Monday, April 23, 2018

रेल्वेच्या चाकांनी पाय हिरावून घेतले,पण स्वप्न नाही


     मुंबईच्या जोगेश्वरी चाळीत राहणार्या रोशन जावेदला लहानपणापासूनच पुस्तकांवर प्रेम होतं. तिचे अब्बू घराशेजारीच भाजीपाल्याचे दुकान लावायचे. अम्मीदेखील शिकली-सवरलेली नव्हती. मुलगी 92 टक्क्यांनी दहावी उत्तीर्ण झाली,तेव्हा तिचा वर्तमानपत्रात फोटो छापून आला. अब्बू- अम्मीचा आनंद गगनात मावेना. शेजारी-पाजारीदेखील तिला शुभेच्छा द्यायला,तिच्या घरी गर्दी करू लागले. त्याचवेळेला रोशनने घोषणा करून टाकली,मला डॉक्टर व्हायचं आहे. अब्बूने तिला छातीशी धरलं आणि आश्वस्त करत म्हणाले, हो गं,पोरी तुला डॉक्टरच करीन.

     रोशन बांद्राच्या अंजुमन--इस्लाम डॉ. इशाक जमशानावाला कॉलेजमध्ये शिकू लागली. ती अवघी सोळा वर्षांची होती. 11 वीच्या परीक्षा चालू होत्या. ही घटना 2008 ची आहे. संध्याकाळची वेळ होती. परीक्षा झाल्यावर नेहमीप्रमाणे ती लोकल रेल्वेने घरी जायला रेल्वे स्थानकावर गेली.  नेहमीप्रमाणे लोकलला गर्दी होती. एका हातात पुस्तकं सांभाळत कसे तरी स्वत:ला सांभाळत लोकलच्या गर्दीत घुसली. गर्दी वाढतच जात होती. अचानक तिला कुणाचा तरी धक्का बसला आणि ती दरवाजाच्या दिशेने फेकली गेली. ती स्वत:ला सांभाळणार तोच तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. तिचा आक्रोश लोकलच्या आवाजात दबून गेला. लोकल गेल्यावरचे चित्र भयानक होते. तिच्या दोन्ही पायांवरून लोकलचे बारा डबे गेले होते. तिचे दोन्ही पाय दुसर्या बाजूला तिच्या धडापासून निर्जीव निपचिप पडले होते. ती मोठमोठ्याने रडू लागली. आक्रोश करू लागली. प्रवाशांना माझ्या घरी फोन लावा,म्हणून ओरडू लागली. कुणीच तिला मदत केली नाही. अर्ध्या तासानंतर मेडिकल टीम आली आणि तिला दवाखान्यात घेऊन गेले.
     बातमी मिळताच अम्मी आणि अब्बू धावतच दवाखान्यात पोहचले. मुलीची ती विदारक अवस्था पाहून दोघेही गर्भगळीत झाले. थरथर कापू लागले. डॉक्टरांनी थोड्या वेळांनी सांगितले की, तिचे दोन्ही पाय कापावे लागतील, नाही तर गँगरीन होईल. रोशनला तर मोठा मानसिक धक्का बसला होता. तिच्या मनात क्षणभर विचार आला, आता सगळं संपलं! जगून तरी काय करू? जवळपास तीन महिने तिला दवाखान्यात काढावे लागले. या दरम्यान तिला नातेवाईक, शेजारीपाजारी भेटायला येत होते. प्रत्येकालाच तिची दया येत होती. सगळे म्हणत, बिच्चारी रोशन! आता तिचं कसं होणार? आता हिचे आयुष्यच संपले.प्रत्येकाच्या तोंडात हेच शब्द! 16 वर्षांच्या रोशनची अवस्था अगदी लहान मुलासारखी झाली होती. ती स्वत:चं कोणतं काम करू शकत नव्हती. पण तिच्या अम्मीनं सांभाळ केला. तिला धीर दिला. ती म्हणते, अम्मीने धीर दिला नसता तर मी कधीच मरून गेली असते.
