माणसाला रोज नवनवीन रोग होतात. वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी त्याचा शोध घेऊन त्याचा उगम कुठला आहे,
त्याची लागण होण्याची कारणे याचा शोध घेत असताना या रोगाच्या लागणीमुळे
तोपर्यंत अनेक जीव संपलेले असतात. संशोधन पूर्ण होऊन त्याच्यावर
औषधोपचार यायला बराच कालावधीत जातो. शिवाय आपल्या देशात रोगावर
संशोधन आणि उपचार याबाबतीत उदासिनताच दिसते आहे. परदेशात त्याच्यावर
औषधोपचार झाले तरी आपल्या देशात ती औषधे यायला बराच कालावधी लागतो. खरे तर आपल्या देशात याबाबतीत अधिक संशोधन व्हायला हवे आहे. आपल्या देशाची सर्वार्थाने होणारी प्रगती अनेक देशांना खुपते आहे. पाकिस्तान, चीन तर आपल्याला पाण्यातच पाहात आहेत.
त्यामुळे अशा देशांकडून आपल्याला मोठा धोका आहे. दहशतवाद, अतिरेकी यांद्वारे जरी आपल्या देशाला पोखरण्याचा
प्रयत्न चालला असला तरी नव्या तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्या देशातला नागरिक शारीरिकदृष्ट्या
कसा कमकुवत होईल, यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आपण सतर्क राहणे आवश्यक आहे. कॅन्सरने तर आपल्या
देशात थैमान घातले आहे. 20 वर्षांपूर्वी आपल्या देशाला एड्ससारख्या
महाभयंकर रोगाने आपल्या देशातल्या तरुण-तरुणींना तर धसकाच देऊन
गेले. कालांतराने माणसाचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
अर्थात नंतर त्यात आपल्याला यश आले असले तरी धोका काही टळला नाही.
कारण या रोगाचा समूळ नायनाट करण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे.
कॅन्सर,हृदयरोग, लकवा
असे अनेक आजार अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आढलून येत आहेत. त्यात यकृताचा आजारदेखील आहे. 19 एप्रिलला जागतिक यकृत
दिन आहे. यानिमित्ताने दरवर्षी जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
जेणेकरून लोकांनी आपल्या यकृताची योग्य ती काळजी घ्यावी. हळूहळू एक-एक अवयव निकामी होत राहिल्यावर या शरीराची
गरजच का आहे? अगोदरच रोगाचे अनेक प्रकार उदयास येत असताना आपण
स्वत:सुद्धा आपली काळजी करत नसल्याने आपला जीव धोक्यात घालतो.
यामुळे आजची तरुण पिढी अकाली निघून जात आहेत. कुठलेही
ध्येय नसलेली पिढी व्यसन, आरोग्याबाबत निष्काळजीपणा यामुळे आजची
पिढी शारीरिक, मानसिक आणि आरोग्यदृष्ट्या निकामी होत चालली आहे.
यकृताची काळजी वेळीच घ्यायला लागल्यावर आपल्याला संभाव्य होणार्या रोगांवर नियंत्रण आणायला मदत होते. यकृत हा आपल्या
शरीराचा महत्त्वाचा हिस्सा आहे. शास्त्रीय अभ्यासानुसार लिव्हर
अर्थात यकृत हा मेंदूनंतरचा मानवी शरीरातील दुसर्या क्रमांकाचा
सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील बहुतांश क्रिया नियंत्रित
करण्याचे महत्त्वाचे कार्य यकृताकडून पार पाडले जाते. अशा या
अवयवाची योग्य ती काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. अन्यथा यकृताच्या
कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि असे होणे म्हणजे गंभीर परिस्थिती निर्माण करणारे ठरते.
मुख्यत्वे यकृतखराब होण्याची कारणे तसेच त्याची लक्षणे या संदर्भात नेमकी
माहिती असण्याची आवश्यकता आहे. मानवी शरीर रचनेतील यकृताचे महत्त्व,
त्याची कार्यक्षमता अबाधित राहण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच त्यादृष्टीने
जीवनशैलीत करावे लागणारे बदल या संदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे,मात्र अजूनही यात वाढ होण्याची शक्यता आहे.
यकृत
आपल्या शरीराचा प्रमुख अंग असल्याने त्याची काळजी घेणे म्हणजे आपले वयोमान वाढवण्यासारखे
आहे. त्यामुळे यकृत खराब होण्यामागील कारणांविषयी
जाणून घेणे आपल्यासाठी योग्य ठरेल. आपण जे पाणी पितो त्यात क्लोरिनची मात्रा अधिक
असेल तर त्याचा लिव्हरवर विपरित परिणाम होतो. या शिवाय शरीरात
व्हिटॅमिन बी ची कमतरता असणे, अँटीबायोटिक औषधांचे अधिक प्रमाणात
सेवन, शिवाय मलेरिया तसेच टायफाईडचा विकार जडल्यास यकृत खराब
होण्याची शक्यता असते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी सांगतात.
फक्त अति दारूच्या आहारी गेल्याने यकृत खराब होते, असे नाही. तर याला अनेक कारणे आहेत. दूषित मांसाचे सेवन, दूषित पाणी पिणे, मसालेदार तसेच तिखट पदार्थांचे सेवन,चहा-कॉफी-जंकफूड अधिक प्रमाणात
घेणे याचाही यकृताच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. वैद्यकीय अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार रंगीत मिठाई खाणेही हानिकारक ठरते. या शिवाय काही बाहय लक्षणांवरूनही यकृतावर परिणाम होत असल्याचे जाणून घेता
येते. यामध्ये मुख्यत्वे यकृताच्या जागेवर दाब दिल्यास वेदना
होतात. छातीत जळजळ होते तसेच छाती भरल्यासारखी वाटते.
भूक न लागण्याची समस्या निर्माण होते. तसेच पोटात
गॅसचा त्रास सुरू होतो. आळस येऊ लागतो आणि अशक्तपणाही जाणवतो.
अशी लक्षणे दिसून आल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि उपचार
घ्यायला हवेत.
वैद्यकीय
क्षेत्रातील मंडळी यकृताचे कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी काही उपाय सांगतात आणि
ते सहज करता येण्याजोगे आहेत. त्यामुळे लोकांनी त्याप्रकारे
काळजी केल्यास त्याचा चांगला उपयोग यकृतसंबंधीच्या आजाराविषयी होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे सकाळी लवकर उठायला हवे. सकाळी उठल्यावर
मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घ्यावा. सकाळी
चालताना दीर्घ श्वास घ्यावा.याचे उत्तम
परिणाम होतात. आठवड्यातून एकदा पूर्ण शरीराला मातीचा लेप लावावा.
त्याच बरोबर मोहरीच्या तेलाने शरीराला मालिश करावी. आजकाल सनबाथ किंवा बाष्प स्नानाविषयी बरेच बोलले वा लिहिले जात आहे.
त्यामुळे या गोष्टीकडील ओढा वाढला आहे. यकृत कार्यक्षम
राहण्यासाठी सनबाथ किंवा बाष्पस्नानाचा उपचार महत्त्वाचा ठरतो. यकृतासंदर्भातील विकारांवर हळद गुणकारी ठरते. कारण अशा
वेळी हळद ही अँटीऑक्सिडंटच्या रूपात कार्य करते. त्यामुळे सकाळी
उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा हळद एक ग्लास दुधात मिसळून त्याचे सेवन
करावे. अशा काही उपचारांबरोबर खाण्या-पिण्याच्या
सवयींकडेही लक्ष द्यायला हवे. यकृताच्या विकारात ज्यूसचे सेवन
अतिशय फायदेशीर ठरते. त्यामुळे अशा व्यक्तींनी नारळाचे पाणी,
उसाचा रस यांच्या सेवनावर विशेष भर द्यावा. पालक,
गाजर यांचा ज्यूसही परिणामकारक सिध्द होतो. यकृताच्या
तक्रारी असणार्या रुग्णांनी दिवसातून तीन ते चार वेळा लिंबू-पाणी घ्यावे. टरबूज, पपई,
सफरचंद, द्राक्षे या फळांचे अवश्य सेवन करायला
हवे. पपईमुळे यकृताला ताकद मिळते तसेच टरबुजामुळे यकृताची सूज
कमी होण्यास मदत होते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी ची मात्रा अधिक
प्रमाणात असते. त्यामुळे आवळ्याचे नियमित सेवन यकृताची कार्यक्षमता
अबाधित ठेवण्यासाठी सहाय्यकारी आहे. यकृताच्या स्वास्थ्यासाठी
दिवसभरात चार ते पाच कच्चे आवळे खावेत.
अशा
उपचारांप्रमाणे रोज सकाळी अनुलोम विलोम, भ्रस्त्रिका
प्राणायाम यामुळेही यकृताची कार्यक्षमता अबाधित राहण्यास मदत होते. या सार्या बाबी लक्षात घेऊन जीवनशैलीत योग्य ते बदल
करावेत. योग्य आहार आणि नियमित व्यायाम यांची जोड लाभली तर यकृतासंदर्भातील
विकारांपासून दूर राहत दीर्घकाळ आरोग्यदायी जीवनाचा आनंद घेणे शक्य होईल. यकृत स्वास्थ्य कायम राखण्यासाठीचे उपाय फार कठीण नाहीत, त्यामुळे अगदी मनापासून कामाला लागा.
No comments:
Post a Comment