Thursday, March 8, 2012

(बालकथा) सोनेरी बोट

        
     फार वर्षांपूर्वी चीनच्या वाई नदीच्या काठी एक शेतकरी राहात होता. त्याचं नाव होतं वांग. चीनी भाषेत वांगचा अर्थ होतो राजा. परंतु त्याच्याजवळ  फुटकी कवडीसुद्धा नव्हती. तो आपल्या उजाड शेतात दिवसरात्र खपायचा.परंतु, तरीही त्याला दोन वेळचे जेवण मिळायची मारामार होती. मात्र वांग त्याबाबत कधीही तक्रारीचा सुर काढत नव्हता.   कधी ना कधी आपले नशीब उघडेल, या आशेवर तो सदा आनंदी राहात असे.
     एक दिवस तो घरी झोपला होता. इतक्यात त्याच्या कानात कुणी तरी कोकिळेच्या मधूर स्वरात  सांगत होते."  ऊठ वांग, बघ बा-झिआन ( चीनच्या आठ अमर देवता) येताहेत."
     वांगने डोळे उघडले. इकडे-तिकडे पाहिले. त्याला कुणीच काही दिसले नाही. तो पुटपुटला,' अरे, कोण माझ्याशी कोकिळेच्या आवाजात बोलतो आहे.  आणि असा आवाज कोण काढू शकणार आहे?  शिवाय या भूमीवर कोणी अमर माणसेच  नाहीत ...' असा विचार करून तो पून्हा झोपला.

