आपल्या देशात तसे पाहायला गेले तर क्रीडा प्रकारांची तशी काही वानवा नाही. फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, तिरंदाजी, टेनिस त्याचबरोबर खो खो, कबड्डी, कुस्ती आदीए देशी खेळही खेळले जातात. या खेळांची प्रांतवार लोकप्रियताही वाखाणण्यासारखी आहे. तीन दशकापर्यंत कोलकात्यात फुटबॉल, दिल्ली- हरियाणात कुस्ती, महाराष्ट्र- पंजाबात कबड्डी आणि दक्षिण भारतात व्हॉलीबॉल किंवा ऍथलेटिक्सची लोकप्रियता सर्वोच्च स्तरावर होती. पण आज क्रिकेटरुपी दानवाने देशातल्या सर्वच खेळांना गिळंकृत करून टाकले आहे. क्रिकेटचा पागलपणा, असा उन्माद, असली आंधळी क्रिकेटभक्ती यापूर्वी कधीही पाहिली गेली नव्हती. आणि विशेष म्हणजे ज्या देशात मुहूर्तमेढ रोवली गेली, त्या साहेबांच्या देशातही इतका वेडेपणा पाहिला गेला नाही. भारतीय जनमानसात चढलेला उन्माद भारतीय खेळांना मात्र मृत्यूपंथाला नेत आहे.
केवळ क्रिकेट आणि क्रिकेट हाच भारतीयांचा धर्म बनला हे. संपूर्ण जगभरातील फक्त डझनभर देशात खेळल्या जाणार्या या क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर अथवा महेंद्रसिंह धोनी यांनी शतक ठोकले तर त्याला अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचले जाते. सर्वसामान्यांपासून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसहेचे खासदारसुद्धा क्रिकेटपटूंचे कौतुक करायला विसरत नाहीत. विशेष म्हणजे 'टीम इंडिया' च्या दारुण पराभवावर आगपाखड करायला आणि खराब कामगिरीवर चिंता व्यक्त करायला हीच माणसे आघाडीवर असतात. मात्र देशातल्या अन्य क्रीडा प्रकारातल्या खेळाडूने अथवा संघाने विश्वविजेतेपद मिळवले किंवा विश्वविक्रम केला तरी त्याची फारशी चर्चा केली जात नाही. हॉकी, मुष्टीयुद्ध, बुद्धीबळ, बिलियडर्स, तिरंदाजी, कुस्ती, बॅडमिंटन, टेनिस, व्हॉलीबॉल अशी काही क्रीडा प्रकारांची नावे आहेत. क्रिकेटच्या वेडापायी अन्य खेळातील उत्कृष्ट खेळाडूंची मोठी कुचंबना चालली आहे. सानिया मिर्झा, सायना नेहवालसारखे काही खेळाडू त्याला अपवाद आहेत. अलिकडच्या काळात काही खेळांना महत्त्वही आले आहे. मात्र क्रिकेटच्या तुलनेने म्हटले तर 'दरिया में खसखस'च! बीसीसीआय ही संस्था जगात एक श्रीमंत संस्था मानली जाते ते यामुळे. सगळा पैशाचा ओघ, प्रसिद्धी, जाहिराती, मान्-सन्मान सगळे सगळे क्रिकेटभोवती फिरत आहे.
