Tuesday, March 6, 2012

बालकथा शहाणा पोपट

     एक  पोपट होता. तो अन्नाची नासाडी फार करायचा. त्याच्या या वागण्यामुळे  त्याला दाणापाणी कुणी देत नव्हते.  त्याची उपासमार होऊ लागली. त्याची तब्येतही खंगत चालली.
     एक दिवस तो अनिकेतच्या घराच्या बाल्कनीत येऊन बसला. अनिकेत आणि आसावरी अभ्यास करत होते. इतक्यात त्यांना नास्त्यासाठी आईने दूध-ब्रेड आणून दिले. खाताना ब्रेडचे काही तुकडे टेबलावरून खाली पडले. पोपट आवाज न करता आत आला. तुकडे चोचीने वेचून खाऊ लागला. अनिकेतने आणखी काही तुकडे खाली टाकले. त्याने तेही खाल्ले. थोड्या वेळाने पोपट उडाला.
     आता अनिकेत आणि आसावरी वरच्या खोलीत अभ्यासाला येत, तेव्हा हमखास पोपटसुद्धा बाल्कनीत  हळूच येऊन बसायचा. यथावकाश, ते दोघेही त्याची वाट पाहू लागले.  तो त्यांना न घाबरता त्यांच्या खोलीत येऊन बसू लागला. आता अनिकेत, आसावरी आणि पोपट यांच्यात मैत्री झाली.
     कधी कधी त्यांच्याशी मस्ती करू लागला. त्यांनी आपल्याला पकडावं म्हणून पोपट कधी त्यांच्या पायाजवळ जायचा. तर कधी अभ्यासाच्या टेबलावर बसायचा. जसे त्यांनी पकडायला हात पुढे केला की भुर्रकन उडून जायचा.
     मुलं आता पोपटाची वाट पाहात राहायचे आणि या भानगडीत उशीरापर्यंत अभ्यास करत बसायचे. आईकडून खायला काही ना काही मागून घ्यायचे. हळूहळू अनिकेत आणि आसावरी यांची तब्येतही सुधारू लागली. आणि अभ्यासात प्रगतीही होऊ लागली. 
     आसावरीचा वाढदिवस जवळ आला.दोघांनीही भेट काय मागायची, याचा विचार केला.एरव्ही सुंदर सुंदर ड्रेस मागणारी आसावरी या खेपेला पोपटाचाच विचार करत होती. शेवटी त्यांनी पिंजरा मागण्याचे ठरवले. आईला आश्चर्य वाटले, तिने विचारले," आपल्याकडे कुठला पक्षी नाही, मग पिंजरा घेऊन काय करणार आहात?" दोघेही एकदम म्हणाले," पहिल्यांदा घेऊन तर दे. मग पाहू..."
     आईने पिंजरा आणून दिला. त्यांनी तो आपल्या अभ्यासाच्या खोलीत आणला व त्याचा दरवाजा उघडून ठेवून दिला. टपू यात बसतो की नाही, याचा ते विचार करू लागले. आता ते त्याला टपू नावाने हाक मारत होते. 'तारक मेहता का उलटा चश्मा' या मालिकेतल्या करामती टपूचे पात्र त्यांना फार आवडायचे. म्हणून त्याचे नाव पोपटाला ठेवले होते.
     पिंजर्‍यात त्यांनी बदाम, काजू व बिस्किटाचे चुरे ठेवले होते. टपूला ते फार आवडायचे. टपूसुद्धा विचार करत होता,' बसू का नको!' मग विचार केला,' यापेक्षा आणखी चांगले घर कोठे मिळणार आहे!'तो गपचिप पिंजर्‍यात जाऊन बसला. त्याला मुलांचा लळा लागला होता. अनिकेतने दरवाजा बंद केला. आसावरीने खाली जाऊन आईला बोलावून आणले. पिंजर्‍यात पोपटाला पाहून ती चकीत झाली. पण मुलांचा रागही आला. ती फाडकन म्हणाली," याला का पकडून आणलत?"
     तेवढ्यात मुलं एका सुरात म्हणाली," आमचा मित्र आहे तो! आम्ही त्याला टपू म्हणून हाक मारतो. आणि आई, तो स्वतःच पिंजर्‍यात कैद झालाय!" आई म्हणाली," ठीक आहे, पण पिंजर्‍याचे दार उघडा. त्याला जायचं असेल तर जाऊ दे." आईच्या सांगण्यावरून त्यांनी पिंजर्‍याचा दरवाजा खोलला. परंतु, टपू पिंजर्‍याबाहेर आला नाही. गपचिप सगळ्यांकडे पाहात राहिला.
     मुलं आईला म्हणाली," टपूमुळेच आमची तब्येत सुधारली. यानेच आम्हाला खायला शिकवले.अभ्यासातली प्रगतीसुद्धा याच्यामुळेच झाली. टपूमुळेच आम्ही लवकर उठायचो व त्याची वाट पाहात अभ्यास करत बसायचो." आईला फार आनंद झाला. ती म्हणाली," आता बिस्किटावर भागणार नाही. आपन जे काही कातो, तेच त्याचे अन्न... त्याच्या आवडीचा पेरुसुद्धा खायला द्या."
     आता टपूचा पिंजरा रात्रंदिवस उघडाच असतो. तो रात्री येऊन झोपी जातो. सकाळी सगळ्यांना उठवतो. आपणही बाहेर जाऊन शुद्ध हवा खातो. मौजमजा करतो. घरात आल्यावरही घरभर फिरतो. भोजन करतो. पण आता अन्नाची नासाडी करत नाही. त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली होती. 

No comments:

Post a Comment