Sunday, April 15, 2018

एक होता रोमिओ


     प्रेम एक युनिवर्सल घटना आहे. एक युनिवर्सल सत्य. या घटनेला तुम्ही देश,हे जग किंवा काळ आणि वेळ अशा कुठल्याच सीमा बंधनात  बांधू शकत नाही. अगदी अशीच रोमिओ-ज्युलिएटची प्रेमकथा आहे. 16 व्या शतकात शेक्सपिअरने ही कथा नाटकाच्या स्वरुपात लिहिली होती. आज 21 व्या शतकातदेखील आपण याविषयी बोलतो आहोत.लिहितो आहोत. कारण ती एक अजरामर प्रेमकथा आहे. यावरून आपल्याला कळतं की,या रचनेचे महत्त्व किती आणि काय आहे ते! या रचनेला महान कलाकृती म्हटले जाते.
     देश किंवा जगातल्या जवळपास सर्वच साहित्यामध्ये या रचनेला स्थान मिळाले आहे. कलेच्या वेगवेगळ्या अंदाजामध्ये ही रचना व्यक्त करण्यात आली आहे. इतक्या सशक्त रचनेच्या मुख्य पात्राला रस्त्यावरच्या सटरफटर,उथळ प्रेम करणार्यांच्या आचरणाशी जोडणे कोणत्याही प्रकारे योग्य नाही. हा खरे तर या अजरामर पात्रांचा अपमान आहे. या कथेला ना रस्त्यावरची कथा म्हणता येणार नाही, ना कथेच्या पात्राला. तुम्ही ही कथा वाचल्यावर तुम्हाला या कथेला आणि रचनेला कोणत्या उंचीवर आणि का नेऊन बसवले आहे, याची कल्पना येईल.

