Thursday, January 24, 2013

बालकथा : जमीनदाराची शिकवण

     लखनपूर गावात विष्णूकांत नावाचा सोन्या-चांदीचा एक प्रसिद्ध व्यापारी राहात होता. त्याला मदनलाल नावाचा एक मुलगा होता. त्याला आपल्या वडिलोपार्जित व्यापारात रस नव्हता. एक दिवस अकस्मात व्यापाराचा मृत्यू झाला. त्यामुळे धंद्याची सगळी जबाबदारी मदनलालवर येऊन पडली. पण त्याने त्यात लक्ष न घालता सगळा कारभार नोकरांच्या भरवशावर सोडून दिला.
     एक दिवस त्यांच्या व्यापारातला  सल्लागार त्याला म्हणाला,"मालक, मी ऐकलंय की, आपल्या दुकानासमोरच एक व्यापारी दुसरं सोन्या-चांदीच्या व्यापाराचं दुकान थाटतो आहे. आपल्याला काही तरी करायला हवं." 
     मदनलाल बेफिकीरपणे म्हणाला," तू इतकी का काळजी करतोयस. आपयाकडे कुशल कारागीर आहेत. आपल्या व्यापारात कसलादेखील परिणाम होणार नाही."
     काही दिवसांतच समोर भव्य असे सोन्या-चांदीचे दुकान सुरू झाले. थोड्या दिवसांतच त्याने लोकांचा विश्वास संपादन केला. व्यापारात जम बसवला.साहजिकच मदनलालची मिळकत कमी हो ऊ लागली. पुढे पुढे तर त्याला आपल्या नोकर, कारागिरांनादेखील पगार द्यायला अडचण येऊ लागली. काही कारागीर सोडून गेले तर काहींना मदनलालने काढून टाकले. व्यापार पूर्ण बसला. एक दिवस वैफल्यग्रस्तावस्थेत त्याने घर सोडले.
     असाच भटकत असताना प्रचंड थकव्यामुळे तो एका झाडाखाली विसावला. चेहर्‍यावर त्याच्या प्रचंड ताण आणि थकवा होता.  तिकडून आपल्या माणसांसोबत जाणार्‍या एका जमीनदारने त्याला पाहिले. तो आजारी असल्याचे वाटल्याने त्याने मदनलालला आपल्यासोबत घेतले. जमीनदारने त्याला बरेच काही विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही एक बोलला नाही. कदाचित, जमीनदारला त्याची दया आली असावी. त्याने त्याची आपल्या अतितीगृहात राहण्याची व्यवस्था केली.
     त्याच रात्री दरोडेखोरांनी जमीनदाराच्या घरावर हल्ला चढवला. जमीनदारदेखील आपल्या माणसांना घेऊन  शस्त्रांसह त्यांना सामोरे गेला. प्रचंड धुमश्चक्री झाली. मजबूत प्रतिकार पाहून दरोडेखोर मागे हटले आणि पळून गेले. जमीनदारला स्वतः आपल्या माणसांसोबत दरोडेखोरांशी दोन हात करताना पाहून मदनलाल चकीत झाला. तो त्याच्याजवळ जात म्हणाला," भाऊ, आपल्याकडे एवढे नोकरचाकर असताना आपण स्वतःचा जीव धोक्यात घालून दरोडेखोरांशी लढणे योग्य नव्हते. हे काम तुमचे नाही, नोकरांचे आहे."
     ऐकून जमीनदार हसला आणि म्हणाला,'' कुठलेही काम सगळ्यांनी मिळून केले तरच  ते यशस्वी होते.  आणि तसे आपण वागलेच पाहिजे.   त्यातून जो फायदा होईल, त्यातला काही वाटा त्यांनाही द्यावा. जमीनदार आणि व्यापार्‍यांनी तर ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवली पाहिजे."
     जमीनदारचे बोलणे ऐकून मदनलालचे डोळे उघडले.त्याने आपली सगळी कहानी जमीनदारला सांगितली. जमीनदारने त्याला गळाभेट देत विश्वास दिला. आणि काही माणसे आणि काही पैसा देऊन मदनलालची त्याच्या गावी रवानगी केली. मदनलालने आपल्या व्यापाराला नव्याने सुरुवात केली. आणि अल्पावधीतच त्याने आपल्या वडिलांसमान कीर्ती मिळवली.

कष्टाचं मोल

     गोष्ट फार जुनी आहे. अमृतपूर नावाच्या छोटयाशा गावात गोरखनाथ नावाचा एक शेतकरी राहात होता. त्याला केदार नावाचा मुलगा होता. त्याच्यात एक अवगुण होता. तो नेहमी वायफळ पैसे खर्च करायचा. त्याच्या हातात पैसे राहतच नसत. वडिलांकडून पैसे मागून उधळण्यातच त्याचा दिवस जात असे. साहजिकच, वडिलांना त्याच्या खर्चिकपणाची मोठी चिंता वाटत होती. हा असाच पैसे उधळत राहिला तर याला पैशाची किंमत कळणार नाही आणि हा भविष्यात दरिद्री बनून जाईल, असा ते मनोमन विचार करत असत.
     एक दिवस गोरखनाथानं आपल्या मुलाला जवळ बोलावलं आणि समजावलं, ‘‘बाबा रे, मी एका गरीब घरात जन्माला आलो. माझे बाबा शेळ्या चरवत. दूध, बक-यांची विक्री यातून चार पैसे मिळवत. त्यात कशी-बशी घराची गुजराण होई. मला फार शाळा शिकता आली नाही. मी वडिलांना कामात मदत करू लागलो. वडिलांनी मग अधिक शेळ्या घेतल्या. थोडा फार पैसा येऊ लागला. ते पैसे खर्च न करता साठवून ठेवू लागलो.
     वडिलांच्या मृत्यूनंतर मी त्या पैशांतून थोडी जमीन घेतली. त्यात भाजीपाला पिकवून विकू लागलो. पैसे वाचवून पुढे त्यातून एक छोटंस घर खरेदी केलं. मी तुझ्यासारखे पैसे उधळत राहिलो असतो तर आज मी गरीबच राहिलो असतो. मला असं वाटतं, पैसे उधळण्याबाबतीत तू थोडातरी विचार करावास.’’केदारवर याचा काडीमात्र परिणाम झाला नाही. तो पैसे उधळत राहिला. एकदा गोरखनाथ विचार करीत बसला असताना त्याच्या मित्रानं, मंजूनाथनं त्याला कारण विचारलं.
     गोरखनाथने कारण सांगितलं. मंजूनाथने एक योजना सांगितली. ती गोरखनाथला विलक्षण आवडली. त्याने एक दिवस केदारला बोलावून सांगितलं, ‘‘मी बाजारात भाजीपाला विकायला जातो आहे. आता रोज मी भाजीपाला विकून आलो की, तुला दहा रुपये देत जाईन. त्यातले पाच रुपये तू खर्च करायचे आणि पाच रुपये आपल्या शेतातल्या झाडीतल्या विहिरीत फेकून द्यायचे.’’
केदारला तेवढेच पाहिजे होते.
     रोज दोन रुपयाच्या जागी पाच रुपये मिळणार असतील तर कोणाला नको आहे? तो वडील सांगतील तसंच करू लागला. एक दिवस ठरल्यानुसार, गोरखनाथने आजारी पडल्याचा बहाणा केला. केदारला जवळ बोलावून म्हणाला, ‘‘बाबा रे, माझ्या अंगात ताप भरला आहे. अशक्तपणाही आला आहे. उद्यापासून काही दिवस तुलाच बाजारात जावं लागेल. शेतातलीही कामं करावी लागतील. नाही तर, मग मी तुला पैसे कोठून आणून देणार?’’
     दुस-या दिवशी केदार शेतावर गेला. भाजी तोडली. त्याच्या पेंडया बांधल्या. हे करताना त्याला खूप कष्ट पडले. तो भाज्यांचे गाठोडे बांधून बाजारात गेला. संध्याकाळी तो फार थकून घरी आला. एवढं करूनही त्याने फक्त दहा रुपयेच कमावले होते. बाजारातून त्याने अगोदरच पाच रुपये खर्च केले होते. उरलेले पाच रुपये विहिरीत टाकायला गेला. चालता चालता विचार करू लागला, एवढे कष्ट करून मिळवलेले पैसे विहिरीत कसे टाकायचे? तरीही मन मारून त्यानं पाच रुपये विहिरीत टाकले.
     पुढच्या दिवशीही असंच घडलं. पण विहिरीत पैसे फेकायला त्याचं मन तयार होईना. तो बराच वेळ विचार करत उभा राहिला. आणि शेवटी मनाची तयारी करून पाच रुपये विहिरीत फेकून माघारी परतला. तिस-या दिवशी मात्र विहिरीत पैसे फेकण्याचं त्याचं धाडस झालं नाही. विहिरीत पैसे न फेकताच तो माघारी फिरला. वडिलांना म्हणाला, ‘‘बाबा, एवढे मोठे कष्ट उपसून पैसे कमवायचे आणि ते विहिरीत फेकायचे? जर हेच पैसे साठवले तर भविष्यात आपल्या कामाला येतील.’’
गोरखनाथ म्हणाला, ‘‘केदार बाळा, मी रोज तुला दहा रुपये देत होतो, त्यावेळेला तू असा का विचार केला नाहीस?’’
     ‘‘बाबा, माझी चूक झाली. त्यावेळेला मला कष्टाचं मोल माहीत नव्हतं. पण आता मी ते समजून चुकलो आहे. यापुढे माझ्याकडून असा प्रकार होणार नाही.’’ गोरखनाथ हसला. म्हणाला, ‘‘बाळ जा, ती विहीर कोरडी आहे. त्यात फेकलेले पैसे काढून घेऊन ये. आता तुला पैशाचं मोल कळलं ना, हेच मला हवं होतं.’’ केदारला आनंद झाला. तो धावतच विहिरीकडे गेला. विहिरीत उतरल्यावर पैशांचा ढिग पाहून चकीत झाला. ते सगळे पैसे गोळा करून घरी परतू लागला.
     वाटेत विचार करू लागला, आपण उगाचच पैसे खर्च करत होतो. ते पैसे साठवले असते, तर सायकल घेण्याइतपत पैसे जमले असते. अजूनदेखील वेळ गेली नाही. हे पैसे आणि आणखी थोडे पैसे जमवून उपयोगाच्या काही गोष्टी करता येतील. ही योजना त्याने आपल्या बाबांना सांगितली. गोरखनाथने त्याला गळ्याशी धरलं आणि म्हणाला, ‘‘आता तुला पैशाची किंमत कळली, माझ्या मनावरचं फार मोठं ओझं कमी झालं. मी निर्धास्त झालो. आता मी तीर्थयात्रा करून येतो. तू तुझा व्यवसाय सांभाळ.’’खरोखरच केदारने व्यवसाय चांगला सांभाळला, वाढविला आणि फुलविला. त्याची भरभराट पाहून गोरखनाथ कृतकृत्य झाला.

Monday, January 21, 2013

सोन्याचा शर्ट, सोन्याचा बूट आणि....

