Thursday, January 24, 2013

कष्टाचं मोल

     गोष्ट फार जुनी आहे. अमृतपूर नावाच्या छोटयाशा गावात गोरखनाथ नावाचा एक शेतकरी राहात होता. त्याला केदार नावाचा मुलगा होता. त्याच्यात एक अवगुण होता. तो नेहमी वायफळ पैसे खर्च करायचा. त्याच्या हातात पैसे राहतच नसत. वडिलांकडून पैसे मागून उधळण्यातच त्याचा दिवस जात असे. साहजिकच, वडिलांना त्याच्या खर्चिकपणाची मोठी चिंता वाटत होती. हा असाच पैसे उधळत राहिला तर याला पैशाची किंमत कळणार नाही आणि हा भविष्यात दरिद्री बनून जाईल, असा ते मनोमन विचार करत असत.
     एक दिवस गोरखनाथानं आपल्या मुलाला जवळ बोलावलं आणि समजावलं, ‘‘बाबा रे, मी एका गरीब घरात जन्माला आलो. माझे बाबा शेळ्या चरवत. दूध, बक-यांची विक्री यातून चार पैसे मिळवत. त्यात कशी-बशी घराची गुजराण होई. मला फार शाळा शिकता आली नाही. मी वडिलांना कामात मदत करू लागलो. वडिलांनी मग अधिक शेळ्या घेतल्या. थोडा फार पैसा येऊ लागला. ते पैसे खर्च न करता साठवून ठेवू लागलो.
     वडिलांच्या मृत्यूनंतर मी त्या पैशांतून थोडी जमीन घेतली. त्यात भाजीपाला पिकवून विकू लागलो. पैसे वाचवून पुढे त्यातून एक छोटंस घर खरेदी केलं. मी तुझ्यासारखे पैसे उधळत राहिलो असतो तर आज मी गरीबच राहिलो असतो. मला असं वाटतं, पैसे उधळण्याबाबतीत तू थोडातरी विचार करावास.’’केदारवर याचा काडीमात्र परिणाम झाला नाही. तो पैसे उधळत राहिला. एकदा गोरखनाथ विचार करीत बसला असताना त्याच्या मित्रानं, मंजूनाथनं त्याला कारण विचारलं.
     गोरखनाथने कारण सांगितलं. मंजूनाथने एक योजना सांगितली. ती गोरखनाथला विलक्षण आवडली. त्याने एक दिवस केदारला बोलावून सांगितलं, ‘‘मी बाजारात भाजीपाला विकायला जातो आहे. आता रोज मी भाजीपाला विकून आलो की, तुला दहा रुपये देत जाईन. त्यातले पाच रुपये तू खर्च करायचे आणि पाच रुपये आपल्या शेतातल्या झाडीतल्या विहिरीत फेकून द्यायचे.’’
केदारला तेवढेच पाहिजे होते.
     रोज दोन रुपयाच्या जागी पाच रुपये मिळणार असतील तर कोणाला नको आहे? तो वडील सांगतील तसंच करू लागला. एक दिवस ठरल्यानुसार, गोरखनाथने आजारी पडल्याचा बहाणा केला. केदारला जवळ बोलावून म्हणाला, ‘‘बाबा रे, माझ्या अंगात ताप भरला आहे. अशक्तपणाही आला आहे. उद्यापासून काही दिवस तुलाच बाजारात जावं लागेल. शेतातलीही कामं करावी लागतील. नाही तर, मग मी तुला पैसे कोठून आणून देणार?’’
     दुस-या दिवशी केदार शेतावर गेला. भाजी तोडली. त्याच्या पेंडया बांधल्या. हे करताना त्याला खूप कष्ट पडले. तो भाज्यांचे गाठोडे बांधून बाजारात गेला. संध्याकाळी तो फार थकून घरी आला. एवढं करूनही त्याने फक्त दहा रुपयेच कमावले होते. बाजारातून त्याने अगोदरच पाच रुपये खर्च केले होते. उरलेले पाच रुपये विहिरीत टाकायला गेला. चालता चालता विचार करू लागला, एवढे कष्ट करून मिळवलेले पैसे विहिरीत कसे टाकायचे? तरीही मन मारून त्यानं पाच रुपये विहिरीत टाकले.
     पुढच्या दिवशीही असंच घडलं. पण विहिरीत पैसे फेकायला त्याचं मन तयार होईना. तो बराच वेळ विचार करत उभा राहिला. आणि शेवटी मनाची तयारी करून पाच रुपये विहिरीत फेकून माघारी परतला. तिस-या दिवशी मात्र विहिरीत पैसे फेकण्याचं त्याचं धाडस झालं नाही. विहिरीत पैसे न फेकताच तो माघारी फिरला. वडिलांना म्हणाला, ‘‘बाबा, एवढे मोठे कष्ट उपसून पैसे कमवायचे आणि ते विहिरीत फेकायचे? जर हेच पैसे साठवले तर भविष्यात आपल्या कामाला येतील.’’
गोरखनाथ म्हणाला, ‘‘केदार बाळा, मी रोज तुला दहा रुपये देत होतो, त्यावेळेला तू असा का विचार केला नाहीस?’’
     ‘‘बाबा, माझी चूक झाली. त्यावेळेला मला कष्टाचं मोल माहीत नव्हतं. पण आता मी ते समजून चुकलो आहे. यापुढे माझ्याकडून असा प्रकार होणार नाही.’’ गोरखनाथ हसला. म्हणाला, ‘‘बाळ जा, ती विहीर कोरडी आहे. त्यात फेकलेले पैसे काढून घेऊन ये. आता तुला पैशाचं मोल कळलं ना, हेच मला हवं होतं.’’ केदारला आनंद झाला. तो धावतच विहिरीकडे गेला. विहिरीत उतरल्यावर पैशांचा ढिग पाहून चकीत झाला. ते सगळे पैसे गोळा करून घरी परतू लागला.
     वाटेत विचार करू लागला, आपण उगाचच पैसे खर्च करत होतो. ते पैसे साठवले असते, तर सायकल घेण्याइतपत पैसे जमले असते. अजूनदेखील वेळ गेली नाही. हे पैसे आणि आणखी थोडे पैसे जमवून उपयोगाच्या काही गोष्टी करता येतील. ही योजना त्याने आपल्या बाबांना सांगितली. गोरखनाथने त्याला गळ्याशी धरलं आणि म्हणाला, ‘‘आता तुला पैशाची किंमत कळली, माझ्या मनावरचं फार मोठं ओझं कमी झालं. मी निर्धास्त झालो. आता मी तीर्थयात्रा करून येतो. तू तुझा व्यवसाय सांभाळ.’’खरोखरच केदारने व्यवसाय चांगला सांभाळला, वाढविला आणि फुलविला. त्याची भरभराट पाहून गोरखनाथ कृतकृत्य झाला.

No comments:

Post a Comment