Friday, July 26, 2013

जिल्हा परिषदांच्या शाळांच्या शाळा टिकवायच्या तर............


     जिल्हा परिषदांच्या शाळांचा पट कमी होत चालला आहे. यंदा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होतील, अशी भीती शिक्षण विभागातून व्यक्त केली जात आहे. अनेक शाळांमध्ये पहिलीला मुले दाखल झाली नसल्याच्या बातम्या येत आहेत. तर काही ठिकाणाहून  दोन शिक्षक, तीन विद्यार्थी असाही मामला पुढे येत आहे. शासन २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणार अशी हूल उठल्याने शिक्षकांनी त्याविरोधात आंदोलन केल्याच्या बातम्याही आल्या. एकिकडे गेल्या दोन-तीन वर्षांपासून नव्या शिक्षकांची भरती प्रक्रिया झाली नसल्याने बेकारांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे जिल्हा परिषदांच्या शाळांचा पट कमी होत चालल्याने शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ येत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात या शिक्षकांना अन्य खात्यात सामावून घेण्याची किंवा सेवानिवृत्तीचा नारळ देऊन सक्तीने घरी बसवण्याची व्यवस्था शासनाला करावी लागणार आहे. शिक्षकांचे आणि शिक्षणाचे भविष्य जाणून की काय भरमसाठ वाढलेली शिक्षणशास्त्र महाविद्यालये (डीटीएड) विद्यार्थ्यांअभावी बंद पडत चालली आहेत.
     जिल्हा परिषदांच्या शाळा टिकवण्याची गरज आहे. मात्र यात कुणालाच फारसे स्वारस्य नसल्याचे दिसते. शासनाला शिक्षकांवर भलामोठा खर्च करत बसण्यापेक्षा स्वयंसहाय्यता नावाखाली उदंड खासगी शाळा मिळताहेत. अशा बिगरखर्चाचा शाळा हव्याच आहेत. मात्र जे खरोखरीच गरीब आहेत, ज्यांना राबल्याशिवाय पोट भरता येत नाही, अशा लोकांच्या मुलांसाठी मोफत शिक्षणाची गरज आहेच. जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा बंद पडल्या तर या मुलांना शिक्षणाची दारे बंद होणार आहेत. आणि पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या ...' ही परिस्थिती ओढवणार आहे. आपल्याकडे बालकांचा सक्तीचा मोफत शिक्षणाचा अधिकार कायदा अस्तित्वात आहे. असे असताना देणगी घेऊन शाळा चालवणार्‍या शाळांचे स्तोम माजत आहे, याला शासन, शिक्षक, पालक आणि समाजच कारणीभूत आहे. या अधिकाराला दखलांदाज करण्याचा हा प्रयत्न आर्थिक दुर्बल घटकांसाठी दुर्दैवी म्हणावा लागेल.
     गेल्या काही वर्षात इंग्रजी शाळांचे स्तोम प्रचंड वाढले आहे. इंग्रजी शिकण्याची गरज लक्षात घेऊन जो तो पालक आपल्या पाल्याला इंग्रजी शाळांमध्ये घालण्याची घाई करायला लागला आहे. साहजिक याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळांवर होऊ लागला आहे. त्यांना मुले मिळेनाशी झाली आहेत. आधीच छोट्या कुटुंबाची सोयीस्कर संकल्पना आपल्यात रुजत आहे. त्यामुळे अलिकडच्या कुटुंबात एक किंवा दोनच मुले आहेत. मुलांची संख्या कमी असल्याने त्यांचे लाडसुद्धा वाढले. कुठे चार-पाच मुले आहेत, दोन तर आहेत. मग जाऊ द्या ना इंग्रजी शाळांमध्ये. आम्हाला काही शिकता आलं नाही, मुलं तर शिकतील, अशी मानसिकता पालकांमध्ये वाढली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची तयारी पालकांमध्ये आहे. याचा परिणाम असा झाला की, जिल्हा परिषदेच्या शाळा फक्त अति गरीब मुलांसाठीच आहेत, अशी भावना लोकांमध्ये होऊ लागली.  त्यामुळे कितीही चांगले शिक्षण असले तरी पालक तिथे आपली पाल्ये घालायला तयार होईना.
     जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सगळं मोफत मिळतं. पाठ्यपुस्तके मिळतात, गणवेश मिळतो, मध्यान्ह भोजनाची सोय आहे. शिवाय शिष्यवृत्ती, प्रोत्साहनपर भत्ता मिळतो. शिक्षक गुणवत्तेची परीक्षा उत्तीर्ण हो ऊन आलेले असतात. पटसंख्या कमी असल्याने मुलांना वैयक्तिकरित्या लक्ष देता येते. असे असतानाही जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट कमी होत आहे. अन्य ऍक्टिव्हिटीजमध्येही या शाळा मागे नाहीत. याला गावातले पदाधिकारी, प्रशासन, शिक्षक जबाबदार आहेत. गावातल्या पदाधिकार्‍यांना गावातल्या शाळांमध्ये रस नाही. त्यांची मुले बाहेर इंग्रजी शाळांमध्ये असतात. ग्रामपंचायतीचा पदाधिकारी असो अथवा सदस्य यांची मुले खोट्या प्रतिष्ठेपायी इंग्रजी शाळांमध्ये शिकायला जातात. मग पंचायत समिती, जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य यांची गोष्ट तर वेगळीच. गावची शाळा, आपली शाळा म्हणून त्यांनी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करत असताना आपली मुलेदेखील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घातली पाहिजेत.  गावातल्या शैक्षणिक समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.  आर्थिक कमाईच्यादृष्टीने शिक्षकांच्या बदल्या, तक्रारी आदी गोष्टींवर मात्र बारकाईने लक्ष असते. आता ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी पंचायत समिती सभापातींना दहा बदल्यांचे तर जिल्हा परिषद अध्यक्षांना २० बदल्यांचे अधिकार दिले आहेत. सध्या हा विषय मोठा चर्चेचा झाला असून अशा बदल्यांचा दर ४० हजारापासून लाख रुपयांपर्यंत चालला असल्याची चर्चा आहे.
     वास्तविक जिल्हा परिषदेच्या शाळा राजकारणापासून अलिप्त असायला हव्यात. त्यामुळे शिक्षक भयमुक्त अध्ययन-अध्यापनाचे काम करू शकेल. शिक्षकांच्या कामात राजकीय हस्तक्षेप असायचे कारण नाही, मात्र शिक्षकांकडे बराच मतदानाचा गठ्ठा अवलंबून असतो, त्यामुळे राजकारण्यांचे शिक्षकांशिवाय काही चालत नाही. याचाच फायदा काही महाभाग शिक्षक घेतात आणि स्थानिक पुढार्‍यांना हाताशी धरून शाळेचा उंबरठाही चढत नाहीत. त्यांना माहित आहे, आपल्याला नोकरीवरून तरी कोणी काढू शकत नाही. त्यामुळे काही शिक्षक बेफिकिरीने वागताना दिसतात. शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्‍यांना तर शाळांना दांड्या मारायला अलिखित सूटच असते. याचा वाईट परिणाम चांगल्या आणि प्रामाणिक शिक्षकांवर होतात.  साहजिक शाळा सोडून जाणार्‍या विद्यार्थ्यांना थांबवून घेण्याबाबत फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार कसे मिळतात, याच्या सतत बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकत असतात.
     वास्तविक शिक्षकांनी आपले वर्तन सुधारायला हवे. आपल्यावर फार मोठी राष्ट्रीय जबाबदारी आहे, याचे भान असायला हवे. सहाव्या वेतनाने शिक्षकांचे पगार त्यांच्या गरजा चांगल्याप्रकारे भागवण्याइतपत आहेत. आपल्या कामाची जबाबदारी दुसर्‍या कोणी सांगण्याची गरज नाही. आपण आपल्या वेळेशी आणि कामाशी प्रामाणिक राहिल्यास कुणाला भिण्याचे कारण नाही. प्रशासनातल्या अधिकार्‍यांनीदेखील पोषण आहार, आर्थिक व्यवहार यांच्या पाहणीवर अधिक भर न देता त्याच्या अडचणी-समस्या जाणून घेण्याचा व त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करावा. शिक्षक सहकारी आपलाच एक मित्र आहे, असे समजून त्याच्याकडून काम करून घेण्याची हातोटी मिळवली पाहिजे.

