Friday, April 13, 2018

पहिल्यांदा प्रियकरासोबत मद्य पाजले; नंतर नवर्‍याला पेट्रोल ओतून जिवंत जाळले


     दोस्ती निखळ, निर्मळ असावी. त्यात आडपडदा नसावा. त्यात स्वार्थ नसावा. एकमेकांच्या मदतीला जाणं मित्राचं कर्तव्य आहे. अशी मैत्री आपण पाहिलीही आहे आणि अनुभवलीही आहे. पण मैत्रीचा रंग स्वार्थाचा असेल तर मात्र आयुष्याचा बेरंग झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आजकाल निखळ, निर्मळ मैत्री अभावानेच आढळून येते. यातूनच मग खून,मारामार्या होतात. पण यातून कोणीच सुखी होत नाही. खून झालेला मरून जातो आणि मारणारा जेलमध्ये सडत राहतो. ज्यासाठी हा अट्टाहास करायचा त्याला तर ते मुकतातच! मग असे गुन्हे करून तरी काय फायदा? पण कळतय परंतु वळत नाही ना! त्यामुळे अशा घटनांना तोटा नाही. कुठे ना कुठे अशा घटना घडतच राहतात.
     बिलासपूर जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे. महमंद नावाच्या गावात राजू साहू हा त्याचे वडील लक्ष्मी साहू, पत्नी नंदिनी आणि दोन मुलांसह अगदी आनंदात आणि मजेत राहत होता.त्याच्या शेजारी राहणारा पितांबर याच्याशी त्याची दोस्ती होती. दोघांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. पण त्याला याची कल्पनाच नव्हती की, त्याचा मित्र म्हणणारा पितांबर हा मैत्रीचा गळा घोटून त्याच्या बायकोला आपल्या प्रेम जाळ्यात अडकवून तिच्यासोबत रासक्रीडा करत होता. पितांबरचे नंदिनीशी प्रेमसंबंध असतानादेखील तो आणखी महिलांना आणि मुलींना आपल्या प्रेमात अडकवण्याचा प्रयत्न करत होता.

