Friday, April 20, 2018

अहो,उन्हाळा उन्हाळा;त्वचा,डोळे,पोट सांभाळा


     सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून प्रचंड उकाड्याला आपल्याला सामोरे जावे लागले आहे. सायंकाळी हमखास ढगांचा गडगडाट आणि विजेचा लखलखाट यांच्यासह पाऊस बरसल्याचा अनुभव आपण घेतला आहे. कुठे गारा पडल्याच्या बातम्या आपण ऐकल्या, वाचल्या आहेत. पण पाऊस येऊन गेला की, धग इतकी प्रचंड सुटते की, बोलायची सोय नाही. ना घरात बसवते, ना बाहेर. अशा विचित्र वातावरणाचा अनुभव घेतो आहोत. गेल्या दोन दिवसांपासून मात्र तापमानात चांगलीच वाढ झाल्याचे आपण पाहिले आहे. 40 आणि 42 अंश तापमान लोकांना घाबरवून सोडत आहे. उष्माघाताचे प्रकार आपल्याकडे फारसे घडत नसले तरी त्याबाबत काळजी घ्यावी लागेल, अशी परिस्थिती सध्याच्या वातावरणावरून वाटत आहे. अशा विचित्र वातावरणात काहीच काम करण्याचे सुचत नसले तरी कामे तरी पार पाडावीच लागतात. बाहेर पडल्यावर आपल्याला त्वचा, डोळे आणि पोटाची काळजी घ्यावी लागते. नाही तर आजारी पडलाच म्हणून समजा. एकतर पाणी जास्त ओढते. त्यात उन्हाळ्यामुळे थंड पाणी प्यावेसे वाटते. मात्र थोडी फार काळजी घेतल्यास आपल्याला उन्हाळा सुकर पद्धतीने घालवता येतो. आपल्या शरीराची काळजी आपल्याला घ्यावीच लागते. ऐन उन्हाळ्यात वर्तमानपत्रात आला उन्हाळा, तब्येत सांभाळा, असे आवाहन करणार्या बातम्या. लेख वाचायला मिळतात. त्यावरदेखील नजर टाकून आपण उन्हाळा सुसह्य करण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण पावसाळा, हिवाळा परवडला,पण उन्हाळा नको, असे सर्वांचेच मत आहे. थंडीत घट्ट पांघरुण लपेटून बसता येतं. लवंडता येतं. पावसाळ्यात घरात बसून मस्तपैकी गरमागरम भजी-चहाचा आस्वाद घेता येतो. मात्र उन्हाळ्यात ना घरात बसवते, ना बाहेर. भलतीच आवस्था होऊन जाते. शिवाय दिवसेंदिवस तापमान वाढत असल्यामुळे उष्णतेचा दाहदेखील वाढत चालला आहे.

