नार्वेमध्ये स्कूल
बस किंवा स्कूल टेम्पो अथवा स्कूल रिक्षा वगैरे काही नाहीत. मुलं सरकारी बसने किंवा रेल्वेने
अथवा सायकलने शाळेला जातात-येतात. अगदी
पहिलीपासून तिथल्या मुलांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात होते आणि दुसरीत जाईपर्यंत ते
सरकारी रेल्वे किंवा बसचा प्रवास शिकून घेतं.बसवाले त्यांना त्यांच्या
युनिफॉर्ममुळे ओळखतात आणि त्यांना सहकार्य करतात. स्टुडंट पास
असल्याकारणाने त्यांचा तिकिट काढण्याचा प्रश्नच येत नाही.
मुलांना याचा फारसा त्रास होत नाही. एका गल्लीतली
मुलं आपला एक गट करतात आणि एकमेकांच्या हाताला धरून बस स्टँडपर्यंत जातात आणि सोबतच
घरीदेखील येतात. या सगळ्यांचे मध्ये आई-वडिलांची काहीच भूमिका नाही. मुलं घरी आल्यावर ब्रेड-लोणी वगैरे खातात आणि खेळायला मैदानावर निघून जातात.
तरीही पालकांना
मुलांची काळजी ही असतेच. आता तिथल्या मुलांना एक विशिष्ट प्रकारचे घड्याळ दिले जात आहे. जर ती मुलांनी त्यांच्या मनगटावर बांधली तर त्यांचे लोकेशन पालकांच्या मोबाईल
दिसते. त्या घड्याळाला स्पिकर लावण्यात आला आहे. त्यावरून ते केव्हाही आपल्या पालकांशी संवाद सादू शकतात. अडचणीच्या वेळेला सांगू शकतात. त्या घड्याळाचे आणखी एक
वैशिष्ट्य असे की, त्या घड्याळाला एसओएस बटन आहे, त्या बटणाला फक्त स्पर्श झाला तरी पालकांच्या मोबाईल रिंग वाजायला लागते.
या घड्याळाच्या अविष्कारकाला कोणती भीती वाटली म्हणून त्याने या घड्याळाची
निर्मिती केली, माहित नाही. पण त्याची निर्मिती
ही वैश्विक आहे. कितीही सुरक्षितता देण्याचा
प्रयत्न केला तरी ती अपुरीच पडते.
आपल्या देशात याबाबत
काय चित्र आहे? मुला-मुलींची सुरक्षितता धोक्यात असलेल्या आपल्या देशात कुठलेच काही खरे नाही.
भौतिक सुविधांची वानवाच आहे. श्रीमंतांची मुले
स्कूल बसमधून शाळेला जा-ये करतात. काहींच्या
स्वत:च्या गाड्या आहेत. पण ज्यांच्या घरी
दोन वेळचे खायला मिळत नाही. त्यांची मुलं शाळेतल्या पोषण आहारावर
आपले पोट भरतात. आपल्या खेड्यांमध्ये तर चार-पाच किलोमीटर मुलं आनवाणी पायी चालत शाळेला येतात-जातात.
रस्त्यावर, माळरानावर चिटपाखरू नसतं, अशा ठिकाणाहून जातात. हिंस्त्र प्राणी, कुत्री वगैरेंची भीती न बाळगता ही मुलं बिनधास्त वावरत असतात. मात्र याच्या उलट चित्र शहरात आहे. रस्त्यांवर माणसांची
ही गर्दी! वाहनांचा आवाज, कर्णकर्कश हॉर्न,
वाहनांमधून निघणारा विषारी धूर अशा डोकं फिरवणार्या वातावरणात मुलं शाळेला जात-येत असतात.
आपल्या देशात मुलींच्याबाबतीत
फारच गंभीर आणि धोकादायक वातावरण आहे. छेड काढणे, घालून-पाडून
बोलणे,अंगाला स्पर्श करण्यासाठी अतुर असलेली पिढी लांडग्यासारखी
त्यांच्या भोवतीने वावरत असते. चौका-चौकात
अशी टोळकी वावरत असतात. कधी कुणी एकादा रस्त्यात अडवून मुलीवर
ब्लेड किंवा चाकूने वार करतो. पळून जातो. कुणी रिक्षात-बसमध्ये तर कुणी कोणत्या वाहनात मुलींची
छेड काढतो, तिच्या अब्रूला हात घालतो. मुलींसाठीही
किती सुरक्षितता बाळगली तरी ती कमीच आहे. चौका-चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी होते,पण ती
मागणीच राहते. आणि जरी ते कॅमेरे बसवले तरी त्याची छायाचित्रण
करण्याची क्वालिटी भयानक असते. त्यात चित्रित झालेला माणूस ओळखूच
येत नाही अशी अवस्था! अशा वातावरणात आजची पिढी वावरत असताना आपला
बालपणीचा काळ आठवतो. तेव्हा असं काही नव्हतं. बिनधास्त आणि अगदी आनंदात, उड्या मारत कधी रस्ता चुकवत
शाळेला जात होतो. अगदी बेफिकीर जगणं. कशाची
कशाची चिंता नाही.
दप्तर कुठे तरी
ओढ्यात किंवा आणखी कुठे लपवून शाळेला बुट्टी मारून मस्तपैकी मित्रांसोबत मज्जा करत
होतो. शिक्षक रागवायचे, तेव्हा काही तरी थापा मारायचो. आणि कधी तरी त्या थापांचे
बिंग फुटायचे. पण एकूण मजेचे दिवस होते. कसले टेन्शन नाही. जाता-येता काळजी.
मुलंही व्यस्त झाली आहेत, पण तीही टेन्शननेच!
सकाळी या क्लासला जा, दुपारी शाळा पुन्हा संध्याकाळी
दुसर्या क्लासला. डोक्यात फक्त अभ्यास,
सराव, कसरत!
आज आई-वडील दोघेही कामाला जातात.
घरात कोणीच नाही. त्यामुळे सुरक्षेची साधने वाढली,
ती कमी पडू लागली, दुसरीची त्यात भर पडू लागली.
हा प्रकार सुरूच आहे. तरीही मुलांच्या सुरक्षेची
काळजीच! आता घड्याळ, सीसीटीव्ही अशा कित्येक
सुरक्षा! माणसंच माणसाला भीती घालताहेत आणि माणसंच माणसांची जनावरांसारखी
लचके तोडत आहेत, तेव्हा काय करायचं? प्रत्येकाला
आपली सुरक्षा करण्याचा तेवढा तरी हक्क आहे.
अगदी योग्य वास्तव मांडलेत सर
ReplyDelete