     दवाखान्यातून घरी गेल्यावर रोशनला निराशेने घेरले. तिने विचार केला होता की, आता ती शिकू शकणार नाही. पण आईने तिला शिकण्यासाठी प्रेरित केले. ती व्हीलचेअरवर बसून 11 वीची परीक्षा द्यायला परीक्षा हॉलमध्ये गेली. 11 वीला तिला चांगले गुण मिळाले. आशा जागली. 12 वीची तयारी तिने घरी राहूनच केली. या खेपेलाही तिला चांगले गुण मिळाले. या दरम्यान ती कृत्रीम पायांवर हळूहळू चालू लागली होती. आता अम्मी प्रत्येक क्षण तिच्या सावलीसारखी तिच्यासोबत राहत होती. 12 वीचा निकाल लागल्यावर अम्मीने तिला तिची डॉक्टर होण्याच्या इच्छेचे स्मरण करून दिले. मग तिने मेडिकल परीक्षेची तयारी सुरू केली. 2011 मध्ये मेडिकल प्रवेश परीक्षेमध्ये रोशन तिसर्या रँकने उत्तीर्ण झाली. आता खात्री पटत चालली होती की, तिला आता डॉक्टर होण्यापासून कुणी रोखणार नाही. पण काउंसलिंगमध्ये गेल्यावर तिला मोठा धक्का बसला. काउंसलिंग टीमने तिला 88 टक्के दिव्यांग असल्याचे साम्गून मेडिकलला प्रवेश नाकारला. रोशन सांगते, अल्लाहने पुन्हा एकदा माझी परीक्षा घेतली. तिला वाटलं की, आपल्या आयुष्यातील सर्व काही हिरावून घेतलं गेलं आहे. तिने मनातल्या मनात मान्य करून टाकलं होतं की, आपण डॉक्टर होण्याच्या लायकीचे नाही आहोत. पण या दरम्यान तिच्या डॉक्टरांनी कोर्टात जाण्याचा सल्ला दिला.
     आता पुढचा सर्वात मोठा प्रश्न होता, तो म्हणजे केस कशी लढाईची याचा! घरची परिस्थिती इतकी हालाकीची होती की, वकिलाचे पैसे कसे चुकते करायचे? शेवटी रोशनच्या अम्मी- अब्बूने त्यांच्या इलाख्यातील एक ज्येष्ठ वकिलाची भेट घेतली. वकील रोशनच्या जिद्दीपुढे नतमस्तक झाले. त्यांनी केस लढवायची तयारी तर दाखवलीच पण एक पैसाही घेतला जाणार नाही, असे जाहीर करूनही टाकले. प्रकरण कोर्टात गेले. तिचे मेडिकल आणि शाळेचे दस्तावेज कोर्टात सादर करण्यात आले. रोशनने मोठ्या धीराने आपली बाजू मांडली. आपण अन्य सामान्य मुलींप्रमाणेच घरी आणि बाहेर वावरते, आपण कृत्रीम पायांवर चालत-फिरत असलो तरी बस आणि रेल्वेने प्रवासदेखील करू शकतो, याची कोर्टाला खात्री दिली.  मेडिकलचे शिक्षण आणि ते पूर्ण झाल्यावर रुग्णांवर उपचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, हे पटवून दिले. कोर्टात ज्यावेळेला केस चालली होती, त्यावेळेला ती लोकल ट्रेननेच ये-जा करत होती. न्यायाधीशांनी तिचे म्हणणे ऐकल्यावर मेडिकल कॉलेजला आदेश दिला की, रोशनचा प्रवेश निश्चित करावा.
     न्यायाधीश म्हणाले होते, हीतिला मेडिकलचे शिक्षण घेण्याचा तिचा हक्क आहे. मुलगी कोर्टात सुनावणीला येऊ शकते तर ती कॉलेजला का नाही जाऊ शकत?  तिच्या संघर्षाची कथा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली. काही सामाजिक संघटनांनी तिचा पुरस्कार देऊन सन्मान केला. गेल्या वर्षी केईएम हॉस्पीटल अँड कॉलेजमधून तिने एमबीबीएस झाली. आता ती एम.डी. करत आहे. शेवटी रोशन जावेदला एकच सांगायचे आहे की, गरिबी आणि लाचारीचा बहाणा करू नका. अडचण कितीही असली तरी आपल्या ध्येयावर कायम राहा. यश आपोआप मिळते.

No comments:

Post a Comment