Saturday, March 17, 2012

बालकथा दिव्यशक्ती

    गोष्ट खूप जुनी आहे. गोविंदा नावाचा एक साधा-सरळ आणि भोळाभाळा माणूस होता. गोविंदा सगळ्यांवर प्रेम करायचा. सार्या जीवमात्रांवर त्याच्या मनात भूतदया होती. त्याच्या गुणांवर प्रसन्न होऊन एकदा परमेश्वराने त्याच्याकडे आपला दूत पाठवला. देवदूत गोविंदाला म्हणाला," परमेश्वर आपल्यावर बेहद प्रसन्न आहेत. आणि ते तुम्हाला दिव्यशक्ती देऊ इच्छितात. जेणे करून तुमच्या हातून लोकसेवा घडावी. तेव्हा तुम्हाला कोणती दिव्यशक्ती हवी आहे, ती नि:संकोच सांगा. ती  तुम्हाला प्राप्त होईल. बोला तुम्हा लोकांना रोगमुक्त करण्याची शक्ती हवी आहे ? "
   गोविंदा हात जोडत म्हणाला," मूळीच नको. मला तर वाटतं की कुणाला रोगमुक्त करायचं आणि कुणाला नाही , याचा निर्णय खूद्द परमेश्वरानेच घ्यायला हवा."  
    " ती शक्ती नको असेल तर मग तुम्ही पापी लोकांना सन्मार्गाला लावण्याची शक्ती प्राप्त करून घ्या." देवदूत म्हणाला.   गोविंदा म्हणाला," असली कामं आपल्यासारख्या देवदूतांनाच शोभून दिसतात. लोकांनी मला त्यांचा त्राता , तारणहार म्हणून माझा सन्मान करावा आणि मला देवत्व द्यावं, या मताचा मी अजिबात नाही.   मला काहीही नको. बस्स, फक्त परमेश्वराचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा, हीच इच्छा."
   देवदूत गोविंदाच्या गोष्टी ऐकून संभ्रमात पडला. तो म्हणाला," तुम्ही तर मला पुरतं संकटात टाकलं आहे. तिकडे देवाने मला तुम्हाला शक्ती दिल्याशिवाय माघारी परतायचं नाही, असे बजावून सांगितलं आहे. त्यामुळे तुम्हाला कोणती ना कोणती शक्ती घ्यावीच लागेल. नाही तर मला तरी ती जबरीने तुमच्या गळ्यात मारावी लागेल. त्यापेक्षा तुम्ही  कुठल्याही एका शक्तीचा स्वीकार करावा, हे चांगले."
   गोविंदाला त्याची अडचण लक्षात आली. तो म्हणाला," ठीक आहे, मी शक्ती घ्यायला तयार आहे. .." असे म्हणून गोविंदा पुढे सांगू लागला. " माझ्या हातून सत्कर्म घडावं अशी परमेश्वाराचीच  इच्छा असेल तर माझा  नाईलाज आहे. पण ती दिव्यशक्ती परमेश्वराच्याच नियंत्रणाखाली असायला हवी. त्या शक्तीमुळे झालेल्या परिणामाबाबत खुद्द मलासुद्धा कळता कामा नये आणि  ज्याला फळ मिळाले त्यालासुद्धा ! "   देवदूताने नि:स्वार्थी गोविंदाचे अक्षरशः पाय धरले. खरा देव हाच , याची त्याला खात्री  झाली. " तथास्तू" म्हणत तो अंतर्धान पावला.  आता गोविंदा जिथे जिथे जाई, तिथे तिथे  त्याच्या  सावलीच्या सानिध्यात आलेला  रोगी खडखडीत बरा होई.

No comments:

Post a Comment