'पानी फौंडेशन' आणि 'नाम फौंडेशन' यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सध्या पाण्याबाबत
चांगली जनजागृती होत आहे, ही बाब चांगली उल्लेखनिय आहे.
राज्य शासनानेसुद्धा शेतशिवार, जलयुक्त शिवारच्या
माध्यमातून पाणी अडवण्याचे धोरण राबवले आहे आणि त्याला चांगले यश आल्याचेही दिसत आहे.
गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने आणि त्यानिमित्ताने पाणी अडवले
गेल्याने शिवारात अजून तरी पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे राज्य शासनाला
पाण्याच्या टँकरवर करावा लागणारा खर्चदेखील वाचला आहे. पानी आणि
नाम फौंडेशनच्यामाध्यमातून गावेच्यागावे जलसंधारणासाठी पुढाकार घेत असल्याचे आणि त्यासाठी
लोकसहभाग वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र अजूनही लोकांनी
पाण्यासंदर्भात जागृत व्हायला हवे. शहरातदेखील लोकांनी,
सोसायट्यांनी छतावरचे पाणी अडवून ते मुरवण्याच्यादृष्टीने प्रयत्न करायला
हवे आहेत.
पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याशिवाय सृष्टी अशक्य आहे.
पाणी ही मानव प्राण्याला व निसर्गाला जीवन देण्याची जीवनदायी अशी प्रभावी
किमयाच आहे. पाणी हे
साक्षात परमेश्वराने निर्माण केलेल्या पंचमहाभुतांपैकी एक म्हणजे
’पृथ्वी, आप, तेज,
वायु व आकाश यापैकी एक आहे. तसे पाहता पंचमहाभूतांची
आवश्यकता प्रत्येक प्राणीमात्रला जगण्यासाठी अपिरिहार्य असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण
आहे,पण तरीही पाण्याचे महत्व फारसे कुणाच्या लक्षात येत नाही.
पाणी
मुबलक आहे.मात्र त्याचे योग्य नियोजन नसल्याने लोकांना
पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्याचा काटकसरीने वापर,
पाणी अडवा आणि जिरवा हा मंत्र जोपासला तर भारतात उपलब्ध असलेले पाणी
सहज लोकांना पुरेल. पाण्यासाठी भांडणे होण्याची शक्यताही कमी
होईल. त्यामुळे त्याचे योग्य नियोजन ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
विशेष म्हणजे पाण्याचे योग्य नियोजन आणि योग्य स्तरावरुन वापर केला तर भारताची लोकसंख्या पुढील
50 वर्षात 5 पट जरी वाढली तरीसुद्धा पाण्याचे दुर्भीक्ष
कधीच भासणार नाही.
परंतु
आज मात्र पाण्यसाठी ’दाही दिशा- आम्हा फिरवीशी
जगदिशा’ अशा केविलवाण्या परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आपल्यावर
आलेली आहे. याचा सर्वात मोठा फटका महिलांना बसतो. कारण पुरुष सकाळी उठून कामाला जातो. मागे राहतात महिला!
त्यांना धुणी-भांडीसह अन्य गोष्टींसाठी पाण्याची
आवश्यकता आणि त्याचा शोध आणि वापर त्यांनाच करावा लागतो. ही मोठी
दु:खद गोष्ट आहे. उन्हाळ्याच्या दिवसात
तर अनेक किलोमीटर दुरवरून पायपीट करून हंडाभर पाणी मिळवावे लागते, तर काही भागात टँकरद्वारे पाण्याच्या पुरवठा करावा लागतो. दोन वर्षांपूर्वी लातूर शहराला तर रेल्वे वॅगननी पाणीपुरवठा करावा लागला होता.
ही बाब इतिहासात वारंवार घडणार नाही,याची दक्षता
घ्यावी लागणार आहे.
