Thursday, April 19, 2018

शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला


     जागतिकीकरणाच्या आजच्या काळात शिक्षणाकडे फक्त नोकरीच्या दृष्टीकोनातून न पाहता व्यक्तिमत्त्व आणि क्षमता विकासाच्या दृष्टीकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. जर क्षमता असेल आणि योग्यता असेल तर संधींची काहीच कमतरता नसते. गरज आहे ती फक्त सततच्या प्रयत्नांची! सध्याच्या काळात शिक्षणाला केवळ नोकरीशी जोडले जात आहे. शिक्षण, गुणपत्रिका, पदवी आणि भल्या मोठ्या पगाराची नोकरी! असेच काहीसे गणित मांडले जात आहे. आज विद्यार्थी आणि त्यांचे पालक दोघेही याकडेच आशाळभूतपणे पाहात आहेत. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण झाल्यावर व्यावसायिक शिक्षण निवडताना कोणती नोकरी मिळते? पगार किती मिळतो? याचाच शोध घेतला जातो. चांगल्यात चांगले कॉलेज मिळावे,यासाठी धडपड चाललेली असते. हमखास नोकरी देणारे कॉलेज पाहताना किती मुलांना प्लेसमेंत मिळाली? त्या कॉलेजमधील यापूर्वीच्या मुलांना कितीचे वार्षिक पॅकेज मिळाले, याचा शोध घेतला जातो. कुठलाच पालक कॉलेजमधल्या शिक्षकांना विचारत नाही की, या अभ्यासक्रमामुळे मुलाचे भविष्य कसे असणार आहे? अभ्यासक्रम पूर्ण करताना मुलाला काही समजेल का? आणि यातून तो काही करू शकेल का?