     त्याच्या कानात पुन्हा तोच आवाज आला,"ऊठ वांग. ते बघ, अगदी तुझ्याजवळ आले आहेत."  वांगनं उठून खिडकीच्या बाहेर पाहिलं. 'अरे, हे कोण? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात आणि आठ...'   खरोखरच ते  आठजण आहेत. तो बा-झिआन यांना प्रत्यक्षात पाहतोय, यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.  सगळ्यात पुढे परी हो-शेन्-कू आहे. तिच्या पाठीमागे गाढवावर बसलेला चांग कुओ लाओ आणि सगळ्यात शेवटी हातात छ्डी घेऊन अपांग ली टीगु आहे.
     " मला यांच्याबरोबर जायला हवं...." असा विचार करून वांगने पटपट आपल्या सामान आवराआवर केली.  ते एका गाठोड्यात भरून बा- झिआन यांच्या मागोमाग चालू लागला. परंतु आठजणांपैकी कुणीही मागे वळून पाहिले नाही.  नदीवर आल्यावर ते थांबले. परी हो-शेन्-कु म्हणाली," आता आपण काळजीपूर्वक पाण्याच्या प्रवाहावरून चालायला हवं."
     "ठीक आहे, पण आपल्या मागोमाग जो माणूस आला आहे, त्याचे काय करायचे?" अपांग ली टीगुने विचारलं.
     " त्याचं नशीब!  तू त्याची परीक्षा घे. त्यात यशस्वी झाला तर त्यालाही सोबत घेऊ." परी म्हणाली.
     " वत्सा..." लीने  मागे वळून वांगला हाक दिली आणि विचारलं," तुला आमच्यासोबत यायचं असेल तर आमच्या तीन अटी मान्य कराव्या लागतील."
     " तुमच्यासोबत यायला तीनच काय वीस अटीसुद्धा मान्य करीन. " वांग मोठ्या उत्साहात म्हणाला. " ... अमर देवतांबरोबर राहायला  कोणाला आवडणार  होणार  नाही."
     " ठीक आहे, पहिली अट:  नदी पार करताना  फक्त समोर पाहशील.  आणि मनात कुठलाही अपवित्र विचार आणायचा नाही. आणि  लक्षात ठेव, काहीही चुकीचं घडलं तर  पाण्यात पडशील नी  बुडून जाशील"
     " ही तर सगळ्यात सोपी अट आहे. मला  कबूल  आहे." वांग म्हणाला.
     " दुसरी अट- तू जे काही सोबत आणला आहेस ते तुला इथेच टाकून द्यावं लागेल." वांगला धक्का बसल्यासारखा झाला. पण नंतर त्याने विचार केला, प्रत्यक्षात देवता आपल्यासोबत असताना आपल्याला कशाची गरज पडणार आहे. त्याने आपले गाठोडे नदीत फेकून दिले. 
     " तिसरी अट- तुला अमच्याकडील एक  पवित्र पेय प्यावं लागेल.  हे पेय तुला सगळ्या अपवित्र गोष्टीतून मुक्त करेल आणि तुला अमरत्व प्राप्त होईल. त्याच्याने तू सामान्य मनुष्य राहणार नाहीस."ली म्हणाला.
     '' मी पवित्र पेय  आवश्य  प्राशन करीन. आपल्या  अटी तर खूपच सोप्या आहेत.'' वांग म्हणाला.
     " ठीक आहे, टरबूजच्या पानांचे द्रोण बनव." ली म्हणाला.
      वांगने द्रोण बनवले. लीने आपल्या कमरेला बांधलेली एक कुपी काढली आणि त्यातले थोडे  पेय द्रोणमध्ये ओतले. पेय खूपच घट्ट आणि काळेजार होते. शिवाय एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी येत होती.  दुर्गंधीमुळे वांगने आपला चेहरा कसनुसा  केला.  पण अमर व्हायचे असेल तर प्यावंच लगेल.  द्रोण त्याने ओठाला लावला. पण दुर्गंधी असह्य झाली. घसा कोरडा पडला. त्याला पेय पिणे अशक्य झाले.
     " तू आपला घरी जा!" ली म्हणाला आणि त्याच्या हातून द्रोण घेतले व  ते पेय त्याने एका झटक्यात स्वतः संपवून टाकले. 
     " हे अमृत आहे. तू थोडे जरी  धाडस एकवटून पिला असतास  तर अमर झाला असतास आणि शाश्वत रुपाने आमच्यासोबत राहिला असतास. पण तू ही संधी गमावलीस." ली म्हणाला
     " माझ्यावर दया करा.मी चुकलो" वांगने  लगेच लीच्या पायावर लोळण घेतली.
     " संधी एकदाच येते.  आता काही होऊ शकत नाही.  तू आता माघारी जा.  तरीही  हा द्रोण   तुझ्याजवळ ठेव.   गरीब , अभागी लोकांची सेवा करीत राहिलास तर तुझे भाग्य पून्हा उजळेल." लीने द्रोण त्याच्या हातात दिले. ते आठही देवता नदी पार करून पलिकडे निघून गेले. वांगला मोठा पश्चाताप झाला.  आज त्याने थोडी जरी इच्छाशक्ती दाखवली असती तर तो चीनचा नववा अमर देवता बनला असता.
     त्याने काही तरी  विचार करून द्रोणात पाहिले. त्यात अमृताचे काही कण चिकटले होते. त्याने आपली तर्जनी त्यातून फिरवली. पण बोटाला काहीच लागलेले दिसले नाही. परंतु अचानक त्याच्या शरीरात कुठली तरी अज्ञात शक्ती संचार करीत आहे, असा भास होऊ लागला. त्याने आपल्या बोटाकडे पाहिले, तर काय आश्चर्य! त्याचे बोट सोनेरी रंगाने चमकत होते.
     वांगचे  बोट म्हणजे एक चमत्कारच होता.  एखाद्या आजारी माणसाच्या तोंडात आपले सोनेरी बोट ठेवल्यास तो रुग्ण खडखडीत बरा व्हायचा. ठेवायचा.  वांग आता त्या सोनेरी बोटामुळे दूरदूरवर  'देवताम्हणून प्रसिद्ध झाला होता.
     एकदा चीनमध्ये काळ्यातापाची साथ  पसरली.  चोहीकडे माणसे पटापट मरू लागली. वांगच्या घरासमोर तर रात्रंदिवस रुग्णांची रीघ लागू लागली.  वांगला अजिबात सवड मिळेना.  आता वांगने विचार केला. आतापर्यंत आपण लोकांची फुकट सेवा केली. आपला बहुमोल वेळ घालवला. मग आता तरी पैसा कमवायला काय हरकत आहे.  
     तो आता मोबदला घेऊ लागला. वांग श्रीमंत होऊ लागला. त्याने स्वतःचा बंगला बनला.  चीनच्या राजालाही लाजवतील असे शानदार रेशमी कपडे वापरू लागला.  त्याचे नाव वांग. वांग म्हणजे राजा. आता त्याच्या नावाचे सार्थक झाले.  लोक आपला जमीन्जुमला विकून त्याच्याकडून उपचार करवून घेत. कोणी गरीब्-दरिद्री असला तरी मोबदल्याशिवाय त्याच्यावर तो उपचार करीत नसे. त्याचे हृदय पाषाणासारखे कठोर बनले होते.
     एक दिवस सकाळी सकाळीच एका गरीब भिकार्‍याने वांगचा दरवाजा खटखटला. " पैशाशिवाय मी इलाज करीत नाही, माहीत आहे ना तुला. जा इथून " आळसावलेला वांग बाहेर येत  म्हणाला. " अरे वांग, तू मला ओळखलं नाहीस. मी तुझा  जुना मित्र आहे. आठव जरा.  आणि माझ्याकडूनही पैसे घेणार?" भिकारी म्हणाला. 
     "कोण तू? तुला मी ओळखत नाही. माझा कोणी मित्र नाही आणि असता तरी त्याच्याकडून पैसे घेतले असते. " वांग म्हणाला.
     " पण माझ्याकडे तर फक्त एवढे एकच नाणे आहे. याच्याने  माझ्यावर उपचार होणार नाहीत काय?" भिकार्‍याने आपल्या झोळीतून एक सोन्याचे नाणे बाहेर काढले. आनंदाने  वांगचे डोळे चमकले. " या.. या. आत या. बसा, आपले तोंड उघडा." खूपच नम्रपणे वांगने आपले बोट त्याच्या तोंडात ठेवण्यासाठी उचलले.  
     पण पुढच्याच क्षणी तो भीतीने थरथर कापू लागला. समोर अपांग ली टी गुआई उभा होता. त्याच्या डोळ्यांत क्रोध होता. " वांग, तू विसरलास, मी तुला काय सांगितलं होतं तेगरीब्,अभागी लोकांची सेवा, हेच तुझे ध्येय होते.  तू अमृतकणांचा दुरुपयोग केला आहेस. लुप्त होऊ दे." ली  क्रोधाने वांगच्या घराच्या दिशेने बोट करीत म्हणाला.  त्याचा  ऐश्वर्यसंपन्न  बंगला गायब झाला.  " लुप्त हो!" लीने त्याच्या किंमती वस्त्राकडे बोट केले. क्षणात वांग आपल्या जुन्या फाटक्या कपड्यात आला.
     "लुप्त होऊन जा" शेवटी लीने  वांगच्या सोनेरी बोटाकडे इशारा केला. क्षणार्धात बोट तुटून खाली पडले.  ली अदृश्य झाला. वांग बेशुद्ध पडला. त्याला  जाग आली, तेव्हा तो आपल्या अंथरुणावर छातीला ऊशी कवटाळून तळमळत पडला  होता.  भलेही हे एक भयंकर स्वप्न होते, पण त्याच्या पुढच्या वाटचालीला सावधानतेचा इशारा देणारे होते. (चिनी कथेवर आधारित)                                                                            

No comments:

Post a Comment