Wednesday, April 25, 2018

यशस्वी माणसांची समान आठ गुणवैशिष्ट्ये


     रिचर्ड सेंट जॉन या अत्यंत यशस्वी लेखकाचे यशाची अष्टसूत्री हे पुस्तक एकदा वाचून भागणारे नाही. पुन्हा पुन्हा वाचावे किंवा त्याचे पारायण करावे, असे हे पुस्तक आहेयात त्यांनी यशस्वी व्यक्तींमध्ये आढळणारी आठ समान गुणवैशिष्ट्ये शोधून काढली आहेत. वास्तविक यशस्वी व्यक्तींची गुणवैशिष्ट्ये शोधून काढणे तसे फारच कठीण आहे,पण त्यांनी आपल्या अथक प्रयत्नांनी, अभ्यासाने आणि मुलाखतीने ती मिळवली आहेत. यशस्वी व्यक्तींविषयी आपल्याला वाचायला आणि ऐकायला फार आवडते. कारण माणसे कशी यशस्वी झाली, हे जाणून घ्यायला प्रत्येकालाच आवडत असते. त्याविषयी उत्कंठा असते. हे पुस्तक यशस्वी होऊ इच्छिणारांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. यशस्वी होणार्या व्यक्तींमध्ये फक्त आठच गुण असतात, असे नाही. यापेक्षाही अधिक गुण असतात. वेगवेगळे गुणही असतात. व्यावसायिक,कलाकार, उद्योजक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांमध्ये वेगवेगळे गुण असतात. असे जवळपास 300 गुण यशाला कारणीभूत असणारी असतात. मग या गुणांनी काय पेंड खाल्लीय? पण यात लेखकाने समान आणि महत्त्वाचे गुण वेचले आहेत, जे यशस्वीतेसाठी गरजेचे आहेत. यासाठी रिचर्ड सेंट जॉन यांनी तब्बल 500 यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

     लेखकाने यशाची जी अष्टसुत्रे काढली आहेत, ती म्हणजे झपाटलेपणा, काम, केंद्रित लक्ष, जोर, कल्पना, सुधारणा, सेवा आणि चिकाटी होय. यशाला कारणीभूत ठरणारी आणखीही काही गुण वैशिष्ट्ये आहेत, यात सकारात्मक दृष्टीकोन, ध्येयनिश्चिती, मार्गदर्शक मिळवणे, जोखीम स्वीकारणे, अशी 300 घटक आहेत. तंत्र, लोकसंग्रह,संवाद, नैतृत्व ही कौशल्येदेखील यासाठी उपयुक्त आहेत.मात्र या सगळ्यात ही आठ गुणवैशिष्ट्ये सर्वात वर येतात. त्यामुळेच लेखकाने या आठ वैशिष्ट्यांवर अधिक चर्चा केली आहे. मुलाखत देणार्या लोकांनी या आठ वैशिष्ट्यांना प्राधान्य दिल्याचे यातून स्पष्ट होते.
     झपाटलेपणा हा अंगी हवाच आहे. त्याशिवाय माणूस यशस्वी होऊच शकणार नाही. यशस्वी व्यक्तींसाठी, ते जे करतात, ते अतिशय प्रिय असते.म्हणूनच ते झपाटून काम करतात. दुसरे म्हणजे ते खूप काम करतात. कामाशिवाय यश कुणाला मिळत नाही, याची कल्पना आपल्याला आहे. आणि काम करताना अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा एका गोष्टीवर अधिक लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे केंद्रित लक्ष महत्त्वाचे आहे. साहजिकच त्यावर अधिक जोर दिला जातो. म्हणूनच चौथे गुणवैशिष्ट्य जोर. एकादे काम पूर्ण करण्यासाठी एकाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा यशस्वी लोकांचा हातखंडा असतो. यशस्वी लोक नेहमी नवनव्या आणि चांगल्या कल्पना लढवित असतात. माणूस जसजसा पुढे जात असतो,तसतसा त्याच्यात बदलही होत असतो. कारण त्याला अनुभव येत राहतो. या अनुभवातून तो स्वत:मध्ये, आपल्या कामांमध्ये सातत्याने बदल म्हणजेच सुधारणा करत असतो. ही माणसे सेवा देत असतात. इतरांना कायम मूल्यवर्धन होईल, अशी सेवा देत असतात. अशी माणसे अपयशाने किंवा वाटेत आलेल्या समस्यांनी खचून जात नाहीत, ती आपल्या चिकाटीपणामुळे ही वादळे पचवत टिकून राहतात.
     इथे लेखकाने यशाची काही गुपिते नसतात, हे स्पष्टपणे सांगितली आहेत.  यशाची काहीही गुपिते नसतात, हेच यशाचे खरे गुपीत आहे, असे ते सांगतात. त्यांनी सांगितलेली आठ गुणवैशिष्ट्ये विकसित करणे, हाच मूलभूत पाया आहे. ती आपल्याकडे नसतील तर जगातील सर्व गुपिते जरी आजमावून पाहिली तरी आपण कुठेच पोहचू शकणार नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यशाची गुणवैशोष्ट्ये अनुवंशिक नसतात. तर ती कृतीतून मिळवावी लागतात. यश उपजत असते. ते पालकांकडून त्यांच्या पाल्यांमध्ये अनुवंशिकतेने उतरते, असे एक मिथक आहे. पण्अ संशोधन सांगते ते खरे नाही. हे स्पष्ट करताना लेखक मुलाखतींचा आधार घेतात. त्यांनी 500 मुआखती घेतल्या,त्यात एकाही यशस्वी माणसाने अनुवंशिकतेचा संबंध असल्याचे स्पष्ट केले नाही.
     आपल्याजवळ कामाविषयी तळमळ महत्त्वाची आहे. झपाटलेपणा आवश्यक आहे. यशस्वी माणसासाठी झपाटलेपणा ही सुरुवात आहे. महत्त्वाचे म्हणजे यशस्वी व्यक्ती जे करतात, ते त्यांना मनापासून आवडत असल्याने करतात. एकदा का त्यांना झपाटलेपण सापडले तर सुमार कामगिरी करणारादेखील असमान्य कामगिरी करू शकतो. फक्त त्याला ते सापडणं महत्त्वाचं आहे. आपली आवड शोधताना सुरुवातीला त्रास होतो. कारण आपली आवड कशात आहे, हे कधी कधी अणि कुणाकुणाला सापडतच नाही. त्यामुळे ते आवड शोधण्यासाठी अनेक वाटा धुंडाळतात. आपल्या आतल्या आवाजाची हाक ऐकतात. महत्त्वाचे म्हणजे इथे आपल्या खिशातल्या पैशाचे ऐकायचे नाही. आपल्या मनाचे ऐकायला हवे. माणूस पैशांसाठी सर्व काही करत असतो,पण आवडीसाठी काम करायला लागला तर पैसादेखील आपोआप येतो, हे मुलाखत देणार्या व्यक्तीच्या यशावरून लक्षात येते.
     यशस्वी माणसे ही कामाला अधिक महत्त्व देतात. जीव तोडून मेहनत घेतात. मेहनत हेच यशस्वी व्यक्तींमधले समान असलेले दुसरे महत्त्वाचे गुणवैशिष्ट्य आहे. लेखकाने होममेकिंग गुरु मार्था स्टुअर्ट यांना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की, मी खूप कष्टाळू आहे. मी सतत काम करीत असते. दुसरे कुणीतरी तुमचे काम करेल, यावर विश्वास ठेवू नका. महत्त्वाचे असे की, ही यशस्वी माणसे कार्यव्यसनी नव्हे तर कार्यप्रवण असतात. कामात त्यांना आवड असते. काम करताना तुम्हाला निश्चित आनंद व्हायला हवा. चिआट/डे जाहिरात कंपनीचे सहसंस्थापक जे चिआट सांगतात, तुम्हाला कामातून आनंद मिळत नसेल तर तुम्ही चुकीच्या कारणासाठी काम करत आहात, असे समजा. कारण यशस्वी लोकांना काम करताना मजा येत असते. पण हे कोणासाठीही सोपे नाही.
     श्रेष्ठ व्यक्ती सहसा खूप वेळ काम करत असतात. नशीब,उद्या सुट्टी आहे, असे म्हणण्यापेक्षा, असे विचार करा नशीब मी काम करतोय.काम कधीही गुणवत्तेपेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मेहनतीचे चीज होईल यावर विश्वास ठेवा, हे सांगायला लेखक विसरत नाही.
     लक्ष्यकेंद्रित वृत्ती हे यशस्वी व्यक्तींमध्ये आढणारे तिसरे समान गुणवैशिष्ट्य आहे. एखाद्या कामात स्वत:ला झोकून देणे आणि त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.एकच गोष्ट लक्ष देऊन उत्तम करणे,यातून समाधान तर मिळतेच,पण आत्मविश्वासही वृद्धिंगत होतो. आपण एक काम उत्तम करू शकतो, ही गोष्ट आपल्याला खूप आत्मविश्वास देणारी असते. कोणतेही काम कधीही वरवरचे करू नका. उलट यामुळे कमालीचा कंटाळा येतो. यश म्हणजे तर काय? नुसते भरकट राहण्यापेक्षा हळूहळू एका गोष्टीपर्यंत येऊन त्यावर लक्ष केंद्रित करणे. म्हणजे लगेच एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू नका.ही प्रक्रिया हळूहळू व्हायला हवी.कारकीर्द, ध्येय,प्रकल्प यापैकी कशाच्याही सुरुवातीला आपल्याला लक्ष केंद्रित करण्याच्या बरोबर विरुद्ध गोष्ट करावी लागते. आपल्याला थोडा चौकस,व्यापक विचार करावा लागतो.
सीड या विज्ञान नियतकालिकाचे संस्थापक अॅडम ब्लाय सांगतात की, भविष्यातील आपल्या लक्ष्यासाठी आपण कोणती बीजे रोवली आहेत,हेच आपला व्यापक विचार ठरवतो. आपल्याला जेथे जायचे आहे, तेथे पोहचण्याचा मार्ग धुंडाळण्यासाठी तुम्हाला आधी बरेच फिरावे लागते. पण प्रत्यक्षात तेथे पोहचण्यासाठी तुम्हाला त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागते. आपण इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे यशस्वी व्यक्ती या अनेक गोष्टींत श्रेष्ठ नसतात. ते एकाच कोणत्या तरी बाबतीत श्रेष्ठ असतात. संगीतकार क्विन्सी जोन्स यांचे इथे लेखकाने उदाहरण दिले आहे. त्यांना साधी गाडीही चालवता येत नाही,पण त्या त्यांचे पूर्ण लक्ष उत्तम संगीत तयार करण्यावर केंद्रित करतात. आणि त्यांच्यासाठी तेच जास्त महत्त्वाचे आहे. यशासाठी एकमेव उद्दिष्ट असणे महत्त्वाचे आहे.  यशस्वी कंपन्या या लक्ष्यकेंद्री असतात. ही माणसे एकाग्र होण्याची क्षमता विकसित करतात. या क्षमतेवर विजय प्राप्त करायचा असेल तर विचलित करणार्या गोष्टी टाळायला हव्यात.
     चौथे समान गुणवैशिष्ट्य जे यशस्वी माणसांच्या अंगी असते, ते म्हणजे जोर. की माणसे स्वत:ला सतत ढकलत राहतात. प्रेरित करत राहतात. प्रसिद्ध सागरतज्ज्ञ डेव्हिड गॅलो सांगतात, स्वत:ला ढकलत राहा. हे खूप मोठे आहे. नेहमीच. तुम्ही स्वत:ला शारीरिकरित्या, मानसिकरित्या आतून ढकलत राहणे खूप महत्त्वाचे आणि गरजेचे आहे.  यशस्वी व्हायचे असेल तर भिडस्तपणावर मात करायला शिकले पाहिजे. अनेक यशस्वी व्यक्ती मूळच्या भिडस्त स्वभावाच्या असतात, मात्र त्यातून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी त्या कायम धडपडत असतात. आणखी एक मुद्दा इथे स्पष्ट करण्यात आला आहे, तो म्हणजे भिडस्तपणावर मात करताना भिडस्तपणामुळे ज्या काही चांगल्या गोष्टी साध्य होतात, त्या मात्र कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण भिडस्त व्यक्ती (बहुतेकदा) आपला वेळ वाचन, शिक्षण,एकाग्रता, श्रवण, निरीक्षण, कल्पकता यात घालवताना दिसतात. यातूनच त्यांचे ध्येय त्यांना मिळते. सापडते.
     भिडस्तपणाचे फायदे असले तरी आपण आपल्या कोशातच राहिलो तर फुलपाखरू होऊन विविध ठिकाणी विहारायला आपल्याला होणारच नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे भिडस्तपणावर मात करता आले पाहिजे. यावर मात करण्यासाठी सराव सर्वात महत्त्वाचा असल्याचे लेखक सांगतो. यासाठी अतिशय धिटाईने इतरांशी बोलायचा प्रयत्न करायला हवा. लोकांसमोर आले पाहिजे, त्यांच्यासमोर बोलले पाहिजे. आणखी एक अडथळा आहे. त्याकडेही लक्ष द्यायला हवे. स्वत:बद्दल, स्वत:च्या क्षमतेबद्दल असलेल्या शंका हा एक अंतर्गत अडथळा आहे. यातून आपण बाहेर पडणे आवश्यक आहे. यासाठी आतून रेटा देणे महत्त्वाचे आहे. या जगात आपण एकटेच असे नाही की, स्वत:वर स्वत: शंका घेणारे! त्यामुळे थोडे आपल्याच यशाकडे किंवा या आधी साध्य केलेल्या काही गोष्टींकडे मागे वळून पहा. त्यामुळे तुम्हाला धीर येईल. शंका मागे ठेवून पुढे जात राहा. कामास प्रवृत्त होण्यासाठी ध्येय निश्चित करायला हवे. शिवाय स्वत:ला कार्यप्रवण ठेवण्यासाठी एखादे आव्हान स्वीकारा. आव्हाने ही ध्येय गाठण्यासाठीची उद्दिष्ट्ये असतात. स्वत:ला आतून रेटा देण्यासाठी अंतिम मुदत ठरवून घ्यायला हवे. यासाठी अंगी शीस्त हवी नाही का? 
   
 पाचवा महत्त्वाचा गुण आहे कल्पना. यशाचा मार्ग प्रकाशित करण्याचे काम करतात. यशस्वी माणसे खूप चांगल्या कल्पना लढवतात. कल्पना या मानसिक ऊर्जेचा शक्तिशाली स्त्रोत आहे. तुम्ही जर उत्तम कल्पना लढवू शकलात तर तुम्हाला यातून आयुष्यात पुढे जाण्याची ऊर्जा मिळते. आपल्याला माहित आहे की, प्रत्येकजण हा सर्जनशील असतो. त्यामुळे कल्पनेकडे लक्ष द्यायला हवे. शिवाय या कल्पना कशा मिळतात,याचाही विचार करायला हवा. एकादी समस्या घेऊन पाहा, भोवताली, आजूबाजूला पाहा, इतरांचे ऐका, प्रश्न विचारा, कल्पनेची प्रेरणा घ्या, संगती लावा. यातून कल्पनाशक्ती वाढीस मदत होते. चुका आणि अपयश या गोष्टीदेखील महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी तुम्हाला चांगल्या कल्पनांकडे घेऊन जातात. आणि महत्त्वाचे म्हणजे कल्पना मनात आली तर ती लगेच कागदावर उतरवा नाही तर ती लगेच उडून जाते. एकदा का ती उडून गेली की पुन्हा हाताला गवसत नाही.
     सर्व यशस्वी व्यक्तींमध्ये समान असलेले सहावे गुणवैशिष्ट्य म्हणजे सुधारणा. सतत स्वत:ला आणि स्वत: करीत असलेले काम, मग ते स्वत:ची कारकीर्द असो, एखादा प्रकल्प असो, सेवा असो- सुधारत राहण्याचा प्रयत्न करतात. सुधारणा गरजेची आहे. काळाबरोबर जाताना काही गोष्टींमध्ये बदल करणे महत्त्वाचे आहे. पूर्वी साधी बैलगाडी तयार करून माणूस एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाऊ लागला. मात्र यात त्याचा वेळ जास्त होता. खर्चिक होते. मात्र माणूस सतत सुधारणा करत गेल्याने मग गाडी आली. विमानाचा शोध लागला. सुधारणेच्या मागे लागल्याने माणूस बदलत गेला. माणसाचे जीवनदेखील बदलले. आता तर तंत्रज्ञानाचा जमाना आहे. सुधारणा करण्याशिवाय गत्यंतर नाही. पण आपण जे काही करतो, ते उत्तम करण्याचा प्रयत्न करायला हवा. सारखे सारखे चांगले करत राहण्याचा तोटा कधी होत नाही, फायदाच होतो. यासाठी सराव एके सराव महत्त्वाचा आहे.
