Friday, March 9, 2012

बालकथा

                                                            जीवनाचे सार
     फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक मजूर होता. दिवसभर मोलमजुरी करून आला दिवस कसा तरी ढकलत होता. मजुरी मिळाली नाही तर उपाशीपोटी दिवस-रात्र काढायचा. एकदा दोन-तीन दिवस मजुरी मिळाली नाही.  भुकेने जीव कासावीस झाला होता. अंगात त्राणसुद्धा राहिले नव्हते.
      उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाच्या झळा बडवत होत्या. एखादे काम मिळावे, या प्रतीक्षेत रस्त्याकडेला झाडाखाली सावलीत बसला होता. इतक्यात एक सावकार आपल्या डोक्यावरून एक पेटी वाहून नेताना दिसला. तो जागेवरून उठला व म्हणाला," मालक, मी घेऊ का? बदल्यात काय द्यायचं ते द्या."
     सावकाराने पेटी मजुराकडे सोपवली.दारिद्र्याने पिचलेल्या मजुराच्या पायात चपलाही नव्हत्या. त्याच्या पायाला चटके बसत होते.पायाची होरपळ निवावी म्हणून तो अधेमधे झाडाच्या सावलीखाली थांबत असे. आपल्या दारिद्र्यामुळे दु:खी झालेला मजुरी सावकारास म्हणाला," परमेश्वरसुद्धा किती निर्दयी. आमच्या नशीबी साधी चप्पलसुद्धा नाही."
     सावकार काहीच बोलला नाही. दोघेही निमुटपणे चालले होते. एवढ्यात त्यांना समोरून येताना एक व्यक्ती दिसली. व्यक्तीला पायच नव्हते. आपले शरीर सरपटत  तो पुढे चालला होता. त्याला पाहून सावकार म्हणाला," तुला तुझ्या पायात चपला नाहीत म्हणून दु:ख होत आहे. पण या इसमाला पायच नाहीत. तो तुझ्यापेक्षा अधिक दु:खी असेल. या जगात तुझ्यापेक्षा किती तरी अधिक दु:खी माणसे आहेत. तू जर अधिक मेहनत केलीस तर तुला चप्पल मिळून जाईल. पण हा इसम काय करणार? त्यामुळे धैर्य गमावून इश्वराला दोष देण्याची गरज नाही. ईश्वर योग्य वेळी सगळ्यांना संधी देतो. पण त्यातले काहीजण लाभ उठवतात, काही नाही. हे सगळे ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते.
     सावकाराच्या बोलण्याचा मजुरावर खोलवर परिणाम झाला. त्या दिवसापासून तो देवाला दोष न देता आपल्या योग्यतेच्या आणि मेहनतीच्या जोरावर आपले जीवन आनंदी बनविण्याचा प्रयत्न करू लागला.
                                                                                                        

No comments:

Post a Comment