     सध्या एप्रिल महिना संपत आला आहे. मात्र त्याचबरोबर उन्हाची तीव्रता वाढत आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी काही गोष्टी सांभाळायला हव्यात. म्हणजे उरलेले उन्हाळ्याचे दिवस चांगल्यापैकी पार पडतात. या काळात डोळे कोरडे पडणे, घामाने जंतुसंसर्ग होणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने होणार्या आजाराचे प्रमाण वाढतात. असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञ नोंदवीत असतात.  त्वचा, डोळे, पोटाच्या आरोग्यावर या उन्हाळ्याचा थेट परिणाम होत असतो. लहान मुलांनाही उन्हाळा असह्य करून सोडतो.
 उष्णतेमुळे डोळे कोरडे
उन्हाळ्यात ज्या काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते,त्यापैकी डोळे महत्त्वाचे आहेत. कारणउन्हाळ्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होतो. त्यातून डोळ्यांचे विकार वाढतात. वैद्यकीय अधिकार्यांच्या नोंदीनुसार  सर्वाधिक रुग्णांना आढळणारा विकार म्हणजे डोळे कोरडे होणे होय. उष्णतेमुळे डोळे कोरडे पडतात,त्यामुळे डोळ्यांची आग होते. थकल्यासारखे वाटते. या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावीच लागेल. यासाठी पहिल्यांदा आपण बाहेर उन्हात जाताना म्हणजे घराबाहेर किंवा ऑफिसमधून बाहेर पडण्यापूर्वी डोक्याला टोपी आणि डोळ्यांना गॉगल लावणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर दिवसांतून दोन-तीन वेळा तरी डोळ्यांवर थंड पाण्याची पट्टी ठेवायला हवी. एसीऐवजी एअर कुलरला प्राधान्य दिल्यास चांगले होईल.
 त्वचा कोरडी पडून विकार
डोळ्यांबरोबरच आपल्या त्वचेचीदेखील काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कारणउन्हाळ्यात त्वचा कोरडी पडते. त्वचा कोरडी पडू नये यासाठी उन्हात जाण्यापूर्वी तोंडावर स्कार्फ, सनकोट घ्यावा. शरीराच्या बंद भागात घाम आल्याने जंतुसंसर्गाचा धोका असतो. शरीराचे असे भाग कोरडे ठेवावेत. जिन्ससारख्या घट्ट आणि जाड पँट घालणे टाळावे. त्याऐवजी सुती आणि सैल कपडे घालायला हवेत. त्याचबरोबर पोहून आला असाल तर पुन्हा अंघोळ करा. सुती आणि सैल कपडे वापरायला हवेत. आपल्या आहारात कलिंगड, काकडी, लिंबू सरबत यांचे प्रमाण वाढवायला हवे. मात्र बाजारात मिळणार्या कृत्रिम शीतपेयांचा मोह टाळायला हवा. ऊसाचा रस सर्वात उत्तम.
डायरिया, टायफॉईड, कावीळचा धोका
उन्हाळा आला म्हटले की, सगळीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य दिसून येते. यंदा पाऊस बर्यापैकी हजेरी लावल्याने काही दिवस फार मोठी पाणी टंचाई जाणवली नसली तरी आता मात्र ट्ंचाईचे चटके बसू लागले आहेत. लोकांना खूप लांबून डोक्यावरून, खास करून महिलांना कमरेवर घागरी ठेवून त्याचबरोबर सायकल वगैरेचा वापर केला जातो. ग्रामीण भागाबरोबरच उन्हाळ्यात शहरातही पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे, त्यामुळे टँकरने बहुतंश सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा होत आहे. या पाण्याची गुणवत्ता माहीत नसल्याने डायरिया,टायफॉईड आणि कावीळ यांचा धोका वाढतो. या आजारांपासून लांब राहण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.  बर्फ न घालता रस प्या. उसाचा रस दुपारी घेणे टाळा. मैदानावरचे खेळ दुपारी खेळणे टाळा. मुलांना दुपारी खेळायला सोडू नये. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरपूर पाणी प्या.
      वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार उन्हाळ्यामध्ये घसादुखी, डोकेदुखी, सर्दी अशा आजारांच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असते, तसेच उष्णतेचे विकार, साथीचे आजार आणि पोटाच्या तक्रारींचे प्रमाणही वाढते, त्यामुळे भरपूर पाणी पिण्यासोबत थोडी काळजी घेतल्यास उन्हाळा सुसह्य होऊ शकतो. बर्फाचे पदार्थ खाल्ल्याने हे आजार होतात. शहरातील बहुतांश बर्फ औद्योगिक वापरासाठी तयार केला जातो. त्यासाठी वापरलेल्या पाण्याची गुणवत्ता माहीत नसते. असा बर्फ खाण्यात आल्याने जंतुसंसर्ग होतो. उन्हाळ्यात झालेल्या जुलाबाचा त्रास होतो. औद्योगिक क्षेत्रासाठी वापरला जाणारा बर्फ काहीसा निळ्या रंगाचा तर खण्यासाठी वापरला जाणारा बर्फ हा पांढरा शुभ्र असतो. त्यामुळे बर्फाचे निरीक्षणदेखील महत्त्वाचे आहे. ज्युस,रसवाले फायदा कमवण्याच्या नादात माणसाच्या जीवाशी खेळण्यासाठी मागेपुढे पाहात नाहीत. त्यामुळे आपण स्वत: बर्फाचे प्रकार टाळायला हवेत. शरीराची काळजी घेऊन वावरल्यास उन्हाळा लवकर घालवता येतो.

No comments:

Post a Comment