     गुजरातच्या मोदी सरकारने प्राथमिक शिक्षणातील गुणवत्ता सुधारण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. या समितीने अनेक शिफारशी केल्या आहेत. त्यातली एक शिफारस फारच महत्त्वाची आहे.  ती म्हणजे सरकारी अधिकार्‍यांच्या मुलांना  सरकारी शाळांमध्ये दाखल करण्याबाबतची सक्ती करावी. जेणेकरून सरकारी शाळांमधील परिस्थिती मुलांमार्फत अधिकार्‍यांपर्यंत पोहचतील आणि यात काय सुधारणा करता येतील, याच्या आयडिया त्यांना येत राहतील. सरकारी शाळांचा शैक्षणिक असो अथवा भौतिक सगळ्या प्रकारचा दर्जा आपोआप वाढीस लागेल. असे झाले शिक्षण क्षेत्रातला हा क्रांतिकारक बदल म्हणावा लागेल. आपल्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी या शिफारशीची अंमलबजावणी केल्यास नक्कीच चांगले परिणाम दिस्प्प्न येतील. 

बालकथा टिमूने झटकला आळस


     ताकोबा वनात टिमू नावाचे एक माकड होते. टिमू  वनातल्या अन्य प्राण्यांपेक्षा मोठा चलाख आणि उत्साही होता. एके दिवशी अप्पू हत्ती आणि बंडू अस्वल गप्पा मारत बसले होते. ते कुठल्या तरी चिंतेत होते. जंगलातल्या प्राण्यांना त्यांच्या दूरदूरच्या नातेवाईकांकडून पत्रेटपाल, मनिऑर्डर येत. पण ते आणून द्यायला लांबडा जिराफ फार उशीर करत असे. त्यामुळे अनेकांना फटका बसला होता.  आणखी,  हा लांबडा जिराफ पैसे दिल्याशिवाय चिठ्ठीच आणून द्यायचा नाही. त्याला काढून टिमू माकडाला पोष्टमन करण्याचा विचार अप्पू आणि बंडूने केला.
     एक दिवस जंगलातल्या सगळ्या प्राण्यांची सभा बोलवण्यात आली आणि त्यात टिमू माकडाची पोष्टमन म्हणून नेमणूक करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. टिमू अगदी फीट आणि चलाख आहे, अशी शिफारस करण्यात आली. लांबड्या जिराफाला वैतागलेल्या प्राण्यांनी तात्काळ प्रस्तावाला मंजुरी दिली. मंजूर प्रस्ताव वनराजापुढे ठेवण्यात आला. वनराजाने ताकोबा जंगलाचा पोष्टमन म्हणून टिमू माकडाची नेमणूक  जाहीर केली.
     टिमू अगदी वेळेत सगळ्यांना टपाल आणून द्यायचा. असेच काहीदिवस गेले.  टिमूच्या लक्षात आले की, त्याला सगळेच  पसंद करतात.  याचा त्याने फायदा घेण्याचे ठरवले. आता प्रत्येक टपालाला मागे तो एक केळ  घेऊ लागला. याचा एक फायदा त्याला होऊ लागला तो म्हणजे काम झाल्यावर त्याला अन्नासाठी भटकावे लागत नव्हते. आरामात गोळा केलेली केळी खाऊन लोळता येत होते.
     याचा परिणाम असा झाला की, टिमू हळूहळू  सुस्तावत  चालला. काम झाले की, गोळा केलेल्या केळींवर ताव मारून एखाद्या झाडावर सुस्त पडून राहू लागला. त्याच्याने त्याच्यातला चपळपणा कमी हो ऊ लागला. अंगमेहनत कमी झाल्याने  आळस चढत चालला.  कामावर दांड्या मारू लागला.  नंतर नंतर तर तो पक्का  कामचोर बनला. आजचे टपाल परवा द्या, चार दिवसांनी द्या, असा प्रकार करू लागला.   पुढे पुढे पैसेही मागू लागला.
     सगळ्यांच्या लक्षात आले की, टिमू आळशी बनला आहे. प्राण्यांकडून पैसे घेतो आहे. प्राण्यांनी मग एक सभा बोलावली. यात अनेकांनी टिमूच्या तक्रारी मांडल्या. कधी  आजाराचा बहाणा तर कधी कुठे जाण्याचा बहाणा करून  पैसे लाटतो.  झालं, सगळ्यांनी निर्णय पक्का केला. टिमूला काढून टाकायचं आणि बंडू अस्वलला त्याच्या जागी नेमायचं.  तेवढ्यात अप्पू हत्तीमध्ये पडत म्हणाला," आता कोणाला पोष्टमन नेमायचं नाही."
     एकदम सगळे ओरडले," पोष्टमन नेमायचा नाही तर आम्हाला पत्रे कशी मिळणार? आमच्या नातेवाईकांची ख्यालीखुशाली कशी कळणार?"
     अप्पू हत्ती म्हणाला," आपण सगळ्यांनी शहरात किंवा अन्य कुठे राहत असलेल्या  आपल्या नातेवाईक, आई-बाबा, भाऊ-बहीण या सगळ्यांना निरोप पाठवा कीथोडे दिवस तुम्ही पत्रे पाठवू नका. मग टिमू माकड काम नसल्याने आपोआप घरात बसेल. त्याला अद्दल घडेल."
     बंडू अस्वल म्हणाले," अप्पू, तुझी आयडिया मस्त आहे.पण शहरात कुणाला काही झालं तर आपल्याला निरोप कसा मिळेल?"
     सगळेच प्राणी ओरडले," हो हो, निरोप कसा मिळणार?"
     अप्पू हत्ती म्हणाला," अरे, जरा शांत राहा. माझं ऐका. आपण सगळ्यांनी मिळून ताकोबा वनात एक टेलिफोन बुथ बसवू.  बुथचा नंबर नातेवाईकांना देऊ. फोनवर नातेवाईकांशी आरामात बोलता येईल.  मग पत्रे येण्या-देण्याचा सवाल राहत नाही. आणि पोष्टमनची गरजच उरणार नाही.  हळूहळू आपण आपापल्या घरात टेलिफोन जोडून घेऊ शकतो."  ही आयडिया ऐकून सगळे प्राणी खूश झाले.
     ही गोष्ट टिमूच्या कानांवर गेली, तेव्हा तो मोठा अस्वस्थ झाला. त्याला आपली चूक कळली. पळतच तो सभेत पोहचला आणि सगळ्यांची क्षमा मागू लागला.  टिमूला आपली चूक कळल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला माफ करून टाकले आणि आळस झटकून कामाला लागण्याची सूचना केली. आता टिमू पहिल्यासारखा चुस्तफुस्त राहू लागला. आता तो पैसेही कुणाला मागत नाही.  कुणाला वाचता येत नाही त्यांना पत्रेही वाचून दाखवू लागला.  ताकोबा वन आनंदात डुंबून गेले.                                               

