Friday, March 30, 2012

बालकथा गुरूचा शोध

            एकदा एक संत खूप आजारी पडले. आपला अंतीम क्षण जवळ आला आहे, याची कल्पना आली. मात्र  त्यांना आपल्या तीन प्रिय शिष्यांच्या भवितव्याची चिंता सतावू लागली. ते विचार करू लागले,' त्यांना ज्ञानाच्या मार्गावर घेऊन जाणार्‍या योग्य गुरूची आवश्यकता आहे. मग तो कुठे आणि कसा मिळेल?'
     संत खूप विद्वानांना ओळखत होते. परंतु, त्यांची इच्छा होती की शिष्यांनी स्वतःच आपल्या गुरूची निवड करावी. यासाठी त्यांनी एक युक्ती योजली आणि आपल्या तीनही शिष्यांना बोलावून घेतले. संत म्हणाले,' आपल्या आश्रमात १७ उंट आहेत. मी त्यांची वाटणी करावी म्हणतो. तुम्ही तिघांनी त्यांची  वाटणी   अशाप्रकारे करा की यापैकी सर्वात मोठ्या शिष्याला निम्मे घोडे, मधल्याला एक तृतीयांश घोडे आणि धाकट्याला त्यातला नववा हिस्सा मिळायला हवा.'
     तीनही शिष्य गुरूच्या विचित्र वाटणीमुळे मोठ्या गोंधळात पडले. तिघांनीही खूप विचार केला. पण त्यांना त्यावर उत्तर शोधता आले  नाही. प्रत्येकजण आपापल्या मतीनुसार गुरूंच्या वाटनीचा  अंदाज बांधू लागला. त्यातला एकजण म्हणाला,' मला वाटतं, गुरुजींना वाटणीच कारायची नाही. त्यामुळे आपण तिघेही त्या घोड्याचे  मालक राहू.'  दुसरा म्हणाला,' गुरुजींनी जी वाटणी केली आहे. ती अशक्य वाटत असली तरी त्याच्या जवळपास तरी वाटणी करू. एखाद दुसर्‍याला कमी-जास्त मिळाले तरी काय हरकत आहे?' पण बाकी दोघांना ते काही पसंद पडले नाही. त्यामुळे त्यांची समस्या जशीच्या तशी राहिली. हळूहळू त्यांची समस्या आश्रमाबाहेर गेली. सगळीकडे पसरली. एका विद्वानाच्या कानांवर ही समस्या पडली. त्याने त्या तिन्ही शिष्यांना बोलावून घेतले. विद्वान म्हणाला,' तुम्ही माझा एक उंट घ्या. त्यामुळे तुमच्याकडे अठरा उंट होतील. आता तुम्ही गुरुजींच्या वाटणीनुसार सर्वात थोरल्याला त्यातले निम्मे म्हणजे नऊ उंट द्या. मधल्याला एक तृतीयांश म्हणजे सहा उंट आणि सगळ्यात धाकट्या शिष्याला नववा हिस्साचे म्हणजेच दोन ऊंट वाट्याला येतील.  आता बाकी राहिला एक उंट. तो तर माझा आहे. तो माझा मी परत घेईन. झालं, तुमच्या गुरुजींच्या म्हणण्यानुसार सगळ्यांना बरोबर वाटणी मिळाली.'
     विद्वानाने केलेली योग्य वाटणी ऐकून   तिघेही शिष्य जाम खूश झाले. आणि या वाटणीमुळे शिष्यांना त्यांचा नवा गुरू मिळाला. कारण, गुरू शिष्यांच्या अडचणीत स्वतः सुद्धा सहभागी झाला होता. आता संत निश्चिंत झाले.

No comments:

Post a Comment