Friday, June 14, 2013

चोराच्या घरात चोरी

  
   एक चोर होता. त्याचे नाव होते करणकुमार. अनेक वर्ष तो चोरी करत आला
, पण एकदाही सापडला नाही. त्याला खूप वाटायचं, आपण हा धंदा सोडावा आणि मेहनतीचं काम करावं. पण हा त्याचा संकल्प दुस-या दिवसापर्यंतही टिकायचा नाही.
     एका रात्री करणकुमार चोरी करायला बाहेर पडला होता. एका घरात तो अगदी काळजीपूर्वक शिरला. खोलीत दिवा जळत होता. एक माणूस दु:खी मनाने मान खाली घालून चिंताग्रस्त बसला होता. त्याच्यासमोर देवाचा एक सोन्याचा मुकूट आणि दागदागिने पसरलेले होते. करणकुमार माघारी फिरणार, तोच आवाज आला, ‘‘मित्रा ये, आता परत चाललास कुठे? तू चोर ना! चोरी करण्याच्या उद्देशानेच आलास ना?’ करणकुमार जागच्या जागी थबकला. त्याला मोठं आश्चर्य वाटलं.
तो माणूस एखाद्या पाहुण्याचं स्वागत करावं, तशाप्रकारे बोलत होता. काहीसा घाबरलेला करणकुमार त्याच्याजवळ जाऊन खाली बसला. तो माणूस म्हणाला, ‘काय नाव तुझं? तुझ्यासारखाच मीदेखील चोर आहे. प्रत्येक वेळेला चोरी केल्यावर विचार करतो की, आता हा चोरीचा धंदा सोडावा. चोरी म्हणजे पाप, अधर्म. कष्टानं कुणी तरी मिळवतं आणि आपण त्याच्याकडून ते लुबाडून नेतो. त्याला अडचणीत टाकतो.’’
      करणकुमार म्हणाला, ‘‘माझं नाव करणकुमार. मित्रा, तू म्हणतोस ते खरं आहे. आपण आपल्या आणि घरच्यांच्या नजरेतून उतरलेले असतो. माझी बायको तर माझा तिरस्कार करते. चोरीच्या वस्तूंना स्पर्शदेखील करत नाही.’’ ‘‘माझं नाव श्रावणकुमार. जरा विचार कर, तो एक श्रावणकुमार होता, ज्याने आपल्या अंध माता-पित्यांची सेवा केली. त्यांना कावडीत बसवून तीर्थयात्रा घडवून आणली. आणि मी एक असा श्रावणकुमार, जो नालायक आणि अधर्मी. मी मेल्यावर मला नरकातदेखील जागा मिळणार नाही.’’
     ‘‘तू म्हणतोस ते बरोबर आहे, श्रावणकुमार. बरं, तू हे समोर काय घेऊन बसला आहेस? हा सोन्याचा मुकूट आणि ही आभूषणं?’’ करणकुमारने विचारलं. ‘‘अरे मित्रा, आज तर मी करंटेपणाचा कळस केला. मी एका मंदिरात गेलो होतो. तिथे देवाच्या मूर्तीवर सोन्याचे दागिने घातले होते. मी मंदिराच्या दाराला लावलेलं कुलूप तोडलं आणि हे सगळे दागिने चोरून घेऊन आलो. आता माझा आत्मा माझा धिक्कार करतो आहे. अरे, देवालाही सोडलं नाहीसहे शब्द घणासारखे माझ्या कानात आदळत आहेत. क्षणभरही माझं मन स्थिर नाही. आता तूच सांग, मी काय करू?’’ श्रावणकुमार दु:खी होऊन म्हणाला.
     करणकुमार म्हणाला, ‘‘माझ्या मते तू देवाची ही सगळी आभूषणं जिथे होती, तिथे ठेवून ये.’’
‘‘पण मला मूर्तीचा शृंगार करता येत नाही. पहिल्यासारखी आभूषणं जिथल्या तिथे कशी बरं चढवता येतील मला?’’ श्रावणकुमार म्हणाला.
     करणकुमार म्हणाला, ‘‘काळजी करू नकोस. मी या कामात तुला मदत करीन.’’
     दोघेही मुकूट आणि आभूषणं घेऊन मंदिराच्या दिशेने निघाले. मंदिरात पोहोचल्यावर दोघांनीही पाहिलं, पुजारी अजून झोपलेला होता. मंदिरातल्या आभूषणांची चोरी झाल्याची बातमी अजूनही कुणाला कळालेली नव्हती. करणकुमारच्या मदतीने श्रावणकुमारने देवाच्या मूर्तीवर मुकूट आणि इतर आभूषणं जशी होती तशी चढवली. दोघांनीही देवाला हात जोडले. आपल्या वाईट कामाबद्दल क्षमा मागितली आणि देवाला वचन दिलं की, आता यापुढे कधीही चोरी करणार नाही. कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीन.
     मंदिराबाहेर आल्यावर श्रावणकुमार म्हणाला, ‘माझ्यावर जे पापाचं ओझं होतं, ते आता दूर झालं आहे. आता मला खूप समाधान मिळतंय.’’‘‘मलादेखील फार बरं वाटतं आहे. कारण ही जी वाईट गोष्ट मी सोडू शकत नव्हतो, ती सोडायला माझं मन तयार झालं आहे. परमेश्वराने आपल्याला सद्बुद्धी दिली आहे. आता मी मेहनत करीन आणि भल्या कामासाठी वेळ देईन.’’
     ‘‘खरंच, प्रामाणिक माणूस म्हणून
     जगण्यात फार मोठा आनंद आहे.’’ असं म्हणून श्रावणकुमारने करणकुमारला अलिंगन दिलं. चोरीचा धंदा सोडून नवं जीवन जगण्याचा संकल्प करून दोघांनेही एकमेकांचा निरोप घेतला.
     त्यानंतर खरोखरच करणकुमार आणि श्रावणकुमार दोघांनी चोरीचा धंदा सोडून दिला आणि छोटा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या मेहनतीमुळे आणि प्रामाणिक व्यवहारामुळे दोघांच्याही धंद्याला चांगली बरकत आली. लवकरच ते शहरातले एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यापारी बनले. आता त्यांना लोक शेठ करणकुमार आणि श्रावणकुमार म्हणून ओळखू लागले.

