Thursday, March 15, 2012

उत्साहाचा खळाळता झरा: शशी कपूर

      कपूर घराण्यातील राज, शम्मी आणि शशी म्हणजे तीन दिशांचे तीन प्रवाशी होय. मात्र या सगळ्यात शशी कपूर हटकेच राहिला. त्याचं व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि सुंदर राहिलं आहेच, पण जीवनातही जसे सुखाचे अनुभव पाहिले, तसे वाईट दिवसही त्याला पाहावे लागले आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी ब्रिटिश अभिनेत्री जेनिफर कँडलशी विवाह करून कपूर खानदानात विद्रोहाचे पहिले बिगुल वाजवले ते शशीकपूरनेच! याशिवाय जेम्स आयवरी-इस्माईल मर्चंट यांच्या इंग्रजी-हिंदी चित्रपटांमध्ये काम करून त्याने 'इंग्लिश कपूर' अशी आपली ओळखही निर्माण केली. शशी कपूर स्वतः मेनस्ट्रीम सिनेमाशी जोडला गेला असला तरी त्याने कला सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी 'फिल्मवाला'  या आपल्या होम प्रॉडक्शन बॅनरखाली अनेक कला चित्रपटांची निर्मिती केली.  इकडची कमाई तिकडे घालण्याच्या या त्याच्या स्वभावामुळे त्याला कफल्लकही व्हावे लागले होते. मात्र त्याचे नशीबच जोरावर असल्याने तो सगळ्या चढ उतारातून सहिसलामत बाहेर पडला.
     शशी कपूरचा जन्म १८ मार्च १९३८ चा. पृथ्वीराजकपूर यांचा बलवीर तिसर्‍या क्रमांकाचा सुपुत्र. सतत हसतमुख. या त्याच्या स्वभावामुळे त्याला रोमांटिक रोल मिळत गेले. आणि ओळखही तशीच निर्माण झाली. त्याच्या करिअरची सुरुवात पृथ्वी थिएटरच्या 'शकुंतला' नाटकाने झाली होती. राज कपूरच्या निर्माता-दिग्दर्शक म्हणून पहिल्या कामगिरीच्या 'आग' ( १९४८) चित्रपटात व 'आवारा' ( १९५१)  या तिसर्‍या चित्रपटात त्याने राज कपूरच्या बालपणाच्या भूमिका साकारल्या होत्या. १९५७ मध्ये त्याने जॉफरी कँडल यांची टुरिंग नाटक कंपनी जॉईन केली. आणि शेक्सपिअरच्या नाटकाम्मधील विभिन्न प्रकारच्या भूमिका करू लागला. दरम्यान जॉफरी कँडल यांची मुलगी जेनिफर हिच्याशी जवळीक निर्माण झाली. ही जवळीक इतकी वाढली की, ती लग्न मंडपापर्यंत जाऊनच थांबली. कपूर खानदानात अशाप्रकारचे पहिलेच लग्न होते.
     कपूर खानादानातील असल्याने निर्माता-दिग्दर्शकांच्या प्रारंभी त्याच्यासाठी उड्या पडत. पण त्यावेळेला त्याच्या डो़क्यात मात्र आदर्श सिनेमा व आदर्श भूमिकेच  भूत सवार झाले होते. नुसते नाचणे-गाणे त्याला करायचे नव्हते. तो त्यावेळेला निर्मात्यांना साम्गायचा,' मी अभिनेता आहे, नाचणारा डोंबारी नव्हे' त्याच्यात आदर्शवादाचे भूत शिरले होते. कदाचित शेक्सपिअरच्या नाटकांचा अथवा विदेशी चित्रपटांचा प्रभाव असेल मात्र तो निर्मात्यांना स्पष्ट नकार कळवायचा.
     हिंदी सिनेमाच्या प्रागंणात शशी कपूरची एंट्री यश चोप्रा यांच्या 'धर्मपुत्र' चित्रपटाद्वारे झाली. हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व काळातल्या परिस्थितीवर बेतलेला आणि आचार्य चतुरसेन शास्त्री यांच्या कादंबरीवर आधारित होता. यात मुस्लिम दाम्पंत्याच्या अवैध मुलाची कथा होती. या मुलाचे पालनपोषण एक उदारमतवादी हिंदू कुटुंब करते. त्याच्यातल्या अभिनेत्याला आव्हान देणारी कथा असली तरी चित्रपट काही चालला नाही.  शेवटी एकदाचे आदर्शवादाचे भूत उतरले नी त्याने 'एक अनार सौ बिमार' हा चित्रपट स्वीकारला. मात्र त्या आधी 'चार दिवारी' हा चित्रपट प्रदर्शित झाला.
     १९६० मध्ये शशी कपूरने अनेक रोमांटिक चित्रपटांमध्ये काम केले. तो कालसुद्धा चॉकलेटी हिरोंचा होता. त्यामुळे त्यालाही तशाच प्रकारच्या भूमिका मिळत गेल्या. 'मेहंदी लगे मेरे हाथ', 'प्रेमपत्र', मोहब्बत इसको कहतें हैं', 'नींद हमारी ख्वाब तुम्हारे', 'जुआरी', 'कन्यादान', 'हसीना मान जाएगी' सारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले. मात्र यातले बहुतांश चित्रपट फ्लॉप ठरले. त्यामुळे त्याला त्यावेळचे आघाडीचे कलाकार दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, मनोज कुमार यांच्या पंक्तीत जाऊन काही बसता आले नाही. शिवाय त्याच्या प्रतिभेला बाहेर येण्याची संधी मिळाली नाही.
