Saturday, April 28, 2018

चांगल्या नेतृत्त्वाची लक्षणे


      लोक नेहमी विचार असतात की, एक चांगला वक्ता आणि एक चांगला लिडर यांच्यात काय फरक असतो? ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि लेखक स्वप्निल कोठारी याचं उत्तर मानसिकतेत असल्याचे सांगतात. एका चांगल्या वक्त्त्याचे अस्र आणि शस्त्र हे त्याचे  फक्त शब्द असतात. त्याचे विचार असतात. पण एक चांगला लिडर सर्वात पहिल्यांदा शब्द आणि विचारांना स्वत: आपल्या जीवनात आत्मसात करतो. त्यानंतरच तो दुसर्यांना तसे वागण्याविषयी सांगतो. आपल्या सगळ्यांना एका महात्म्याची एक गोष्ट माहित आहे. ती बर्याचदा महात्मा गांधींपासून सुकरातपर्यंत कुणाकुणाच्या नावावर खपवण्यात आली आहे. असे जरी असले तरी त्या कथेचे महत्त्व काही कमी होत नाही. ती गोष्ट अशी आहे: एक महिला आपल्या शाळकरी मुलाला घेऊन एका महात्म्याकडे जाते. त्या मुलाला गूळ फार आवडत असतो आणि तो साहजिकच जास्त गूळ खात असतो. त्याची ती सवय बंद करण्यासाठी त्याची आई त्याला घेऊन त्या महात्म्याकडे घेऊन आलेली असते. मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की, त्या महात्म्यालादेखील अधिक गूळ खाण्याची सवय असते. अर्थात महात्मा लोक स्वत: आचरण असल्याशिवाय तसे करायला कुणाला सांगत नाहीत. त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक असा प्रकार नसतो. साहजिकच ते महात्मा त्या महिलेला आठ दिवसांनंतर पुन्हा यायला सांगतात. या आठ दिवसात ते गूळ खाण्याचे सोडतात आणि ती महिला आपल्या मुलाला पुन्हा येते, तेव्हा मग ते त्या मुलाला गूळ न खाण्याचा सल्ला देतात. जास्त गूळ खाल्ल्याने काय परिणाम होतात, तेही सांगतात.

     म्हणजेच जो लिडर असतो, तो जे सांगतो, ते अगदी मनापासून सांगतो. त्यामुळे त्याचे बोलणे अगदी हृदयात उतरते. आपण इतिहास धुंडाळून पाहिला तर आपल्या लक्षात येईल की, सर्वच महापुरुष आपल्या विचारांना पहिल्यांदा आचरणात आणत, मग अन्य लोकांना ते त्याच्याबाबत सांगत.ज्याचे आचरण शुद्ध असते, लोक त्यालाच मान देतात. ही माणसे स्वत: आचरण करीत,मग तसे करायला सांगत. मग ते राम असतील, कृष्ण असेल, बुद्ध किंवा महावीर असतील. त्याचबरोबर महात्मा गांधी,सुभाषचंद्र बोस अथवा मार्टिन लूथर असतील, या सगळ्यांच्या बोलण्यात वजन, सांगण्यात प्रेरणा आणि हृदयात उतरणारा विशेष गुण असतो. स्टीव जॉब्सचे जीवन जर नवयुवकांना प्रेरणादायी असेल तर ते यासाठी की, ते स्वत: 18 ते 20 तास सतत काम करीत असत. फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग आपल्या प्रोजेक्टसमध्ये स्वत:ला अगदी झोकून देत असतात. विश्वप्रसिद्ध अँकर ओफ्रा स्वत: जीवनातले सर्व कटू प्रसंग झेलून पुढे आले आहेत.
     वॉरेन बफेट रोज पाचशे पानं वाचतात आणि भाषणापूर्वी फक्त आऊटलाइन बनवतात. ते व्यासपीठावर बोलत असतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यात अगदी सहजता असते. ते श्रोत्यांवर आपली छाप सोडतात. प्रत्येक यशस्वी व्यक्ती आपली स्वत:ची एक स्वतंत्र  शैली बनवतात. कारण ते स्वत: तसे दिवस-रात्र जगत असतात. त्यामुळेच ज्यावेळेला ते दुसर्याला सांगतात, तेव्हा ते अनुकरणीय बनलेले असते.
     खरे तर खरी ताकद शब्दांमध्ये नसते तर त्याच्या मागे असलेल्या कर्मात असते. त्याच्या जीवन दर्शनमध्ये असते. तसे जीवन जगून त्याला जीवंत करतात. काही शब्दांची आठवण जरी काढली तरी त्यासंबंधीत महान पुरुषांची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर येते. कारण त्यांनी त्या शब्दांना जीवन देण्यासाठी आपले जीवन पणाला लावलेले असते. जर तुम्हाला या जगात बदल हवा असेल, तर पहिल्यांदा स्वत: ला बदला. जर निखार्याचे चटके कसे असतात, ते दुसर्याला सांगायचे असेल तर पहिल्यांदा ते आपल्या हातात पकडून ठेवायला हवेत.

3 comments: