Friday, March 16, 2012

कंजुष कोल्हा

      पुष्पक वनात रोमू नावाचा एक कोल्हा राहत होता. तो मोठा कंजुष होता. एखादी शिकार अन्य एकादा कोल्हा जास्तीत जास्त दोन दिवस पुरवून खाईल. पण हा रोमू मात्र सात दिवस त्याच्यावर आपली गुजराण करी. या भानगडीत तो नेहमीच उपाशी राही. त्यामुळे रोमू शक्तीहीन बनला होता.
         एकदा त्याला वाटेत मरून पडलेले काळवीट दिसले. त्याने ते ओढून आपल्या गुहेत आणले. त्याने पहिल्यांदा काळविटाची शिंगे खाण्याचा निर्णय घेतला. कारण मांस शिल्लक राहायला हवं.कित्येक दिवस तो शिंगेच खात राहिला. या दरम्यान मृत काळविटाचा देह सडून गेला. त्यात खाण्यालायक काही राहिलेच नाही. त्याच्या या सवयीमुळे जंगलातल्या प्राण्यांमध्ये एक हास्यपात्र बनला होता. तो बाहेर पडायचा तेव्हा,सगळे प्राणी त्याला चिडवायचे. त्याच्या मरतुकड्या देहाकडे पाहात म्हणायचे," तो पहा कंजुष आला" पण तो कुणाची पर्वा करायचा नाही.
       एकदा एक पारधी सावजाच्या शोधात त्याच वनात आला. त्याला जंगली डुक्कर दिसले. चांगली शिकार मिळणार या आशेने त्याला खूप आनंद झाला. त्याने डुकरावर बाणाचा नेम धरला. तीर त्याच्या छातीत घुसला. परंतु, ते जंगली डुक्कर जखमी अवस्थेतच अगदी क्रोधाने शिकार्याच्या दिशेने धावले. आपले डोकदार शिंग पारध्याच्या पोटात घुसवले. यात दोघांचाही मृत्यू झाला.
     इतक्यात तिथे कंजुष कोल्हा आला. डुक्कर आणि मनुष्य मरून पडल्याचे पाहून त्याला अत्यानंद झाला. त्याने तिथे बसून हिशोब केला, त्यानुसार त्याला दोन महिने अन्नाची चिंता नव्हती. निवांत बसून खाता येईल, असा त्याने अंदाज बांधला. तेवढ्यात त्याची दृष्टी बाजुलाच पडलेल्या धनुष्यावर पडली. त्याने त्याचा वास घेतला. धनुष्याची दोरी चामड्याच्या पट्टीने बनवलेली होती. ती लाकडाला दोन्ही बाजुला बांधली होती. त्याने विचार केला, ' आज या चामड्यावरच काम भागवू.' असा विचार करून त्याने धनुष्यकाठीच्या एका टोकाला बांधलेली पट्टी दातांनी तोडू लागला. पण जशी पट्टी तुटली तशी दोरी सुटली आणि काठी सरळ झाली. धनुष्याची एक बाजू फाडकन त्याच्या नरड्यावर बसली कंजुष रोमू जाग्यावरच ठार झाला. खरेच कधी कधी कंजुषी जिवावर बेतते. -

No comments:

Post a Comment