कर्नाटक राज्याच्या धर्तीवर सर्व शिक्षक संघटनांचे एकच फेडरेशन असावे, यासाठी राज्याच्या ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला असून जाईल तिथे श्री. पाटील आपला मनोदय बोलून दाखवत आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन राज्यातल्या शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्यांची पहिली बैठक दि. १९ जून रोजी मुंबईत बोलावली आहे. यासाठी त्यांनी शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष आणि सचिवांना आमंत्रणे धाडली आहेत. मात्र, शिक्षक संघटनांना एकत्रीकरणाच्या नावाखाली राजकीय पक्षाच्या दावणीला बांधण्याचा हा डाव असल्याचा आरोप काही शिक्षक संघटनांचे पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या फेडरेशन स्थापनेबाबतच्या आशा धुसर वाटत आहेत.
अलिकडेच शिक्षकांच्या बदल्यांसंबंधात राज्यातील सर्व शिक्षक संघटनांची बैठक जयंत पाटील यांनी मुंबईत आयोजित केली होती. या बैठकीला राज्यातील सुमारे २२ संघटनांचे राज्याध्यक्ष व समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाल्यानंतर जयंत पाटील यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात राज्यातील सर्व शिक्षक संघटनांचे फेडरेशन स्थापन करण्याचा विचार बोलून दाखविला. अर्थात गेल्या वर्षभरापासून श्री. पाटील हा आपला मनोदय शिक्षकांच्या विविध व्यासपीठावरून दाखवत आहेत. मुंबईतल्या बैठकीत संघटनांनी फारसा मनावर घेतला नाही. मात्र आता यासाठी खास बैठक बोलवण्यात आल्याने चर्चेला ऊत आला आहे.
अलिकडेच शिक्षकांच्या बदल्यांसंबंधात राज्यातील सर्व शिक्षक संघटनांची बैठक जयंत पाटील यांनी मुंबईत आयोजित केली होती. या बैठकीला राज्यातील सुमारे २२ संघटनांचे राज्याध्यक्ष व समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाल्यानंतर जयंत पाटील यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात राज्यातील सर्व शिक्षक संघटनांचे फेडरेशन स्थापन करण्याचा विचार बोलून दाखविला. अर्थात गेल्या वर्षभरापासून श्री. पाटील हा आपला मनोदय शिक्षकांच्या विविध व्यासपीठावरून दाखवत आहेत. मुंबईतल्या बैठकीत संघटनांनी फारसा मनावर घेतला नाही. मात्र आता यासाठी खास बैठक बोलवण्यात आल्याने चर्चेला ऊत आला आहे.
सर्व शिक्षक संघटना एकाच छताखाली आल्यास शिक्षकांचे प्रश्न सुटू शकतात, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. त्यानुसार कर्नाटक राज्याच्या धर्तीवर सर्व संघटनांचे एकच फेडरेशन असावे, यावर निर्णय घेण्यासाठी मुंबईत १९ जूनला बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र, जयंत पाटील काहीही म्हणत असले तरी त्यांच्या एकत्रिकरणाच्या प्रयत्नाला राजकीय वास आहे, असे म्हटले जात आहे.
शिवाजीराव पाटील यांच्या संघटनेच्या एकत्रिकरणाचा प्रयत्न अद्याप यशस्वी झाला नसता श्री. पाटील राज्यातल्या सर्वच संघटनांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न अशक्य आहेच, पण त्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा महत्त्वाच्या आहेत, असे म्हटले जात आहे. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्त्याखाली शिवाजीराव पाटील यांची शिक्षक संघटना वावरत आहे. हीच संघटना फुटलेली असल्याने त्यांना आगामी निवडणुकीत मोठा धोका दृष्टीस पडत आहे. राज्यात जवळपास तीन लाखावर प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. यातले सुमारे एक दीड लाख शिक्षक शिक्षक संघाचे म्हणजेच शिवाजीराव पाटलांच्या संघटनेचे सभासद आहेत.उर्वरीत शिक्षक विविध संघटनांमध्ये सामावलेले आहेत.
राज्यात दहा ते बारा शिक्षक संघटना आहेत. सध्याच्या घडीला शिवाजीराव पाटलांची संघटना बलाढ्य वाटत असली तरी संभाजी थोरातांनी आपली वेगळी चूल मांडली असल्याने ही संघटना खिळखिळी झाली आहे. ही संघटना एकत्रित करण्याची जबाबदारीही जयंत पाटील यांनी घेतली आणि यासाठी मुंबई, आळंदी, इस्लामपूर आणि कोल्हापूर आदी ठिकाणी फुटीर व शिवाजीराव पाटलांच्या संघटनांच्या पदाधिकार्यांची बैठक घेतली. यात त्यांनी राज्य स्तरावरील पदाधिकारी निवडून काही प्रमाणात यश मिळवले असले तरी अद्याप जिल्हा व तालुका पातळीवर या संघटना या तनामनाने एकत्र आल्या नाहीत. अद्याप या निवडी पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा शिक्षक संघाची मोट घट्ट बांधावी लागणार आहे. ही प्रक्रिया खोळांबली असताना त्यांनी राज्यातल्या सर्व संघटना एका छताखाली आणण्यासाठी घाई लावली आहे. त्यातच उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, माराठवाड्यात या एकिकरणाला विरोध वाढू लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अद्याप याबाबत विरोधाचा उघड सूर निघत नसला तरी खासगीत या एकिकरणाची खिल्लीच उडवली जात आहे.
एकत्रीकरणाला बव्हंशी शिक्षक संघटनांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. या संघटना या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिक्षक संघटनांचे फेडरेशन करून त्याला राजकीय पक्षाच्या दावणीला बांधण्याचा हा डाव असल्याचा आरोप संघटनांच्या पदाधिकार्यांनी केला आहे. राज्यातील विविध शिक्षक संघटना आपापल्या स्तरावर शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. संघटनांना एकत्र आणून त्यांची मोट बांधण्यामागे एकमेव राजकीय कारण असल्याचे म्हटले जात आहे. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना सर्व शिक्षक संघटना शिक्षकांचे नेते म्हणवून घेणार्या आमदार शिवाजी पाटील यांच्या अधिपत्याखाली आणायची आहे आणि शिक्षकांचा उपयोग आगामी निवडणुकांसाठी करून घ्यावयाचा आहे. त्यासाठीच हा एकत्रीकरणाचा सारा खटाटोप आहे. शिक्षक संघटना या राजकारणविरहित असून, त्यात राजकारण्यांचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. सर्व संघटना आपापल्या स्तरावर चांगले काम करत आहेत. त्यांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचा कोणालाही अधिकार नाही. फेडरेशन स्थापनेला पूर्णपणे विरोध केला जाईल. शासन आणि संघटना यांच्यात अभद्र युती झाल्यास शिक्षकांचे हित पाहिले जाणार नाही, असा सूर विविध भागातून निघत आहे. जयंत पाटलांनी १९ जूनला मुंबईत बैठक बोलावली असताना सुमारे २0 संघटनांच्या पदाधिकार्यांची बैठक दि. १८ जून रोजी पुण्यात होत आहे. त्यात या एकत्रीकरणाला प्रखर विरोध करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. त्यामुळे जयंत पाटलांचे मनसुबे उधळले जाणार अशीच परिस्थिती सध्या तरी उदभवत असल्याचे दिसत आहेत.
No comments:
Post a Comment