आपल्या महाराष्ट्रातल्या पिंपरी-चिंचवडमधील दत्ता फुगे नावाच्या इसमाने सव्वा कोटी रुपयांचा साडेतीन किलो वजनांचा सोन्याचा शर्ट बनवून घेतला असल्याची बातमी अलिकडेच झळकली होती. सोन्याविषयीचे त्याचे प्रेम आपल्याला आश्चर्यात टाकत असले तरी हे काही एकमेव उदाहरण नाही. सोन्याविषयीचे माणसाचे प्रेम आजकालचे नाही, ते प्राचीन काळापासून चालत आलेले आहे. विशेष म्हणजे हे वेड आणखी वाढतच चालले आहे. धर्मापासून ते विज्ञानापर्यंत सोन्याची महिमा गायिली जात आहे. हेही कमी की काय म्हणून फायनान्सियल ऍडवायझरदेखील सोन्यातील गुंतवणुकीला सर्वोत्तम गुंतवणूक असल्याचा सल्ला दिल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या रुपाने सोन्याचा भाव वाढतोच आहे आणि त्याचे महत्त्व अधोरेखित होतेच आहे. आजच्या बेभवरशाच्या आर्थिक व्यवहारात बँका, पतपेढ्या आदी संस्थांपेक्षा सोन्यातील गुंतणुकीलाच खात्रीशीर आणि योग्य असल्याचं स्वीकारलं जात आहे. फक्त दत्ता फुगेसारखी माणसे काहीसा अतिरेक करताना दिसतात.
सोन्याचे महत्त्व आणि त्याचा उपयोग आपल्याला माहितच आहे. चकाकी असलेला आणि सहज आकार देण्याजोगा मऊ धातू असल्याने सोन्याचा दागिन्यांमध्ये वापर होतो. त्याच्यापासून सुंदर सुंदर दागिने बनवता येतात. जुन्या काली सोन्याची नाणी प्रचारात होती. तशी ती आजही आहेत, मात्र आता ती देव्हार्यात पुजन्यासाठी अथवा गुंतवणुकीसाठी वापरली जातात. वैद्यकशास्त्रातही त्याचा उपयोग औषधी धातू म्हणून केला जातो. कशिदाकाम, वर्करुपाने मिठाईत वापर होतो. अन्य विविध उद्योग-व्यवसायांमध्येदेखील सोन्याचा उपयोग केला जातो. पण वेळोवेळी काही लोकांना सोन्याची सणक अशी काही येते की, मग असं काही घडतं. काही तरी असामान्य वस्तूच्या निर्मितीत त्याचा वापर करण्याची लहर येते आणि मग चकीत व्हायला होतं. प्राचीन काळात राजे-रजवाड्यांना आपल्या श्रीमम्तीचे प्रदर्शन करण्याची मोठी हौस आणि खुमखुमी होती. ते रोजच्या वापराच्या वस्तूदेखील सोन्याच्या बनवायचे आणि त्याचा रोजच्या व्यवहारात वापर करायचे. सोन्याच्या सिंहासनावर बसणे, सोन्याच्या ताटात भोजन करणे, सोन्याचा मुकुट परिधाण करणे किंवा आपल्या महाल्याच्या खिडक्यांमध्ये सोन्याचा उपयोग करणे आदी गोष्टी राजे-रजवाड्यांच्या काळात सामान्य होत्या. इजिप्तसारख्या देशांमध्ये महालसुद्धा सोन्यापासून बनविण्याचा प्रघात होता. आयुष्यभर सोन्याच्या वैभवात लोळणार्या राजांवर त्याच्या मृत्यूपश्चातदेखील अंत्यसंस्कार करताना सोन्याचा वापर केला जाई.
