मोदी सरकार केंद्रात येऊन चार वर्षे
होत आली आहेत. ज्या अपेक्षा ठेवून लोकांनी मोदी
सरकारला सत्तेवर बसवले, त्या अपेक्षांचा भंग झाल्याचेच चित्र
सध्या दिसत आहे. महागाई कमी झाली नाही, पेट्रोल-डिझेलचे दर उतरले नाहीत. बेरोजगारांना रोजगार दिला जाईल. परदेशातला काळा पैसा
आणला जाईल आणि तो लोकांच्या बँक खात्यावर टाकला जाईल, अशा बर्याच वल्गना करण्यात आल्या होत्या. मात्र यातले काही एक
झाले नाही. भ्रष्टाचार तरी कमी होईल, अशी
अपेक्षा होती. ना खाऊंगा, ना खाने दुगां
यावर लोकांचा पक्का विश्वास बसला होता. त्यामुळेच मोदी सरकार 282 चा जादुई आकडा पार करू शकले
होते. मनमोहनसिंह यांच्या आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराला लोक
अक्षरश: कंटाळले होते. नरेंद्र मोदी यांचा
प्रसार माध्यमांमध्ये चाललेला उदोउदो देशाला एक मसिहा सापडल्याचा साक्षात्कार काही
लोकांना झाला होता. देशात भाजपला म्हणून मतदान झाले नाही.
नरेंद्र मोदी हा एकच चेहरा सर्वत्र दिसत होता. लोकांनी त्यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली आणि लोक परिवर्तनाची वाट पाहू
लागले. एक वर्ष गेले,दुसरे गेले.
लोकांना वाटले, थोडा अवधी द्यावा लागेल.
60 वर्षे काँग्रेस सत्तेवर होती. तिने इतक्या वर्षात
काही केले नाही, त्यामुळे आपल्याला आणखी वेळ द्यावा लागेल.
असेच लोकांना वाटू लागले. असे म्हणत आता चौथे वर्षही
सरत आहे. लोकांच्या मात्र पदरात निराशेशिवाय काहीच पडलेलं नाही.
आता लोकांना अपेक्षाभंग झाल्यासारखे वाटू लागले आहे. 2019 मध्ये निवडणुका झाल्या तर मोदी सरकार 120 जागा तरी जिंकेल
का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ठीक अशीच परिस्थिती 1988 मध्ये होती. त्यावेळी राजीव
गांधी पंतप्रधान होते. काही राजकीय तज्ज्ञ या दोन वर्षांचा तुलनात्मकदृष्ट्या
अभ्यास करत आहेत. 1988 मध्येदेखील राजीव गांधी सरकारविरोधात देशभर
रान उठले होते. भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. अर्थात त्यावेळची आणि आताची पिढी भिन्न आहे. पिढ्यांमध्ये
बदलाचे अंतर भिन्न आहे. मोदी आणि गांधी यांची राजकीय,
सामाजिक पृष्ठभूमीदेखील भिन्न आहे. भाजप आणि काँग्रेस
हे दोन टोकाचे, भिन्न स्वभावाचे पक्ष आहेत. अत्यंत विरोधाभास असलेल्या या भाजप-काँग्रेस पक्षांच्या
पंतप्रधानांमध्ये मात्र भारतीय लोकशाहीच्यादृष्टीने काही साम्ये आहेत. पहिले साम्य म्हणजे या दोघांनीही आपल्या पक्षाच्या इतिहासात स्वत:साठी विशिष्ट जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राजीव
गांधी यांच्यासाठी ही गोष्ट सहजशक्य होती कारण ते पंतप्रधान होण्यापूर्वी फक्त तीन
वर्ष अगोदर पक्षात सामिल झाले होते. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी
एकमेका सहाय्य करू... या संस्कृतीला विरोध केला होता.
काँग्रेसच्या पूर्वीच्या सरकारांना भ्रष्टाचारासाठी जबाबदार धरण्यास
त्यांनी कधी मागेपुढे पाहिले नाही. ते म्हणत असत की, विकास निधीचा 15 टक्के पैसा गरिबांपर्यंत पोहचतो.
दुसरीकडे मोदी यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे.
कारण काही दशके ते राजकारणात आहेत. त्यांनी पंतप्रधान
पदासाठी अभूतपूर्व अशी तयारी करून अभूतपूर्व असे यश मिळवले. असे
यश भाजपला अजपावेतो कधी मिळाले नाही. अर्थात केवळ मोदी म्हणूनच
यश मिळाले असल्याने भाजपमधील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेतेमंडळींची कारकीर्द झाकोळली
गेली. मोदी यांनी त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर करत हे
यश संपादन केले आहे. प्रसारमाध्यम आणि सोशल मिडियात भारताचा तारणहार
अशा पद्धतीची प्रतिमा पद्धतशीरपणे निर्माण केली. आज त्यांची पक्षात
एकाधिकारशाही आहे. त्यांच्याशिवाय कुठे पान हालत नाही.
