Friday, April 27, 2018

... आणि शंकर-जयकिशन संगीतकार बनले


      ही घटना साधारण 1948-49 ची असावी. पृथ्वीराज कपूर यांच्या थिएटरमध्ये एक तबलावादक एक बंदिश सारखा गुणगुणायचा, ती बंदिश होती अशी: अमुआ का पेड है वो ही मुंडेर है, आजा मेरे बालमा अब काहे की देर है...  हा तबलावादक हैद्राबादहून साधारण चार-पाच वर्षांपूर्वी मुंबईला आला होता. तो तबला वाजवण्यात प्रवीण होता. त्याला आशा होती की, या शहरात त्याच्या कलेची कदर केली जाईल. योगायोगाने त्याला पृथ्वीराज कपूर यांच्या थिएटरमध्ये काम मिळाले होते. इथे त्याचे काही मित्रही बनले होते. यात तबलावादक चंद्रकांत भोसले आणि गुजरातचा हार्मोनियम वाजवणारा जयकिशन यांचादेखील समावेश होता. या दरम्यान पृथ्वीराज कपूर यांच्या अभिनेता मुलाने आग (1948) नावाचा पहिला चित्रपट सुरू केला होता. या चित्रपटाचे संगीत राम गांगुली यांच्याकडे सोपवण्यात आले होते. आणि शंकर-जयकिशन त्यांचे सहाय्यक होते.

     आग बनवताना प्रशिक्षित गायक असलेले राज कपूर यांनी कित्येकदा शंकर यांच्या तोंडून अमुआ का पेड है वही मुंडेर है... ही बंदिश ऐकली होती. आग नंतर राज कपूर यांनी बरसात बनवायला घेतला. याचे संगीतदेखील राम गांगुली यांच्याकडेच सोपवण्यात आले.यातील एका गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान राम गांगुली आणि राज कपूर यांच्यात मतभेद झाले. त्यावरून वादही झाले. याचा परिणाम असा झाला की, राज कपूर यांनी बरसात चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी काढून घेतली आणि ती शंकर यांच्याकडे सोपवली. शंकर यांनी राज कपूर यांना विनंती केली की, माझ्यासोबत जयकिशन यांनादेखील घेतल्यास चांगले होईल. अशा प्रकारे 1949 मध्ये बरसात मध्ये पहिल्यांदा शंकर-जयकिशन यांची संगीतकार जोडी बनली.
     शंकर बरसातच्या गाण्यांवर काम करीत असताना राजकपूर यांना ते गुणगुणत असलेली बंदिश अमुआ का पेड है... आठवली. त्यांनी ही बंदिश चित्रपटात वापरण्याचा निर्णय घेतला. आणि महिन्याला 11 रुपये पगारावर मुंबईतल्या बेस्टमध्ये कंडेक्टरची नोकरी केलेल्या हसरत जयपुरी यांना यावर गाणे लिहायला सांगण्यात आले. गाण्याचा मुखडा खरे तर शंकर यांनी ऐकवलेल्या बंदिशीवर आधारित होता. यात जयपुरी यांनी थोडा फार बदल केला. जयपुरी यांच्या गाण्याचा मुखडा होता, जिया बेकरार है, छाई बहार है, आजा मेरे बालमा तेरा इंतजार है... जयपुरी यांचे पहिले गाणे रिकॉर्ड झाले, ते फारच गाजले. याबरोबरच बरसात ची सगळीच गाणी लोकांच्या ओठांवर राहिली. सगळ्याच गाण्यांना लोकांनी डोक्यावर घेतले.
     बरसात च्या यशानंतर शंकर-जयकिशन यांच्या जोडीने नंतर असा काही धुमाकूळ घातला, त्यांना जवळपास 20 वर्षे कोणी त्यांच्या स्थानापासून हटवू शकले नाही. त्यांचा आवारा, श्री 420, बसंत बहार, अनाडी, चोरी चोरी, मेरा नाम जोकर, दाग,यहूदी सारख्या चित्रपटांनी यशाचा झेंडाच गाडला.  चित्रपटसृष्टीत त्यांना पर्यायच नव्हता. शंकर-जयकिशन म्हणजे हिट चित्रपटाची गॅरंटी! निर्माते त्यांच्या नावामुळे पैशांची थैली मुक्तहस्ते खोलायचे. शेवटी यश हा एक असा पतंग आहे, ज्याला शेवटी खाली यावेच लागते. हा नियतीचा खेळ आहे. 1966 मध्ये सूरज या चित्रपटानंर्ईंर ही जोडी फुटली. शारदा ( तितली उडी... या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली) या नव्या नायिकेला शंकरद्वारा प्रोत्साहन दिल्याचे कारण या मागे असल्याचे सांगितले जाते. 1971 मध्ये जयकिशन आणि 1973 मध्ये शैलेंद्र यांच्या मृत्यूनंतर शंकर एकट्याच्या जीवावर यश कायम ठेवू शकले नाहीत. त्यांच्या अहंकारी स्वभावामुळे निर्माते त्यांच्यापासून दूर होत गेले. आर. के. कँपने बॉबी चित्रपटासाठी त्यांच्या जागी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना घेतले. 26 एप्रिल 1987 मध्ये शंकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या नातेवाईकांनी सिनेसृष्टीला दिली नाही. राज कपूर यांनाही सांगण्यात आले नाही. अनेकांना त्यांच्या मृत्यूची बातमी दुसर्यादिवशी वर्तमानपत्रातच वाचायला मिळाली.

शंकर (जयकिशन)
15 ऑक्टोबर 1922- 26 एप्रिल 1987
बरसात प्रदर्शित झाल्यावर याच्या गाण्याने संपूर्ण देशाला वेड लावले. सिनेमा- संगीत एका वेगळ्या वळणावर पोहचला. बरसात मागे आठ माणसांचे कष्ट होते. आणि विशेष म्हणजे यातील एकही व्यक्ती 30 वर्षे वयाच्या पुढचा नव्हता. यात हसरत जयपुरी आणि शंकर यांचे वय सर्वात अधिक म्हणजे 27-27 होते. सगळ्यात कमी वय निम्मी(16 वर्षे) होते. जयकिशन (20), लता मंगेशकर (20), मुकेश (26), शैलेंद्र (26), राज कपूर (25), नरगिस (20) यांची एक टीम तयार झाली होती. शंकर-जयकिशन आरके स्टुडिओचे अविभाज्य भाग होते. या जोडीतील शंकर यांचा काल स्मृतिदिन होता

No comments:

Post a Comment