     तो नेहमी राजू साहू सोबत असताना रायगडच्या एका सेल्सगर्लशी नेहमी बोलायचा. तिच्या लाघवी बोलण्यावर राजू साहू भाळला. त्याला ती आवडू लागली. मग त्याने पितांबरला माहित न होता त्याच्या मोबाईलमधून त्या सेल्सगर्लचा मोबाईल नंबर काढून घेतला. तो स्वत: तिच्याशी बोलू लागला. राजूशी मैत्री वाढल्याने ती मुलगी पितांबरशी बोलायची बंद झाली. याची कल्पना अर्थात पितांबरला आली. त्यामुळे पितांबर राजूशी मनात वैर धरून राहिला आणि त्याचा काटा काढण्याची संधी शोधू लागला. त्याने राजूला मारण्यासाठी त्याची पत्नी नंदिनी आणि त्याची प्रेमिका असलेली सेल्सगर्ल यांचे कान भरले. राजूचे अन्य एका युवतीशी लफडे असल्याचे त्यांना सांगून टाकले. तिच्याशी तो नेहमी बोलत असल्याचे मी पाहिले असल्याचे सांगून त्यांच्या मनात राजूविषयी विष कालवले.
     नंदिनी त्याच्या बोलण्याला फसली आणि दोघांनी त्याचा खून करण्याचा प्लान बनविला. या प्लाननुसार डिसेंबर 2017 ला नंदिनीने घरात कोंबडा शिजवला. दुसरीकडे पितांबर राजू साहूला घेऊन बाजारात गेला. त्यादिवशी आठवडा बाजार होता.कामाला सुट्टी होती. त्यामुळे दारूच्या दुकानात जाऊन त्यांनी दारू प्यायला सुरुवात केली. पितांबर स्वत: कमी प्यायचा आणि राजूच्या ग्लासमध्ये भरपूर दारू  ओतायचा. राजूनेही यथेच्छ दारू पिली. मग दोघेही घरी आले. राजू घरात कोंबड्याच्या जेवणावर ताव मारत होता. प्लाननुसार पितांबरने त्याला आणखी दारू प्यायला कॉल केला. जेवणाचे ताट तसेच सोडून तो पितांबरकडे गेला. प्लाननुसार पितांबर त्याला जवळच असलेल्या अमराईत घेऊन गेला. इकडे राजूची बायको नंदिनी काडेपेटी आणि बाटलीत पेट्रोल घेऊन आली. पितांबरने त्याला आमराईत पुन्हा भरपूर दारू पाजली. जास्त दारू प्यायल्याने त्याला चांगलीच नशा चढली. त्याचे त्याला कळेना अशी अवस्था त्याची झाली. मग पितांबरने एक मोठा दगड घेऊन त्याच्या डोक्यात टाकला. तो खाली पडल्यावर त्याच्या डोक्यावर आणखी दगड घालून त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा केला.
     यात राजू गतप्राण झाला. मग दोघांनी राजूच्या मृतदेहावर पेट्रोल ओतले आणि पेटवून दिले. खून केल्याचा कुठलाच पुरावा मागे न ठेवता ते दोघेही घरी आले. दुसर्या दिवशी नंदिनीने आपला नवरा बेपत्ता झाल्याची फिर्याद तोरवा पोलिस ठाण्यात दिली. नंदिनी रोज पोलिस ठाण्यात जाऊन माझ्या नवर्याला शोधून आणा,म्हणून दंगा करायची. पण पोलिसांना काही राजू साहू सापडत नव्हता. ते हतबल दिसत होते.
पण म्हणतात ना, खोटे कधी लपून राहत नाही. तसेच झाले. 23 डिसेंबर 2017 रोजी सकाळी गावातला एक इसम अमराईत गेला, तेव्हा त्याला कुत्र्याला एका खड्ड्यातून मानवी शरीराचा तुकडा घेऊन जाताना पाहिले. तो शंकेने आणखी पुढे जाऊन खड्ड्यात पाहिले तर तिथे एक मानवी सांगाडा पडल्याचे दिसले. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या अंगाचा थरकाप झाला. त्याने हा प्रकार गावात येऊन सांगितला. ऊार्यासारखी ही बातमी गावात पसरली. काही तासातच आमराई परिसराला पोलिस छावनीचे स्वरुप आले. बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिस आधिकारी आणि कर्मचारी यांनी पंचनामा करतानाच पुरावा शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलिसांना घटनास्थळावर एक चप्पल, स्वेटर सापडला. ते पाहून नंदिनीने या वस्तू आपल्या नवर्याच्या राजू साहूच्याच असल्याचे सांगून हंबरडा फोडला. ओळख पटल्यावर पोलिस कामाला लागले.
     तत्कालिन पोलिस अधिकारी परिवेश तिवारी यांच्या मनात पाल चुकचुकली. नंदिनीला पाहिल्यावर त्याम्चे डोके ठणकायचे. त्याला कारणही तसेच होते. ती रोज शेजारी असलेल्या पितांबरसोबत पोलिस ठाण्यात येऊन दंगा करायची. तिवारींना काय प्रकार आहे, याची कल्पना आली. त्यांनी नंदिनी आणि पितांबर दोघांनाही ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवला तसे दोघेही पोपटासारखे बोलायला लागले. दोघांनी मिळून खून केल्याची आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याची कबुली दिली.
     नंदिनी आणि पितांबर जेलची हवा खात असले तरी त्यांच्या मुलांचे भविष्य मात्र अडचणीत सापडले आहे. पितांबरला दोन आणि नंदिनीलाही दोन मुले आहेत.लग्न झालेले असतानाही दुसर्याची पत्नी आणि दुसर्याच्या नवर्याशी प्रेमसंबंध ठेवून या दोघांनीही आपल्या मुलांचे भवितव्य मात्र अंध:कारात ढकलले आहे. त्यांची मुलं अनाथ झाली आहेत.

1 comment: