संक्रांत म्हटली की, आपल्याला गुजरातमधला अहमदाबाद, आणि मुंबईतला पतंग उत्सव आठवतो. लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही पतंग उडविण्याचे मोठे आकर्षण आहे. साधारणतः दिवाळीनंतर सर्वत्र पतंग उडताना दिसतात. शनिवार-रविवारच्या सुट्टीत तर मुले धमाल करतात. ती दोर्यांचा रीळ आणि पतंग घेऊन गच्चीवर किंवा मैदानावर जाऊन पतंग उडवण्याचा आनंद घेतात. कागद आणि बांबूच्या दोन पातळ कामट्यांपासून बनवला जाणारा पतंग उडविणे हा एक आकर्षक व मनोरंजक क्रीडाप्रकार आहे.
मात्र मुलांनो, या पतंगाचा जन्म कधी झाला माहित आहे? अर्थात पतंगाच्या जन्माबाबत अजूनही वाद असला तरी पतंगाचा अविष्कार साधारणतः दीड हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये झाला. चीनमध्ये हान सिन शासनकाळात पतंग उडविले जात असल्याचा उल्लेख मिळतो. भारतातदेखील प्राचीन काळापासून पतंग उडविले जात आहेत. पतंगाचा संस्कृत अर्थ आहे, हवेत उडणारी वस्तू. संस्कृतमध्ये पतंगासाठी 'बालगडी' असा शब्द आला आहे. तुलसीदास यांनीही पतंगाला बालगुडी म्हटले आहे. आपल्या देशात विशेषतः मोगलांच्या काळात पतंगाचा छंद विशेष जोपासला गेला. उत्तर भारतात हा खेळ विशेषत्वाने खेळला जातो. गुजरातमध्ये पतंगाचा खेळ सर्वांत जास्त लोकप्रिय आहे. दिवाळीनंतर या खेळाचा हंगाम सुरू होतो आणि तो संक्रांतीनंतर संपतो. संक्रांतीचा दिवस फार महत्वाचा असतो. बरं का मुलांनो, आपल्या महाराष्ट्रातही पतंगाचा खेळ तुम्हां मुलांमध्ये विशेष प्रिय आहे.
प्रसिद्ध अमेरिकी शास्त्रज्ञ मायकल फॅराडे यांनी जून १७५२ मध्ये पतंगाच्या सहाय्याने आकाशातल्या विजेचा शोध लावला. भारताशिवाय जपान, थायलंड, चीन, कोरिया, अमेरिका, पाकिस्तान, इंडोनेशियामध्येदेखील पतंग उडविण्याच्या स्पर्धा होत असतात. जगातला सर्वात मोठा पतंग १९३६ मध्ये जपानमधल्या नारुटो शहरात बनविला गेला. यासाठी तब्बल आठ टन कागद लागला होता. आणि हा अवाढव्य पतंग उडवायला सत्तरजणांची मदत घ्यावी लागली होती. नेदरलँड्मधल्या गिरटि बेंडरलू याने नायलॉनपासून पतंग बनविला होता. त्याचे वजन २३० किलोग्रॅम होते. हा पतंग ऑगस्ट १९७८ साली एकाच मांज्याच्यासहाय्याने २१२८ पतंगांसोबत उडविण्यात आला होता. १९८३ मध्ये १४ मीटर रुंद आणि १९ मीटर लांबीचा सर्वात मोठा पतंग उडविण्याचा विक्रम जपानच्या नावावर आहे. ११८ मीटर उडालेला सर्वात लांब पतंग ५०० लोकांनी मिळून उडविला होता. सगळ्यात उंच म्हणजे ९ किलोमीटर ७४० मीटर उंचीपर्यंत उडविण्याचे श्रेय जर्मनीच्या लिडनबर्गला जाते. त्याने १ ऑगस्ट १९१९ रोजी आठ पतंग एकाचवेळी उडविले होते. सगळ्यात उंचीवर असलेला पतंग ९७४० मीटरपर्यंत उडाला होता. मात्र फक्त एकच पतंग ३ किलोमीटर ८०१ मीटरपर्यंत २८ फेब्रुवारी १८९८ रोजी अमेरिकेत उडविला गेला होता.सर्वात अधिक वेगाने अर्थात १९३ किलोमीटर प्रतितास या वेगाने पतंग उडविण्याचा विक्रम अमेरिकेतल्या पीट डोग्याकोमा याच्या नावावर आहे. त्याने २२ सप्टेंबर १९८९ रोजी ही कीर्तीमान कामगिरी केली. लागोपाठ १८० तास आणि १७ मिनिटे म्हणजे जवळजवळ सात दिवस आणि रात्री पतंग उडवून अमेरिकेतल्या वॉशिगंटनमध्ये १९८२ ला २१ ते २९ ऑगस्ट दरम्यान हा विक्रम बनविण्यात आला आहे.
विमानांचा शोध लागेपर्यंत पूर्वी पतंगाचा सैनिकी व इतर उपयुक्त कामांसाठीही उपयोग करीत असत. संदेश पाठवणे, हेरगिरी करणे यासाठीदेखील पतंगाचा वापर केला जात असल्याचे किस्से आहेत. एका कोरियन सेनापतीने आपल्या सैनिकांना स्फूर्तिदायक इशारे देण्यासाठी दिवा जोडलेला पतंग उडविला, अशी मानले जाते. शिवाय हेस्टिंग्जच्या लढाईत इशारे देण्याकरिता पतंग उडविण्यात आले होते. बोअर युद्धात टेहळणीसाठी आणि माणसांना वाहून नेण्याकरिता पतंगांचा उपयोग करण्यात आला होता. समुद्रात वाहून चाललेल्या तसेच बर्फात अडकलेल्या व्यक्तींना उचलून घेण्यासाठी पतंगाचा उपयोग केला जात असे.
आपल्या गुजरातेतील अहमदाबाद येथे २ फेब्रुवारी १९८६ साली एक पतंग संग्रहालयदेखील उभारण्यात आले आहे. येथे दरवर्षी 'पतंग मेळा' भरतो. इथे जगभरातल्या पतंगांची, सबंधित वस्तूंची खरेदी होते. पतंगावर अगणित कथा, कविता, गाणी लिहिली गेली आहेत. चित्रपटातदेखील पतंगबाजी दाखवली जाते. अशा सर्वस्तरावर पतंगाचा वावर आहे. विशेष म्हणजे आजच्या कॉम्प्युटर युगातदेखील सानथोरांचे पतंगावरचे आकर्षण कमी झालेले नाही.
No comments:
Post a Comment