Wednesday, June 12, 2013

शिक्षकांच्या संघटना एका छताखाली: शिवधनुष्य पेलणे अशक्य

     कर्नाटक राज्याच्या धर्तीवर सर्व शिक्षक संघटनांचे एकच फेडरेशन असावे, यासाठी राज्याच्या ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला असून जाईल तिथे श्री. पाटील आपला मनोदय बोलून दाखवत आहेत. त्यांनी  पुढाकार घेऊन राज्यातल्या शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची पहिली बैठक  दि. १९ जून रोजी मुंबईत बोलावली आहे. यासाठी त्यांनी शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष आणि सचिवांना आमंत्रणे धाडली आहेत. मात्र, शिक्षक संघटनांना एकत्रीकरणाच्या नावाखाली राजकीय पक्षाच्या दावणीला बांधण्याचा हा डाव असल्याचा आरोप काही शिक्षक संघटनांचे पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या फेडरेशन स्थापनेबाबतच्या आशा धुसर वाटत आहेत.
     अलिकडेच शिक्षकांच्या बदल्यांसंबंधात राज्यातील सर्व शिक्षक संघटनांची बैठक  जयंत पाटील यांनी मुंबईत आयोजित केली होती. या बैठकीला राज्यातील सुमारे २२ संघटनांचे राज्याध्यक्ष व समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाल्यानंतर जयंत पाटील यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात राज्यातील सर्व शिक्षक संघटनांचे फेडरेशन स्थापन करण्याचा विचार बोलून दाखविला. अर्थात गेल्या वर्षभरापासून श्री. पाटील हा आपला मनोदय शिक्षकांच्या विविध व्यासपीठावरून दाखवत आहेत. मुंबईतल्या बैठकीत संघटनांनी फारसा मनावर घेतला नाही. मात्र आता यासाठी खास बैठक बोलवण्यात आल्याने चर्चेला ऊत आला आहे.
सर्व शिक्षक संघटना एकाच छताखाली आल्यास शिक्षकांचे प्रश्न सुटू शकतात, असा दावा जयंत पाटील यांनी  केला आहे. त्यानुसार कर्नाटक राज्याच्या धर्तीवर सर्व संघटनांचे एकच फेडरेशन असावे, यावर निर्णय घेण्यासाठी मुंबईत १९ जूनला बैठक बोलवण्यात आली आहे.  मात्र, जयंत पाटील काहीही म्हणत असले तरी त्यांच्या एकत्रिकरणाच्या प्रयत्नाला राजकीय वास आहे, असे म्हटले जात आहे.
       शिवाजीराव पाटील यांच्या संघटनेच्या एकत्रिकरणाचा प्रयत्न अद्याप यशस्वी झाला नसता श्री. पाटील राज्यातल्या सर्वच संघटनांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न अशक्य आहेच, पण त्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा महत्त्वाच्या आहेत, असे म्हटले जात आहे. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्त्याखाली शिवाजीराव पाटील यांची शिक्षक संघटना वावरत आहे. हीच संघटना फुटलेली असल्याने त्यांना आगामी निवडणुकीत मोठा धोका दृष्टीस पडत आहे. राज्यात जवळपास तीन लाखावर प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. यातले सुमारे एक दीड लाख शिक्षक शिक्षक संघाचे म्हणजेच शिवाजीराव पाटलांच्या संघटनेचे सभासद आहेत.उर्वरीत शिक्षक विविध संघटनांमध्ये सामावलेले आहेत.
      राज्यात दहा ते बारा शिक्षक संघटना आहेत.   सध्याच्या घडीला शिवाजीराव पाटलांची संघटना बलाढ्य वाटत असली तरी संभाजी थोरातांनी आपली वेगळी चूल मांडली असल्याने ही संघटना खिळखिळी झाली आहे. ही संघटना एकत्रित करण्याची जबाबदारीही जयंत पाटील यांनी घेतली आणि यासाठी मुंबई, आळंदी, इस्लामपूर आणि कोल्हापूर आदी ठिकाणी फुटीर व शिवाजीराव पाटलांच्या संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. यात त्यांनी राज्य स्तरावरील पदाधिकारी निवडून  काही प्रमाणात  यश मिळवले असले तरी  अद्याप जिल्हा व तालुका पातळीवर या संघटना या तनामनाने एकत्र आल्या नाहीत. अद्याप या निवडी पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा शिक्षक संघाची मोट घट्ट बांधावी लागणार आहे. ही प्रक्रिया खोळांबली असताना त्यांनी राज्यातल्या सर्व संघटना एका छताखाली आणण्यासाठी घाई लावली आहे. त्यातच उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, माराठवाड्यात या एकिकरणाला विरोध वाढू लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अद्याप याबाबत विरोधाचा उघड सूर निघत नसला तरी खासगीत या एकिकरणाची खिल्लीच उडवली जात आहे.
      एकत्रीकरणाला बव्हंशी शिक्षक संघटनांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. या संघटना या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिक्षक संघटनांचे फेडरेशन करून त्याला राजकीय पक्षाच्या दावणीला बांधण्याचा हा डाव असल्याचा आरोप संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. राज्यातील विविध शिक्षक संघटना आपापल्या स्तरावर शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. संघटनांना एकत्र आणून त्यांची मोट बांधण्यामागे एकमेव राजकीय कारण असल्याचे म्हटले  जात आहे.  ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना सर्व शिक्षक संघटना शिक्षकांचे नेते म्हणवून घेणार्‍या आमदार शिवाजी पाटील यांच्या अधिपत्याखाली आणायची आहे आणि शिक्षकांचा उपयोग आगामी निवडणुकांसाठी करून घ्यावयाचा आहे. त्यासाठीच हा एकत्रीकरणाचा सारा खटाटोप आहे. शिक्षक संघटना या राजकारणविरहित असून, त्यात राजकारण्यांचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. सर्व संघटना आपापल्या स्तरावर चांगले काम करत आहेत. त्यांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचा कोणालाही अधिकार नाही. फेडरेशन स्थापनेला पूर्णपणे विरोध केला जाईल. शासन आणि संघटना यांच्यात अभद्र युती झाल्यास शिक्षकांचे हित पाहिले जाणार नाही, असा सूर विविध भागातून निघत आहे. जयंत पाटलांनी १९ जूनला मुंबईत बैठक बोलावली  असताना सुमारे २0 संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक दि. १८ जून रोजी पुण्यात होत आहे.  त्यात या एकत्रीकरणाला प्रखर विरोध करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. त्यामुळे जयंत पाटलांचे मनसुबे उधळले जाणार अशीच परिस्थिती सध्या तरी उदभवत असल्याचे दिसत आहेत.      