     आपल्या महाराष्ट्रातल्या पिंपरी-चिंचवडमधील दत्ता फुगे नावाच्या इसमाने सव्वा कोटी रुपयांचा साडेतीन किलो वजनांचा सोन्याचा शर्ट बनवून घेतला असल्याची बातमी अलिकडेच झळकली होती. सोन्याविषयीचे त्याचे प्रेम आपल्याला आश्चर्यात टाकत असले तरी हे काही एकमेव उदाहरण नाही. सोन्याविषयीचे माणसाचे प्रेम आजकालचे नाही, ते प्राचीन काळापासून चालत आलेले  आहे. विशेष म्हणजे हे वेड आणखी वाढतच चालले आहे. धर्मापासून ते विज्ञानापर्यंत सोन्याची महिमा गायिली जात आहे. हेही कमी की काय म्हणून फायनान्सियल ऍडवायझरदेखील सोन्यातील गुंतवणुकीला सर्वोत्तम गुंतवणूक असल्याचा सल्ला दिल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या रुपाने सोन्याचा भाव वाढतोच आहे आणि त्याचे महत्त्व अधोरेखित होतेच आहे. आजच्या बेभवरशाच्या आर्थिक व्यवहारात बँका, पतपेढ्या आदी संस्थांपेक्षा सोन्यातील गुंतणुकीलाच खात्रीशीर आणि योग्य असल्याचं स्वीकारलं जात आहे. फक्त दत्ता फुगेसारखी माणसे काहीसा अतिरेक करताना दिसतात.
     सोन्याचे महत्त्व आणि त्याचा उपयोग आपल्याला माहितच आहे. चकाकी असलेला आणि सहज आकार देण्याजोगा मऊ धातू असल्याने सोन्याचा दागिन्यांमध्ये वापर होतो. त्याच्यापासून सुंदर सुंदर दागिने बनवता येतात. जुन्या काली सोन्याची नाणी प्रचारात होती. तशी ती आजही आहेत, मात्र आता ती देव्हार्‍यात पुजन्यासाठी अथवा गुंतवणुकीसाठी वापरली जातात. वैद्यकशास्त्रातही त्याचा उपयोग औषधी धातू म्हणून केला जातो. कशिदाकाम, वर्करुपाने मिठाईत वापर होतो. अन्य विविध उद्योग-व्यवसायांमध्येदेखील सोन्याचा उपयोग केला जातो. पण वेळोवेळी काही लोकांना सोन्याची सणक अशी काही येते की, मग असं काही घडतं. काही तरी असामान्य वस्तूच्या निर्मितीत त्याचा वापर करण्याची लहर येते आणि मग  चकीत व्हायला होतं. प्राचीन काळात राजे-रजवाड्यांना आपल्या श्रीमम्तीचे प्रदर्शन करण्याची मोठी हौस आणि खुमखुमी होती. ते रोजच्या वापराच्या वस्तूदेखील सोन्याच्या बनवायचे आणि त्याचा रोजच्या व्यवहारात वापर करायचे. सोन्याच्या सिंहासनावर बसणे, सोन्याच्या ताटात भोजन करणे, सोन्याचा मुकुट परिधाण करणे किंवा आपल्या महाल्याच्या खिडक्यांमध्ये सोन्याचा उपयोग करणे आदी गोष्टी राजे-रजवाड्यांच्या काळात सामान्य होत्या. इजिप्तसारख्या देशांमध्ये महालसुद्धा सोन्यापासून बनविण्याचा प्रघात होता. आयुष्यभर सोन्याच्या वैभवात लोळणार्‍या राजांवर त्याच्या मृत्यूपश्चातदेखील अंत्यसंस्कार करताना सोन्याचा वापर केला जाई.
     काही शासनकर्ते सोन्यावर अधिक संशोधन व्हावे  व त्याचबरोबर नव-नवे प्रयोग करण्यासाथी म्हनून शास्त्रज्ञ आणि कलाकारांची नियुक्ती आपल्या दरबारात करत असत.या पिवळ्या रंगाच्या धातूत आढळणार्‍या प्रत्येक नव्या गुणाविषयी नव्या उपयोगाविषयीच्या दाव्यांप्रति शासनकर्त्यांना मोठी उत्सुकता असे. काही राजे तर आपल्याच कल्पनांचा खेळ मांडून सोन्यापासून हे बनव... ते बनव... असा आदेश आपल्या दरबारी असलेल्या कलाकारांना-संशोधकांना आदेश देत असत. आणि मग यंत्रणा कामाला लागायची. त्यातून 'घडलं-बिघडलं' व्हायचं. पण राजापुढं बोलायची  कुणाची बिशाद असायची.
     राजे-रजवाडे यांचा काळ सरला म्हणून सोन्यापासूनची सर्जनशीलता संपली, असे नाही. त्यावरचे प्रयोग आणि नवे-नवे उपयोग पुढेही होतच राहिले. आधुनिक काळातदेखील काही श्रीमंतांनी ही हौस जोपासली. भागवली. इतकंच नव्हे तर काहींनी या  बाबतीत राजे-रजवाडे यांनासुद्धा मागे टाकले. सोन्याच्या महालाचाच विचार केला तर आपल्या लक्षात ये ईल की, सध्याच्या युगातदेखील पॉपकिंग मायकल जॅक्सनसारखी सेलिब्रिटिज सोन्याच्या अवाढव्य सदनिकेत लोळत होती आणि आजही आहेत. काहींना तर नजराणा म्हणून त्यांच्या आप्तनातेवाईक, मित्र-मंडळींकडून दिला जातो.
     अलिकडेच एका डिझायनरने लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये २४ कॅरट सोन्यापासून बनवलेल्या बुटांचे प्रदर्शन भरवले होते.अर्थात सोन्याचा बूट घालून हिंडण्याची कुणाची हिंमत नसली तरी बनविणार्‍याने बनवून आणि पाहणार्‍यांनी पाहून आपली हौस भागवून घेतली. एका मोठ्या हॉटेलने २००५ मध्ये आपल्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाच्यानिमित्ताने एक खास 'स्वीट डिश' सादर केली होती. त्याचं नाव होतं 'गोल्डन ऑप्युलेंस संडे' जगभरातून मागवलेल्या किंमती भांड्यांमधून भोजन 'सर्व' करण्यात आले होते.  त्यात सोन्याची कँडी आणि  १८ कॅरट सोन्याचा चमचादेखील होता. त्याची किंमत होती, एक हजार डॉलर. हाँगकाँग म्हटलं की, पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच. तिथे कित्येक आकर्षणं आहेत. पण हँग फंग गोल्ड टेक्नॉलॉजीच्या शोरुममध्ये मात्र एक खास असं आकर्षण आहे. ते आहे, २४ कॅरट सोन्यानं बनवलेलं टोयलेट. इतकेच नव्हे तर टोयलेटमधील फरशा, भिंती, सिंक आणि टाईल्सपर्यंत सगळ्या वस्तू सोन्याच्या आहेत.
     हे सगळं जाणून घेतल्यावर  आपल्यापुढे प्रश्न पडतो तो असा कीशेवटी लोकांमध्ये एवढी सोन्याविषयी आसक्ती का? अशा विक्षिप्त वस्तू बनवून घेण्यात काय हशील आहे? याचा थोडा फार विचार केल्यावर माणसाला आपल्या श्रीमंतीचा बाजार मांडण्याची, त्याचे प्रदर्शन करण्याची मोठी हौस असते, हे प्रामुख्याने लक्षात येते. काही कलाकार, तंत्रज्ञ यांनाही कदाचित  मोठं आव्हानात्मक  काही करावंविशेष म्हणजे धातूंचा राजा असलेल्या सोन्यापासून काही तरी करून दाखवावं, असं वाटणं साहजिक आहे. सामान्य वस्तूदेखील सोन्याच्या बनवल्या की, त्या वस्तू विशिष्ट हो ऊन जातात आणि याच विशिष्टतेच्या अट्टाहासापायी काही सर्जनशील मंडळी सोन्याच्या दिशेने खेचली जातात.
                                                                                                             

Monday, January 7, 2013

पतंगाची किमया

     संक्रांत म्हटली की, आपल्याला गुजरातमधला अहमदाबाद,  आणि मुंबईतला पतंग उत्सव आठवतो. लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही पतंग उडविण्याचे मोठे आकर्षण आहे. साधारणतः दिवाळीनंतर सर्वत्र पतंग उडताना दिसतात. शनिवार-रविवारच्या सुट्टीत तर मुले धमाल करतात. ती दोर्‍यांचा रीळ आणि पतंग घेऊन गच्चीवर किंवा मैदानावर जाऊन  पतंग उडवण्याचा आनंद घेतात. कागद आणि बांबूच्या दोन पातळ कामट्यांपासून बनवला जाणारा  पतंग उडविणे  हा एक आकर्षक व मनोरंजक क्रीडाप्रकार आहे.
      मात्र मुलांनो, या पतंगाचा जन्म कधी झाला माहित आहे? अर्थात पतंगाच्या जन्माबाबत अजूनही वाद असला तरी पतंगाचा अविष्कार साधारणतः दीड हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये झाला. चीनमध्ये हान सिन शासनकाळात पतंग उडविले जात असल्याचा उल्लेख मिळतो. भारतातदेखील प्राचीन काळापासून पतंग उडविले जात आहेत.  पतंगाचा संस्कृत अर्थ आहे, हवेत उडणारी वस्तू. संस्कृतमध्ये पतंगासाठी 'बालगडी' असा शब्द आला आहे. तुलसीदास यांनीही पतंगाला बालगुडी म्हटले आहे. आपल्या देशात विशेषतः  मोगलांच्या काळात पतंगाचा छंद विशेष जोपासला गेला. उत्तर भारतात हा खेळ विशेषत्वाने खेळला जातो. गुजरातमध्ये पतंगाचा खेळ सर्वांत जास्त लोकप्रिय आहे. दिवाळीनंतर या खेळाचा हंगाम सुरू होतो आणि तो संक्रांतीनंतर संपतो. संक्रांतीचा दिवस फार महत्वाचा असतो. बरं का मुलांनो, आपल्या महाराष्ट्रातही पतंगाचा खेळ तुम्हां मुलांमध्ये विशेष प्रिय आहे.
     प्रसिद्ध अमेरिकी शास्त्रज्ञ मायकल फॅराडे यांनी जून १७५२ मध्ये पतंगाच्या सहाय्याने आकाशातल्या विजेचा शोध लावला. भारताशिवाय जपान, थायलंड, चीन, कोरिया, अमेरिका, पाकिस्तान, इंडोनेशियामध्येदेखील पतंग उडविण्याच्या स्पर्धा होत असतात. जगातला सर्वात मोठा पतंग १९३६ मध्ये जपानमधल्या नारुटो शहरात बनविला गेला. यासाठी तब्बल आठ टन कागद लागला होता. आणि हा अवाढव्य पतंग उडवायला सत्तरजणांची मदत घ्यावी लागली होती. नेदरलँड्मधल्या गिरटि बेंडरलू याने नायलॉनपासून पतंग बनविला होता. त्याचे वजन २३० किलोग्रॅम होते. हा पतंग ऑगस्ट १९७८ साली एकाच मांज्याच्यासहाय्याने २१२८ पतंगांसोबत उडविण्यात आला होता. १९८३ मध्ये १४ मीटर रुंद आणि १९ मीटर लांबीचा सर्वात मोठा पतंग उडविण्याचा विक्रम जपानच्या नावावर आहे.  ११८ मीटर उडालेला सर्वात लांब पतंग ५०० लोकांनी मिळून उडविला होता. सगळ्यात उंच म्हणजे ९ किलोमीटर ७४० मीटर उंचीपर्यंत  उडविण्याचे श्रेय जर्मनीच्या लिडनबर्गला जाते. त्याने १ ऑगस्ट १९१९ रोजी आठ पतंग एकाचवेळी उडविले होते. सगळ्यात उंचीवर असलेला पतंग ९७४० मीटरपर्यंत उडाला होता. मात्र फक्त एकच  पतंग ३ किलोमीटर ८०१ मीटरपर्यंत २८ फेब्रुवारी १८९८ रोजी अमेरिकेत उडविला गेला होता.सर्वात अधिक वेगाने अर्थात १९३ किलोमीटर प्रतितास या वेगाने पतंग उडविण्याचा विक्रम अमेरिकेतल्या पीट डोग्याकोमा याच्या नावावर आहे. त्याने २२ सप्टेंबर १९८९ रोजी ही कीर्तीमान कामगिरी केली. लागोपाठ १८० तास आणि १७ मिनिटे म्हणजे जवळजवळ सात दिवस आणि रात्री पतंग उडवून अमेरिकेतल्या वॉशिगंटनमध्ये १९८२ ला २१ ते २९ ऑगस्ट दरम्यान हा विक्रम बनविण्यात आला आहे.
     विमानांचा शोध लागेपर्यंत पूर्वी पतंगाचा सैनिकी व इतर उपयुक्त कामांसाठीही उपयोग करीत असत.  संदेश पाठवणे, हेरगिरी करणे यासाठीदेखील पतंगाचा वापर केला जात असल्याचे किस्से  आहेत. एका कोरियन सेनापतीने आपल्या सैनिकांना स्फूर्तिदायक इशारे देण्यासाठी दिवा जोडलेला  पतंग उडविला, अशी मानले जाते. शिवाय  हेस्टिंग्जच्या लढाईत इशारे देण्याकरिता पतंग उडविण्यात आले होते. बोअर युद्धात टेहळणीसाठी आणि माणसांना वाहून नेण्याकरिता पतंगांचा उपयोग करण्यात आला होता. समुद्रात वाहून चाललेल्या तसेच बर्फात अडकलेल्या व्यक्तींना उचलून घेण्यासाठी पतंगाचा उपयोग केला जात असे.
     आपल्या गुजरातेतील अहमदाबाद येथे २ फेब्रुवारी १९८६ साली एक पतंग संग्रहालयदेखील उभारण्यात आले आहे. येथे दरवर्षी 'पतंग मेळा' भरतो. इथे जगभरातल्या पतंगांची, सबंधित वस्तूंची खरेदी होते. पतंगावर अगणित कथा, कविता, गाणी लिहिली गेली आहेत.  चित्रपटातदेखील पतंगबाजी दाखवली जाते. अशा सर्वस्तरावर पतंगाचा वावर आहे. विशेष म्हणजे आजच्या कॉम्प्युटर युगातदेखील सानथोरांचे पतंगावरचे आकर्षण   कमी झालेले नाही.                                       

विकारी प्रवृत्तीच्या मुळाशी घाव घालायला हवा

     दिल्लीत चालत्या बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार आणि त्यानंतर झालेला तिचा मृत्यू यामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. दिल्लीतल्या व्हीआयपी समजल्या जाणार्‍या इलाक्यात तरुणीला  न्याय मिळावा, यासाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थींनी, महिला संघटना, समाजसेवी संस्था आदींचे प्रतिनिधी यांनी निदर्शने केली. आंदोलने केली.  अत्याचार करणार्‍या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी आणि पिडित तरुणीला मरणोत्तर तरी न्याय मिळावा, यासाठीही अद्याप धडपड सुरू आहे.  या स्वयंस्फूर्ति आंदोलनामुळे सरकार भयभयीत झाले नसल्यास नवल नाही. पण अंगावरच्या गेंड्याच्या कातडीला संवेदना थोड्या उशिराने पोहचतात, तसा काही तरी प्रकार दिसतो. मात्र या घटनेमुळे देशाची संपूर्ण जगात मोठी नाचक्की झाली आहे. अशा या घटनांचे किंवा गुन्ह्यांचे गंभीरपणाने कोणी आकलन केल्याचे दिसत नाही. अशा घटना घडण्यामागील कारणांचा शोध व त्याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला गेला नसल्याचे दिसत नाही. वास्तविक अशा गुन्ह्या- घटना घडायला खरे कारण आहे, ते म्हणजे एकमेव दारू. भारत एक विकसनशील देश आहे. आम्ही विकसित देशांबरोबर मार्गक्रमण करण्याच्यादृष्टीने वाटचाल करीत असलो तरी आपल्या विकासाचे स्वप्न कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे, याचा विचार करायला कुणाला सवडच नाही. दारू निर्मिती आणि विक्रीतून सरकारांना महसूल मिळत असतो. यातून राजकीय पक्षांना मिळणारा पार्टीफंड हादेखील वेगळाच मुद्दा मोठा फायद्याचा असला तरी तो तूर्त बाजूला ठेवला ठेवू. कारण हा मुद्दा पक्ष चालविण्याशी संबंधित आहे, सरकारशी नाही. दारूतून सरकारांना जवळपास १० ते १५ टक्के महसूल मिळत असतो. आता गंमतीचा भाग असा की, दारूबंदीसाठीदेखील एकिकडे सरकार नाना तर्‍हेच्या योजना राबवत आहे. त्यावर खर्चही मोठ्या प्रमाणात करत आहे. आणि दुसरीकडे महसुलासाठी प्रोत्साहनही देत आहे. दारू विक्री करणार्‍या दुकानांना, बार, शॉपी यांना धडाधड परवाने दिले जात आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात तर सध्याच्याला पाण्यापेक्षा दारूच अधिक प्रमाणात मिळत आहे.
     डॉक्टर, संशोधक-अभ्यासक सांगतात की, दारूच्या सेवनाने कोणाचीही  शुद्ध गमावून बसण्याची  महत्त्वाची भूमिका पार पाडली जाते. एका मर्यादेपर्यंत या दारूचे सेवन ठीक आहे.पण ज्या ज्या वेळेला दारू सेवनाची मर्यादा ओलांडली जाते, त्या त्या वेळेला दारू त्याला पशूवत व्यवहार करायला भाग पाडते. दिल्लीत ज्या तरुणीवर सामुहिक बलात्कार झालाती तरुणी दारूच्या नशेत धूत असलेल्या लांडग्याच्या तावडीत सापडली होती. दारूच्या नशेत त्यांनी तिच्यावर बलात्कार केलाच शिवाय बेदम मारहाण करून निर्दयीपणाने बसमधून बाहेर फेकूनही दिले. हे कृत्य म्हणजे पाशवीपणाचा कळस होय. याचाच अर्थ माणसातल्या या लांडग्यांनी नशेबाजीमुळे आपली शुद्ध आणि आपल्यातला विवेक गमावला होता.त्यांच्यातला हैवान जागा झाला होता. रस्त्यावर बेफामपणे गाड्या उडवणे, बेफामपणे गाडी चालवून फूटपाथवर झोपलेल्या लोकांना  बेदरकारपणे चिरडणे  यासारख्या घटना या अगोदरही नशेखोरीमुळेच घडल्या आहेत. खून, बलात्कारसारख्या गुन्हेगारी घटनांमागे दारूची नशाच असते. नशाखोरी केल्यावर क्षुल्लक कारणांवरूनही एखाद्याचा खून करणं, आता ही सर्वसामान्य गोष्ट झाली आहे.   वाहनांच्या अपघातांमागील बहुतांश कारणेदेखील चालकांची दारूबाजीच असल्याचे समोर आले आहे. महिलांवर होणार्‍या कौटुंबिक अत्याचारांचा अभ्यास केल्यास त्यामागेही प्रमुख कारण दारूच असल्याचे स्पष्ट होते. दुर्बल घटकातील क्वचित एखादी महिला असेल, जिला नवर्‍याने दारू पिऊन मारहाण, शिवीगाळ केली नसेल.दिवसभर मोलमजुरी करून त्याच पैशांतून रात्री घरी येताना दारू ढोसून आपल्या आर्थिक कमजोरीचा, अपयशाचा राग मारहाण अथवा शिवीगाळ करून बायकांवर काढण्याचा प्रकार आता सर्वसामान्य आणि बायकांच्या अंगवळणी पडला आहे. अशा प्रकरणांमध्ये महिला सहनशिलता धारण करून मुकाट्याने गप राहतात. 'रोज मरे त्याला कोण रडे' अशातलाच हाही एक प्रकार आहे, असे म्हणावे लागेल.
     कुठल्याही सरकारला आपला प्रदेश चालवायचा असेल तर पैसा हा लागतोच. राज्याची, प्रदेशाची आर्थिक तहान भागवण्यासाठी विविध प्रकाराने महसूल गोळा करावा लागतो. पण सरकारने हादेखील विचार करायला हवा की, माणसाच्या जीव  गमावण्या किंवा गुन्हा घडविण्याशिवाय महसूल गोळा करता येणे शक्य नाही काय? देशातल्या कुठल्याही प्रदेशात दहा ते पंधरा टक्के महसूल दारूतून मिळत असतो. मात्र सरकार केवळ दहा-पंधरा टक्के महसुलासाठी अप्रत्यक्षरित्या गुन्ह्यांना प्रोत्साहन देत नाही काय? हा प्रश्न प्रासंगिक आहे आणि याचे उत्तर कुठल्याही सरकारजवळ नाही. गुजरातने आपल्या प्रदेशात दारूवर बंदी घातली आहे. तरीही हे राज्य विकासाच्याबाबतीत अन्य राज्यांच्या तुलनेत पुढे आहे. ज्या राज्याचा महसूल दारूबंदीमुळे बुडाला, त्याची भरपाई म्हणून त्या राज्याने लहान-मोठ्या  उद्योजकांना आर्थिक सवलती देऊन आज औद्योगिक क्षेत्रात बरीच मोठी आघाडी घेतली आहे.  त्या राज्याचा आदर्श अन्य राज्यांनी का घेऊ नये?
     भारतासारख्या देशात जिथे पावला पावलांवर संस्कृती आणि सभ्येचे गुणगान गायिले जाते, त्या देशात दारूचा खप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रात काही महिन्यांपूर्वी एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला होता. त्यात एका अभ्यासानुसार सांगितलं गेलंय की, देशात दारूची विक्री ६७ कोटी लिटर आहे. ती आगामी २०१५ पर्यंत १९ अब्जांवर जाऊन पोहोचेल. दारूचा हा व्यापार सध्या ५० हजार ७०० कोटी रुपयांचा आहे. तो २०१५ मध्ये तब्बल १.४० लाख कोटीपर्यंत जाईल.
     अभ्यासात आणखी एक बाब समोर आली आहे ती म्हणजे, मध्यमवर्गियांच्या राहणीमानातील वाढलेला स्तर, आधुनिकतेची खोटी ऐट, सुदृढ आर्थिक स्थिती ही दारूच्या वाढत्या खपाची कारणे आहेत. भारत ही  दारूच्या क्षेत्रात  सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ असल्याचे अभ्यासाने अधोरेखित केले  आहे. दारूमध्ये व्हिस्की हा ब्रँड देशात सर्वाधिक खपाचा  आहे. संपूर्ण दारूच्या व्यापारात ८० टक्के वाटा हा व्हिस्कीचा आहे. सध्या भारतात व्हिस्कीचा व्यवसाय हा ४० हजार ५०० कोटीचा आहे, जो  आणखी दोन वर्षांनी जवळजवळ ५४ हजार कोटीपर्यंत जाईल, असा अम्दाज व्यक्त करण्यात आला आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, गेल्या दहा वर्षात देशातला दारूचा व्यवसाय शंभर टक्क्यांनी वाढला आहे. यामागे युवकांमध्ये वाढत चाललेली दारूबाजी, कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थींनीचा पब, बार अथवा डिस्को डान्स पार्टीमध्ये वाढलेला वावर, हेही कारण असल्याचे म्हटले जाते. पुण्यासारख्या सभ्य म्हणविणार्‍या शहरात याची प्रचिती आली, मग तिथे अन्य शहरांची काय तर्‍हा?
जागोजागी सहजपणे मिळणारी दारू, हीदेखील या वाढत्या खपाला आणि नशाखोरीला प्रोत्साहन देत आहे. वास्तविक, दारू मेंदू आणि शरीरातील स्नायू कमकुवत बनवते. दारू पिणार्‍या माणसाला नशेची जाणीव होते. मात्र नशेत धुंद होण्यासाठी पहिल्या प्रथम थोडी थोडी घेणारा नम्तर त्याची मात्रा वाढवतो. कारण वारंवारच्या पिण्याने त्याची नशा थोड्या थोडक्याने चढत नाही. नंतर नंतर तर भरपूर दारू पिल्याशिवाय त्याला नशा होतच नाही. त्यातला स्वर्गीय आनंद अनुभवायला येतच नाही. भरपूर मात्राने घेतलेली दारू मग आपले रंग दाखवायला सुरू करते. तेव्हा माणूस आपल्या मनावरचा, मेंदूवरचा ताबा गमावून बसतो. आतल्या दबलेल्या इच्छा, भावना उद्दीपित होतात. बाहेर येतात. आणि त्या पूर्ण करण्यासाठी मग तो काहीही करायला तयार होतो. आणि ही धडपड कुठला ना कुठला गुन्हा घडवायला प्रवृत्त करतो. कारणीभूत ठरतो. दिल्ली अथवा  देशभरात  कुठेही  बलात्कार पिडित तरुणीला   मरणोत्तर तरी न्याय मिळावा म्हणून आंदोलने केली जात आहेत, तिथे आंदोलनकर्त्यांनी दारूविरोधात वातावरण तयार करण्याचा मुद्दा उचलून धरला पाहिजे. कारण  झाडांच्या फांद्या किंवा पाने तोडल्याने त्यांचे जीवन संपुष्टात येत नाही. जर मुळावरच घाव घातला तरच या वाढत चाललेल्या संस्कृती विघातक प्रवृत्त्या कमी होत जातील. नष्ट होतील.                                                                                                      

Saturday, January 5, 2013

बालकथा राजाचा न्याय

     शिवसेन नावाचा एक न्यायप्रिय आणि प्रजादक्ष राजा होता. त्याने दिलेला न्याय कधीच चुकला नव्हता. शिवसेनचा न्याय म्हणजे देवाचा न्याय, असे तिथली जनता मानत होती.
     एके दिवशी दुपारी राजा शिवसेन आपल्या दरबारी मंडळींसोबत कसलीशी चर्चा करीत बसले होते. इतक्यात तिथे लांब आणि घनदाट मिशावाला एक माणूस आला. त्याच्याबरोबर आणखी एक व्यक्ती होती. मिशीवाला माणूस हात जोडून म्हणाला, "महाराज, मी नारायण. आणि हा भोलाशंकर'.' दुसर्‍या व्यक्तीकडे इशारा करत तो पुढे म्हणाला," हा गावाची हजामत करतो. मी काल याच्याकडे केस, दाढी करायला गेलो होतो.केस कापताना त्याला ताकीद दिली होती की, माझ्या मिशीला धक्का लागता कामा नये. पण तरीही याने माझ्या मिशीचे दोन केस कापले. मी त्याला पैसे देण्याचा नकार दिल्यावर त्याने तुमच्याकडे जाण्याची धमकी दिली. मग मीही म्हणालो, चल. राजा योग्य तोच न्याय देईल."
     राजाने भोलाशंकरला त्याच्या मिशीला हात लावलास का?,  विचारले. त्यावर तो हात जोडून केविलवाण्या स्वरात म्हणाला," महाराज, मी धक्कासुद्धा लावला नाही."
     राजा विचारात पडला. तो थोडा वेळ बाहेर गेला. आत आल्यावर म्हणाला," तुम्ही दोघेही खरे बोलता आहात, त्यामुळे न्याय-निवाडा करणं कठीण जातं आहे." मग नारायणकडे वळत म्हणाला," तुझ्या मिशीत किती केस होते, सांगू शकशील?'' नारायण चटकन म्हणाला," चार हजार!." यावर राजा म्हणाला," ठीक आहे. आता या निवाड्यासाठी मिशा उतरवाव्या लागतील. त्याशिवाय केस मोजता येणार नाहीत. आणि यात केस कमी आढळले तर भोलाशंकरला दंड ठोठावू पण  केस जास्त आढळले तर मात्र तुला दुप्पट दंड द्यावा लागेल."
     राजाच्या या अनपेक्षित निर्णयाने नारायण चपापला. पण स्वत: ला सावरत म्हणाला," म्हणजे माझ्यावर तुमचा विश्वास नाही. मी पुराव्यासाठी ते दोन केस ठेवले होते. पण माझ्या नोकराने कचर्‍यासोबत फेकून दिले."
     " याचाही विचार  करू, पण त्यासाठी केस मोजावेच लागतील. भोलाशंकर, याची मिशी उतरव."
     नारायण चिडला. " माझ्यावर राजाचा विश्वास नसेल तर हा मी चाललो." असे म्हणून रागारागाने तो  दरबारातून जाऊ लागला. शिपायांनी त्याला अडविले. आता काही आपली धडगत नाहीहे नारायणने ताडले. त्याने जाऊन राजाचे पाय धरले. विणवत म्हणाला, " नकानका माझी मिशी उतरवू. तुम्ही सांगाल ते करीन. पाहिजे तर दंडसुद्धा द्यायला तयार आहे."
     राजा म्हणाला," तुला खोटे बोलल्याची शिक्षा तर मिळेलच पण या गरीब, साध्या भोळ्या माणसालाही फसवण्याचा प्रयत्न केलास. त्याबद्दल तुला दुप्पट दंड द्यावा लागेल. जेणेकरून तुझ्यासारख्याची पुन्हा अशी हिंमत होणार नाही."
     शेवटी पाहिजे तो दंड भरण्याची हमी देऊन नारायणने आपली सुटका करून घेतली. भोलाशंकरने राजाचे आभार मानले.                                                                                             

बालकथा चोरी म्हणजे कला?

     राजा कृष्णदेवराय  महिन्यातून एकदा तुरुंगातले कामकाज पाहायला जात.  ते तुरुंगातल्या कैद्यांना मिळणार्‍या सोयी-सुविधांची जातीने  पाहणी करीत. कैद्यांना मिळणार्‍या वागणुकीत फरक जाणवला तर अधिकार्‍यांची खरडपट्टी काढत.
     एकदाची गोष्ट. राजा कृष्णदेवराय तुरुंगात पाहणी करीत फिरत होते. इतक्यात  दोन कैदी समोर आले आणि त्यांनी राजाचे पाय धरून शिक्षा माफीची याचना करू लागले. आपल्या कामाचे समर्थन करताना ते म्हणाले," चौर्यकर्म  वेदातल्या ६४ कलांपैकी एक आहे. पण आपण शिक्षामाफी करणार असाल तर आम्ही हे काम कायमचे सोडून देऊ आणि चरितार्थासाठी दुसरा कोणता तरी मार्ग शोधू."  
     हे ऐकून राजा विचारात पडला. तो चोरांना म्हणाला," ठीक आहे, मी एका अटीवर तुम्हाला मुक्त करीन."
     "सांगा महाराज सांगा, कोणती अट आहे ती?" दोघेही हात जोडून म्हणाले.
     " तुमच्या कलेचे प्रात्यक्षिक दाखवावं लागेल, यासाठी तुम्हाला तेनालीरामच्या घरी चोरी करावी  लागेल. चोरी करण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला तात्काळ मुक्त करेन."
     राजा पुढे म्हणाला," हां, पण लक्षात ठेवा, यात कोणालाही शारीरिक इजा होता कामा नये." त्या रात्री दोघा चोरांना तेनालीरामच्या घरी चोरी करण्याकरिता मुक्त करण्यात आले. तेनालीरामच्या घरासमोर  सुंदर बाग होती. दोघेही पहिल्यांदा बागेत उतरले. मग ते चोर पावलांनी भिंतीशी आले. त्यांनी इकडे-तिकडे पाहिले, तिथे कोणीही दिसले नाही. ते आत जाण्याचा मार्ग शोधू लागले.
     तेनालीराम जागाच होता. त्याने चोरांना पाहिलं होतं. त्याने आपल्या बायकोला आवाज दिला," अगं, ऐकलंस का, जरा इकडे ये. दोन चोर तुरुंगातून पळाले आहेत. शहरात सगळीकडे घबराहट पसरली आहे. आपल्यालादेखील सावध राहिले पाहिजे. तू असं कर, तुझे सगळे दागिने आणि रोकड इकडे घेऊन ये. आपण ते एखाद्या गाठोड्यात बांधून, कुठे तरी सुरक्षित ठिकाणी ठेवू."  त्याच्या पत्नीने घरातले होते, नव्हते ते दागिने आणले. तेनालीरामने ते सगळे एका गाठोड्यात बांधले. आणि गाठोडे घराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत टाकले.
      चोर सगळा प्रकार पाहात होते. ते चांगलेच हर्षले, कारण चोरीचा माल आयताच त्यांच्या हाती लागणार होता. थोड्यावेळाने तेनालीराम आणि त्याची बायको दोघेही घरात परत आले. चोर याचीच  वाट पाहात होते. ते झोपल्याची खात्री झाल्यावर दोघे चोर पावलाने विहिरीजवळ आले. त्यांनी विहिरीत डोकावले, दाट अंधार असल्याने त्यांना कशाचाही अंदाज येत नव्हता. पहिला चोर दुसर्‍याला म्हणाला," तू विहिरीत उतर आणि पाणी किती खोल आहे, याचा अंदाज घेऊन सांग."
     दुसरा चोर विहिरीत उतरला. तो बाहेर येऊन म्हणाला,'' बाब्या, विहिर खूप खोल आहे. पाणीही पुष्कळ आहे. दागिन्याचे गाठोडे बाहेर काढणं मोठं अवघड आहे. विहिरीतले बरेचसे पाणी उपसल्यावर गाठोडे आपल्या हाती लागू शकेल.'
     दोघांनी थोडा वेळ विचार केल्यावर त्यांनी  विहिरीतून पाणी काढण्याचा निर्णय घेतला. दोघे बादलीने पाणी उपसू लागले.  ओतलेले पाणी बागेत जाऊ लागले.  तेनालीराम खिडकीत लपून सारे काही पाहात होता. त्याने अंगावर एक शाल लपेटली आहे आणि हातात खुरपे घेऊन बाहेर आला. चोरांना न दिसेल अशा पद्धतीने सगळ्या झाडांना पाणी मिळेल, याची व्यवस्था करू लागला. दोघेही पाणी उपसण्याच्या नादात असल्याने त्यांना तेनालीराम दिसला नाही.
विहिरीतून चार-पाच तास पाणी उपसल्यानंतर चोर पार थकून गेले. नंतर त्यातला एक चोर विहिरीत उतरला. आतून ओरडला, " गाठोडे मोठे जड आहे. तूदेखील खाली ये." दुसराही खाली उतरला. दोघांनी मिळून मोठ्या कष्टाने ते गाठोडे वर काढले.
     आता दोघांचा आनंद गगनात मावेना. पहिला चोर दुसर्‍याला म्हणाला," लवकर गाठोडे खोल, पाहू तरी आत किती माल आहे तो."   आणि हे काय! दुसर्‍याने गाठोडे खोलताच त्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. त्यात त्यांना दागिन्यांऐवजी दगड दिसत होते. त्यांना मूर्च्छा यायची वेळ आली. दोघांना चकीत पाहून  तेनालीरामने त्यांना हाक दिली. "अरे बाबानों, दोघांनी आणखी थोडे पाणी उपसा. पाण्यावाचून फक्त दोन झाडेच  बाकी  आहेत. तेवढी माझ्यावर कृपा करा."   तेनालीरामचा आवाज ऐकून दोघेही घाबरले. पहिला दुसर्‍याला म्हणाला," चल पळ, नाही तर तेनालीराम आपल्याला पकडेल."
दोघांनीही  तेथून  पळ काढला. राजाजवळ जाऊन त्यांनी सगळी हकिगत सांगितली आणि चोरीला कधी कला म्हणणार नाही, अशी शपथ खाऊन दोघेही पुन्हा  तुरुंगात निघून गेले.                                                                

Wednesday, January 2, 2013

डिजिटल संपत्तीचे काय होणार?


हिंदुस्थानसारख्या काही देशांमध्ये डिजिटल संपत्तीच्या भविष्याबाबत गांभीर्य किंवा चिंता फारशी नाही. त्याला एक कारण म्हणजे अद्याप आपल्याकडे डिजिटल अज्ञान आहे. आजसुद्धा आपल्या देशातली काही कुटुंबे अशी आहेत की, त्या कुटुंबातला कुणी एखादीच व्यक्ती डिजिटल साक्षर आहे. म्हणजे कुटुंबातील उर्वरित लोक इंटरनेटच्या जगताशी अथवा कॉम्प्युटर साक्षरतेशी संबंधित नाहीत.
     जगभर इंटरनेटचा वापर वाढला आहे. आपल्याला उपयुक्त ठरणारी माहिती, तंत्रज्ञान, दस्तावेज माणूस या माहितीच्या मायाजाळात शोधत आहे आणि ती स्वत:साठी डिजिटल स्वरूपात एकत्रित करीत आहे. पूर्वी एखादा संशोधक किंवा अभ्यासक माहिती मिळविण्यासाठी भ्रमंती करायचा. दस्तावेज मिळवायचा. त्यांचा एकत्रित संचय करून त्यावर संशोधन करायचे. पूर्वीपासून भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांद्वारा इतिहासाचा वेध घेतला जात आहे. अजूनही त्यात फारसा फरक पडलेला नाही, पण आता अभ्यासकांना-संशोधकांना इंटरनेट ही एक नवीन सोय निर्माण झाली आहे आणि ती त्यांना फार सोयीचीही झाली आहे.
      काही अभ्यासक आपल्या भटकंतीतून मिळविलेली सामग्री डिजिटल स्वरूपात नेटवर टाकत आहेत किंवा आपल्या युजरनेम-पासवर्डच्या आधाराने त्याची फाईल बनवून ठेवत आहे. जी सामग्री प्रकाशित केली आहे, त्याचा उपयोग अन्य अभ्यासकांना होत आहे. ज्याला आपली सामग्री प्रकाशित करायची नाही, तोही डिजिटलचा वापर करू लागला आहे. अत्याधुनिक साधनांचा वापर वाढल्याने अभ्यासकही त्याचीच कास धरून चालू लागल्याने तो अशा स्वरूपाची माहिती एकत्रित संकलित करीत आहे. त्याला ते फार सोयीचे आणि सुरक्षिततेचे वाटू लागले आहे. परंतु थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, ही आपली डिजिटल सामग्री भविष्यात एक दस्तावेज म्हणून पुढच्या पिढीला उपयोगी पडणार आहे. नव्हे त्याचा सध्याच्या घडीला वापरही सुरू आहे. मात्र आज जी माणसे डिजिटल विश्‍वात वावरताहेत ती मंडळी आपल्या पश्‍चात आपण जमवलेल्या माहितीचे, दस्तावेजचे काय होणार, याचा कधी विचार करतात का, असा प्रश्‍न पडतो. प्रत्यक्षात बहुतांश लोक याबाबत अद्यापि गंभीर नसल्याचेच दिसते आहे. कारण त्यातले त्यांना गांभीर्यच कळले नाही, पण परदेशात मात्र यावर गंभीरपणे विचार केला जात असून त्याच्या भवितव्याचा निकाल लावला जात आहे. आपण आपल्याकडे मृत्युपत्रात ज्याप्रकारे घर, शेतीवाडी, बंगले अथवा अन्य प्रकारच्या इस्टेटीचा उल्लेख करतो, त्याप्रमाणे पासवर्ड-युजरनेम अथवा अन्य सामग्रीचाही उल्लेख मृत्युपत्रात होऊ लागला आहे.
     एक उदाहरण आहे. अमेरिकेतल्या वॉशिंग्टनमध्ये बरीच वर्षे काढल्यानंतर प्रदीप कुलकर्णी हा सॉफ्टवेअर इंजिनीअर हिंदुस्थानात परत आला. त्याचं आयुष्य म्हणजे इंटरनेटशिवाय जगू न शकणारं. कारण तिथे त्याची बहुतांश कामे इंटनरेटशी जुडलेली. बँकांचा सगळा कारभार तो इंटरनेटच्या माध्यमातून निपटायचा. त्याच्याजवळ ई-पुस्तकांचा मोठा खजिनाही आहे की, ज्याची किंमत हजारो डॉलरमध्ये आहे. त्याच्याजवळ ऑनलाइन चित्रपट पाहण्यासाठीची कित्येक वेबसाईटसची सदस्यता आहे. ‘फेसबुक’ या सोशल नेटवर्क साईटवर तो सतत व्यस्त असतो. शिवाय ‘ट्विटर’सारख्या मायक्रोब्लॉगिंड साईटवरही तो नियमितपणे ट्विट करीत असतो, पण दुर्दैवाने त्याला काही झालं तर त्याच्या या डिजिटल संपत्तीचे काय होणार? प्रदीप कुलकर्णीने सुद्धा या साशंकतेचा कधी गंभीरपणे विचार केला नव्हता; नव्हे, असा विचार त्याच्या डोक्यात कधी शिवला नव्हता, पण इंटरनेटरूपी कपाटात बंद असलेल्या आपल्या खजिन्याची एक दिवस त्याला ओळख झाली. मग त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. एक दिवस बोलता बोलता त्याच्या एका मित्राने असा प्रश्‍न उपस्थित केला. त्याला सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला. आता त्याने आपल्या बँका, सर्व सोशल नेटवर्किंग साईटस्, ई-मेल खाती आणि अशाच प्रकारच्या ऑनलाइन व्यवहारांना संचलित करणारी युजरनेम-पासवर्डची एक डिजिटल फाईल बनवली आहे. या फायलीचा ऍड्रेस त्याने आपल्या अगदी क्लोज असणार्‍या दोन माणसांना दिला आहे. डिजिटल ओळख हीच आपल्या वास्तविक ओळखीचा विस्तार असणार आहे याची त्याला कल्पना आली आणि आपल्या निधनानंतर या ‘आयडेंटी’चे काय करायचे, याचे विवरणही त्याने त्यात भरून ठेवले आहे.
     हिंदुस्थानात याबाबत अद्याप गंभीरपणे विचार सुरू नसला तरी विकसित देशांमध्ये मात्र याबाबत गंभीरता दिसून येत आहे. गेल्या वर्षी ब्रिटनच्या गोल्डस्मिथ युनिव्हर्सिटी ऑफ लंडनने याविषयीचा एक रोचक असा अहवाल प्रसिद्ध केला होता. या रिपोर्टनुसार १० पैकी एक ब्रिटिश नागरिक आपल्या मृत्युपत्रात आता फेसबुक आणि फ्लिकरसारख्या अनेक वेबसाईटस्च्या पासवर्डचा उल्लेख करतो आहे. कारण त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर संबंधीच्या आप्तगण किंवा त्याचे खास मित्र संचित डिजिटल सामग्रीचा वापर करू शकतील आणि या कंटेंटचा दुरुपयोगही होणार नाही. डिजिटल सामग्रीच्या मृत्यूनंतरच्या वापरासंबंधीची आवश्यकता अमेरिकेत आता कळू लागली आहे.
     मृत व्यक्तीच्या बँक किंवा सोशल नेटवर्किंग साईटचे पासवर्ड मिळवणे कठीण असले तरी शक्य नाही असे नाही. अद्यापि डिजिटल संपत्तीबाबत कायदेकानू ठोस प्रकारे बांधले गेले नाहीत. मृत्यूनंतर एखाद्याच्या सामग्रीबाबतचे पासवर्ड कायदेशीररीत्या मिळविण्यासाठीच्या कायद्यांचा अभाव दिसून येत आहे. मात्र हा प्रकार फार दिवस असाच राहणार नाही. सध्या इंटरनेटवर बनावट प्रोफाईलचा वावर वाढला आहे. बनावट प्रोफाईल बनवून ठकविण्याबरोबरच किंवा फिशिंगच्या दरम्यान मृत व्यक्तींचे प्रोफाईल गुन्हेगारांसाठी फायदाचे ठरू शकते. त्यामुळे या गोष्टीसाठी सुरक्षितता महत्त्वाची आहे.
     हिंदुस्थानसारख्या काही देशांमध्ये डिजिटल संपत्तीच्या भविष्याबाबत गांभीर्य किंवा चिंता फारशी नाही. त्याला एक कारण म्हणजे अद्याप आपल्याकडे डिजिटल अज्ञान आहे. आजसुद्धा आपल्या देशातली काही कुटुंबे अशी आहेत की, त्या कुटुंबातला कुणी एखादाच व्यक्ती डिजिटल साक्षर आहे. म्हणजे कुटुंबातील उर्वरित लोक इंटरनेटच्या जगताशी अथवा कॉम्प्युटर साक्षरतेशी संबंधित नाहीत. त्यामुळे त्याचा सरळ अर्थ असा की, घरातल्या त्या डिजिटल साक्षर व्यक्तीच्या आकस्मिक निधनाने कुटुंबातले इतर सदस्य त्याच्या डिजिटल संपत्तीविषयी जागरूक राहण्याचा आणि जाणून घेण्याचा प्रयत्नच करीत नाहीत.
मच्छिंद्र ऐनापुरे
saamana 2/1/2013