आज क्रिकेट खेळणार्या देशांवर दृष्टीक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की या देशातील क्रिकेटची लोकप्रियता घसरत चालली आहे. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, झिम्बावे, न्यूझिलंड आदी देशांमध्ये क्रिकेटला पर्यायी खेळ पुढे आले आहेत. आपण मात्र खेळ म्हणजे क्रिकेट समजून अफूची गोळी खाऊन बसलो आहोत. अजूनही म्हणावा असा दुसरा खेळ आमच्या डोक्यात नाही. नाही. परिणामस्वरूप आपला देश अन्य क्रीडा प्रकारात अद्याप खूप मागास आहोत. क्रिकेट सोडला तर करिअर म्हणून कालपर्यंत दुसरा खेळच नव्हता. आता कुठे जरा युवा वर्ग अन्य खेळाकडे वळतो आहे. पण त्यात अजून खूप प्रगती अपेक्षित आहे. शिवाय शासनस्तरावर त्यासाठी मोठी चालना मिळायला हवी. आपला देश देशी खेळाबाबत अजिबात निरुत्साही आहे. चीनसारख्या देशांनी आपल्या देशी खेळांना चालना देऊन ऑलिंपिकसारख्या स्पर्धांमध्ये आपल्या डझनावरी खेळांना स्थान मिळ्वून देण्यात यश मिळवले आहे. मात्र आपण त्याच्या उलट वागत आहोत. क्रिकेटने अन्य खेळांना अक्षरशः कॅन्सरग्रस्त करून टाकली आहे. वास्तविक क्रिकेट हा एक क्रीडा प्रकार आहे. वास्तविक क्रिकेट हा खेळ आहे, मानायला दुसरा एक वर्ग मानायलाच तयार नाही. वेळ घालविण्याचे साधन असल्याचे म्हटले जात आहे. या खेळामुळे आमची इतर क्षेत्रातील क्रयशक्तीही खालावत चालली आहे. सरकारी कार्यालये, अन्य सार्वजनिक ठिकाणे कामापेक्षा क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. याचा अर्थ क्रिकेट हा पांढरपेशांचा वेळ दवडणारा खेळ राहिला आहे.
क्रिकेटचा कैफ आणि त्याची देशपातळीवरील त्याच्या ठळकपणा आपल्या देशातील घसरलेल्या खेळ- संस्कृतीची अओळख करून द्यायला पुरेसे आहे. या खेळातील आपल्या देशातील खेळाडूंच्या चांगल्या = वाईट कामगिरीवरच्या प्रतिक्रिया या खेळाविषयीचा उन्माद स्पष्ट करतो. संघ जिंकल्यानंतर लाखो- करोडोंचा पुरस्कार, प्रसारमाध्यमांकडून त्यांची सातत्याने होणारी वाहवा आणि खेळाडूंना देवाच्या जागी बसवणारी हीच निस्सिम चाहते मंडळी संघ हरला तर मात्र क्रिकेट प्रेमाच्या आवेशापोटी खेळाडूंच्या घरांवर हल्ले करतात. त्यांचे पुतळे जाळतात. त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढतात, निदर्शने करतात. याचा अर्थ यश आणि अपयश या दोन्हीतही किती उन्माद आपल्या अंगात भरला आहे, याची प्रचिती येते. हे खूळ प्रत्येक सामन्यागणिक संचारलेलं असतं.
इतके क्रिकेटवेड भारतीयांच्या अंगात भिनायचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना त्याबाबत स्पष्टपणाने काही सांगता येणं अवघड आहे. काही क्रीडातज्ज्ञांनी व सामाजिक स्वास्थतज्ज्ञ यांनी वेळोवेळी काही टिपण्या दिल्या असल्या तरी त्यांनी प्रामुख्याने आपल्या उत्सवप्रेमाच्या परंपरेकडे अम्गुलीनिर्देश केले आहे. शिवाय वेळेबाबतचा हलगर्जीपणा या आपल्या भारतीयांच्या दोषावरही बोट ठेवले आहे. कामाशिवायच्या गप्पाटप्पा , उठवळवृत्ती आणि सर्वाधिक म्हणजे खेळाविषयीची अभिजात भावना, ओढ. ही सगळी कारणे क्रिकेटरुपी नशेला खुराक मिळवून देतात. पूर्वी हा खेळ राजा- महाराजांचा, नवाब, कुलीन श्रीमंत लोकांचा खेळ होता. खेळावर त्यांचे निस्सिम प्रेम होते. खेळावर वाट्टेल तेवढा पैसा उधळायचे. साहजिकच ही परंपरा पुढे सर्वसामान्यांपर्यंत आली. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेट आणि क्रिकेट आहे. आपल्या देशात अन्य खेळातही खेळाडूंनी देशाचा नावलौकिक वाढवला आहे. मात्र त्यांना पुढचा कौटुंबिक स्थैर्याबाबतचा काळ तितका सोपा राहिलेला नाही. अनेकांना त्यांच्या उतारवयात पोटापाण्यासाठी मोलमजुरी करावी लागली आहे. अलिकड्च्या काळात त्यात काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी म्हणावी अशी प्रगती झाली नाही. आजही कित्येक खेळाडूंना प्रायोजक मिळवण्यासाठी महत्प्रयास करावे लागतात. तरीही हाती काही लागत नाही. हॉकीचा जादुगार मेजर ध्यानचंद, खुशाबा जाधव, मालवा, गुलाबसिंहसारख्या विभिन्न खेळातील शेकडो खेळातील खेळाडूंचे जीवन समाधानात गेले नाही. त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. करावा लागत आहे. आर्थिक टंचाईमुळे त्यांचे आयुष्य दुर्दैवी ठरले. क्रिकेटमधल्या लोकांना निवृतीनंतरही पंच, समालोचक, प्रशिक्षक अशा अनेक भूमिका पार पाडायला सहजतेने संधी मिळत आहे, त्याला कारण म्हणजे क्रिकेटचा उदोउदो.
जाहिरातबाजीतून आपले उखळ पांढरे करून घेतलेल्या क्रिकेटविरांना राज्य सरकारे आणि केंद्र सरकार सवलतींचा वर्षाव करते. आयपीएलसारख्या खेळांमध्ये भाग घेऊन मैदानावरच्या धावांबरोबरच पैशांचाही पाऊस पाडणार्या याच खेळाडूंना ' भारतरत्न' देऊन सन्मान केला जावा, अशी ओरड करणार्यांविषयी तर खरोखर कीव करण्यासारखी परिस्थिती आहे. खरोखरच हे खेळाडू देशासाठी खेळतात का याचा विचार क्रिकेटप्रेमींनी करायला हरकत नाही, पण जे स्वतः क्रिकेट प्रेमात आंधळे झाले आहेत, त्यांच्याकडून निरपेक्ष भावनेची काय अपेक्षा करायची असा प्रश्न आहे. अशा या ग्लॅमर भरलेल्या, भारतीयांना धुंदी चढलेल्या आणि खेळाडूच्या पायावर पैशाच्या राशी ओतणार्या क्रिकेटकडे ओढा वाढला नाही तर नवलच! साहजिकच अन्य खेळात प्राविण्य मिळवून आर्थिक गटागंळ्या खात बसण्यापेक्षा 'वाहत्या गंगेत हात धुवून घेण्या'ची प्रवृत्ती वाढीस लागणार, हे ओघाने अपेक्षित आहे. नव्या दमाच्या खेळाडूंना असे वाटतच, पण प्रत्येकाला आपल्या घरात सचिन तेंडुलकर जन्माला आला पहिजे, असे वाटत असते. इतिहासातून हेच शिकता येते.
ज्या देशामध्ये या खेळाचा उगम झाला, तिथून आता तो उखडला जात आहे. तरीही भारतीय उपखंडात मात्र क्रिकेट अधिकच लोकप्रिय होत चालला आहे. भारताबरोबरच पाक, बांगला देश आणि श्रीलंकेतही क्रिकेटचा उन्माद भयानक आहे. याचा अर्थ सरळ आहे, आपल्यात इंग्रज गुलामगिरीची मानसिकता, सरंजामशाही आणि अभिजात वर्गाचा दर्प अजूनही लोकांमधून नाहीसा झाला नाही. प्रसारमाध्यमेही टीआरपीसाठी मिळालेल्या संधीचे सोने करायला टपलेली आहेतच. परिणामी क्रिकेटचीच तळी उचलून त्यांनी आपले आर्थिक हित जाणले आणि साधले. 'ग्लोबल' चा आधार त्यांनी घेतला.
