित आहे. राजीव गांधी यांच्या पाठीशी जनता असतानादेखील त्यांनी देशाला पुढे नेण्याची संधी गमावली. आणि आता असे वाटते की, मोदीही याच वाटेवर आहेत.