अरुणाचल प्रदेशातलं तवांग हे एक अतिशय
सुंदर शहर आहे.नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या
प्रदेशातील बहुतांश लोक शेती आणि पशुपालनाचा व्यवसाय करतात. याशिवाय
पर्यटन हादेखील इथल्या लोकांचा प्रमुख्य उत्पन्न स्त्रोत आहे. लामा थुपटेन फुंसोक यांचा जन्म तवांगमधल्या एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला.
त्यांचे बालपण सरोवर आणि पहाडी इलाक्यादरम्यान अगदी मजेत चाललं होतं.
पाच वर्षे झाली, तेव्हा त्यांच्या वडिलांनी गावातल्या
शाळेत त्यांचं नाव दाखल केलं. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं
आणि अचानक त्यांचं जीवनच बदलून गेलं. तेव्हा ते फक्त नऊ वर्षांचे
होते. आई आजारी पडली आणि त्यातच ती सगळ्यांना सोडून गेली.
थुपटेन अनाथ झाले. त्यांच्या मनातली गोष्ट जाणून
घ्यायला कुणी शिल्लक उरलेच नव्हते.
आईच्या जाण्याने ते खूप उदास राहू लागले. कुठेच मन लागत नव्हते. एके दिवशी
ते शाळेतून घरी परतत होते. वाटेत त्यांना दोन बौद्ध भिक्षू भेटले.भिक्षूंनी त्यांना पाहिले आणि उदासीचे कारण विचारले. बोलता बोलता ते भिक्षू त्यांना म्हणाले, तुला बौद्ध धर्माची
दीक्षा घ्यायला हवी. भिक्षूंची ही गोष्ट ऐकून त्यांना फार मोठा
आनंद झाला. त्यांनी निश्चय केला की,
आपण लामा बनायचे. दुसर्या
दिवशी ते मठात पोहचले. यानंतर त्यांचे जीवनच बदलून गेले.
त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. सुरुवातीला
भिक्षूचे जीवन कठीण वाटले.घरापासून लांब राहून कडक शिस्तीत जगावं
लागलं. पण त्यांनी आपल्या जीवनाची दिशा निश्चित केली होती. हळूहळू मठ हेच त्यांचे कुटुंब बनले.
एका बुद्ध भिक्षूचे आयुष्य सामान्य लोकांच्या जीवनापेक्षा फारच वेग़ळे
असते, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. सुरुवातीचे
काही महिने त्यांना कठीण गेले. पण नंतर मात्र त्यांना ते आवडू
लागले.
थुपटेन पुढील शिक्षणासाठी दक्षिण भारतात
निघून गेले. तिथली संस्कृती त्यांना मानवू लागली.
परंतु, ते आपल्या हृदयातून तवांगला कधी दूर करू
शकले नाहीत. काही दिवसांनंतर त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला.
ते गरीब कुटुंबातले असल्या कारणाने त्यांना तिथल्या गरीब आणि अनाथ मुलांची
ओढ लागली. त्यांच्यासाठी काही तरी करावसे वाटू लागले.
याच निश्चयाने ते पुन्हा आपल्या शहरात परतले.
मठ आणि प्रवासादरम्यान त्यांनी कित्येकदा बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना
ऐकले होते. ते आपल्या गृहक्षेत्रासाठी काही तरी करायला हवे,
असे आपल्या बोलण्यातून अधिक जोर देऊन सांगत असत. त्यांची व्याख्याने ऐकून त्यांच्या अंतर्मनात तवांगमधल्या अनाथ मुलांसाठी काही
तरी करण्याची प्रेरणा जागी झाली.
परत आल्यावर थुपटेन एका पब्लिक स्कूलमध्ये
शिकवू लागले. शाळेकडून चांगले वेतन मिळत होते.
