Wednesday, April 25, 2018

... आणि ती वेश्यालयात पोहचली


     ती फक्त तेरा-चौदा वर्षांची होती. आपलं चांगलं वाईट कशात आहे, हे कळण्याइतपत तिच्या बुद्धीचा विकास झालेला नव्हता. या वयात तिचं लग्न लावून दिलं. तिला विचारण्याचा तर प्रश्नच नव्हता. ती आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात राहणारी! अर्थात तेरा-चौदा वर्षे वयात मुलींची लग्नं होणं, ही त्या परिसरातील सर्वसामान्यच गोष्ट होती. फक्त सामान्य नव्हता तो तिच्या सासरचा तिच्याशी असलेला व्यवहार! सासरी गेलेल्या पहिल्या दिवसापासूनच तिला नरक यातना द्यायला सुरुवात झाली. तिचा नवरादेखील तिच्याशी अगदी क्रूर माणसासारखा वागायचा. ती गरोदर होती, त्या दिवसांतही तो तिला मारहाण करायचा. अवघ्या पंधरा वर्षाच्या वयात ती एका मुलीची आई झाली. मूल झालं आहे, म्हटल्यावर तरी सासरची मंडळी आपल्याला छळायचे बंद करतील असे वाटले होते,पण त्यांच्यावर कशाचाच परिणाम झाला नाही. त्यांचा छळ चालूच राहिला.ही कथा आहे, मानवी तस्करी विरोधात लढा उभारणार्या रमा देवीची!

     सासरच्या मंडळींच्या नरक यातना तिला असह्य झाल्या. पाणी डोक्यावरून गेलं. शेवटी तिने आपल्या तानुल्या मुलीसह सासरचं घर सोडलं. पण तरीही त्या हैवानी माणसांवर कसलाच फरक पडला नाही. इकडे माहेरी आई-वडील मोलमजुरी करायचे आणि आपले पोट भरायचे. त्यात आता रमादेवीची आणि तिच्या मुलीची भर पडली. आई-वडील दिवसभर कामाला बाहेर जायचे. घरी फक्त ती आणि तानुली. या काळात तिच्या शेजारी राहणार्या एका मुलीशी ओळख झाली. ती तिची चांगली मैत्रीण बनली. याशिवाय शेजारीच तिच्या आईच्या वयाच्या दोन महिला राहत होत्या. त्यांना रमा देवीच्या दिवसभराची खडानखडा माहिती होती. काही दिवसांत त्यांच्याशीही रमादेवीचे चांगले पटायला लागले.
     एके दिवशी त्या महिलांनी तिला आणि तिच्या मैत्रिणीला सिनेमाला जाण्याचा प्रस्ताव ठेवला. महिलांनी त्यांच्यावर अशी काही जादू केली की, त्या दोघीही त्यांच्या लाघवी बोलण्याला फसल्या. रमादेवी तर लहानग्या म्हणजे अवघ्या पाच महिन्याच्या  मुलीला घरीच सोडून सिनेमाला जायला तयार झाली. या बायकांवर संशय घ्यावा, असे काही वाटण्यासारखी परिस्थिती नव्हती. एकदम अगदी शेजार्यांसारखा त्यांचा व्यवहार होता. वागणे होते. सिनेमाचा मध्यंतर झाला. या कालावधीत दोघी मैत्रिणींना कोल्ड ड्रिंकमधून बेशुद्धीचे औषध पाजण्यात आले होते. शुद्धीवर आल्यावर त्यांना मुंबईतल्या एका वेश्यालयात असल्याचे समजले. तिच्या डोळ्यांवर दिवसा चांदण्या दिसायला लागल्या. त्यांचा सौदा करण्यात आला होता. रमा देवीने तिथल्या कित्येक लोकांना सोडून देण्याची विनंती केली. आक्रोश केला. पण त्याचा काही एक फायदा झाला नाही. रमादेवीने तिथल्या नरक यातनेतून सुटका करण्याचा प्रयत्न केला, पण तो विफल ठरला.
     तिथल्या लोकांच्या सांगण्यानुसार न वागल्यास तिला मारहाण करण्यात येत असे. डोळ्यांत मिरचीपूड टाकली जायची. जवळपास एक वर्ष असाच प्रकार चालला. तरीही ती तेथून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतच राहिली. के करत असताना ती अन्य मुलींनादेखील वेश्यालय प्रमुखांविषयी भडकवून द्यायची. शेवटी दुसर्या मुली तिच्या जाळ्यात अडकू नयेत म्हणून तिला सोडण्यात आले. अमादेवीला सोडल्यावर ती तडक आपल्या गावाकडे आली. इकडे तिच्या घरच्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. तिने तिच्या मुलीला विचारले, तुझी आई कुठे आहे? तर तिने उत्तर दिले, माझी आई मेली. हे ऐकून ती आतून पूर्णपणे तुटली. तिला जगण्यातच रस वाटेना. आत्महत्या करण्याचे विचार तिच्या डोक्यात घुमू लागले. पण नंतर तिला जाणीव झाली की, आपण मरून गेल्यावर काय? आपली मुलगीदेखील त्याच वाटेवर जाणार? त्यापेक्षा या सिस्तीम विरोधात लढले तर? किती तरी मुली, बायका नरक यातना भोगत असतील. वेश्यालयांच्या कैदेत किती तरी मुली अडकून पडल्या आहेत. त्यांची सुटका केली तर...? त्यांच्यासाठी काम केले तर...? शेवटी मनाची तयारी करून ती अशा मुलींना अशा नरकातून बाहेर काढण्यासाठी बाहेर पडली. तिने पोलिसांना माहिती दिली. सुरुवातीला पोलिसांनी कानाडोळा केला. पण रमादेवीला स्थानिक मिडियांची साथ मिळाली. आणि शेवटी तीन मानवी तस्करांना पकडण्यात आले आणि त्यांना सात वर्षांची शिक्षा झाली.
   रमादेवी एवढ्यावर समाधानी झाली नाही. ती पुन्हा एकदा एनजीओ आणि पोलिसांच्या मदतीने भिवंडीतल्या वेश्यालयात गेली. तिथून तीस महिलांची सुटका केली. आज रमादेवी मोलमजुरी करण्याबरोबरच आंध्र प्रदेशातल्या तिच्या इलाक्यातल्या मानवी तस्करांविरोधात लढा देत आहे. ज्या भागात मानवी तस्करी होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी जाऊन महिलांना जागृत करण्याचे काम करत आहे. तिने आपले संपूर्ण आयुष्य यासाठीच वेचण्याचे ठरवले आहे

No comments:

Post a Comment