संयुक्त राष्ट्रच्या
एका सर्व्हेक्षणानुसार आशिया-हिंदी महासागर क्षेत्रातील मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो आहे. शोधकर्त्यांनुसार गेल्या जवळपास दीड दशकात पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या
वजनांमध्ये 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुलांमध्ये लठ्ठपणा वाढणे, ही खरे तर मोठी चिंताजनक गोष्ट
म्हटली पाहिजे.कारण ही मुलं मोठी झाल्यावरही अशीच लठ्ठग्रस्त
राहिली तर फार मोठे परिणाम होऊ शकतात. आणि जगात पूर्वीपेक्षा
आणखी लठ्ठपणाच्या समस्या वाढू शकतील. यासंदर्भात अधिक लक्ष देण्यासारखी
परिस्थिती निर्माण झाली आहे. 2016 मध्ये आय मॅकेंजी ग्लोबल इंस्टीट्यूट
(एमजीआय) च्या एका अभ्यासाच्या अहवालानुसार एक
चकित करणारी गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे लठ्ठपणा जगासाठी धुम्रपान
आणि दहशतवाद यानंतर तिसरे सर्वात मोठे संकट आहे.
अहवालानुसार जगात
सामान्य वजनापेक्षा अधिक वजन असणार्या लोकांची म्हणजे लठ्ठग्रस्त लोकांची संख्या जवळपास
2.1 अब्ज आहे. ही संख्या एकूण लोकसंख्येच्या तीस
टक्के आहे. अहवालात आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रकाश
टाकण्यात आला आहे, तो म्हणजे लोकांमध्ये वाढणार्या लठ्ठपणामुळे वैश्विक अर्थव्यवस्थेला दरवर्षी सुमारे
दोन हजार अब्ज डॉलरचे फटका बसत आहे. जर जगात अशाच प्रकारे लठ्ठपणा
वाढत चालला तर पुढच्या दीड दशकात जगाची निम्मी लोकसंख्या पूर्णपणे या लठ्ठपणाच्या आहारी
गेलेली असेल. इथे आणखी एक सांगायचा महत्त्वाचा मुद्दा असा की,
आपल्या भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये लठ्ठपणाची समस्या अधिकच आहे.
आणि चिंताजनक आहे. एका आकडेवारीनुसार विकसनशील
देशांमध्ये आरोग्यावर खर्च होणार्या एकूण खर्चापैकी सात टक्के
खर्च हा लठ्ठपणामुळे झालेल्या आजारांच्या उपचारावर होत आहे. लठ्ठपणाचा
त्रास आपल्याला सोसावा लागू नये म्हणून जो उपचार घेतला जात आहे, तो पाहिल्यास ही आकडेवारी आणखी पुढे म्हणजे जवळपास तीस टक्क्यांच्या पुढे जाते.
या सर्व गोष्टी
पाहिल्यावर सर्वाधिक चिंताजनक प्रश्न असा उपस्थित होतो की, आता जेव्हा जगभरात
30 टक्के लोक लठ्ठग्रस्त आहेत,तेव्हा ही समस्या
जागतिक अर्थव्यवस्थेला दोन हजार अब्ज डॉलर म्हणजेच जागतिक जीडीपीच्या 2.8 टक्के नुकसान पोहचवत आहे. अशा परिस्थितीत वरील अहवालानुसार
जर पुढच्या दीड दशकात जगातील निम्मी जनता पूर्णपणे या आजाराच्या विळख्यात सापडेल,
तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेचे किती मोठे नुकसान होणार आहे? शक्यता अशीसुद्धा असू शकेल की, त्यावेळेला लठ्ठपणा जगासाठी
सर्वात मोठी आणि आव्हानात्मक समस्या निर्माण झाली असेल. आणि आणखी
एक धोका संभवतो, तो म्हणजे या समस्येशी सामना करण्यासाठी कदाचित
जग पूर्णपणे तयारसुद्धा झाले नसेल.
सर्वसाधारणपणे
असे म्हटले जाते की, लठ्ठपणा आर्थिकदृष्ट्या संपन्न पाश्चिमात्य देशांचीच
समस्या आहे, पण ही जी आपली धारणा आहे,ती पूर्णपणे खरी नाही. कारण भारतासारख्या विकसनशील देशातसुद्धा ही समस्या हळूहळू आपले हात-पाय पसरत आहे. गेल्या काही दिवसांत ग्लोबल अलायंस फॉर
इंप्रूव्ड न्यूट्रीशन (गेन) च्यावतीने करण्यात
आलेल्या अभ्यासात ही गोष्ट समोर आली आहे की, लठ्ठपणाच्याबाबतीत
अमेरिका आणि चीननंतर जगात तिसरे स्थान भारताचेच आहे. याच अभ्यास अहवालानुसार जगाच्या एकूण
लठ्ठग्रस्त किशोरवयीन मुलांच्या 11 टक्के आणि ज्येष्ठांच्या
20 टक्के संख्या एकट्या भारतात आहे. भारतातील बहुतांश
लोकसंख्या ही भोजन प्रिय आहे. इथे स्वादिष्ट,रुचकर भोजनाची
विविधता आहे. पूर्वी लोक शेतात कठीण शारीरिक मेहनत करत होते,त्यामुळे भोजन शरीरात कॅलरीची मात्रा वाढवू शकत नव्हता. आजच्या सुविधा भोगी काळात लोक खातात तर पूर्वीच्या लोकांसारखेच किंबहुना त्याहीपेक्षा
अधिक, पण शारीरिक कष्ट मात्र नसल्याच्या समान आहेत. त्याचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा आणि वजनाची समस्या वेगाने वाढत आहे.
