Wednesday, March 7, 2012

बालकथा अंगठ्याचा फैसला

                                                एक दिवस हाताच्या चार बोटांची आपापसात भांडणे लागली. प्रत्येकजण आपणच सर्वश्रेष्ठ आहोत, अशी बढाई मारू लागला होता. शेवटी चौघे फैसल्यासाठी अंगठ्याकडे गेले. अंगठ्याने चारही बोटांचे स्वागत केले. मग त्यांच्या येण्याचे कारण ऐकून घेतले. त्यावर अंगठा म्हणाला," पहिल्यांदा मला सगळ्यांनी एक एक करून आपले विशेष गुण सांगा."
     सगळ्यात अगोदर तर्जनी म्हणाली," मी लिहिण्या-वाचण्या कामी येते. दुसर्‍यांना मार्ग दाखवते. म्हणून मी श्रेष्ठ." मधले बोट म्हणाले," मी विणेतून संगीत निर्मिती करतो. भजनात चिमटा मीच वाजवतो. या कलागुणांमुळे मीच श्रेष्ठ." अनामिका सगळ्यांना बाजूला सारून पुढे झाली आणि अहंकाराने म्हणाली," कोणत्याही शुभकार्याची सुरूवात, स्वास्तिकाची मांडणी मीच करते. सौभाग्याचा आणि विजयाचा टिळा मीच लावते. मोठमोठ्या राजे-रजवाड्यांचा राज्याभिषेकसुद्धा इतिहास काळापासून मीच करत आले आहे. म्हणून या सगळ्यांपेक्षा मीच सर्वश्रेष्ठ आहे."
     करंगळी आपल्या किनर्‍या आवाजात म्हणाली," मी सगळ्यांमध्ये छोटी असली तरी 'मूर्ती लहान, कीर्ती महान' ही म्हण मला चपखल बसते.अनेक अडचणीच्या गोष्टींचे सोल्यूशन काढण्यासाठी मलाच बोलावले जाते. कानात खाज सुटली की मीच विनम्रतेने सेवा करते. त्यामुळे माझे श्रेष्ठत्व नाकारता येत नाही." चौघांनीही आपापले विशेष गुण सांगून टाकले.
      अंगठ्याने एक चांदीचे नाणे हवेत उडविले. ते खाली पडल्यावर अंगठा म्हणाला," आता एकेक करून हे नाणे उचलून दाखवा." प्रत्येकाने आपल्या क्रमाने प्रयत्न केला पण, कोणालाही नाणे उचलता आले नाही. " आता चौघांनी मिळून उचला." अंगठा म्हणाला.  चौघेही उचलण्याचा प्रयत्न करू लागले. पण त्यांनाही उचलणे कठीण जाऊ लागले. अंगठा त्यांचा मदतीला गेला. नाणे चटकन उचलले गेले. चारही बोटे चिडीचिप. अंगठा म्हणाला," कुठलेही बोट कुठले काम करू शकत नाही. पण सगळ्यांनी मिळून केले तर मात्र मोठ्यात मोठे काम सहज हो ऊ शकते. म्हणून आपापसात न भांडता एकजुटीने राहा. मिळून काम करा." चौघांनी अंगठ्याचे म्हणणे मान्य केले.         

No comments:

Post a Comment