Sunday, June 9, 2013

अंधश्रद्धने केले नुकसान

   
 
संध्याकाळी बाबा ऑफिसमधून घरी आल्या आल्या आकाशने विचारलं, ‘बाबा, माझं पेन आणलंत?’ ‘हो, आणलंय’, असं म्हणत त्यांनी आपल्या बॅगेतून एक पेन काढलं आणि आकाशच्या हातात टेकवलं. पेन पाहताच आकाशचा चेहरा उतरला. तो म्हणाला, ‘हे काय हो बाबा, मी तुम्हाला निळ्या रंगाचं पेन आणायला सांगितलं होतं, तुम्ही हिरव्या रंगाचं आणलंत. निळा रंग यश देतो, माहीत नाही का तुम्हाला?’ त्यावर बाबा चकित होऊन म्हणाले, ‘हे कुणी सांगितलं तुला?’ ‘माझ्या वर्गातल्या नितीनने सांगितलं.

     हिरव्या रंगाच्या पेनने परीक्षा दिली तर चांगले गुण मिळत नाहीत!आकाशने उत्तर दिलं. आकाश, या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. हिरव्या-निळ्या रंगाने काही घडत नसतं. तू परीक्षेची चांगली तयारी केली असशील तर चांगलेच गुण मिळतील. बाबांनी समजावलं. पण आकाश ऐकायला तयार नव्हताच. तो बाबांकडे निळ्या रंगासाठी हट्ट धरून बसला. तेव्हा बाबा म्हणाले, ‘आता सगळी दुकानं बंद झाली असतील. आता कोठून आणणार निळ्या रंगाचं पेन?’
     पेन शोधता शोधता बरीच रात्र झाली. शेवटी एकदाचं निळ्या रंगाचं पेन मिळालं. अजून त्याला परीक्षेची तयारी करायची होती. पण त्याला झोप येऊ लागली. त्यामुळे त्याने आईला पहाटे पाच वाजता उठवायला सांगून तो झोपी गेला. पहाटे आईने त्याला उठवलं. तो बेडवरून खाली उतरत होता, तोच आईला शिक आली. तो पुन्हा बिछान्यावर जाऊन झोपला. आईने पुन्हा एकदा त्याला उठायला सांगितलं. आणि ती आपल्या कामाला निघून गेली. बाबांना तर त्याचा रागच आला.
     ते आकाशला म्हणाले, ‘आकाश, काल तू निळ्या पेनच्या भानगडीत अभ्यास केला नाहीस. आता उठतोस की नाही? साडेसहापर्यंतच तुला वेळ आहे.तेव्हा आकाश म्हणाला, ‘बाबा, नितीनने सांगितलंय की, कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी कुणी शिकलं तर लगेच कामाला सुरुवात करायची नाही.बाबा म्हणाले, ‘अरेव्वा! आमचा आकाश तर चक्क अंधश्रद्धाळू बनला आहे. पण याच्याने तुझं नुकसानच होणार आहे.तरीही आकाश टाळत राहिला. दहा मिनिटांनंतरच तो अंथरुणातून उठला.