Tuesday, July 23, 2013

रस्त्यांवरच्या अपघातांमुळे मरण झाले स्वस्त

    
     गाणगापूरच्या श्री दत्तात्रयाचे दर्शन येऊन परत असताना विजापूर-चिक्क शिंदगी हाय-वे वर एका वळणावर झालेल्या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातल्या जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातल्या आठरा भाविकांवर काळाने घाला घातला. क्रूझर आणि ट्रॅव्हल बस यांच्यात ही समोरासमोर धडक झाली होती. ही धडक इतकी भीषण होती की, क्रूझरमधील २३ पैकी १८ भाविक जागीच ठार झाले. त्यांच्या शरीराचा आणि चेहर्‍याचा अगदी चेंदामेंदा झाला होता. मृतदेह ओळखू येत नव्हते, इतकी भयानकता घटना स्थळावर दिसत होती. वाहनांचा वेग आणि तो नियंत्रणात आणता न आल्याने हा भीषण अपघात घडला. मात्र एका वाहनात किती माणसे कोंबून न्यायची याला काही मर्यादा आहेत. वाहनचालकासह तब्बल २४ माणसे क्रूझरमधून प्रवास करत होती.
     या हृदयद्रावक आणि भीषण घटनेने पून्हा एकदा रस्ते अपघाताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अधिक पैसा मिळवण्याच्या नादात खासगी वाहन मालक-चालक अक्षरशः जनावरांसारखे माणसांना गाडीत कोंबून प्रवास करीत असतात. शिवाय वेगाने नेल्यास आणखी एखादी ट्रीप करता येते, या आणखी एका लालसेपोटी वाहने वेगाने चालवतात. एकूण काय , तर लोकांना स्वतःच्या, दुसर्‍याच्या जीवापेक्षा पैसा प्यारा झाला आहे. त्याच्यासाठी 'वाट्टेल ते' करण्याची तयारी आज खासगी वाहतूक करणारे तयार आहेत.
     अशा घटना  माणसाचे मरण स्वस्त असल्याचे  सांगताहेतमाणसाच्या अनमोल आयुष्याची कदर कोणालाच राहिली नाही. ना वाहनमालक अथवा चालकाला ना शासन-प्रशासनाला! लोभापायी ही यंत्रणा बिघडत चालली आहे.  " मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक" अथवा "अति घाई जीव नेई' अशा सूचनांचा भडीमार  असूनही ना चालक त्याकडे लक्ष देतो, ना प्रवाशी. सगळे वेळेला मागे टाकत पैशाच्या मागे लागले आहेत. अशा वाहनातून प्रवास करणारे प्रवाशीदेखील एसटीपेक्षा कमी पैसे द्यावे लागतात, थोडी फार आपली सोय होते, म्हणून खासगी वाहनांचा पर्याय निवडतात. गाणगापूर देवदर्शनाला गेलेले हे सगळे भाविक-प्रवाशी जत व कवठेमहांकाळ तालुक्यातल्या विविध ग्रामीण भागातून आलेले होते. याच मार्गावर नियमितपणे वाहतूक करणार्‍या वाहनाचा पर्याय त्यांनी निवडताना आपली सोयच पाहिली होती. मात्र इतक्या अक्षरशः कोंबलेल्या अवस्थेत देवाच्या दर्शनाची आस घेतलेल्या या भाविकांना चार पैसे कमी देता येतील आणि जागोजागी गाड्या बदलता येणार नाहीत, आणि वेळेत परत येऊयाचेच समाधान होते.
      पण वेळेवर मात करायची ही कसली  जीवघेणी स्पर्धा म्हणायचीकसला हा बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा म्हणायचा? ज्या जीवाच्या सुखासाठी धावधाव धावायचं आणि तोच जीव असा किड्यामुंग्यांसारखा सहज मृत्यूच्या हवाली करायचा याला काय म्हणायचे?  याचा  विचार का करत  नाही? सोमवारी झालेल्या या अपघातातील क्रूझर चालकाचा आपल्या वाहनावरचा ताबाच सुटला होता. समोरून येणारी ट्रॅव्हल बसदेखील वेगात होती.  खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांही  आपसातील स्पर्धांमुळे वेगावर नियंत्रण ठेवायला तयार नसतात.  त्यात बेदरकार चालकांच्या निष्काळजीपणा अशा अपघाताला कारणीभूत ठरतात.   
    अलिकडे रस्त्यांवरील वाढत्या अपघातांच्या भीषण घटना आपल्याकडे मोठा चिंतेचा विषय झाला आहे. माणसाचे मरण स्वस्त असल्याचे या घटना सांगताहेत. असे अपघात फक्त वाहन चालक-मालकाच्या किंवा प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे होतात, असे नाही. याला   शासन, वाहनमालक, चालक आणि प्रवाशी याचबरोबर आणखीही काहींच्या अप्रत्यक्ष चुका आणि निष्काळजीपणा कारणीभूत  आहेत. अर्थात केवळ या अपघातामध्ये नव्हे तर घडणार्या प्रत्येक अपघाताला अनेकांचा निष्काळजीपणा जबाबदार असतो. चालकांचा निष्काळजीपणा, वाहनांचा प्रचंड वेग, वाहनांच्या देखभालीकडे दुर्लक्ष, आपल्याकडील सुमार रस्ते, डागडुजीबद्दल निष्काळजीपणा असे अपघात घडतात आणि यामुळे अशा  अनेक निष्पापांचे   बळी जाताहेत.
    आपल्या देशातल्या  सुमार रस्त्यांचा, डागडुजीबद्दलच्या निष्काळजीपणाचा मोठा प्रश्न ऐरणीवर आहे.  महामार्गावरील खड्डे निष्पाप प्रवाशांच्या मृत्यूचे निमंत्रक बनले आहेत. हे खड्डे बुजवण्याचे काम कधीच वेळेवर होत नाही. रस्त्यांच्या कामांच्या दर्जेबाबत तर विचारायची सोयच राहिलेली नाही. एक पावसाळा सुखाने जात नाही. लगेच खड्डे पडलेच म्हणून समजा. रस्ते म्हणजे देशांची वाहिनी आहे. पण त्याकडे कोणीच गांभीर्याने पाहात नाही. टक्केवारीला सोकावलेले लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यामुळे ठेकेदार आपल्या सोयीने रस्त्यांची कामे करतो  त्याला रस्त्याच्या क्वालिटीशी काही देणे-घेणे नसते. त्याचा परिणाम म्हणून जागोजागी खड्डे दिसतात. बरे खड्डे पडले ते पडले,  ते बुजवण्याचे कामही वेळेवर होत नाही. परिणाम काय तर हे असले अपघात दिसत राहतात.
     वाहन चालवण्याला एक मर्यादा आहे. शासनानेही त्याला मर्यादा आखून दिली आहे. साधारणतः द्रुतगती महामार्गावर ८० कि.मी. वेगमर्यादा आहे. पण पाळतो कोण? अशा वेगाचे, कायद्याचे उल्लंघन सतत होत असते. त्याला आवर कधी घातल्याचे ऐकिवात नाही. माणसाने आजच्या घडीला आपल्यापेक्षा वेळेला अधिक महत्त्व दिले आहे. कामाला दिवस पुरत नाही म्हणून रात्रीचाही धावधाव धावतो आहे. अलिकडच्या काळात रात्रीच्या प्रवासाला निघण्याचा ओढा कमालीचा  वाढला आहे. आपल्या देशात सकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान रस्त्यावर जी वाहतूक असते, त्यापेक्षा कमी वाहतूक रात्री असते. मात्र तरीही रात्रीचा अपघात हा दिवसाच्या अपघातापेक्षा आठपटीने जास्त आहे. रस्ता मोकळा आहे, म्हणून चालक भरधाव वाहने चालवित असतात. रात्रीचा काळ वास्तविक निसर्गनियमाने झोपेसाठी राखीव असतो. पण माणूस ही निसर्ग चक्रे आपल्या सोयीनुसार फिरवीत आहेमात्र शरीर आणि मन त्याला साथ द्यायला हवे ना! साथ मिळाली नाही तर अनर्थ घडतोच.
     एक तर अलिकडच्या वीस वर्षात वाहनांची संख्या बेसुमार वाढली आहे. वेळेच्या पुढे जाण्याच्या घाईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला फाटा दिल्याने रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. गरिबांच्या देशात ही वाहनांची गर्दी सामान्यांच्या मुळावरच उठली आहे. खासगी वाहतूक, बेकायदा वाहतूक वाढली आहे. मर्यादेपेक्षा अधिक माणसे गाडीत अक्षरशः कोंबली जातात. चालकाला वाहन नीट चालवता येत नाही, तरीही गर्दी केली जातेच. चार पैसे जास्त मिळवन्याच्या नादात सगळेच त्याच्या मागे लागले आहेत. अशा वाहतुकीला आळा घालणारी पोलिसी यंत्रणासुद्धा चिरीमिरीसाठी अभय देत राहते.  सगळी दुनिया पैसा खाते. मग मी थोडा खाल्ला म्हणून थोडच आभाळ कोसळणार आहे, अशी या यंत्रणेची  मानसिकता बनली आहे.
     आपल्याकडे आपल्या जीवाची हमी घेणारे  एस.टी. महामंडळ आहे, मात्र या महामंडळांकडील गाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. शिवाय सीमाभागात वैगेरे या वाहनांना मर्यादा पडतात. माणसांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात  म्हणावी अशी महामंडळाची वाहतूक यंत्रणा पुरेशी नाही. त्याचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे एकमेकाच्या पायावर पाय ठेऊन , दाटीवाटीने आणि लोंबकळत लोक प्रवास करतात. असा प्रवास नको म्हणून  उच्चभ्रू, मध्यमवर्गीय व गरजू प्रवासी खासगी वाहतूकीकडे आपसूकच धाव घेतातखासगी वाहन मालक अशा  प्रवाशांच्या मानसिकतेचा बरोबर फायदा घेतात आणि  त्यांना हवे तसे लुटण्याचा सतत प्रयत्न करतातत्यात खासगी वाहतूकदारांमध्येसुद्दा स्पर्धा प्रचंड वाढली आहे. तू पुढे की मी या नादात आपल्यासह दुसर्याचा जीव धोक्यात घालत आहेत. पैसा मिळवण्याच्या मोहापायी वाहनमालक वाहन फक्त हाकीत असतात. त्याची  देखभाल करत नाहीत. जी रोजीरोटी देते, तिची काळजी घ्यायला हवी, देखभाल करायला हवी. परंतु तसे करताना दिसत नाहीत. निष्काळजीपणा नडतो. . चालकांच्या शारीरिक, मानसिक व परिवहन क्षमतेकडेही काणाडोळा केला जातो.
    प्रवास सुखकर, सुरक्षित व्हावा, यासाठी कायदे करण्यात आले आहेत. त्याचे व्यवस्थितरित्या पालन केल्यास, वेळेपेक्षा जीव महत्त्वाचा मानल्यास आणि  वेळेवर पोहचण्यासाठी थोडे लवकर निघण्याची मानसिकता ठेवल्यास भीषण अपघात टाळता येतील. प्रवासादरम्यान चालकाने मद्यप्राशन करू नये, यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आरटीओ व पोलिसांनी याबाबत दक्ष राहायला हवे. प्रवास सुखकर व्हावा, दळणवळण वाढावे म्हणून रस्ते बांधण्यात आले आहेत, त्यांची वेळचेवेळी दुरुस्ती व्हायला हवीपण विचारात घेतो कोण, असा प्रश्न आहे. ज्यांनी याची काळजी घ्यायला हवी, त्यांना तरी कुठे   सवड आहे?  त्यामुळे फक्त  धावधाव धावण्याच्या स्पर्धेत आजचे अपघात कालचे होऊन जाताहेत.

