या चहाच्या टपरीमुळे त्यांचे घर चालू
लागले. टपरीजवळच झोपडपट्टीत एक लहानशी झोपडी भाड्याने घेतली.
झोपडपट्टीत मुलांना शाळेत पाठवण्याचा रिवाज नव्हता. इथली मुलं कळती झाल्यावर आपल्या आई-वडिलांना मदत करायची.
मात्र प्रकाश यांच्या वडिलांनी त्यांचे नाव शाळेत घातलं. त्यांना अभ्यास आवडायचा. ते मन लावून अभ्यास करायचे.
सतत पुस्तकात तोंड खुपसून बसायचे. साहजिकच त्यांना
झोपडपट्टीत एकही मित्र नव्हता. प्रकाश प्रत्येक वर्गात पहिला
क्रमांक पटकावयाचे. अभ्यासाबरोबरच त्यांना फुटबॉल खेळायला फार
आवडायचे. पण त्या काळात खेळाच्या करिअरबाबत जागरूकता नव्हती.
त्यामुळे त्यांनी मोठे झाल्यावर डॉक्टर बनण्याचा विचार केला.
त्यांचे स्वप्न होते की, डॉक्टर झाल्यावर गरिबांची
मोफत सेवा करायची. कित्येकदा त्यांचे वडील त्यांना चहाच्या दुकानात
मदत करायला सांगायचे. पण ते टाळायचे. त्यांना
अभ्यासाची चांगलीच गोडी लागली होती. त्यांना कधीच वाटलं नव्हतं,
शाळा सोडावी लागेल.
दहावी उत्तीर्ण झाल्यावर संपूर्ण झोपडपट्टीत
त्यांची चर्चा होऊ लागली. वडीलदेखील त्यांच्या
यशाने खूप आनंदी होते. आता त्यांच्या लक्षात आले होते की,
आपला मुलगा चहा विकणार नाही. त्यांनी पुढच्या शिक्षणाला
मोकळीक दिली.मात्र त्यांच्यावर येणार्या
संकटाचा त्यांना अंदाज नव्हता. ही गोष्ट 1976 ची आहे. तेव्हा प्रकाश 11 वीत शिकत
होते. वडील अचानक आजारी पडले. आठवडाभर चहाची
टपरी बंद पडली. त्यामुळे घरात उपासमार होऊ लागली. उपचारासाठी पैसे नव्हते. काही दिवसांतच त्यांच्या वडिलांचे
निधन झाले. आता कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर येऊन
पडली. पोटाचे हाल थांबवण्यासाठी त्यांना पुन्हा चहाचे दुकान सुरू
करावे लागले. प्रकाश सांगतात की, चहाची
टपरी सुरू केली तसा मी त्यातच गुरफटून गेलो. शिक्षणाकडेच लक्षच
गेले नाही. डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूरच राहिलं.
कॉलेज जाणं बंद झालं. कुटुंबाकडून काम करून कमवून आणण्याचा
दबाव वाढत होता.पण मनात शिक्षण सोडल्याची सल सलत होती.
मग त्यांनी विचार केला की, मी जरी शिकलो नसलो तरी
काय झालं, आपल्या झोपडपट्टीतील मुलं तरी शिकतील.मी त्यांना शिकवू शकतो. 2000 साली दोन खोल्यांच्या घरात
त्यांनी लहान मुलांसाठी शाळा सुरू केली. इथे त्यांनी नर्सरीपासून
तिसर्या इयत्तेपर्यंतच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली.
अर्थात हे काम काही सोपे नव्हते. पहाटे चार वाजता
उठून चहाच्या टपरीकडे जावं लागायचं आणि नंतर दुपारी अकरा वाजता दुकान बंद करून मुलांना
त्यांच्या घरी बोलावून घेऊन शाळा सुरू करावी लागायची. वस्तीतल्या
लोकांना त्यांचे हे काम आवडायचे नाही. त्यांना मुलांकडून पैसा
हवा होता. मुलांनी कमवून पैसे आणावेत, असेच
त्यांना वाटे. यामुळे प्रकाश यांना मोठा त्रास सहन करावा लागला.
मुलांचे पालक म्हणायचे, आमची मुलं काम करून पैसे
आणतात, त्यामुळे आमचे घर चालते. शिकल्याने
काय होणार आहे? विनाकारण आमच्या मुलांना बिघडवू नको, अशी ताकीद द्यायचे. मात्र प्रकाश त्यांना विनंत्या करायचे,
मुलांना शिकू द्या, त्यांना त्याचा फायदाच होईल
म्हणायचे.
कमालीचा विरोध असूनही प्रकाश यांनी शाळा बंद केली नाही. आता चहाचे दुकानदेखील चांगल्याप्रकारे चालत होते. ते
आपल्या कमाईतील निम्मा हिस्सा मुलांवर खर्च करू लागले. आपल्या
पैशांतून ते मुलांसाठी पाटी,पेन्सिल, वह्या-पेन,पुस्तके आणू लागले. पण काही
वस्तीवरचे लोक म्हणू लागले की, आमच्याजवळ मुलांना खायला घालायला
पैसे नाहीत. तू त्यांना शिकवतोस तर त्यांच्या खाण्या-पिण्याचीदेखील व्यवस्था कर. प्रकाश यांनी हेही आव्हान
स्वीकारले. ते घरीच डाळ-भात आणि भाजी यांची
पौष्टीक खिचडी करून मुलांना खाऊ घालू लागले. हळूहळू वस्तीवरच्या
लोकांचा विरोध मावळू लागला. त्यांनी काही तिसरी उत्तीर्ण मुलांना
सरकारी शाळेत दाखल केले. त्यांच्या शाळेत मुलांची संख्या वाढू
लागली. त्यांना प्रसिद्धीही मिळू लागली. ही बातमी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून संपूर्ण कटकभर पोहचली. त्यांच्या शाळेतील मुले कॉलेजला जाऊ लागली. काहींनी खेळात
नाव कमावले. आता वस्तीचरचे लोक आनंदी होते.
आजसुद्धा डी प्रकाश राव बक्सी बाजारात
चहा विकतात. पण आता ते फक्त चहावाले राहिले नाहीत.
आजूबाजूच्या परिसरात त्यांचा सन्मान वाढला आहे. 2015 मध्ये ओडिशा ह्यूमन राइट कमेटीने मुलांचे आयुष्य बदलल्याकामी त्यांचा पुरस्कार
देऊन सन्मान केला. त्यांच्या शाळेवर डाक्यूमेंट्रीसुद्धा बनली
आहे. गेल्या वर्षीच मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
त्यांच्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमात त्यांचे कौतुक केले आणि झोपडपट्टीतल्या मुलांसाठी
आशेचा किरण असा त्यांचा उल्लेख केला. यावर्षी त्यांना पद्मश्रीने
सन्मानित करण्यात आले. डी प्रकाश राव आपली मुलं सायकल वरून शाळा-कॉलेजला जाताना पाहतात, तेव्हा त्यांना खूप समाधान वाटतं.
आता त्यांची काही मुलं नोकरी करतात. ते म्हणतात,
मी आजदेखील चहाच विकतो,पण मला स्वत: ला जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखं वाटतं.
No comments:
Post a Comment