आपल्या देशात हा खेळ इंग्रजांनी आणला. इथल्या सामंत, राजेरजवाडे, नवाबांनी तो पोसला. साहजिकच त्याच्यावर श्रीमंतांचा खेळ म्हणून शिक्का बसला. पण त्यावेळी सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांमध्ये देशी खेळच लोकप्रिय होते. फुटबॉललाही मध्यमवर्गियांनी स्वीकारले होते. मोहन बगानच्या संघाने १९११ मध्ये अनवाणी पायांनी फुटबॉल खेळून इंग्रजांच्या संघाला नामोहरम केले होते. तेव्हा तमाम भारतीयांमध्ये देशप्रेम उचंबळून आला होता. हॉकीमध्ये १९२८ साली ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यावर भारतात मोठा जल्लोष झाला होता. आज क्रिकेटबाबतीत जितका उत्साह, जितका जोम आणि जितकी भावना आहे, तितकाच उत्साह त्यावेळी अन्य खेळांबाबत होता. आज मात्र ती हावना, उत्साह राहिलेला नाही. काही दशकांपूर्वी हॉकी, कुस्तीसारखे खेळ देशभरात लोकप्रिय होते. कुस्तीमध्ये विशंबर, मालव, सुदेश, वेदप्रकाश, सतपाल, जाधव सारख्या पैलवानांनी विश्व ऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी केली होती. हॉकीची गोष्ट मात्र विशेषत्वाने मोठी कौतुकास्पद होती. या खेळात आपण अनेकदा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. कोणत्याही डामडौल, योग्य प्रशिक्षणाशिवाया आणि सुविधांव्यतिरिक्त या खेळाडूंनी दैदीप्यमान यश मिळवून आपल्या देशाचे नाव जगात उंचावले होते.
आपले देशी खेळ सर्वसामान्य आणि मध्यमवर्गियांमध्ये लोकप्रिय होते. आजही आहेत. तिरंजादी, वेटलेप्टिंग या खेळातील खेळाडूही गरीब, मध्यमवर्गीयच आहेत. क्रिकेट खेळात यश मिळवलेले खेळाडू केवळ दहा- बारा देशांमध्ये खेळल्या जाणार्या क्रिकेटसारख्या खेळात विश्वविजेता बनले नाहीत. तर १००-५०० देशांमध्ये खेळल्या जाणार्या खेळांमध्ये आपल्या यशाचा झेंडा आपला यशाचा झेंडा फडकावला आहे. सन १९८० च्या दशकांनतर या खेळांना जसे काही ग्रहणच लागले. वास्तविक या खेळांवर बदलत्या गरजानुसार ज्या तर्हेने लक्ष द्यायला हवे होते. , तितकेसे दिले गेले नाही. खेळांच्या पाठीमागचा आधारही हळूहळू कमी होत गेला. ही खेळसंस्कृतीच्या दृष्टीने दुर्दैवाची म्हणावी लागेल. १२५ कोटीच्या भारताला ही बाब नक्कीच शरमेची आहे.
या क्रिकेटच्या नादाला लागून कबड्डी, खो खो, मलखांब, दांडपट्टा, विठी-दांडू, रस्सीखेचसारखे अनेक क्रीडा प्रकार आम्ही विसरून गेलो आहोत. आपला शेजारचा देश चीनमात्र त्यांच्या देशी खेळांना प्रोत्साहन देऊन, त्यांचे संवर्धन करून व सातत्याने पाठपुरावा करून त्याम्चे खेळ ऑलिम्पिंक खेळात समाविष्ठ करून घेण्यात यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे विदेशी क्रीडा प्रकारातही चीन आघाडीवर आहे. आम्ही मात्र एका खेळालाच कवटाळून बसलो आहोत, ही आपल्यासारख्या सव्वाशे कोटी जनतेच्या दृष्टीने शरमेची बाब म्हणायला हवी. सरकार या देशी खेळांसाठी पैसा खर्च करत असली तरी ते खूपच नगण्य आहेत. शिवाय या ख्रेळांना ग्लॅमर मिळवून देण्यात सर्वच स्तरावर अपयशी ठरल्याने आपले देशी खेळ रसातळाला चालले आहेत.
रामायण, महाभारत या पौराणिक कथांमध्ये राम, अर्जून, कृष्ण, भीम, हनुमान, वाली, सुग्रीव, बलराम आदींनी कुस्ती, तिरंदाजीत अदभूत असे शक्ती प्रदर्शन केले आहे. यानंतर बर्याच वर्षांनी आपल्याकडे खेळाचे स्वरुप आले. ऑलिम्पिंकमध्ये कुस्तीला १९०४ साली तर तीरंदाजीला १९७२ साली मान्यता मिळवण्यात यश मिळाले व त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला. याचा अर्थ शासन स्तरावर आणि लोकांची मानसिकता किती निष्क्रिय आणि इंग्रज गुलामगिरीची आहे, हे लक्षात येते. देशी खेळांचा अभिमान न ठेवणारी पिढी पुढे तशीच घडत आहे. शासनही या खेळांसाठी आपणहून काही करायला तयार नाही. त्यामुळे देशी खेळ मृत्यूपंथाला लागले आहेत, तर क्रिकेट त्यांचे कॅन्सररुपाने गळा घोटून त्यांना संपवायला सज्ज झाला आहे.