Saturday, July 20, 2013

बालकथा बक्षीस

     श्रावणपूर गावात एक लाकूड काम करणारा कारागीर राहत होता. त्याचं नाव बुद्धिराम. त्याच्याजवळ एक सुंदर घड्याळ होतं. त्याच्या वडिलांनी एक दिवस आपल्या तिन्ही मुलांना बोलावून घेऊन प्रत्येकाला लाकडी घोडा बनवायला सांगितला होता. सगळ्यात चांगला, सुंदर घोडा बनवल्याबद्दल वडिलांनी बुद्धिरामला घड्याळ दिलं होतं. त्याने ते घड्याळ फार सांभाळून ठेवलं होतं.
     बुद्धिरामलादेखील तीन मुलगे होते. ते ज्या ज्या वेळी एकत्र असत, त्या त्या वेळी आपसात भांडत असत. एके दिवशी भांडण इतके विकोपाला गेले की, त्यांच्यात हाणामारी झाली. थोरल्याने धाकट्याला जोराचे ढकलून दिले. तो दगडावर आपटल्याने डोक्याला मोठी जखम झाली. बुद्धिरामला कळून चुकलं की, आपण याला वेळीच आवर घातला नाही तर पुढे फार मोठे परिणाम भोगावे लागतील.
     एक दिवस त्याने तिघांना लाकडाचे छोटे छोटे तुकडे दिले आणि त्याचे म्हणाला," मी दुकानात जाऊन ये ईपर्यंत जो कोणी सुंदर बदक बनवेल, त्याला आजोबाचे किंमती घड्याळ बक्षीस म्हणून दे ईन." तिघांनाही फार आनंद झाला. थोड्या वेळाने थोरला मधल्या भावाला म्हणाला," बघच, मीच सगळ्यांपेक्षा सुंदर बदक बनवतो." त्यावर मधला म्हणाला," नाही, सगळ्यात सुंदर बदक मीच बनवणार." बघता बघता दोघांमध्ये भांडण लागले. एकमेकांना अद्वातद्वा बोलू लागले.
     बुद्धिराम घरी आला, तेव्हा पाहतो काय तर थोरला आणि मधला मुलगा एकमेकांशी भांडताहेत. धाकटा मन लावून बदक बनवतो आहे. वडिलांना पाहिल्यावर दोघेही गप्प झाले. तो दोघांना म्हणाला," मी तुम्हाला काम सांगितले होते, झाले का?"
     तेव्हा थोरला म्हणाला," बाबा, मी कामच करत होतो, पण हा पहिल्यांदा या मधल्यानेच भाम्डायला सुरूवात केली."
     तेवढ्यात मधे पडत मधला म्हणाला," नाही बाबा, दादानेच भांडणाला सुरूवात केली. मी तर आपला मुकाट्याने काम करत होतो." मग दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू लागले. आपलेच बरोबर आहे, सांगू लागले. इतक्यात धाकट्याने बदक बनवून बुद्धिरामच्या हातात दिले. बुद्धिरामला तो सुंदर बदक पाहिल्यावर वाटले की, हाच आपला खरा वारस. हाच आपले नाव कमावेल.
     तो दोन्ही मुलांकडे पाहात म्हणाला," आजपासून हे धाकट्याचे झाले. तुम्ही दोघेही सगळा वेळ भांडणात घालवलात. कामावर आपली श्रद्धा पाहिजे. आणि श्रद्धा असेल तर कोणतेही काम सुंदर होतं. तुम्हाला या तुमच्या धाकट्या भावासारखं धैर्यानं काम करायला हवं. तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी हो ऊ शकता."
वडिलांचे हे बोल ऐकल्यावर दोघांच्याही माना खाली झुकल्या. आपली चूक त्यांच्या लक्षात आली.

