कलमवाली ममतादीदी
सध्या हिंदुस्थानच्या राजकारणात ममतादीदींचा मोठा वट्ट आहे. युपीएचे सरकार त्या सांगितले तसा डोंबारी नाच करत आहे. दीदीच्या मनमानीपुढे सरकार अक्षरशः हतबल आणि लाचार झाले आहे. त्यांनी एका झटक्यात रेल्वेमंत्री बदलला. खरं तर केंद्राचा मंत्री बदलायचा त्यांना आधिकार नसताना त्यांनी किमया घडवून आणली. त्यामुळे सध्या ममतादीदीचा हिंदुस्थानच्या राजकारणात बोलबाला आहे. दीदी आक्रमक, फटकळ, कुणाचीही भीडभाड न ठेवणार्या आणि आपला दरारा कायम ठेवणार्या एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असल्या तरी एक सृजनशील, हळव्या मनाच्या कवयित्री, लेखिका आणि चित्रकारही आहेत. ऐकून धक्का बसला असेल ना? पण खरं आहे. आतापर्यंत तब्बल २१ पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत.
वरून कितीही कठोर दिसत असल्या तरी त्यांचे हृदय आतून ममतेने भरलेले आहे. हळव्या मनाच्या, भावनाशील चित्रकार आहेत. पायात साधी हवाई चप्पल, अंगावर साधी साडी आणि वर शालीचे पांघरूण. अशा अत्यंत साध्या राहणीच्या दीदी मात्र सभेत बोलायला लागल्या की, तिथे रणांगण उभे राहिल, असा जोश त्यांच्यात आलेला असतो. पिडीत, अत्याचारी महिला आपली दु:खे त्यांच्यापुढे मनमोकळेपणाने हलके करीत असतात. जिथे अन्याय तिथे ममता. असा पश्चिम बंगलमधला आजपर्यंतचा अनुभव आहे. राजकारणात अव्याहतपणे डुंबून गेल्या असल्या तरी दीदींनी आपला वाचनाचा शौक सोडलेला नाही. आपल्या मनातल्या भावना लिखानातून आणि चित्रकारीतून व्यक्त करीत असतात. त्यांची कित्येक पुस्तके 'बेस्ट सेलर' ठरली आहेत.
पश्चिम बंगालमधील सर्वात प्रतिष्ठीत मानल्या जाणार्या 'देज पब्लिकेशन' या प्रकाशन समुहाने दीदीची २१ पुस्तके आतापर्यंत प्रकाशित केली आहेत. 'मां', 'नागोल', 'जन्मायती', 'सरनी', 'आज के घडा', मां माटी मानुष', 'जनता दरबार' ही त्यांची पुस्तके बेस्ट सेलर ठरली आहेत. प्रसिद्ध लेखिका महाश्वेतादेवींना त्यांची ही कविता खूपच भावली आहे.
'मृत्यू कौन डरता है तुमसे? तुम को चुनौती देने का साहस नहीं है किसी में? इसलिए तो कहती हूँ सामने आओ|'
राजकीय पटलावर व्यस्त असतानासुद्धा त्यांनी आपल्यातील सृजनशीलता मरू दिली नाही. लेखन आणि चित्रकारी यातून त्यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन कोलकात्यात भरले होते. त्यात चित्रकृतीच्या विक्रीतून जो पैसा उभा राहिला तो त्यांनी नंदीग्रामच्या पिडीत लोकांना दान केला. त्यांच्या चित्रांमध्ये कोमलता आहे. राजकारणातला उग्र चेहरा तिथे पाहायलाही मिळत नाही. त्यांच्या चित्रात फुलं असतात. आईचा चेहरा असतो. जगन्नाथ आणि गणेश असतात. त्यात मोराचे नृत्यही असते. पेंटिंग करीत असताना ममतादीदी कॅनवासवर खरोखरीचे ममतेचा वर्षाव करीत असतात.
त्यांना कोणीही, कधीही भेटू शकतं. आज मुख्यमंत्रीपदाची खुर्ची असली तरी आलेल्या माणसाला जास्तीतजास्त भेटण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. भेटायला आलेल्याला विन्मुख करायचं नाही, ही महात्मा गांधीजींची परंपरा त्यांनी आजही कायम ठेवली आहे. इतक्या हळव्या मनाच्या कवयित्री, लेखिका, आणि चित्रकार असलेल्या ममतादीदी राजकारणात मात्र असं का वागतात? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. हट्टी, आक्रसताळपणा, आक्रमकता हे कदाचित राजकारणातले 'पत्ते' असतील. समोरच्याला नामोहरम करणारे शस्त्र असेल. पण काही का असेना, ममता दीदी मात्र या न त्या कारणाने सतत चर्चेत राहिल्या आहेत.
No comments:
Post a Comment