पाण्यासाठी
शेजारीशेजारी,लोक, राज्ये आणि देश भांडताना
दिसत आहेत.पाण्यावरून काही ठिकाणी सातत्याने भांडणतंटे,
मारामार्या, प्रसंगी खून
झालेले आपण वर्तमानपत्रातून वाचत असतो. या अतिमहत्त्वाच्या प्रश्वाबाबत अशिक्षितांबरोबर सुशिक्षितसुद्धा क्षणभर पाण्याचे महत्त्व विसरून आपसातील
वाद विकोपास नेतात. वास्तविक सुशिक्षित वर्ग, तसेच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक,
ज्येष्ठ नागरिक यांनी आपल्या वस्त्यातील नागरिकांना पाण्याचे महत्व व
योग्य ते नियोजन, उद्बोधन करून पटवून दिले पाहिजे. उद्बोधन करायला पाहिजे. सर्वांचे योगदान यात महत्त्वाचे
आहे. पाणी ही अत्यंत मौलिक असलेली सामाजिक जीवनोपयोगी वस्तु आहे,
याची सर्वांनीच जाण ठेवावयास पाहिजे, पावसाचे पाणी
हे अत्यंत शुद्ध असते. अशा पाण्याचा संग्रह प्रत्येकाने करायला
हवा.
पाण्याच्या
अडवण्याविषयी आपण आपल्या स्वत:च्या जागेवरून करायला हरकत
नाही. पाण्याचे साठवण आपल्या घराच्या गच्चीवर करायला पाहिजे.गच्चीवर जमणारे पाणी योग्य त्या उतारावरून प्लास्टीक-फायबर्स पाईप लावून आपल्या तळमजल्यावरील पटांगणात असलेल्या विहिरीत,
बोरिंग, किंवा ती नसल्यास जमीनस्तरावर टाके बनवून
त्यात सोडले पाहिजे. एकदा वापरलेले पाणी पुन्हा कसे वापरता येईल
याचा विचार करून दर महिन्यातून एकदा कार्यशाळा घेऊन तिच्या माध्यमातून कपडे धुतलेले
पाणी, आंघोळीचे पाणी संडासात, तसेच गाड्या
धुण्यासाठी किंवा पटांगण व बाहेरील फुलबाग, झाडे यासाठी वापरले
पाहिजे. जेवणानंतर हात धुण्यासाठी वॉश बेसीनचा नळ अत्यंत बारीक
करून फक्त हातच ओले करून स्वच्छ करून वॉश बेसीनचा नळ त्वरित बंद केल्यास एक बादली पाण्याऐवजी
एक मग्गाभर पाण्याचाच वापर केला पाहिजे. तसे केले तर
10 लिटर पाण्याची बचत होऊ शकते. घरांतील बाथरुमचे
नळ, शौचकुपाजवळील नळ, वॉश बेसीनचे नळ,
बाहेरील बागेजवळील नळ, मोटर गॅरेजजवळील नळ यांची
वरचेवर देखरेख करून सर्व नळ व्यवस्थित कार्यक्षम आहेत किंवा नाही हे पाहिले पाहिजे.
गळत असल्यास त्वरित त्याची दुरुस्ती केली पाहिजे किंवा नवीन नळ बसवून
दिवसभर गळणार्या नळाद्वारे शेकडो लिटर पाण्याची बचत केली पाहिजे.
ग्रामीण भागात फावल्या वेळात आपल्या शेतात 7 मीटर
बाय 7 मीटर बाय 3 मीटर याप्रमाणे प्रत्येक
शेतात शेततळे खोदावे. याचा फायदा सर्व शेतकरी व परिसरातील शेतमजूर
यांना होणार असून पाण्याची खरी बचत होऊन एक उत्तम योगदान होऊ शकते.
75 टक्के
पाणी निष्काळजीपणाच्या मानसिकतेमुळे वाया जाते. यासर्व प्रकाराबद्दल
प्रत्येक नागरिकाने सर्वात प्रथम कर्तव्य म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब मानवी जीवनासाठी
किती मौल्यवान आहे,याची जाणीव ठेवून त्या थेंबाचे योग्य ते नियोजन
करून पाण्याची उपयुक्तता ही मानवतेची नव्हे तर साक्षात ईश्वरसेवाच
समजली पाहिजे. सर्वांना कानमंत्र म्हणून हे सांगावे. आता पाण्यासारखा पैसा उधळला या जुन्या म्हणीत बदल करून पैशासारखे पाणी जपावे,
अन्यथा डोळ्यातून निघणारी आसवे पिऊन तहान भागवावी लागेल, अशी म्हण रुढ केली पाहिजे.अन्यथा जल नाही तो कल नही!
असे ओरडून सांगावे लागेल.
No comments:
Post a Comment