     उच्च शिक्षण मिळवून चांगली नोकरी मिळावी,हीच एक इच्छा आजच्या युवकांमध्ये दिसून येते. सर्व काही रोजगाराची शक्यता आणि मोठा पगार एवढ्यापर्यंतच मजल मारताना दिसतात. त्यामुळेच इंजिनिअर किंवा व्यवस्थापनसारख्या सगळ्या रोजगारपूरक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येतो. दरवर्षी मोठ्या प्रमाणात इंजिनिअर आणि व्यवस्थापनाची पदवी घेऊन मुले बाहेर पडत आहेत. मात्र यात फक्त एक कमतरता दिसून येत आहे, ती म्हणजे संधीनुसार योग्य दावेदारी. फक्त गुणपत्रिकेतले मोठे आकडे आणि पदवी हातात आली म्हणजे कोणी नोकरी लायक होत नाही. ज्ञान आणि कौशल्यादरम्यान ताळमेळचा अभाव आज मोठी समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत देशातले चित्र काय आहे? फक्त शिकल्या-सवरलेल्या बेरोजगारांचा आकडा तेवढा वाढत चालला आहे.
     आजच्या घडीला बहुतांश युवकांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नाही. मात्र सामाजिक आणि कौटुंबिक दबाव आणि जबाबदारी पाहता कुठली ना कुठली नोकरी स्वीकारावी लागते. अशा परिस्थितीत मजबुरी म्हणून केली जाणारी नोकरी म्हणजे त्याच्या कौशल्याचा आणि नोकरीचा असा काहीच संबंध येत नाही.  त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की, मजबुरीने करावी लागणार्या नोकरीत आजचा युवा वर्ग शंभर टक्के योगदान देऊ शकणार आहे का? पूर्ण प्रामाणिकपणे तो त्याच्यावर सोपवलेले काम करणार आहे का? या नोकर्या त्यांना त्यांच्या लक्ष्यापर्यंत जाण्यास मदत करणार आहेत का? त्यांनी जे ध्येय मनाशी बाळगले आहे, ते तिथंपर्यंत पोहचणार आहेत का? ते साध्य होणार आहे का?
      खरे तर पुढे ज्या समस्या निर्माण होतात, त्या निर्माण होऊ नयेत,यासाठीच विद्यार्थ्याची दहावी-बारावीपर्यंतच दिशा निश्चित करायला हवी. त्यांची आवड-निवड पारखायला हवी. त्यानुसारच त्याला अभ्यासक्रम निवडायचे स्वातंत्र्य द्यायला हवे. पालकांनाही कळायला हवं की, आपला मुलगा, दुसर्याच्या मुलासारखा नाही. स्पर्धा किंवा सामाजिक प्रतिष्ठेच्या नावावर आपल्या मुलावर दबाव न टाकता त्याला कशात आवड आहे, किंवा त्याची क्षमता कशात आहे, हे पाहून त्याला अभ्यासक्रम निवडण्याची संधी द्यायला हवी. मुलालाच त्याचा पर्याय निवडण्यास हातभार लावावा.त्यांच्यावर  कोणताही प्रकारचा दबाव आणता कामा नये. शेजारी-पाजारी, नातेवाईक यांच्या कुणाही मुलाशी त्याची तुलना करू नये. कारण प्रत्येक मुलगा हा वेगळी क्षमता घेऊन जन्माला आलेला असतो. फक्त त्याची क्षमता काय आहे, याचा शोध घेऊन किंवा त्याकामी त्याला मदत करून त्याच्या आवडीच्या अभ्यासक्रमाकडे जायला मदत करावी. मुलगा गोंधळात पडेल, अशा पद्धतीने पालकांनी वागू नये.
     मुलाला गणित,विज्ञान शिकायचं आहे की वाणिज्य शिकायचं आहे, हे विषय त्याला त्याच्या आवडीनुसार निवडण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. अर्थात कित्येकदा मुलांना कोणते क्षेत्र निवडायचे आहे, हे अजिबात कळत नाही. अशा वेळेला त्याच्या शिक्षकांशी चर्चा करायला हवी. शिक्षकांना त्याच्या आवडी-निवडी, कौशल्य कशात आहे, याची थोडी फार कल्पना आलेली असते. मानसशास्त्रदेखील मुलांच्या अभिरुचीबाबत सांगण्यास मदत करू शकते. पालकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, शेजारचा मुलगा डॉक्टर क़िंवा इंजिनिअर आहे, तर आपल्याही मुलाला डॉक्टर किंवा इंजिनिअर करायचे, हा विचार मनातून काढून टाकला पाहिजे. जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्ही मुलावर आणि स्वत: तुमच्या पायावर दगड मारून घेत आहात, हे लक्षात ठेवा. अशी किती तरी मुले आपल्या आई-वडील किंवा नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार अभ्यासक्रम निवडतात,पण आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन किंवा क्षमतेनुसार प्रदर्शन करू शकत नाहीत. याचे कारण अगदी स्वच्छ आहे, ते म्हणजे त्या विषयात त्याचे मन रमत नाही. त्याला हे सगळे दबावामुळे करावे लागत आहे. मुले इतक्या कठीण समस्येत आणि संभ्रमात पडतात की, ते कोणताच निर्णय घेऊ शकत नाहीत. पुढे अशा प्रकारच्या दबावामुळे मुले चुकीचे पाऊल उचलण्यास मजबूर होतात.
     आता आपण पाहिलेली नोकरी संदर्भातील एक बाजू होती. पण याची दुसरी बाजूदेखील आहे. फक्त नोकरीच सगळं काही आहे, असे नाही. आज उद्योजकतेचा काळ आहे.स्टार्ट अप म्हणजे लहान आणि नव्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी फक्त सरकारच नाही तर खासगी क्षेत्रदेखील योग्य ती मदत करताना दिसत आहे. अशा अनेक योजना आहेत, ज्या सरकारकडून रोजगाराच्या नव्या संधींना प्रोत्साहन देण्यासाठी राबवल्या जात आहेत. जर योग्य मार्गदर्शन मिळाले आणि एक चांगला विचार  पक्का झाला असेल किंवा स्वयं उद्योगाकडे एखाद्या मुलाचा कल असेल तर फक्त नोकरीवरचे ओझेच कमी होणार नाही तर सामाजिक प्रगतीतदेखील चांगली मदत होणार आहे. शेवटी सगळे नवे उद्योग कोणत्या ना कोणत्या समस्यांचे उत्तर शोधतानाच दिसतात.
     गोष्ट साधी आणि सोपी आहे. जर सगळेच नोकरीच्या मागे लागले तर नोकरी देणारा कोण असणार आहे? नोकरी देणारा कोणी असल्याशिवाय नोकरदार घडणार आहे का? सरकारी नोकरी तर प्रत्येकाला मिळणार नाही. खासगी क्षेत्रात अनिश्चितेचे ढग केव्हाही वाहताना दिसतात. तेव्हा यावर आणखी एक उपाय आहे, तो म्हणजे आपण आपला व्यवसाय सुरू करणे. यामुळे तुम्ही फक्त आपलेच भले करून घेणार नाही तर तुमच्याबरोबरच अनेकांचे भले करणार आहात. देशात सध्या मेक इन इंडियाचे वारे वाहू लागले आहे. कौशल्य विकासावर जोर दिला जात आहे. यामुळे स्वयंरोजगारासंदर्भात संधी चांगलेच असल्याचे जाणवत आहे. आवश्यकता आहे, ती फक्त आपल्या डोक्यात अडथळा होऊन बसलेल्या गोष्टी बाजूला करण्याची! व्यापार्याचा मुलगा व्यापारी आणि नोकरदाराचा मुलगा नोकरदार, अशा ज्या गोष्टी आपल्या डोक्यात फिट बसल्या आहेत, त्या बाजूला करायला हव्या आहेत.  यासाठी पैसा किंवा जमीनदेखील अडथळा ठरू शकत नाही. कारण यासाठीसुद्धा विविध सरकारी सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी चांगला व्यवसाय निवडण्याची आणि सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
     सर्वच शिक्षण संस्था, अभ्यासक्रम निर्मिती मंडळ आणि विद्यापीठ यांनी उद्योजकतेचे महत्त्व लक्षात घेऊन याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अलिकडे चांगले विचार आणि दृष्टीकोण समोर ठेवून काही नवे उद्योग येताना दिसत आहेत. - सप्ताह, -परिषद, आणि ई-सेलसारख्या व्यवहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची भावना वाढीस लावण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्राकडून मदत मिळत आहे. वास्तविक, एका चांगल्या रोजगारातून फक्त एकाच विद्यार्थ्याची समस्या सुटणार नाही तर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था आणि समाजाला लाभ पोहचवणार्या कार्याचा पाया घालण्याची शक्यता आहे. यामुळे देशाला चिंतेत टाकणारी समस्या सुटणार आहे.  स्वयंरोजगार फक्त बेरोजगारीची समस्या कमी करत नाही तर कोणत्याही देशाच्या विकासामध्ये चांगल्यापैकी मदत करू शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत आता शिक्षणाच्याबाबतीत आपण आपला दृष्टीकोण बदलण्याची खरीच गरज आहे.

1 comment:

  1. ८५ टक्के युवकांना
    नोकरीचे प्रशिक्षणच नाही

    वृत्तसंस्था/चेन्नई

    भारताच्या शिक्षण व्यवस्थेवर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी टीका केली आहे. देशातील ८0 ते ८५ टक्के युवकांना नोकरीसाठी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही, असे मूर्ती म्हणाले.
    चेन्नई येथे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसोबत एका कार्यक्रमात मूर्ती बोलत होते. यावेळी त्यांनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. भारतीय शिक्षण व्यवस्थेत घोकमपट्टीवर लक्ष दिले जाते. त्यामुळे देशातील ८0 ते ८५ टक्के युवकांना कोणत्याही नोकरीचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाहीये, असे ते म्हणाले. स्टार्टअपसाठी चांगले वातावरण तयार करण्यात आपण मागे पडतोय, असे ते म्हणाले.

    ReplyDelete