वास्तविक लठ्ठपणा
ही एक समस्या आहे, जी माणसाच्या एकूण व्यक्तिमत्वावर विपरित परिणाम करते. कार्यक्षमता, दैनंदिन व्यवहारावर परिणाम तर होतोच.
पण त्यांचे भोजनदेखील सामान्य लोकांपेक्षाही अधिक असते. शिवाय दुसर्या बाजूला ते त्यांच्या सामान्यांपेक्षा
अधिक वजनांमुळे इतर लोकांच्यादृष्टीने काहीसे आळशी, सुस्त असतात.
त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा, सहकार्यांचा दृष्टीकोन बदलतो. लठ्ठपणामुळे त्यांच्या शरीरात अन्य आजारांचा शिरकाव झालेला असतो. त्यामुळे त्याच्या उपचारावर आर्थिक आणि वेळ खर्ची पडते. सामान्य किंवा तंदुरुस्त माणसाचा खर्च कमी असतो आणि त्याच्याकडे उत्पादनक्षमता
अधिक असते. मात्र लठ्ठ माणसांचा व्ययक्तिक खर्च अधिक असतो तर
त्यांच्याकडून उत्पादनक्षमता, क्रयशक्तीदेखील कमी असते.
साहजिकच यांचे काम कमी आणि खर्च अधिक असा प्रकार होतो. याचा साहजिकच अर्थव्यवस्थेवर अधिक परिणाम होतो. देशाचे
तसेच जागतिक स्तरावर
अशा लोकांमुळे मोठे नुकसान होते.
मात्र लोक या लठ्ठपणाच्याबाबतीत
सजग नाहीत, असे नाही.
स्वत: काही लठ्ठ माणसे आपला लठ्ठपणा आणि वजन कमी
करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. त्यासाठी औषधीय उअपचार त्याचबरोबर
व्यायाम,योग यांचा अवलंब करताना दिसतात. जागतिक पातळीवरदेखील लठ्ठपणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
ब्रिटनसारख्या देशाने तर मुलांमधील लठ्ठपणाला तोंड देण्यासाठी सॉफ्ट
पेय पदार्थांवर शुगर टॅक्स लावला आहे. खाद्यपदार्थांच्या वेष्ठणावर
कॅलरी आणि पोषण तत्त्वांची माहिती देणे बंधनकारक केले आहे. जनस्वास्थ्य
अभियान चालवले जात आहे. असे उपाय जगभर राबवले जात असले तरी याबाबतीत
फार मोठा सकारात्मक परिणाम आला असल्याचे जाणवत नाही. अर्थात याला
जागरुकतेचा अभाव हेच मोठे कारण आहे.
जी माणसे खाण्या-पिण्याच्याबाबतीत बेपर्वा असतात,
आळशी आणि खादाड असतात,तीच माणसे या लठ्ठपणाच्या
कचाट्यात सापडत आहेत. माणसे चवीकडे बघून कॅलरीकडे दुर्लक्ष करतात
आणि भरपेट खातात. मात्र कामधाम नसल्याने किंवा आळशीपणा बळावल्याने
शरीरात गेलेली कॅलरी खर्ची पडत नाही. कॅलरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी
काही माणसे योग्य तो व्यायामदेखील करत नाहीत. परिणाम असा होतो
की, त्यांच्या शरीरात कॅलरीची मात्रा हळूहळू वाढत जाते आणि ते
लठ्ठपणाने ग्रस्त होऊन जातात. अलिकडच्या काळात मुलांचे खेळणे,बागडणे कमी झाले आहे. खेळापेक्षा मुले मोबाईल,
संगणक-लॅपटॉपवर गेम्स खेळण्यातच आपला संपूर्ण वेळ
घालवत आहेत. एक-दोन मुलेच असल्याने आई-वडीलदेखील मुलांना दुखापत होऊ नये, यासाठी घराबाहेर सोडत
नाहीत. शाळेतदेखील खेळायला मैदाने नाहीत. त्यामुळे लठ्ठपणावर तर नियंत्रण येत नाहीच,पण उलट खेळ
थांबल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत चालला आहे.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी
किंवा मुलांना त्यापासून दूर ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जनजागृती आहे. आपल्या देशात त्याचबरोबर संपूर्ण
देशात यासाठी प्रयत्न चालले आहेत,पण ते अपुरे पडत आहेत.
आपल्या योगाला आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्थान
मिळाले असले तरीही आपल्याला अजून फार मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. शाळांमध्ये याबाबतीत अधिक जागृती करण्याबरोबरच अभ्यासक्रमात स्वतंत्र समावेशदेखील
महत्त्वाचा आहे. लोकांनीदेखील आपल्या तंदुरुस्तीकडे, आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. कंपन्या, सरकारी कार्यालये यांनी आपल्या कर्मचार्यांवर योग आणि
व्यायामाचे बंधन घालायला हवे. लठ्ठपणा या वाढत्या आजाराची गंभीर
दखल घेतल्याखेरीज यावर नियंत्रण अशक्य आहे.
No comments:
Post a Comment