     परीक्षेच्या तयारीसाठी त्याच्याकडे फक्त साडेसहापर्यंतच वेळ होता. सात वाजता त्याची स्कूलबस यायची. काल रात्री निळ्या पेनाच्या शोधात आणि आज सकाळी शिकेच्या भानगडीत त्याची परीक्षेची तयारी काही म्हणावी तशी छान झाली नाही. त्यामुळे त्याला शाळेत जाण्यासाठी तयार व्हायलाही वेळ झाला. बाबा आणि आकाश रस्त्यावर येताच त्यांना एक मांजर आडवं गेलं. आकाशने बाबांना थांबवलं. एक मोटारसायकल पुढे गेल्यावर मग तो निघाला. स्कूलबस कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर येऊन थांबायची. पण आता तिथे ना गाडी होती ना मुलं! म्हणजे स्कूलबस कधीच निघून गेली होती. पण आकाशला तर शाळेत पोहोचणं आवश्यक होतं, कारण आज परीक्षा होती.
     एक रिक्षा आली. बाबांनी त्याला हाक मारली. दोघेही रिक्षात बसायला पुढे निघाले, तोच आकाश जागच्या जागी थांबला. बाबांनी विचारल्यावर आकाश म्हणाला, ‘बाबा, गाडीचा क्रमांक १३०१ आहे. तेरा हा अंक अशुभ असतो. या रिक्षाने गेलो तर परीक्षा चांगली जाणार नाही. आपण दुस-या रिक्षाने जाऊ या.
     आकाशचं बोलणं ऐकून बाबांना भलताच राग आला. ते म्हणाले, ‘तुझं डोकंबिकं फिरलंय का? कुठल्या अंधश्रद्धेच्या गोष्टी करतोयस तू? आत्ता तुला शाळेत पोहोचणं महत्त्वाचं आहे. चल, रिक्षात बस बघू. आधीच उशीर झाला आहे.पण आकाश आपल्या गोष्टीवर अडून राहिला. रिक्षावाल्याला दुसरं भाडं मिळालं आणि तो निघून गेला. ब-याच उशिराने एक रिक्षा आली. दोघे शाळेत पोहोचले.
     परीक्षा सुरू होऊन अर्धा तास झाला होता. आकाश वर्गात गेला. परीक्षा दिली आणि दुपारी शाळेतून घरी आला. त्याचा चेहरा उतरलेला होता. आई-बाबांनी त्याला विचारल्यावर त्याने पेपर खूपच कठीण गेल्याचं सांगितलं. तेव्हा बाबा म्हणाले, ‘बघितलसं, अंधश्रद्धेच्या आहारी गेलं की काय होतं ते! मी तुला अगोदरच सांगितलं होतं, असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस!आई म्हणाली, ‘ठीक आहे. आता हात-पाय धुऊन घे. काही तरी खा आणि पुढच्या अभ्यासाच्या तयारीला लाग.
     आकाश हात-पाय धुण्यासाठी उठणार तोच, बाबांना शिक आली. बाबा म्हणाले, ‘आकाश, मला शिक आली. आता तू दहा मिनिटे असाच बसणार का? हात-पाय धुवायला जाणार नाहीस का?’ ‘नाही बाबा, आता मी या भानगडीत पडणार नाही. मला सगळं काही समजून चुकलं आहे. या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत.असं म्हणून आकाश अभ्यास करायला बसला