Wednesday, March 28, 2012

महिलांवरील सायबर अत्याचारांत वाढ

अलीकडच्या काळात स्त्रियांवरील वाढत चाललेले सायबर अत्याचार केवळ छेडछाड किंवा ब्लॅकमेल करण्यापुरते मर्यादित राहिले नाहीत. स्त्रियांची खासगी माहिती चोरून त्याचा चुकीचा वापर केला जात आहे. दिल्लीसारख्या शहरांमधील उपलब्ध आकडेवारीवरून सायबर अत्याचार करणारे ५० ते ७० टक्के लोक कामाच्या ठिकाणचे असल्याचे आढळून आले आहे. नोकरी पेशातल्या महिलांबाबतच अधिक गुन्हे आहेत. जगभरातल्या अत्याचारांच्या घटनांचा अभ्यास केल्यास असे लक्षात येईल की, सगळ्यात जास्त अत्याचार स्त्रियांवर झाले आहेत. हुंडाबळीचे प्रकरण असो अथवा कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, एकतर्फी प्रेमातून होणारे लैंगिक छळ किंवा खून, विनयभंग, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ अथवा बालविवाह अशा प्रकारचे अनेक अत्याचार स्त्रीवरच झाले आहेत. यात भरीस भर म्हणून सायबर अत्याचारांचे नवे भूत स्त्रियांच्या पाठीशी लागले आहे. सायबर अत्याचारांतही स्त्रीच ‘टारगेट’ बनली आहे. या गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात स्त्रिया बळी पडत आहेत.
     आज सायबर कम्युनिकेशन एक मानवी गरज बनली आहे. मानवी जीवनशैलीचे अंग बनले आहे. त्याचा लाभ होत असला तरी नुकसान हे त्याचे दुसरे अंगही आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो, पण त्याचा वापर काही माणसे स्व-आनंद मिळविण्यासाठी करतात तर काही माणसे दुसर्‍याला त्रास देऊन आसुरी आनंद मिळवीत असतात. काहींना बदला घ्यायचा असतो तर काहींना प्रेमभंगाने पछाडलेले असते. काहींचे पैशांवर अतोनात प्रेम असते. ते मिळविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची त्यांची तयारी असते. अशा अनेक गोष्टींसाठी सायबर कम्युनिकेशनचा काही माणसे आता सराईतपणे वापर करू लागली आहेत. त्यामुळे सायबर क्राइमचा आलेख वाढत चालला आहे. ढोबळमानाने सायबर क्राइमची व्याख्या करायची झाल्यास ‘संगणकाच्या माध्यमातून संगणक प्रणालीत अनधिकृतरीत्या शिरकाव करून आपले ईप्सित साध्य करणे.’ या सायबर गुन्ह्याचे अनेक प्रकार आहेत. दुसर्‍याचा मानसिक छळ करणे, संगणक प्रणालीत माहितीची, साहित्याची नासधूस करणे, डाटा चोरणे, इंटरनेट तासांची चोरी करणे, दुसर्‍याच्या छायाचित्रांचा गैरमार्गासाठी वापर करणे असे अनेक प्रकारचे गुन्हे संगणकाच्या माध्यमातून केले जातात. फसवणुकीने दुसर्‍याचे पैसे परस्पर पळवणे अशा घटना तुरळक प्रमाणात होत असल्या तरी सायबर क्राइममध्ये स्त्रियांना ‘टारगेट’ करण्याचे प्रमाण मात्र कमालीचे वाढले आहे. स्त्रियांवरील अत्याचारांचा हा प्रकार त्यांना घातक ठरत आहे. याला आवर घालण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.
     अलीकडच्या काळात स्त्रियांवरील वाढत चाललेले सायबर अत्याचार केवळ छेडछाड किंवा ब्लॅकमेल करण्यापुरते मर्यादित राहिले नाहीत. स्त्रियांची खासगी माहिती चोरून त्याचा चुकीचा वापर केला जात आहे. युवती, महिलांची छायाचित्रे चोरून छायातंत्रज्ञानाच्या माध्यमातून ती अश्‍लील छायाचित्रांमध्ये बदलली जाऊ शकतात व तशी बदललेली छायाचित्रे आपल्या परिचयाच्या लोकांमध्ये प्रचारित, प्रसारित करून चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अशा घटना देशभरातल्या अनेक छोट्यामोठ्या शहरांमध्ये घडल्या आहेत. आपल्या या बदनामीमुळे अनेक मुलींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी इहलोकीची यात्राच संपवून टाकली. शिवाय पोलिसांत जावे तर आणखी बदनामीच पदरात पडते. त्यामुळे असले अत्याचार निमूटपणे सहन करणार्‍यांची संख्याही मोठी आहे.
      इंटरनेटचा वापर करताना थोडीशी जरी बेफिकिरी झाली तरी ती घातक ठरू शकते. कारण कुरापतखोर माणसे त्याचा लगेच गैरवापर करायला मोकळे होतात. सायबर अत्याचारअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये ई-मेल अकाऊंटमधून फोटो काढून त्याचा गैरकामासाठी वापर करणार्‍या घटनांचाही समावेश आहे. अशाप्रकारच्या वाढत्या तक्रारींमुळे दिल्लीसारख्या अनेक शहरांमध्ये ‘सायबर क्राइम’साठी स्वतंत्र विभागाचीच स्थापना करण्यात आली आहे. आपल्या राज्यातल्या पुणे, मुंबई शहरातसुद्धा सायबर गुन्ह्यांची दखल घेणे भाग पडले आहे. त्यामुळे इंटरनेट आपल्याला कितीही फायदे देत असला तरी आपला थोडासासुद्धा दुर्लक्षपणा संकटे उभी करू शकतो. कित्येक कुरापतखोर माणसांचा अशा प्रकारचा अत्याचार करण्याच्या मागे बदनामी करण्याचा प्रमुख उद्देश असतो. बदनामी करण्यामागे अनेक प्रकारच्या भावना लपलेल्या असतात. बदला घेण्याची भावना काहींच्यात असते, तर काहीजण निव्वळ मनोरंजन अथवा टाइमपास करण्याच्या उद्देशाने असला प्रकार खेळत असतात. मानसशास्त्रज्ञ याला ‘सायबर सिकनेस’ असे नाव देतात. दुसर्‍याला त्रास देऊन आसुरी आनंद लुटणारे कुठल्याही थराला जातात आणि हा प्रकार जास्तीत जास्त स्त्रियांच्या बाबतीत घडतो आहे. विशेषकरून जे अशा प्रकारचा सायबर अत्याचार करतात ती माणसे संबंधित पीडित महिलेच्या जवळचीच असल्याचेही हे गुन्हे उघडकीस आणताना लक्षात आलेली बाब आहे.
     ही माणसे प्रत्यक्षात समोर अगदी चांगल्या प्रकारे पेश येतात. मात्र पाठीमागे बदनामी करण्याच्या नानाविध क्प्त्या शोधत असतात. दिल्लीसारख्या शहरांमधील उपलब्ध आकडेवारीवरून सायबर अत्याचार करणारे ५० ते ७० टक्के लोक कामाच्या ठिकाणचे असल्याचे आढळून आले आहे. नोकरी पेशातल्या महिलांबाबतच अधिक गुन्हे आहेत. आणखी एका अभ्यासानुसार असे गुन्हे करणारे २० ते २५ वयादरम्यानचे आहेत. नकार, ईर्षा, आत्मिक सुख, सूडभावना, तिरस्कार अशी अनेक कारणे या अत्याचारांमागे आहेत.
     अत्याचारांमागील कारणे काहीही असली तरी ही समस्या महिलांसाठी मोठी धोकादायक रूप धारण करत आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून याला आळा घालण्यासाठी कोणती पावले उचलावी लागतील याचा अभ्यास करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. महिलांनीही जरूर ती सावधगिरी बाळगायला हवी. सध्या तरी सायबर अत्याचारांपासून बचावण्यासाठी जागरूकता याचीच मोठी आवश्यकता आहे.
- मच्छिंद्र ऐनापुरे  dainik saamana 28/3/2012 

No comments:

Post a Comment