Monday, February 18, 2019

(लहानशी गोष्ट) मानसिकता


माझ्या एका मित्राच्या घरी गेलो होतो. आम्ही पोर्चमध्ये बसून गप्पा मारत होतो. बाजूलाच असलेल्या नळातून पाणी वाहत होतं. जवळ बसलेल्या माझ्या मित्राला मी म्हणालो, “दोस्ता, पाणी बघ किती वाया चाललंय.
 तो बेफिकिरीने म्हणाला, “अरे, त्याचं थोडंच बील येणार आहे?
 मी शांतपणे म्हणालो, “ तू इतकी मोठी चूक का करतो आहेस?
तो चपापला. म्हणाला, “ कसली चूक?

मी सांगायला सुरुवात केली. “तुला तर माहितच आहे, तहानलेल्या पाणी पाजणं किती पुण्याचं काम आहे. अगदी शत्रूनेदेखील पाणी मागितलं तरी त्याला दिलं जातं.
मित्र ते स्वीकारत म्हणाला, “हो,ती तर आपली परंपराच आहे. उन्हाळ्यात लोकं वर्गणी काढून पाणपोया उभ्या करतात. कारण वाटेने चाललेल्या लोकांची तहान भागवून पुण्य मिळावं.
त्याने होकारार्थी मान हलवली,पण पुढे विचारलं, “ पण यात माझी काय चूक आहे?
मी म्हणालो, “ माणसे पाणी पाजून पुण्य कमवतात,परंतु तू पाणी असेच व्यर्थ वाया घालवून पापाचा वाटेकरी बनत आहेस.
त्याने उत्सुकतेने मला विचारले, “ते कसे काय?
मी म्हणालो, “ जे पाणी तू इथे व्यर्थ वाया घालवत आहेस, त्यामुळे ते पाणी ज्या लोकांना हवं आहे, त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. ते या पाण्यापासून वंचित राहत आहेत. आणि त्यामुळे त्यांना पाणी लांबून आणावे लागत आहे. साहजिकच त्यांना त्रास होणार. ते संताप करणार. शाप देणार. ज्यांच्यामुळे त्यांच्यापर्यंत पाणी पोहचत नाही, त्यांच्याविषयी ते थोडेच गोड बोलणार?
तो पटकन उठला आणि  नळ बंद करायला गेला. वर म्हणाला, “ सॉरी बरं का मित्रा, इथून पुढे असे होणार नाही.पाणी व्यर्थ घालवणार नाही आणि मी दुसर्यांनाही समजावून सांगेन.
त्याला आपण पाप करण्यापासून बचावलो, ही गोष्ट चांगलीच लक्षात आली. मी त्याला सरळ सरळ सांगितले असते, तर त्याने माझे ऐकले नसते.त्याला पाणी वाहू दिल्याने किती लोक पाण्यापासून वंचित राहिले असते, हे कळले नसते.

No comments:

Post a Comment