Monday, March 26, 2012

लेख मूर्खांचा दिवस

      'मुर्खांना इथे कुठे आलेय महत्त्व?' असे म्हणणार्‍यांनाही कधी वाटलं नसेल की, त्यांच्यासाठीही एक दिवस राखून ठेवला जाईल. माणसे मूर्ख बनायला आणि बनवायला  उतावीळ हो ऊन जातील आणि त्या दिवसाला 'मूर्खांचा दिवस' असे स्वरूप येईल, शिवाय त्याचे लोण अख्ख्या जगभरात पसरेल, असे वाटणे तर अगदी अशक्यच!  पण तसे झाले खरे! आज जगभर १ एप्रिल हा दिवस मूर्ख बनविण्याचा आणि बनण्याचा दिवस म्हणून मूक्रर झाला आहे.
     अर्थात लोकांना मूर्ख बनविण्याची ही परंपरा कधीपासून सुरू झाली, याबाबत मतभिन्नता असली तरी काही लोक याची सुरूवात फ्रान्स तर काहीजण इंग्लंडमध्ये झाल्याचे सांगतात. परंतु, बहुतांश लोक  या 'मूर्ख दिवसाची' सुरूवात फ्रान्समध्ये झाल्याचेच मानतात. प्राचीन काळातील फ्रान्सची जनता आपल्या विनोदबुद्धीसाठी प्रसिद्ध होती. तिथे सुरुवातीला 'मूर्ख दिवस' साजरा करण्याच्या उद्देशाने संमेलने भरविली जात. या संमेलनांमध्ये राजा, राजपुरोहितसुद्धा सामिल होत. संपूर्ण जनतेच्यादृष्टीने हा दिवस मोठी पर्वणीच होती. कारण या दिवशी जनतेला प्रत्यक्ष आपल्या राज्यकर्त्यांसमवेत हर्षोल्हासात दिवस घालविण्याची सुवर्णसंधी मिळत होती.
     काही लोकांच्यामते 'एप्रिल फूल'ची परंपरा १८ व्या सहतकात ब्रिटनमध्ये सुरू झाली. १७५२ मध्ये शासनकर्त्यांनी आपली जुनी कॅलेंडरपद्धती रद्दबातल करून नवी कालगणना सुरू केली, तेव्हा अनेकांनी या गोष्टीला विरोध दर्शविला होता. कारण नव्या कॅलेंडरमध्ये १ एप्रिल या नववर्षांरंभाऐवजी १ जानेवारी हा वर्षारंभ करण्यात आला होता. पण लोकांच्या विरोधाला भीक न घालता, नवीन वर्षाची सुरुवात १ जानेवारीच ठेवण्यात आली. परंतु, त्याला विरोध करणार्‍यांना मात्र मूर्खांची संज्ञा मिळाली.  आणि तेव्हापासून एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला 'एप्रिल फूल' बनविण्याच्या प्रथेला प्रारंभ झाला. कालांतराने ही प्रथा संपूर्ण युरोपात पसरली.
     अघटीत आणि अविश्वसनीय बातम्यांद्वारा या दिवशी लोकांना वेड्यात काढले जाते. पश्चिमी देशांत 'एप्रिल फूल' बनविण्याला समाज मान्यता मिळाली आहे. या दिवशी हरेकजण दुसर्‍याला मूर्ख बनविण्याची संधी दवडत नसतो.  नव्हे दुसर्‍याला मूर्ख बनविल्याशिवाय सोडत नाही. प्रसारमाध्यमेही याबाबतीत अजिबात मागे नाहीत. आजही ही परंपरा सर्वत्र मोठ्या उत्साहाने चालवली जाते. आपल्या भारतातही वृत्तपत्र माध्यमांनी त्यांचे अनुसरण केले आहे. १९८२ मध्ये ब्रिटिश दूरचित्रवाणीने एप्रिल फूल' च्यानिमित्ताने एक सनसनाटी बातमी देऊन खळबळ उडवून दिली होती. सेंटपाल संग्रहालय त्याच्या मूळ ठिकाणावरून हटवून रिजेंट पार्कमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी ती बातमी होती. अशाच प्रकारची ८० च्या दशकात एका वृत्तसंस्थेने ' इराण- इराक दरम्यानचे युद्ध विनाअट संपले', अशी बातमी देऊन आश्चर्यात टाकले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. कित्येकदा 'एप्रि फूल' बनविण्याच्या अशाप्रकारच्या सनसनाटी बातम्यांमुळे वाईट परिणामांनाही सामोरे जावे लागले आहे. भारतात ही परंपरा इंग्रजांनी आपल्यासोबत आणली. पारतंत्र्याच्या काळात इंग्रज अधिकारी त्यांच्या त्यांच्यात अशा प्रकारचा खेळ खेळायचे. पुढे इंग्रज त्यांच्या या खेळात भारतीयांनाही सामावून घेऊ लागले. भारतीयांनाही दुसर्‍यांना मूर्ख बनविण्याचा धंदा फार आवडला. भारतीय मनोरंजनवादी. त्यांनी हा खेळ पटकन उचलला. बघता बघता मूर्ख बनविण्याचा दिवस पुर्‍या भारत देशात साजरा केला जाऊ लागला. इंग्रज आपल्यातून निघून गेले, पण त्यांची ही विचित्र परंपरा भारतात कायम राहिली. पण ही प्रथा भारतीयांनी जशीच्या तशी आपल्या गळी उतरवली नाही. त्याला भारतीय स्वरूप देण्यात आली.
     आपल्या भारतात तर मूर्खांची 'व्हरायटी'च पाहायला मिळते. संत रामदासांनी तर मोर्खांची लक्षणेच सांगितली आहेत.  महामूर्ख, वज्रमूर्ख, मूर्खाधिराज, मूर्खपती, जडपती, बुद्धीहिन अशी काही मूर्खांची उदाहरणं आहेत. प्राचीन काळी अशा काही लोकांना दरबारात आश्रय दिला जात असे की तो चतुर दरबार्‍यांना मूर्ख बनवित असे. तेनालीराम, बिरबल, गोपाळ, मिथिलांचलचा प्रसिद्ध गानू झा यांसारख्यांच्या चतुराईने भरलेल्या किश्शांना कोण बरे विसरू शकेल?
     खरे तर 'मूर्ख दिवस' साजरा करणार्‍यांवर टीका करणार्‍यांची संख्याही काही कमी नाही. याला सुपीक डोक्यातलं पीक असं संबोधलं जातं. परंतु, हा दिवस साजरा करणार्‍या मदोन्मतांना कशाचीच पर्वा नाही. ते आपल्या आकलेला एक दिवस सुट्टी देतात. जगातल्या सार्‍या समस्यांचं कारण बुद्धीमत्ता आहे.  समस्यांच्या उकलीसाठी बुद्धी वापरली जाते.  मग एक दिवस बुद्धीचा वापर न करता मूर्खात निघालं म्हणून काय बिघडलं? असा त्यांचा सवाल आहे.                                          - मच्छिंद्र ऐनापुरे  

No comments:

Post a Comment