आज वसुंधरा दिवस
आहे. हा दिवस एका अशा महापुरुषाच्या
दृढ इच्छाशक्तीसाठी ओळखला जातो, ज्याने आपल्या मनाशी पक्की खूणगाठ
बांधली होती की, आज जो काही व्यवहार आपल्या पृथ्वीशी केला जात
आहे, तो बदलायला हवा. आपली पृथ्वी वाचली
पाहिजे,इतकेच नव्हे तर पृथ्वीवरचा प्रत्येक जीव आनंदाने जगला
पाहिजे. असा हा महान पुरुष म्हणजे अमेरिकेचे माजी सीनेटर गेराल्ड
नेल्सन. त्यांनीच सर्वात अगोदर 22 एप्रिल
1970 रोजी दोन कोटी लोकांच्यामध्ये पहिला वसुंधरा दिवस साजरा केला होता.
म्हणजे जवळपास पाच दशकापूर्वी ग्लोबल वार्मिंगचा धोका आजच्या इतका वाटत
नव्हता किंवा प्रदूषणाची एवढी मोठी समस्या निर्माण झाली नव्हती,तरीही त्यांनी पर्यावरण वाढीसाठी वसुंधरा दिवस साजरा करण्याचा निश्चय केला.
त्यांच्या दूरदृष्टीला खरे तर दाद द्यायलाच हवी. त्यांचे म्हणणे होते की, पर्यावरण संरक्षण हा विषय आपल्या
राजकीय अजेंड्यामध्ये समाविष्ट व्हायला हवा. त्यांचा हा विचार
आज किती महत्त्वाचा आहे, याची कल्पना येते आहे. त्याचवेळेला आपण सावध झालो असतो तर आज ही गंभीर परिस्थिती उदभवली नसती.
आजच्या इतका मोठा धोका आज दिसला नसता.
आज हा धोका पहिल्यापेक्षा
अधिक वेगाने वाढताना दिसत आहे, या दिवसाचे महत्त्व आज अधोरेखित झाले आहे. पण खरी गोष्ट
अशी की, आजदेखील ही बाब कुणीच गंभीरपणे घ्यायला तयार नाही.
हा मुद्दा कुणाच्या राजकीय अजेंड्यामध्येदेखील नाही. कदाचित त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे नाही,कारण पृथ्वी
ही काही त्यांची वोट बँक नाही. ती आपल्या अस्तित्वाचा आधार असली
तरी किंवा आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू असली तरी पर्यावरणाशी काही कुणाचा संबंध नाही.
आपली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आपण सगळे या पृथ्वीला भोगाचे साधन मानले
आहे. आर्थिक, व्यापारिक आणि काही मर्यादेपर्यंत
सामाजिकदृष्ट्या आपण या पृथ्वीला एक संसाधनच मानत आलो आहोत. पृथ्वी
मानवी जीवनाबरोबरच लाखो वनस्पती-जीव-जंतूची
आश्रय ठिकाणदेखील आहे. पृथ्वीमध्ये जीवाश्यम इंधनाचा विशाल साठा
आहे,पण तो ज्या वेगाने संपुष्टात येत आहे. त्याच वेगाने पृथ्वीवरची मानव जातदेखील संपणार आहे. याची
भीती आजच्या लोकांना का नाही, असा प्रश्न पडतो. महत्त्वाचे म्हणजे ही संपत्ती रिसाइकल होऊ शकत
नाही. आपण जी संसाधने रिसाइकल होऊ शकतात, त्यांच्या मागे न लागता, जी संसाधने संपुष्टात येणार आहेत,
त्याच्याच पाठी लागलो आहोत.त्यांनाच जमिनीतून बाहेर
काढत आहोत.
नैसर्गिक संसाधनाच्या
या अति वापरामुळे जैव विविधतेवर मोठे संकट आले आहे. प्रदूषणाच्या अतिरेकामुळे देशातल्या बहुतांश नद्या अस्तित्वासाठी संकटाशी तोंड देत
आहेत. या नद्याच्या आसपासचे आरोग्यपूर्ण जीवन हे एक स्वप्नच आहे.
कारण नदीकाठच्या लोकांना प्रदूषणामुळे अनेक आजारांशी सामना करावा लागत
आहे. शहराचे सांडपाणी, कारखान्यांचा मळीमिश्रीत
घाणेरडे पाणी सगळे सगळे नदीत सोडले जाते. यामुळे साहजिकच आर्थिक
आणि वेळेचा मोठा अपव्यय होत आहे. कोळशापासूनच्या वीज निर्मितीमुळे
केवळ प्रदुषणातच वाढ होत नाही तर हिरवीगार समृद्ध वनसंपत्तीही विनाश होत चालला आहे.इंटर गव्हर्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज च्या अभ्यासानुसार असा खुलासा करण्यात
आला आहे की, गेल्या दशकभरात पृथ्वीच्या सरासरी तापमान
14 डीफारेनहाइटने वाढ झाली आहे. पृथ्वीच्या सरासरी
तापमानात होत असलेल्या वाढीमुळे हवामान आणि मोसमी व्यवस्था यात व्यापक प्रमाणात धोकादायक
बदल होऊ शकतात,याचे पुरावे मिळत आहेत. पावसाच्या
वितरण प्रणालीमध्ये बदल घडत असल्याने गंभीर सुका दुष्काळ, महापूर,
जोराचा पाऊस आणि नेहमीचा उष्माघात यांचा खरे तर प्रकोप होत आहे.
महासागराच्या गरम होण्याच्या वेगामध्ये वाढ होत आहे.ते आम्लीय होत चालले आहेत. हिमाच्छित क्षेत्रावरील बर्फ
वितळण्याचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे.
वसुंधरा धोक्यात
येण्याला आणखी एक कारण आहे, ते म्हणजे लोकसंख्यावाढ. लोकसंख्या जितकी वाढेल,
त्याहीपेक्षा अधिक संसाधनांची गरज आपल्याला भासणार आहे. माणसांच्या गर्दीमुळे अन्य जीवांच्या जीवावर आपण उठलो आहोत. जंगले नष्ट होत चालल्याने त्याचबरोबर त्यावर अवलंबून असलेल्या अनेक प्राणी-पक्षी यांच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत. हवामान
परिवर्तनामुळेही अशा प्रजातींच्या आयुष्यापुढे संकट उभे राहिले आहे. या सगळ्यामुळे वातावरणात असा काही नवा बदल घडेल, जो हजारो
वर्षांपर्यत झालेला नाही. आणि हाच आपल्यासाठी धोकादायक ठरणार
आहे.
या वसुंधरा दिनाच्या
निमित्ताने पृथ्वी वाचवण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची आवश्यकता आहे. झाडे लावा, झाडे जगवा इतके फक्त म्हणून चालणार नाही तर आपल्याला झाडे प्रत्यक्ष लावून
व त्यांचे संगोपन करून त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत अगदी लहान पोरांप्रमाणे त्यांची
काळजी घेण्याची आवश्यकता आहे. एकदा का ती मोठी झाली की,
आपली काळजी मिटते. आज आपण झाडे तोडून गावेच्या
गावे, जंगलेच्या जंगले उजाड करत आहोत. त्यामुळेच
आपल्या पुढे मोठी संकटे उभी राहिली आहेत. यावर मात करायची असेल
तर आपल्याला जगण्याचा
दृष्टीकोन बदलावा लागणार आहे.
No comments:
Post a Comment