मच्छींद्रजी... लेख खूपच उत्तम लिहिला आहे. पण यामागे तुमचे दुषित पुर्वग्रह दिसतात. क्रिकेट हादेखील अन्य खेळांसारखाच एक खेळ आहे. तिथं हारजित आहे. तिथंही विक्रम आहेत. त्यामुळे एका खेळानं इतरांना गिळंकृत केलंय, तो दानव आहे, असा दृष्टीकोन बाळगण्याचं कारण समजू शकलेलं नाही. हा खेळ इतका प्रसिद्ध आणि श्रीमंत होतो आणि इतर होऊ शकले नाहीत, याची कारणं काय आहेत त्याचा अभ्यास तुमच्यासारख्या अभ्यासुंनी केला पाहिजे. आपला हॉकीचा संघ एकेकाळी आताच्या क्रिकेट संघापेक्षा कितीतरी पट अधिक बलवान होता. तुम्ही अमोल पालेकरचा गोलमाल बघितला असाल, तर त्यात तो दांडी मारून हॉकीची मॅच पाहायला जातो, क्रिकेटची नाही... याचा अर्थ त्या काळात सर्वाधिक लोकप्रिय खेळ हॉकी होता. पण त्या खेळाच्या दुर्दैवानं भारत ग्लोबल होण्यापूर्वी त्याची सद्दी संपली. ज्यावेळी देशाचे दरवाजे जगासाठी आणि जगाचे देशासाठी खुले होत होते, त्याच सुमारास आपण वर्ल्डकप जिंकला आणि त्यानंतर हॉकीची जागा क्रिकेटनं घेतली. गेल्या वर्षी आपण दुसरा वर्ल्डकप जिंकला, तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी गेलं होतं. आपल्या देशातला उच्च मध्यमवर्ग महिनाअखेरची जुळवाजुळव न करता आरामात जगायला शिकला होता. त्यांच्याकडे थोडाफार पैसा असला तरी आयुष्यात त्यांना विजयी असल्याचं समाधान क्वचितच मिळायचं. आजही स्थिती फारशी बदललेली नाही. म्हणूनच आपल्या देशाचा संघ जिंकतो आहे, यात त्यांनी समाधान मानलं. कदाचित या सबंध काळात हॉकी संघानं आपलं स्थान कायम ठेवलं असतं, तर कदाचित तुम्ही हॉकीचा कॅन्सर असं म्हणाला असतात... किंवा अन्य एखाद्या खेळाबाबतही ती शक्यता होतीच. साईना नेहवाल, विश्वनाथन आनंद, खाशाबा जाधव, अभिनव बिंद्रा, लिएंडर पेस-महेश भूपती (एकत्र असले तर) असे अनेक दिग्गज आपल्याकडे अन्य खेळांमध्येही आहेत. मात्र यातल्या किती जणांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे? त्यामुळे क्रिकेटकडे दुस्वासानं न बघता तो एक खेळ आहे, म्हणूनच त्याकडे बघितलं पाहिजे. हा खेळ आपला नाही, असं म्हणायचंही कारण नाही. कोणतीही परकीय वस्तू आपल्यामध्ये भिनविण्याची ताकद आपल्या संस्कृतीत आहे... अन्य खेळांनाही महत्त्व दिलं पाहिजे, हा तुमचा मुद्दा एकदम रास्तच आहे. फक्त त्यासाठी सरकार आणि त्या खेळाच्या खेळाडूंनी कष्ट घ्यायचे आहेत. मारून-मुटकून एखाद्याला एखादी गोष्ट आवडायला भाग पाडलं जाऊ शकत नाही, इतकंच!!!
ReplyDelete