शिक्षक असल्याकारणाने परिसरात मानसन्मान मिळत होता. पण त्यांचे मन त्यात रमत नव्हते. त्यांना नेहमी त्या
मुलांची काळजी सतावत होती, जे फी देऊ शकत नसल्याने शाळेत जाऊ
शकत नव्हते. त्यांच्या मनाला याची चुटपूट लागून राहत होती की,
आपण नोकरी करायला तवांगला आलेलो नाही. तर आपल्याला
गरीब आणि अनाथ मुलांसाठी काही तरी करायचे आहे. ते ज्या शाळेत
शिकवत होते, त्या शाळेत श्रीमंत कुटुंबाची मुले शिकायला येत.
ते त्या अनाथ आणि दिव्यांग मुलांना पाहून दु:खी
व्हायचे, ज्या मुलांना शाळेला जाता येत नव्हते. शेवटी त्यांनी नोकरी सोडून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला.
शाळा सुरू करायची म्हटल्यावर त्यासाठी
जमीन हवी. त्यांनी तवांगमध्ये स्वस्तात जमीन मिळते का, याचा शोध सुरू केला. जमीन खरेदी करण्यासाठी त्यांनी त्यांच्याजवळ
जी काही संपत्ती होती, ती डावावर लावली. यानंतर शाळेची इमारत उभी करण्यासाठी पैशांची चणचण भासू लागली. अनेकांना त्यांनी मदतीची हाक दिली. 1993 मध्ये स्थानिक
प्रशासन आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून शाळेची इमारत तयार झाली. शाळा पूर्णपणे गरीब लोकांसाठीच होती. पण अडचणी काही कमी
झाल्या नाहीत. गावातल्या मुलांना शिक्षणासाठी एकत्र गोळा करण्याचं
कामदेखील कठीण होतं. बहुतांश गरीब मुलं मोलमजुरी करायचे.
जर ते शिकायला शाळेत येऊ लागले तर त्यांचे घर कसे चालायचे? त्यामुळे अशी कुटुंबे आपल्या मुलांना शाळेत कशी पाठवणार? त्यांच्या अडचणी योग्य होत्या. पण त्यांना असेच वार्यावर सोडून कसे
चालणार?
थुपेटन यांनी गावोगावी जाऊन लोकांशी
संवाद साधला. गरीब शेतकरी,मजुरांना भेटले. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा
प्रयत्न करू लागले. गरिबीपासून सुटका करून घ्यायची असेल तर मुलांना
शिकवणे गरजेचे आहे, हे ते लोकांना सांगत. शेवटी मोठ्या मुश्किलीने
17 मुलं शिकायला तयार झाली. अशा प्रकारे त्यांच्या
शाळेची सुरुवात झाली. शाळेत शिकवण्याबरोबरच मुलांना राहण्या-खाण्याची व्यवस्थाही करण्यात आली. हळूहळू संख्या वाढत
गेली. 1998 मध्ये त्यांनी मंजूश्री विद्यापीठाची स्थापना केली.
या शाळेत अनाथ आणि दिव्यांग मुलांसाठी प्राधान्य देण्यात आले.
थुपटेन यांनी त्यांच्या बालपणीच त्यांच्या आईला गमावले होते.
त्यामुळे अनाथ होण्याच्या वेदना काय असतात,याची
कल्पना त्यांना आली होती. त्यांनी असा प्रयत्न केला की,
अशा मुलांना शाळा आपली वाटली पाहिजे,मुलांना चांगले
शिक्षण मिळाले पाहिजे आणि त्यांना एक प्रामाणिक, चांगला नागरिक
बनवले पाहिजे. पुढे जाऊन हीच मुले अनाथ, गरीब आणि असहाय्य लोकांना मदत करू शकतील. थुपटेन आपल्या
परीने आणि सावकाशीने समाजसेवेला लागले. हळूहळू त्यांच्या या कामाची
दखल घेतली जाऊ लागली. आज मंजूश्री विद्यापीठात जवळपास शेकडो मुले
मोफत शिक्षण घेत आहेत. 2004 मध्ये प्रदेश सरकारने त्यांचा सामाजिक
कार्यासाठी गोल्ड मेडल देऊन गौरव केला. 2006 मध्ये त्यांना उत्तर-पूर्व अॅवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले आणि
2007 मध्ये केंद्र सरकारने त्यांचा मानाचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव
केला.
No comments:
Post a Comment