काही शासनकर्ते सोन्यावर अधिक संशोधन व्हावे व त्याचबरोबर नव-नवे प्रयोग करण्यासाथी म्हनून शास्त्रज्ञ आणि कलाकारांची नियुक्ती आपल्या दरबारात करत असत.या पिवळ्या रंगाच्या धातूत आढळणार्या प्रत्येक नव्या गुणाविषयी नव्या उपयोगाविषयीच्या दाव्यांप्रति शासनकर्त्यांना मोठी उत्सुकता असे. काही राजे तर आपल्याच कल्पनांचा खेळ मांडून सोन्यापासून हे बनव... ते बनव... असा आदेश आपल्या दरबारी असलेल्या कलाकारांना-संशोधकांना आदेश देत असत. आणि मग यंत्रणा कामाला लागायची. त्यातून 'घडलं-बिघडलं' व्हायचं. पण राजापुढं बोलायची कुणाची बिशाद असायची.
राजे-रजवाडे यांचा काळ सरला म्हणून सोन्यापासूनची सर्जनशीलता संपली, असे नाही. त्यावरचे प्रयोग आणि नवे-नवे उपयोग पुढेही होतच राहिले. आधुनिक काळातदेखील काही श्रीमंतांनी ही हौस जोपासली. भागवली. इतकंच नव्हे तर काहींनी या बाबतीत राजे-रजवाडे यांनासुद्धा मागे टाकले. सोन्याच्या महालाचाच विचार केला तर आपल्या लक्षात ये ईल की, सध्याच्या युगातदेखील पॉपकिंग मायकल जॅक्सनसारखी सेलिब्रिटिज सोन्याच्या अवाढव्य सदनिकेत लोळत होती आणि आजही आहेत. काहींना तर नजराणा म्हणून त्यांच्या आप्तनातेवाईक, मित्र-मंडळींकडून दिला जातो.
अलिकडेच एका डिझायनरने लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये २४ कॅरट सोन्यापासून बनवलेल्या बुटांचे प्रदर्शन भरवले होते.अर्थात सोन्याचा बूट घालून हिंडण्याची कुणाची हिंमत नसली तरी बनविणार्याने बनवून आणि पाहणार्यांनी पाहून आपली हौस भागवून घेतली. एका मोठ्या हॉटेलने २००५ मध्ये आपल्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाच्यानिमित्ताने एक खास 'स्वीट डिश' सादर केली होती. त्याचं नाव होतं 'गोल्डन ऑप्युलेंस संडे' जगभरातून मागवलेल्या किंमती भांड्यांमधून भोजन 'सर्व' करण्यात आले होते. त्यात सोन्याची कँडी आणि १८ कॅरट सोन्याचा चमचादेखील होता. त्याची किंमत होती, एक हजार डॉलर. हाँगकाँग म्हटलं की, पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच. तिथे कित्येक आकर्षणं आहेत. पण हँग फंग गोल्ड टेक्नॉलॉजीच्या शोरुममध्ये मात्र एक खास असं आकर्षण आहे. ते आहे, २४ कॅरट सोन्यानं बनवलेलं टोयलेट. इतकेच नव्हे तर टोयलेटमधील फरशा, भिंती, सिंक आणि टाईल्सपर्यंत सगळ्या वस्तू सोन्याच्या आहेत.
हे सगळं जाणून घेतल्यावर आपल्यापुढे प्रश्न पडतो तो असा की, शेवटी लोकांमध्ये एवढी सोन्याविषयी आसक्ती का? अशा विक्षिप्त वस्तू बनवून घेण्यात काय हशील आहे? याचा थोडा फार विचार केल्यावर माणसाला आपल्या श्रीमंतीचा बाजार मांडण्याची, त्याचे प्रदर्शन करण्याची मोठी हौस असते, हे प्रामुख्याने लक्षात येते. काही कलाकार, तंत्रज्ञ यांनाही कदाचित मोठं आव्हानात्मक काही करावं, विशेष म्हणजे धातूंचा राजा असलेल्या सोन्यापासून काही तरी करून दाखवावं, असं वाटणं साहजिक आहे. सामान्य वस्तूदेखील सोन्याच्या बनवल्या की, त्या वस्तू विशिष्ट हो ऊन जातात आणि याच विशिष्टतेच्या अट्टाहासापायी काही सर्जनशील मंडळी सोन्याच्या दिशेने खेचली जातात.
No comments:
Post a Comment