Friday, July 19, 2013

मध्यान्ह भोजनची ऐशी की तैशी

     खरं तर तामिळनाडूच्या शाळांमधून १९६० मध्ये 'मध्यान्ह भोजन' योजनेला सुरूवात झाली. पण ही योजना १९९५ मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर नेली. या मागे काही हितावह उद्देश होते, विद्यार्थ्यांना मोफत पौष्टीक अन्न मिळावे, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वृद्धी व्हावी आणि त्यांना शाळेत नियमितपणे येण्यासाठी प्रेरित केलं जावं. केंद्र सरकारची ही योजना अनेक राज्यांनी पैशांची चणचण असल्याचे सांगून गांभिर्याने घेतली नाही. पण २००१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या चांगल्या योजनेला संपूर्ण देशभर राबवण्याबाबत आदेश दिला.
     तामिळनाडूमध्ये ही 'मध्यान्ह भोजन ' योजना लागू करण्याबाबत त्यावेळी एक मोठी रोचक अशी घटना घडली होती. झालं असं होतं की, १९६० मध्ये के. कामराज त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते. एकदा ते एका गावावरून जात असताना त्यांना तिथे काही मुलं गुरे राखत असताना दिसली. त्यांनी त्या मुलांना विचारलं," तुम्ही शाळेला का जात नाही?" त्यातल्याच एका मुलाने पटकन विचारलं," शाळेत गेल्यावर तिथे आम्हाला भोजन मिळेल का? ही गुरं राखल्याने आम्हाला पोटाला काही फार मिळतं." यानंतर कामराज यांनी संपूर्ण राज्यात 'मध्यान्ह भोजन' योजनेची सुरूवात केली.
     या योजनेच्या विस्ताराचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने याच दृष्टीकोनातून दिला होता, गरीब मुलांना पौष्टीक भोजन मिळेल आणि त्यांची कुपोषणातून सुटका होईल. शिवाय शिक्षणाचाही प्रसार होईल.परंतु, आपलं दुर्दैव असं की, ही योजना कितीही चांगली असली तरी ती योग्यरित्या राबवण्यात आली नाही. यातदेखील भ्रष्टाचार शिरला. धान्याच्या गुणवत्तेपासून ते खरेदी करण्यापर्यंत आणि शिजवून वाढण्यापर्यंत भ्रष्टाचार बोकाळला. काही लोकांनी तर पैशांच्या लालचेपायी इतक्या खालच्या स्तराला जाऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा बाजार मांडला.
     आणि परिणाम समोर येऊ लागले, येत आहेत. हा मोठा चिंताजनक प्रश्न असून चरित्र आणि स्वार्थविरहीत कामाबाबत शंका उत्पन्न हो ऊ लागल्या. नि: स्वार्थ विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणार्‍यांचे कृत्य कुठल्याही दृष्टीकोनातून क्षम्य नाही. जरा विचार करा, बिहारमधल्या छापरीच्या मशरकस्थित एका सरकारी शाळेतील मध्यान्ह भोजन खाल्ल्याने २२ विद्यार्थी दगावले. मधुबनीमध्ये ५० मुलं तर गयामध्ये २० मुलं गंभीररित्या आजारी पडली. यातल्या बहुतांश मुलांची वय १०-११ च्या आसपास आहेत. या दुर्घटनेचे योग्यरित्या आकलन केल्यास आपल्याला असं लक्षात ये ईल की, यातून काही कुटुंबांचा वंशच संपला आहे. कारण आजची कौटुंबिक परिस्थिती आणि विचारधारा वेगळी आहे. आजकालच्या लोकांना खंडीभर मुलांची गरज नाही. एक किंवा दोन मुले पुरेत, अशी विचारधारा लोकांची झाली आही. आणि हीच मुले त्यांच्यासाठी जीवापाड  असतात. अशा लाडक्या मुलांना ही माणसं आपल्या लापरवाहीमुळे गमवावी लागत असतील तर यापेक्षा भयंकर गोष्ट कोणती म्हणायची. ही हैवानगी झाली. अशा बेफिकीर वागणुकीला क्षमा करता ये ईल काय? त्यामुळे 'मध्यान्ह भोजन' योजनेच्या सुधारणांचा गांभिर्याने विचार व्हायला हवा.
     १२लाख शाळांमधून जवळपास ११ कोटी मुलांना या 'मध्यान्ह भोजन'द्वारा शाळांमध्ये भोजन दिले जाते.मात्र या योजनेद्वारा किती पौष्टीक अन्न मिळते, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. सरकारी शाळांची अवस्था तर फार चिंताजनक आहे. या शाळा भोजनालयात रुपांतरित झाल्या आहेत. पोषण आहार शिजवून देण्यासाठी अथवा धान्यादी मालांसाठी पुरेसा पैसा शासनाकडून उपलब्ध होत नाही. काही शाळांमधून तर शिक्षकांनाच अध्यापनाचे काम सोडून स्वयंपाकाच्या मागे लागावे लागते. तटपुंज्या मानधनावर कोणी महिला अथवा मदतनीस कामाला येत नाही. त्यामुळे शिक्षकांनाच आचारी बनावे लागते. तर काही ठिकाणी याहीपेक्षा वेगळी परिस्थिती दिसून येते.मुलांसाठीचे धान्य थेट शिक्षकांच्या किंवा स्वयंपाक्यांच्या घरात जाऊन पडते. शिवाय त्याला पायदेखील फुटतात आणि ते थेट बाजारात जातात. मुलांच्या तोंडचा घास हिरावून घेऊन ही माणसं कसलं पुण्य करताहेत म्हणायचे? स्वतःच्या तुंबड्या भरण्याखेरीज यात दुसरं काय असणार? पुरवठादारदेखील चांगला माल पुरवत नाही. खराब, सडका माल शाळांच्या माथी मारतो. यावर कोणाचेच नियंत्रण नाही.
      बिहार असो किंवा मधुबनी अथवा गया. इथल्या दुर्दैवी घटनांनी अख्खा देश हबकून गेला आहे. आता काही मुलांच्या घरातल्या लोकांनी शाळेतला भात खात जाऊन नकोस. घरातला डबा खात जा, असे आपल्या मुलांना सुनवायला सुरूवात केली आहे. आपल्या एक-दोन मुलांची आपल्यापासून अशी कायमची ताटातूट हो ऊ नये, अशी काळजी वाटणे स्वाभाविक आहे. या घटना घडल्यानंतर देशातली राज्ये खडबडून जागी झाली आहेत. महाराष्ट्रदेखील असाच जागा झाला आहे. शासनाने शाळांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. आठ दिवसात तपासणी करून अहवाल द्यावयाचा आहे. आठ दिवसांत या चौकश्या पूर्ण होतील. पण यातून काही निघणार नाही. कारण हा निव्वळ फार्स आहे. दिखावा आहे. याही अगोदर अशा तपासण्या झाल्या, पण यातून काहीच निष्पण झाले नाही. आता यातूनही काही निष्पण होणार नाही.
     खरे तर 'मध्यान्ह भोजन' योजना फार मोठी आणि चांगली योजना आहे.मात्र त्याची अंमलबजावणी राम भरोसे सुरू आहे. त्यात बर्‍याच चांगल्या सुधारणांची आवश्यकता आहे. या मध्यान्ह योजनेमुळे शालेय कामकाजात बाधा येऊ नये, याचीही काळजी घेतली पाहिजे. काही ठिकाणी शिक्षक फक्त मध्यान्ह भोजन उरकायला शाळेत जातात. त्याच्याने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडत नाही. शिक्षकांच्या अशैक्षणिक कामात ही आणखी एक भर. मध्यान्ह भोजन योजनेला दुसरा चांगला पर्याय शोधला जायला हवा. अलिकडे शासन सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना कपडे, पाठ्यपुस्तके पुरवत असते. हे भोजन देण्यापेक्षा मुलांच्या बँकेच्या खात्यावर थेट अनुदान जमा करायला  हवे.    हुशार मुलांना शिष्यवृत्ती द्यायला हवी. जाण्या-येण्यासाठी सायकली पुरवाव्यात किंवा जाण्या-येण्याचे भाडे द्यावे. जे लोक मध्यान्ह भोजनाच्याबाबतीत बेफिकीरपणे वागतील, त्यांना मोठी शिक्षा किंवा दंड ठोठवायला हवा. मुलांना शाळेची गोडी लागावी, यासाठी आणखी काही उपक्रम आणि योजना राबवायला हव्यात. मुलगा शाळेत आला पाहिजे, रमला पाहिजे, यासाठी त्याच्या राहण्या-खाण्याबाबत दक्ष असायला हवे.पुन्हा अशा घडू नयेत तसेच शाळा, शिक्षणाची बदनामी हो ऊ नये, यासाठी सर्वच स्तरावर काळजी घेतली पाहिजे.     

अतिघाई संकटात नेई!

     एक गरीब लाकूडतोडया आपली पत्नी आणि सात मुलांसोबत एका छोटया गावात राहत होता. घरात अठराविश्व दारिद्रय़ असल्यानं त्याचे दिवस मोठया हलाखीत जात होते. दिवसरात्र काबाडकष्ट करूनही तो मुलाबाळांना पोटभर अन्न देऊ शकत नव्हता. मुलं मोठी होत होती, तशी त्याची परिस्थिती आणखीच बिकट होत चालली होती. कधी कधी त्यांना अन्नही मिळत नव्हतं. त्यामुळे ती वाळलेल्या काटक्यांसारखी दिसू लागली होती. लाकूडतोडयाला त्यांची दशा पाहावत नव्हती.
त्यानं एक दिवस आपल्या पत्नीला सांगितलं, ‘आपली परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. आपल्या मुलांचं संगोपन करण्यासाठी आपण अपुरे पडत आहोत. त्यामुळे त्यांची परवड होण्यापेक्षा सगळ्या मुलांना जंगलात सोडून येऊ. तिथे ते आपल्या जगण्याचा काहीतरी मार्ग शोधतील.लाकूडतोडयाच्या पत्नीच्या डोळ्यांत अश्रू दाटले. पोटच्या पोरांना आपल्यापासून वेगळं करण्याची कल्पनाच तिला सहन होत नव्हती. तिनं त्याला खूप विरोध दर्शवला. पण शेवटी लाकूडतोडयाच्या समजावण्यानं ती तयार झाली. शेवटी ती बिचारी तरी काय करणार? तिचा नाईलाज होता. भुकेनं तडफडून आपल्या डोळ्यांदेखत मुलांचा मृत्यू पाहण्यापेक्षा ती मुलं जंगलात काहीतरी खाऊन जगतील, असं तिला वाटलं.
     लाकूडतोडयाचं आणि त्याच्या पत्नीचं बोलणं थोरला मुलगा सोमनाथ लपून ऐकत होता. सकाळी लाकूडतोडया सातही मुलांना घेऊन जंगलाच्या दिशेनं निघाला. तेव्हा सोमनाथनं आपल्या खिशात पुष्कळसे लाल खडे ठेवले. जंगलात जात असताना सोमनाथ खिशातून एकेक खडा काढून रस्त्यावर टाकू लागला. काही वेळानं लाकूडतोडया दाट जंगलात आला. मी पाणी शोधून आणतोअसं सांगून त्यानं सातही मुलांना एका ठिकाणी थांबायला सांगितलं आणि तो घरी निघून गेला. मात्र तो मनोमनी खूप दु:खी होता. जगण्याचा दुसरा काहीच मार्ग समोर दिसत नसल्यानं अगदी नाखुशीनं तो हे सगळं करत होता.
     सोमनाथ काही वेळानं आपल्या भावंडांबरोबर रस्त्यावर टाकलेल्या लाल खडय़ांच्या मदतीनं पुन्हा घरी आला. लाकूडतोडयाला मुलं घरी आलेली पाहून खूप आश्चार्य वाटलं. शिवाय खूप दु:खही झालं. त्याला काय करावं हे समजेना! त्यानं दुस-या दिवशी पुन्हा मुलांसह जंगलाचा रस्ता धरला. या खेपेला सोमनाथ घाईगडबडीत खिशात लाल खडे ठेवायचं विसरला. त्याला वाटेत एक भाकरीचा तुकडा दिसला. तो त्याचेच तुकडे करून रस्त्यात टाकू लागला. सातही मुलांना जंगलात सोडून लाकूडतोडया माघारी परत आला.
     मागच्या वेळेसारखंच सोमनाथ पुन्हा भावंडांना घेऊन घरचा रस्ता शोधत शोधत माघारी येऊ लागला, पण अचानक तो रस्ता चुकला. कारण रस्त्यात टाकलेले भाकरीचे तुकडे पक्ष्यांनी वेचले होते, त्यामुळे त्याला घरी जाण्याचा रस्ता सापडेना. अशा प्रकारे सातही भावंडं जंगलातच हरवली. पण काही दिवसांनी अचानक एक व्यक्ती लाकूडतोडयाच्या घरी आली. त्यानं फार पूर्वी घेतलेलं पुष्कळ धन लाकूडतोडयाला परत केलं. शिवाय इतके दिवसांचं व्याजही दिलं. आता लाकूडतोडयाच्या घरात सगळं काही होतं, पण त्या पैशांचा आनंद घेण्यासाठी लाकूडतोडयाची मुलं त्याच्यासोबत नव्हती. आता मात्र लाकूडतोडयाला आणि त्याच्या बायकोला आपल्या मुलांची खूप आठवण येऊ लागली. त्यांची उणीव भासू लागली. आपण केलेल्या गोष्टीचा पश्चात्ताप होऊ लागला.
     लाकूडतोडया आणि त्याच्या पत्नीनं आपल्या सातही मुलांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण जंगल पालथं घातलं. खूप हिंडले. त्यांना खूप चिंता वाटत होती. पण मुलं काही सापडेनात. शेवटी हताश होऊन ते एका जागी बसले. तोच बाबा तुम्ही कुठे आहात?’ अशी आरोळी त्यांना ऐकू आली. आपल्या मुलांचा आवाज त्यांनी लगेचच ओळखला. धावतच लाकूडतोडया आणि त्याची बायको त्या आवाजाचा मागोवा घेत जाऊ लागले. आणि अखेरीस त्यांची त्यांच्या मुलांशी भेट झाली. लाकूडतोडयाने आपल्या मुलांची माफी मागितली. यापुढे कितीही मोठं संकट आलं तरी तुम्हाला सोडून जाणार नाही, असं वचन दिलं आणि आता सगळं कुटूंब सुखासमाधानाने एकत्र राहू लागलं.
     म्हणूनच मित्रांनो, अतिघाई संकटात नेई असं म्हटलं जातं. आपली सहनशक्ती थोडी वाढवली तर थोडं उशिरा का होईना, पण चांगलं फळ नक्कीच मिळतं.