     अभिनेत्री नंदा हिने शशी कपूरसोबत अनेक चित्रपट केले. शशीचे लागोपाठ चित्रपट प्लॉप होत असतानाही नंदाने मात्र त्याच्यावर विश्वास दाखवला. शेवटी सूरज प्रकाश दिग्दर्शित 'जब जब फूल खिले' प्रदर्शित झाला आणि 'एक था गुल..' गीताद्वारा सांगितली गेलेली रोमांटिक स्टोरी गोल्डन ज्युबली ठरली. नंतर अनेक चित्रपटात शशी- नंदा ही जोडी पडद्यावर आली. सत्तर दशकात त्याच्याकडे जवळ जवळ दीडशे चित्रपट होते. त्याच्या कालावधीतील तो सर्वाधिक व्यस्त काळ होय. रोज तो पाच -पाच शिफ्टमध्ये काम करायचा. एका स्टुडिओतून दुसर्‍या स्टुडिओत धावायचा. एखाद्या चित्रपटाचं दोन तास तर दुसर्‍या चित्रपटाचं तीन तास शुटिंग करायचा. तो सेटवर गेला की, निर्माते म्हणायचे 'शशी का काम पहले कर दो, वो दो घंटे में चला जायेगा' त्याला राज कपूरने 'सत्यम शिवम सुंदरम' साठी घेतले होते. राजला स्टार सिस्टमचा तिटकारा होता. तो वैतागून ओर्‍अडायचा,' ऍक्टर हो टॅक्सी?' त्यावेळेला त्याला बरेच जण टॅक्सी कपूर म्हणत. टॅक्सीप्रमाणे त्याची धावपळ असायची.
     सत्तर-ऐंशीच्या दशकात अमिताभसोबत त्याची खूपच छान जोडी जमली होती. प्रेक्षकांनीही ती पसंद केली. 'दीवार' (१९७५) , 'कभी कभी' (१९७६), 'इमान-धरम' (१९७७),' त्रिशूल' ( १९७८), 'काला पत्थर', 'सुहाग' (१९७९), 'दो और दो पांच' , 'शान'(१९८०), 'सिलसिला' (१९८१) आणि 'नमक हलाल' (१९८२) सारखे संस्मरणीय चित्रपट त्यांनी दिले.याच सुवर्ण काळात त्याने हिंदी सिनेमातला सगळ्यात यादगार संवाद म्हटला होता, तो म्हणजे- ' मेरे पास माँ है.'
     शशी कपूरचा अभिनयाच्यादृष्टीने नितांत सुंदर असलेला चित्रपट म्हणजे, 'न्यू देहली टाइम्स' ( १९८६). हा चित्रपट रोमेश शर्माने दिग्दर्शित केला होता.  राजकीय पार्श्वभूमीवर असलेल्या चित्रपटात स्वतः च्या स्वार्थासाठी एका वृत्तपत्राचा मालक संपादकाला बळीचा बकरा बनवतो.या चित्रपटानंतर मात्र शशी कपूरने आपल्या वाढत्या वयाची जाणीव ठेऊन चरित्र भूमिका स्वाकारू लागला.
     शशी कपूर हा असा एकमेव अभिनेता आहे, ज्याला सातत्याने इंग्रजी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. जेम्स आयवरी आणि इस्माइल या जोडीचा 'तिसरा कोन' म्हणजे शशी कपूर. या त्रिकुटाने अनेक चित्रपट केले. 'द हाऊस होल्डर' ( १९६३), 'शेक्सपिअरवाला' ( १९६५), 'बॉम्बे टॉकी' (१९७०), 'हीट अँड डस्ट' ( १९८३) आदी चित्रपट भारताबरोबरच परदेशातही नावाजले गेले. 'कॉनरॅड रुक्स यांचा 'सिद्धार्थ' ( १९७२) हा चित्रपट मात्र वादग्रस्त ठरला. या चित्रपटात शशी कपूर न्यूड सिमी ग्रेवालसमोर उभा आहे, याची फोटोग्राफी इंग्रजीतल्या दोन सिनेनियतकालिकांनी मुखपृष्ठावर छापली होती. हे प्रकरण न्यायालयात गेले होते.
     आपल्या होम प्रॉडक्शनच्या 'फिल्मवाला' बॅनरखाली त्याने वेगळ्या धाटणीच्या, कलात्मक चित्रपटांची निर्मिती केली.  त्याने श्याम बेनेगलकडून 'जुनून' (१९७९), 'कलयुग' (१९८१), अपर्णा सेन '३६ चौरंगी लेन' ( १९८१), गोविंद निहलानी 'विजेता' १९८३) आणि गिरीश कर्नाड 'उत्सव' ( १९८३) यांच्या दिग्दर्शनाखाली पडद्यावर आणले. अर्थात या चित्रपटांना हिटचा दर्जा मिळाला नसला तरी हे चित्रपट कलात्मकदृष्ट्या 'मीला का पत्थर' आहेत, यात संशय नाही. मात्र यामुळे शशी कपूरला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागले. त्याचा  मूळचा पिंडच तसा होता. भारत- सोवियत संघ यांच्या सहकार्याने त्याने स्वतः दिग्दर्शित केलेला 'अजुबा' हा चित्रपट   मात्र त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक ठरली. यात त्याला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. यानंतर त्याने इस्माइल मर्चंटच्या भोपाळमध्ये बनविण्यात आलेला 'इनकस्टडी' ( १९९४) काम केलं. नंतर मात्र तो घरातच कैद झाला. क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसला. अलिकडे तर त्याची तब्येत फारच गंभीर असल्याचं वाचनात आलं होतं. आपल्या वडिलांच्या स्मृतिखातर त्याने मुंबईत पृथ्वी थिएटरची स्थापना केली आहे. त्याचे काम सुरूच आहे. हिंदी चित्रपटाचा लिहिताना शशी कपूरशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही.  त्यास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!


No comments:

Post a Comment