Monday, April 30, 2018

ढोंगी बाबा आणि आपण


     आजच्या कलियुगच्या जमान्यात फक्त दोनच असे व्यवसाय आहेत, जे अगदी गरिबातल्या गरीब माणसालादेखील गरिबीतून वर काढतात. ते व्यवसाय म्हणजे नेतागिरी आणि बाबागिरी. या स्पर्धेत कधी काळी नेता मंडळी पुढे होते. त्या काळी साधूसंत खरोखरच साधूसंत होते. धर्माच्या नावावर व्यापार करणारे बाबा नव्हते. गेल्या वीस-तीस वर्षात मात्र सर्व काही बदलले आहे. बाबा लोकांची इतकी ताकद वाढली आहे की, त्यांनी नेतागिरी करणार्यांनाही आपला अनुयायी बनवले आहे. उत्तराखंडमधला एक बाबा तर इतका मोठा उद्योगपती बनला आहे की, आज मोठमोठ्या परदेशी कंपन्यादेखील त्यांना घाबरत आहेत. बाबा रामदेव यांचा पंतजली समूह आज लाखो-कोट्यवधींचा व्यवसाय करत आहे. फारच कमी लोकांना ठाऊक असेल की, कधी काळी बाबा रामदेव टीव्हीवर फक्त योगा शिकवायचे.
   
 योग शिकवणारे आणखी एक बाबा होते. सत्तरच्या दशकात धीरेंद्र ब्रम्हचारी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना योग शिकवायला पंतप्रधान निवासस्थानी जायचे, बघता बघता ते इतके मोठे योगाचार्य बनले की, दिल्लीतल्या लुटियंस परिसरातल्या एका मोठ्या सरकारी बंगल्यात त्यांना त्यांचा आश्रम उघडण्यास परवानगी मिळाली. नंतर त्यांची मैत्री इंदिरा गांधी यांचा धाकटा मुलगा संजय गांधीशी झाली. मग तर काय, त्या बाबाची इतकी प्रगती झाली की, त्यांनी जम्मूमध्ये बंदुका बनवण्याचा कारखाना उघडला. त्यांची संपत्तीदेखील प्रचंड प्रमाणात वाढली. असे असले तरी ते योगा विसरले नाहीत. जम्मूजवळ मन्तलय नावाच्या एका सुंदर घाटावर त्यांनी एका आधुनिक आश्रमाची निर्मिती केली. तिथे स्वामी महाराज आपल्या खासगी विमानाने जात, तेव्हा मोठमोठ्या उद्योगपतींना आपल्या स्वत:च्या मालकीचे विमान खरेदी करण्याची क्षमता नव्हती. त्या आश्रमात स्त्रिया आणि मुलींना राहण्यासाठी आश्रमात सोय केली जायची तर मुलांना किंवा पुरुषांना तंबूत सोय असायची.
     स्वामींच्या आजूबाजूला सुंदर मुली वावरायच्या,पण त्यांच्यावर कधी बलात्काराचा आरोप झाला नाही. आजचा काळ इतका बेकार आहे की, एका पाठोपाठ एक बाबा बलात्कारी सिद्ध होत आहेत आणि तुरुंगाची हवा खात आहेत.गेल्यावर्षी बाबा रहिम तुरुंगात गेले आणि आता गेल्याच आठवड्यात बाबा आसाराम तुरुंगात गेले. तुरुंगात गेल्यावर या दोन्ही बाबांची संपत्ती उघड झाली आहे. ती ऐकून लोकांना चक्कर यायची वेळ आली आहे. मोठमोठ्या उद्योगपतींपेक्षाही अधिक संपत्ती या लोकांकडे सापडली आहे.
     खरे तर या बाबांनी नेतागिरी करणार्या लोकांना आपल्या दरबारात शरण देऊन इतके मोठे झाले आहेत. पण याला खरे दोषी आपणही आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. आपण वर्तमानपत्रे वाचतो, टीव्ही पाहतो, यात आपल्या लक्षात येते की, चांगले शिकले-सवरलेले लोकदेखील बाबांच्या तावडीत सापडले आहेत. त्यांच्यासाठी आपली संपत्ती उधळली आहे. कुणी आपला जमीन-जुमला दिला आहे. आपली धन-संपत्ती बाबांकडे सोपवली आहे. मानसिक, शारीरिक आजारावर आज आधुनिक उपचार निघाले आहेत, पण तरीही माणसे अशा बाबांच्या शरण जाऊन आपले सर्वस्व गमावून बसतात. के मोठे धक्कादायक आहे.
     बाबा आसारामबापूला आज जी शिक्षा झाली, ती एका मुलीमुळे! ती आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यानेच बाबा आसाराम तुरुंगात गेला. एक एक साक्षीदार आपला जीव गमावत गेले. तिच्या आई-वडिलांना बाबाच्या समर्थकांकडून धमक्या मिळाल्या,पण ती मुलगी बधली नाही. पण याच मुलीच्या आई-वडिलांनी बाबाच्या आश्रमासाठी आपली जमीन दिली होती.   शेवटी या ढोंगी बाबाचे पितळ उघड पडले आणि तो तुरुंगाची हवा खायला गेला. त्याने ज्या मुलीशी दुर्व्यवहार केला होता, तिच्या ठामपणामुले ते शक्य झाले. आज अशा मुलींची देशाला गरज आहे. अर्थात त्यांच्याशी होणारा संघर्ष हा दीर्घ काळ असणार आहे,कारण आपल्या महान देशात अंधश्रद्धा इतकी फोफावली आहे की, ढोंगी बाबांनाच आपण देव मानायला लागलो आहोत.

No comments:

Post a Comment