     शेक्सपिअरने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात हे नाटक लिहिले होते. ही कथा इटलीच्या वेरोना शहराची आहे. या शहरात राहणार्या रोमिओ नावाच्या एका राजपुत्राची आणि ज्युलिअट नावाच्या एका राजकन्येची ही कथा आहे. या कथेत रोमिओ कुणाला माहित न होता  ज्युलिअटशी लग्न करतो. ज्युलिअट रोमिओच्या वडिलांच्या शत्रूची मुलगी असते. रोमिओ जोपर्यंत तिच्यावर प्रेम करत होता, तोपर्यंत त्याने याचा सुगावा कुणालाच लागू दिला नव्हता. या कथेत सांगितले  आहे की, रोमिओशी लग्न करण्यासाठी ज्युलिअट झोपेच्या गोळ्या घेऊन आपल्या घरच्यांना धोका देण्याचा प्रयत्न करते, कारण तिचे घरचे  तिला मेली आहे, असे समजून मकबरेत टाकून देतील. रोमिओसोबत तिला राहयचे असते. पण रोमिओला याबाबतीतची काहीच कल्पना नसते. त्याने तर सरळ सरळ विचार केला की, खरोखरच ज्युलिअट मेली आहे. असे समजून रोमिओ विष प्राशन करून स्वत:ला संपवतो. विष घेण्यामागे मेल्यानंतर तरी निदान वरती दोघे एकत्र राहू, असा विचार रोमिओने केलेला असतो. पण ज्यावेळेला ज्युलिअट शुद्धीवर येते आणि तिला समजते की, रोमिओ मेला आहे, तेव्हा तीदेखील स्वत:ला संपवते.
     शेक्सपिअरच्या जीवनातील हॅम्लेट शिवाय हे सर्वात प्रसिद्ध असे नाटक आहे. इंग्लंडमध्ये अशी काही थिएटर्स आहेत, जिथे कित्येक वर्षांपासून हे नाटक सातत्याने चालते आहे. एकवेळ आपण हे नाटक शेक्सपिअरपासून बाजूला करू, तरीही काही प्रश्न उरतातच. असे म्हटले जाते की, ही कथा इटालियन कथेवर आधारित आहे. 1562 मध्ये आर्थर ब्रुक यांनी दी ट्रेजिकल हिस्ट्री ऑफ रोमिओ एंड ज्युलिअट या नावाने एक कविता लिहिली होती. 1567 मध्ये विलियम पेंटरने ही रचना गद्याच्या स्वरुपात जगासमोर आणली. ही कथा शेक्सपिअरने 1591 आणि 1595 च्या दरम्यान लिहिली होती आणि हे नाटकाच्या स्वरुपात 1697 मध्ये पुस्तकरुपाने प्रकाशित झाले होते.
वास्तविक या कथेला आधार 1303 मध्ये इटलीतल्या वेरोना या शहरात घडलेल्या सत्य प्रेमकथेचा आहे. यानुसार तिथे एका प्रेमी युगलाने आपल्या कुटुंबाच्या शत्रुत्वापुढे आपल्या प्रेमाची आहुती देत आपला जीव गमावला होता. शेक्सपिअरला नाटक लिहिण्याची प्रेरणा ऑर्थर ब्रुकच्या कवितेतून मिळाली. ही खरे तर शेक्सपिअरची प्रतिभा म्हटली पाहिजे की, त्यांनी रोमिओ आणि ज्युलिअटची पात्रे अशी काही बनवली की, ते एक क्लासिक बनली आणि त्याची आजतागायत चर्चा होत आहे. असे सांगितले जाते की, या नाटकात एकूण 25 हजार 948 शब्द होते. रोमिओ ज्युलिअटचे काही संवाद आजदेखील प्रसिद्ध आहेत. उदाहरण द्यायचे तर पार्टिंग इज सच ए स्वीट सॉरो, व्हाट्स इन अ नेम, डोन्ट वेस्ट योर लव ऑन समबडी, हू डज नॉट वॅल्यू इट, वगैरे वगैरे. शेक्सपिअरच्या नाटकात पहिल्यांदा ज्युलिअट रोमिओला भेटते, त्यावेळेला ती फक्त 13 वर्षांची असते. रोमिओ आणि ज्युलिअट  आपल्या प्रेमाविषयी इतके आश्वस्त आणि दृढनिश्चयी होते की, त्यांनी पहिल्या मुलाखतीच्या 24 तासानंतर लगेचच लग्न केले.
     18 व्या शतकात हे नाटक ज्यावेळेला रंगमंचावर आले, तेव्हा डेविड गेरिकने या कथेच्या खुपशा दृश्यांमध्ये बरेच बदल केले. त्यांनी नाटकातले काही बोल्ड दृश्येदेखील काढून टाकली. तर जॉर्ज बेंडा याच्या रोमिओ एंड ज्युलिअट मध्ये बरीचशी अॅक्शन दृश्ये काढून आणि शेवटदेखील हॅपी एंडिंग दाखवण्याचा प्रयत्न केला. 19 व्या शतकात यांच्या नाटकात बर्याच शब्दांमध्ये बदल करण्यात आला. आणि नाटकाला यथार्थवादी बनवण्याचा प्रयत्न केला. यानंतर 20 व्या आणि 21 व्या शतकात कथेवर आधारित रोमिओ एंड ज्युलिअट नावाचा चित्रपट बनवण्यात आला. ही खरे तर शेक्सपिअरचीच कमाल म्हटली पाहिजे कारण रोमिओ एंड ज्युलिअटवर तब्बल 77 चित्रपट बनले आहेत. यापैकी सर्वात लोकप्रिय ठरला तो जॉर्ज कुकोर, फ्रेंको जेफिरेली आणि बाज लुहमेन यांनी बनवलेले चित्रपट. रोमिओ एंड ज्युलिअटला समजून घ्यायचे असेल तर या कथेकडे अधिक बारकाईने पाहायला हवे. या नाटकाच्या कथेत आपापसातल्या भांडणापेक्षा प्रेम सर्वश्रेष्ठ आहे. मला वाटतं, या कथेतले प्रेम खूपच आध्यात्मिक आहे. यात कुठेही आणि कोणत्याही स्तरावर आततायीपणा नाही. चिल्लरपणा नाही. या कथेला खरे तर कशाचीच कमतरता नाही. पण आज या संपूर्ण कथेच्या उलट परिस्थिती आहे. अशी प्रेमकथा आढळून येत नाही. आज फक्त शारीरिक आकर्षणव्यतिरिक्त काही नाही.
     गल्ली-बोळातल्या प्रेमी युगलांना आपण रोमिओ-ज्युलिअटची उपमा देतो. खरे तर त्यांच्या आणि रोमिओ-ज्युलिअट यांच्या प्रेमात कसलेच साम्य दिसून येत नाही. कारण रोमिओ-ज्युलिअट आपण समजून घेतलेला नसतो.  आपण रोमिओचे नाव कुठल्याही रस्त्यावरच्या, सटरफटर व्यक्तीला उपमा म्हणून वापरतो. ज्याला खर्या प्रेमाची कल्पना नाही. प्रेमात त्यागाला महत्त्व आहे, याची कल्पना नसलेल्या माणसाला,तरुणाला आपण रोमिओची उपमा देत असतो.  असे जेव्हा फालतू युवकाला रोमिओ म्हणतो, तेव्हा आपल्याला फारच वाईट वाटतं. कारण तो शेक्सपिअरचा रोमिओ आपल्या मनात बसला आहे, तो खरा प्रेमी आहे.मला वाटते की, ज्या लोकांना ही कथा माहित नाही, ज्या लोकांनी शेक्सपिअर वाचला नाही, ते लोक अशा चुका करू शकतात. लोकांना पहिल्यांदा हे नाटक, या कथेला आणि रोमिओच्या पात्राला वाचण्याची आवश्यकता आहे. खरे तर आपल्या देशातही अशा प्रेमकथा असंख्य झाल्या आहेत. त्यांना आपण रोमिओच्या नावाने उपमा देत असतो. आपल्याकडे लैला-मजनू, हीर-रांझा ही नावं प्रसिद्ध आहेत. यांच्या नावाने आपण अनेकांना हाक मारत असतो.  प्रेमात घायाळ झालेल्या किंवा प्रेमात अखंड बुडालेला असतो, अशा व्यक्तीला आपण काय मजनूसारखा फिरतो आहेस, असे आपण म्हणत असतो.
     रोमिओ-ज्युलिअट ही कथा विश्व साहित्यात महान अशी रचना आहे. स्वत: शेक्सपिअरदेखील या रचनेला खूप महत्त्वाचे मानत. या कथेची ताकद आपल्याला आणखी एका गोष्टीवरून लक्षात येते, ती म्हणजे आपली चित्रपटसृष्टी या कथेच्या आधारावरच चालली आहे. या कथेलाच फिरवून फिरवून, वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करून, वेगवेगळ्या पात्रांद्वारा आणि सातत्याने  मांडले जात आहे. असे फक्त आपल्या इथेच नाही तर जगभरातच घडते आहे. रशियन साहित्यात म्हटले जाते की, या जगात जितक्या म्हणून कथा आहेत, त्या सगळ्या लोककथेवर आधारित आहेत. एक म्हण आहे.त्यानुसार या संपूर्ण जगात बत्तीस प्रकारच्या भूमिका असतात. दोन प्रकारचे प्लॉट असतात. सात प्रकारच्या घटना असतात. हीच गोष्ट रोमिओ-ज्युलिअटच्याबाबतीतही म्हणता येईल. कारण कित्येक प्रेमकथादेखील या रचनेच्या भोवतीच फिरत असतात.

1 comment:

  1. मस्त Really dont weast your love on somebody who does not value it

    ReplyDelete