त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना विविध विकास कामे केली.
भारतात सर्वचदृष्ट्या अव्वल राज्य म्हणून गुजरातला पुढे आणले.
याशिवाय गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दीर्घ कारकीर्द सांभाळली
होती. 2014 च्या निवडणुकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल
देण्यात आली. उदाहरणच द्यायचे झाले तर हिंदू गौरव मुद्द्याचा
देता येईल.
या दोघांमध्ये दुसरी समानता कोणती असेल
तर ती युवकांना आकर्षित करण्याची! राजीव गांधी यांच्यासाठी
ही गोष्टदेखील सहजसोपी होती.कारण ते स्वत: युवा होते. मोदी साठ वर्षांपेक्षा अधिक वयाचे असले तरी
त्यांनी आपल्यापेक्षा अधिक वय असलेल्या पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्यावरही अगदी कुशलपूर्वक
निशाना साधला. रोजगार निर्मिती हा मुद्दा युवकांना आकर्षणाचा
केंद्रबिंदू ठरला. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोघांनीही
स्वत:ला असा उमेदवार म्हणून पुढे आणले, जो लोकांमध्ये आशा जागवू शकतो. या धर्तीवरच दोघांनीही
लोकसभेत अभूतपूर्व यश मिळवले. इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यावर
काही दिवसांतच झालेल्या निवडणुकीत राजीव गांधी यांनी चारशेपेक्षा अधिक जागा मिळवल्या
होत्या. अर्थात मोदींसाठी अशी कोणती सहानुभूतीची लाट नव्हती.
पण तरीही ते पक्षाला 282 जागा मिळवून देण्यात यशस्वी
झाले. सहयोगी पक्षांकडून आणखी 50 जागा त्यांना
मिळाल्या. त्यामुळे सरकार सहजपणे सत्तेवर येऊ शकले.
चौथी समनता ही की, पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यावर राजीव आणि मोदी या दोघांनीही
सत्तेची सूत्रे आपल्या हातात ठेवली. आपल्या सध्याच्या पंतप्रधानांच्या
अहंकाराची काही उदाहरणे आपल्याला माहित आहेत.पण राजीव गांधी यांच्या
आठवणी आज लक्षात राहिल्या असतीलच असे नाही. शिवाय आजच्या युवापिढीला
त्याची माहितीदेखील असणार नाही. इतिहासाच्या माहितीचे जाणकार
रामचंद्र गुहा यांनी काही आठवणी सांगितल्या आहेत. त्यांनी एका
विदेश सचिवाला आणि एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्रकारपरिषदेतच बरखास्त करून टाकले
होते. मोदी यांनीही काही देशासंबंधीत महत्त्वाच्या गोष्टींसंदर्भात
आपल्या स्वत:च्या खासदार किंवा मंत्रिमंडळाला विश्वासात घेतले नाही. राजीव गांधी यांनी आपल्या काही जुन्या
मित्रमंडळी आणि काही विश्वासू अधिकार्यांच्यामदतीने देश चालवण्याचा प्रयत्न केला. मोदी यांनीदेखील
काही प्रमाणात हाच फार्म्युला वापरला आहे.
याच अहंकार आणि व्यापक विचारसरणीचा अभाव
यामुळे सांगितले जाते की, राजीव गांधी यांना इतक्या
उंचीवरून खाली यावे लागले. असे सांगितले जाते की, राजकारणात एक आठवडादेखील खूप मोठा असतो.दीर्घ असतो.
पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या काही उरलेल्या आठवड्यात बरेच
काही घडू शकतं. इतिहासकार सांगू शकतील का की, कठुआ आणि उन्नवचे मुद्दे मोदींसाठी घातक ठरू शकतील का, जसा राजीव गांधींसाठी बोफर्स
मुद्दा घातक ठरला होता. अर्थात हे सगळे काळच ठरवणार आहे.
मात्र 2014 च्या आणि आजच्या परिस्थितीत फारच फरक जाणवतो आहे.
आज सोशल मिडियावर 80 टक्के लोक मोदी यांच्या विरोधात
असल्याचे सांगितले जाते. मी काही वॉट्स अप ग्रूपच्या लोकांशी
बोलल्यानंतर हीच परिस्थिती असल्याचे ऐकायला मिळाले आहे. 1984 मध्ये चारशेपेक्षा अधिक जागा पटकवणारी राजीव गांधी यांची काँग्रेस पाच वर्षांनंतर
197 जागांवर येऊन थांबली होती. आताचे सरकार
2014 च्या 282 जागांच्या आकड्यांवरून किती खाली
येईल, असा काही अंदाज आता सध्या तरी बांधला जाऊ शकत नसला तरी
जागा या कमी होणार, हे निश्चित आहे.
राजीव गांधी यांच्या पाठीशी जनता असतानादेखील त्यांनी देशाला पुढे नेण्याची
संधी गमावली. आणि आता असे वाटते की, मोदीही
याच वाटेवर आहेत.
No comments:
Post a Comment