     आपण आपल्या कामातून दुसर्याला एक प्रकारची सेवा देतो. ही सेवा उत्तम असायला हवी. कोण काय देतो,या कडे थोडा दृष्टीक्षेप टाकू. विक्री प्रतिनिधी ग्राहकांना सेवा देत असतो. व्यावसायिक अशिलांना सेवा देत असतो. डॉक्टर रुग्णांना सेवा देतो, कलाकार प्रेक्षकांना सेवा देत असतो. शिक्षक विद्यार्थ्यांना सेवा देत असतो, अभिनेते दिग्दर्शकाला सेवा देतात, राजकारणी मतदारांना सेवा देतात, लेखक वाचकांना सेवा देत असतो आणि पोलिस नागरिकांना सेवा देत असतो. म्हणजे आपण सर्वजण कोणी ना कोणी कोणाला तरी सेवा देत असतो. त्यामुळे तुम्ही कोणाला सेवा देता, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.  कारण कोणत्याही क्षेत्रातील यश हे तुम्ही नक्की कोणाला सेवा देता, ते तुम्हाला माहित असण्यामध्ये आहे. व्यवसायातील यश हे ग्राहकाला सेवा देण्यावर अवलंबून असते. त्यामुळेच तर जनरल इलेक्ट्रिकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक वेल्श म्हणतात, आम्हाला अशी कंपनी हवी आहे, जी केवळ ग्राहकांना सेवा देण्यावर लक्ष केंद्रित करेल. इथे महत्त्वाचे म्हणजे इतरांना मूल्यवान वाटेल, अशी सेवा देणे गरजेचे आहे. तुम्ही कोणाला सेवा देता, कोणत्या मूल्याची सेवा तुम्ही देता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण त्यामुळे तुम्हाला एक समृद्ध आयुष्य लाभणार आहे. यातून एक गोष्ट आपण शिकली पाहिजे, हे लेखकाने आपल्यापुढे नमूद केले आहे. यातून श्रीमंत होण्याचे सूत्र लेखकाने मांडले आहे. उत्तम सेवेकरी होताना काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. स्वत:ला विसरा आणि इतरांकडे लक्ष द्या, इतरांच्या जागी स्वत: ला ठेवून पाहायला शिका, दुसर्या व्यक्तींचा दृष्टिकोन समजून घ्यायला हवा. महत्त्वाचे म्हणजे आपण ज्यांना सेवा देणार आहे, त्यांचे म्हणणे ऐकायला शिका. मी खूप मोठा आहे हा अहंकार तुम्हाला कमी प्रतीचा सेवेकरी बनवतो. सेवा देताना द्राविडी प्राणायाम महत्त्वाचा आहे.
     यशस्वी व्यक्तींमधील सर्वात शेवटचा आणि समान असणारा आठवा गुणधर्म म्हणजे चिकाटी! हा गुण टिकून राहण्यासाठी महत्त्वाचा आहे. चिकाटी खरोखरीची महत्त्वाची असली पाहिजे. कारण म्हणूनच चिकातीसाठी अनेक समानार्थी शब्द आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर टिकून राहण्याची क्षमता याचे देता येईल. ठामपणा, दृढनिश्चयी वगैरे वगैरे! आपल्याला आपण स्वीकारलेल्या वाटेवर टिकून राहण्यासाठी वेळ, अपयश, चुका, टीका, नकार यातून शिकले पाहिजे. या प्रवासात टिकून राहण्यासाठी खालील उपायांकडे लक्षपूर्वक पाहायला हवे. 1) छोटी पावले टाका,2) माघार घेण्याची वृत्ती सोडा,3) हार मानू नका, 4) पुन्हा उसळण्याची क्षमता अंगी बाणायला हवी,5) दुराग्रहीपणा सोडा,6) उतावळ्यावर संयम थेवा,7) मागे वळून पाहू नका 8) असमतोल काळात टिकून राहा. आणि 9) सातत्यपूर्ण पुढे चालत राहा.
     यशाची अष्टसूत्रे हे पुस्तक अनेकांना लाभाचे ठरले आहे. स्वत:ला लेखकालाही ते फायद्याचे ठरले आहे. त्यामुळे आपल्याला आयुष्यात अलौकिक यश मिळवायचे असेल तर या पुस्तकाचे पारायण करायला हवे.

1 comment: