Sunday, April 8, 2018

(बालकथा ) बर्फाचा तुकडा


     एकदा महसूल अधिकारी राजा कृष्णदेवराय यांना भेटायला आला. त्याने तक्रार केली,"महाराज, गेल्या काही महिन्यांपासून राज्याची आर्थिक स्थिती बिघडत चालली आहे. कररूपाने गोळा होणारा पैसा राजकोषापर्यंत येईनासा झाला आहे. खर्च होतो आहे,पण जमा  नावे काहीच पडतच नाही. काही तरी उपाय करावा लागेल,महाराज."

हे ऐकून राजा काळजीत पडला. तेनालीरामदेखील तिथे उपस्थित होता. तो म्हणाला,"महाराज,काळजी नसावी. आज दरबारात या गोष्टीची चर्चा घडवून आणा. मी त्याचवेळी यावर उपाय शोधून काढीन."
राजाने काळजी भरल्या नजरेने तेनालीरामकडे पाहिले आणि मग म्हणाला,"ठीक आहे,पण मला नाही वाटत की, तू या समस्येवर काही उपाय शोधू शकशील."
तेनालीराम उत्तरादाखल फक्त हसला.
दरबारात महाराज कृष्णदेवराय यांनी यासंदर्भात चर्चा चालवली. याबाबत सगळ्यांनाच सर्व काही माहीत होते परंतु, दरबारात सांगणार कोण?
तेवढ्यात तेनालीराम उठून उभा राहिला.त्याच्याजवळ असलेल्या  झोळीतून त्याने एक बर्फाचा तुकडा बाहेर काढला. त्याने तो तुकडा एका दरबाऱ्याकडे सोपवला.  आणि म्हणाला,"तू हा तुकडा दुसऱ्या दरबाऱ्याकडे सोपव.त्याने दुसऱ्याकडे. असे करत हा तुकडा राजापर्यंत पोहचवा." 
तसेच झाले. हातोहात तो बर्फाचा तुकडा राजाच्या हातात पोहचला. पण त्याचा आकार तोपर्यंत फारच लहान झाला होता.
तेनालीरामने हे काय चालवले आहे, हे कोणालाच कळेना. राजालाही काही कळेना. तेव्हा तेनालीराम म्हणाला,"महाराज, बर्फाच्या या तुकड्यांप्रमाणेच कराच्या रूपाने गोळा होणाऱ्या पैशांचे होत आहे. राजकोषपर्यंत येता येता हा पैसा कमी कमी होत आहे."
राजा कृष्णदेवराय यांच्या सगळा प्रकार लक्षात आला. त्याने तेनालीरामच्या चतुराईची खूप प्रशंसा केली. -मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment