दिल्लीत चालत्या बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार आणि त्यानंतर झालेला तिचा मृत्यू यामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. दिल्लीतल्या व्हीआयपी समजल्या जाणार्या इलाक्यात तरुणीला न्याय मिळावा, यासाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थींनी, महिला संघटना, समाजसेवी संस्था आदींचे प्रतिनिधी यांनी निदर्शने केली. आंदोलने केली. अत्याचार करणार्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी आणि पिडित तरुणीला मरणोत्तर तरी न्याय मिळावा, यासाठीही अद्याप धडपड सुरू आहे. या स्वयंस्फूर्ति आंदोलनामुळे सरकार भयभयीत झाले नसल्यास नवल नाही. पण अंगावरच्या गेंड्याच्या कातडीला संवेदना थोड्या उशिराने पोहचतात, तसा काही तरी प्रकार दिसतो. मात्र या घटनेमुळे देशाची संपूर्ण जगात मोठी नाचक्की झाली आहे. अशा या घटनांचे किंवा गुन्ह्यांचे गंभीरपणाने कोणी आकलन केल्याचे दिसत नाही. अशा घटना घडण्यामागील कारणांचा शोध व त्याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला गेला नसल्याचे दिसत नाही. वास्तविक अशा गुन्ह्या- घटना घडायला खरे कारण आहे, ते म्हणजे एकमेव दारू. भारत एक विकसनशील देश आहे. आम्ही विकसित देशांबरोबर मार्गक्रमण करण्याच्यादृष्टीने वाटचाल करीत असलो तरी आपल्या विकासाचे स्वप्न कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे, याचा विचार करायला कुणाला सवडच नाही. दारू निर्मिती आणि विक्रीतून सरकारांना महसूल मिळत असतो. यातून राजकीय पक्षांना मिळणारा पार्टीफंड हादेखील वेगळाच मुद्दा मोठा फायद्याचा असला तरी तो तूर्त बाजूला ठेवला ठेवू. कारण हा मुद्दा पक्ष चालविण्याशी संबंधित आहे, सरकारशी नाही. दारूतून सरकारांना जवळपास १० ते १५ टक्के महसूल मिळत असतो. आता गंमतीचा भाग असा की, दारूबंदीसाठीदेखील एकिकडे सरकार नाना तर्हेच्या योजना राबवत आहे. त्यावर खर्चही मोठ्या प्रमाणात करत आहे. आणि दुसरीकडे महसुलासाठी प्रोत्साहनही देत आहे. दारू विक्री करणार्या दुकानांना, बार, शॉपी यांना धडाधड परवाने दिले जात आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यात तर सध्याच्याला पाण्यापेक्षा दारूच अधिक प्रमाणात मिळत आहे.
डॉक्टर, संशोधक-अभ्यासक सांगतात की, दारूच्या सेवनाने कोणाचीही शुद्ध गमावून बसण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली जाते. एका मर्यादेपर्यंत या दारूचे सेवन ठीक आहे.पण ज्या ज्या वेळेला दारू सेवनाची मर्यादा ओलांडली जाते, त्या त्या वेळेला दारू त्याला पशूवत व्यवहार करायला भाग पाडते. दिल्लीत ज्या तरुणीवर सामुहिक बलात्कार झाला, ती तरुणी दारूच्या नशेत धूत असलेल्या लांडग्याच्या तावडीत सापडली होती. दारूच्या नशेत त्यांनी तिच्यावर बलात्कार केलाच शिवाय बेदम मारहाण करून निर्दयीपणाने बसमधून बाहेर फेकूनही दिले. हे कृत्य म्हणजे पाशवीपणाचा कळस होय. याचाच अर्थ माणसातल्या या लांडग्यांनी नशेबाजीमुळे आपली शुद्ध आणि आपल्यातला विवेक गमावला होता.त्यांच्यातला हैवान जागा झाला होता. रस्त्यावर बेफामपणे गाड्या उडवणे, बेफामपणे गाडी चालवून फूटपाथवर झोपलेल्या लोकांना बेदरकारपणे चिरडणे यासारख्या घटना या अगोदरही नशेखोरीमुळेच घडल्या आहेत. खून, बलात्कारसारख्या गुन्हेगारी घटनांमागे दारूची नशाच असते. नशाखोरी केल्यावर क्षुल्लक कारणांवरूनही एखाद्याचा खून करणं, आता ही सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. वाहनांच्या अपघातांमागील बहुतांश कारणेदेखील चालकांची दारूबाजीच असल्याचे समोर आले आहे. महिलांवर होणार्या कौटुंबिक अत्याचारांचा अभ्यास केल्यास त्यामागेही प्रमुख कारण दारूच असल्याचे स्पष्ट होते. दुर्बल घटकातील क्वचित एखादी महिला असेल, जिला नवर्याने दारू पिऊन मारहाण, शिवीगाळ केली नसेल.दिवसभर मोलमजुरी करून त्याच पैशांतून रात्री घरी येताना दारू ढोसून आपल्या आर्थिक कमजोरीचा, अपयशाचा राग मारहाण अथवा शिवीगाळ करून बायकांवर काढण्याचा प्रकार आता सर्वसामान्य आणि बायकांच्या अंगवळणी पडला आहे. अशा प्रकरणांमध्ये महिला सहनशिलता धारण करून मुकाट्याने गप राहतात. 'रोज मरे त्याला कोण रडे' अशातलाच हाही एक प्रकार आहे, असे म्हणावे लागेल.
कुठल्याही सरकारला आपला प्रदेश चालवायचा असेल तर पैसा हा लागतोच. राज्याची, प्रदेशाची आर्थिक तहान भागवण्यासाठी विविध प्रकाराने महसूल गोळा करावा लागतो. पण सरकारने हादेखील विचार करायला हवा की, माणसाच्या जीव गमावण्या किंवा गुन्हा घडविण्याशिवाय महसूल गोळा करता येणे शक्य नाही काय? देशातल्या कुठल्याही प्रदेशात दहा ते पंधरा टक्के महसूल दारूतून मिळत असतो. मात्र सरकार केवळ दहा-पंधरा टक्के महसुलासाठी अप्रत्यक्षरित्या गुन्ह्यांना प्रोत्साहन देत नाही काय? हा प्रश्न प्रासंगिक आहे आणि याचे उत्तर कुठल्याही सरकारजवळ नाही. गुजरातने आपल्या प्रदेशात दारूवर बंदी घातली आहे. तरीही हे राज्य विकासाच्याबाबतीत अन्य राज्यांच्या तुलनेत पुढे आहे. ज्या राज्याचा महसूल दारूबंदीमुळे बुडाला, त्याची भरपाई म्हणून त्या राज्याने लहान-मोठ्या उद्योजकांना आर्थिक सवलती देऊन आज औद्योगिक क्षेत्रात बरीच मोठी आघाडी घेतली आहे. त्या राज्याचा आदर्श अन्य राज्यांनी का घेऊ नये?
भारतासारख्या देशात जिथे पावला पावलांवर संस्कृती आणि सभ्येचे गुणगान गायिले जाते, त्या देशात दारूचा खप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रात काही महिन्यांपूर्वी एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला होता. त्यात एका अभ्यासानुसार सांगितलं गेलंय की, देशात दारूची विक्री ६७ कोटी लिटर आहे. ती आगामी २०१५ पर्यंत १९ अब्जांवर जाऊन पोहोचेल. दारूचा हा व्यापार सध्या ५० हजार ७०० कोटी रुपयांचा आहे. तो २०१५ मध्ये तब्बल १.४० लाख कोटीपर्यंत जाईल.
अभ्यासात आणखी एक बाब समोर आली आहे ती म्हणजे, मध्यमवर्गियांच्या राहणीमानातील वाढलेला स्तर, आधुनिकतेची खोटी ऐट, सुदृढ आर्थिक स्थिती ही दारूच्या वाढत्या खपाची कारणे आहेत. भारत ही दारूच्या क्षेत्रात सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ असल्याचे अभ्यासाने अधोरेखित केले आहे. दारूमध्ये व्हिस्की हा ब्रँड देशात सर्वाधिक खपाचा आहे. संपूर्ण दारूच्या व्यापारात ८० टक्के वाटा हा व्हिस्कीचा आहे. सध्या भारतात व्हिस्कीचा व्यवसाय हा ४० हजार ५०० कोटीचा आहे, जो आणखी दोन वर्षांनी जवळजवळ ५४ हजार कोटीपर्यंत जाईल, असा अम्दाज व्यक्त करण्यात आला आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, गेल्या दहा वर्षात देशातला दारूचा व्यवसाय शंभर टक्क्यांनी वाढला आहे. यामागे युवकांमध्ये वाढत चाललेली दारूबाजी, कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थींनीचा पब, बार अथवा डिस्को डान्स पार्टीमध्ये वाढलेला वावर, हेही कारण असल्याचे म्हटले जाते. पुण्यासारख्या सभ्य म्हणविणार्या शहरात याची प्रचिती आली, मग तिथे अन्य शहरांची काय तर्हा?
जागोजागी सहजपणे मिळणारी दारू, हीदेखील या वाढत्या खपाला आणि नशाखोरीला प्रोत्साहन देत आहे. वास्तविक, दारू मेंदू आणि शरीरातील स्नायू कमकुवत बनवते. दारू पिणार्या माणसाला नशेची जाणीव होते. मात्र नशेत धुंद होण्यासाठी पहिल्या प्रथम थोडी थोडी घेणारा नम्तर त्याची मात्रा वाढवतो. कारण वारंवारच्या पिण्याने त्याची नशा थोड्या थोडक्याने चढत नाही. नंतर नंतर तर भरपूर दारू पिल्याशिवाय त्याला नशा होतच नाही. त्यातला स्वर्गीय आनंद अनुभवायला येतच नाही. भरपूर मात्राने घेतलेली दारू मग आपले रंग दाखवायला सुरू करते. तेव्हा माणूस आपल्या मनावरचा, मेंदूवरचा ताबा गमावून बसतो. आतल्या दबलेल्या इच्छा, भावना उद्दीपित होतात. बाहेर येतात. आणि त्या पूर्ण करण्यासाठी मग तो काहीही करायला तयार होतो. आणि ही धडपड कुठला ना कुठला गुन्हा घडवायला प्रवृत्त करतो. कारणीभूत ठरतो. दिल्ली अथवा देशभरात कुठेही बलात्कार पिडित तरुणीला मरणोत्तर तरी न्याय मिळावा म्हणून आंदोलने केली जात आहेत, तिथे आंदोलनकर्त्यांनी दारूविरोधात वातावरण तयार करण्याचा मुद्दा उचलून धरला पाहिजे. कारण झाडांच्या फांद्या किंवा पाने तोडल्याने त्यांचे जीवन संपुष्टात येत नाही. जर मुळावरच घाव घातला तरच या वाढत चाललेल्या संस्कृती विघातक प्रवृत्त्या कमी होत जातील. नष्ट होतील.
No comments:
Post a Comment