Friday, February 1, 2019

नाते असे जपा!


     
नात्यामध्ये प्रेम असायला हवं,पण एकमेकांशी सतत जोडून राहणं चुकीचं आहे. अशा परिस्थितीत नातेसंबंधावर त्याचा परिणाम होतो. आपसातील ओढीवर त्याचा परिणाम होऊन असं वाटायला लागतं की, नातं फक्त निभावलं जात आहे. आपल्या नात्यांमध्ये अगदीच जवळीक निर्माण करायची असेल तर अधे-मधे त्यातील दुराव्याचा स्वाददेखील चाखला पाहिजे. अमेरिकेतील वर्तणूक विज्ञानाचे शास्त्रज्ञ डॉ. जोसेफ जे प्लाउड म्हणतात की, आपल्याला वाटतं असतं की, आपली प्रिय व्यक्ती सतत आपल्यासोबत राहायला हवी. पण यात आपण इतके गंभीर होतो की, त्याला अप्रिय बनवून टाकतो. सोबत राहून व्यक्तिस्वातंत्र्य मिळत नसेल तर नात्यात बिघाड निश्चित मानायला हवं.
     नातं आई-वडिलांचं आपल्या मुलांमधलं असो किंवा पती-पत्नीचं. दीर्घकाळापासूनची जवळीक कंटाळा निर्माण करतं.जास्त काळ एकमेकांसमवेत राहिल्यानं एकमेकांचं महत्त्व दिसून येत नाही. महत्त्व कायम ठेवायचं असेल तर दुरावाही आवश्यक आहे. तात्पुरते का असेना, पण काही काळ एकटे राहायलाही शिकले पाहिजे. तुमचे यातून फक्त महत्त्वच दिसून येत नाही तर तुम्ही कुणाच्या तरी उपयोगाला येत आहात, याचा आनंदही चाखायला मिळतो. शिवाय तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी कितीही अवघड काम असले तरी या नातेसंबंधामुळे सहज निपटून टाकता. महत्त्व यामुळेही लक्षात येतं,की तुम्ही तिथे नसलात तरी तुमची आठवण प्रकर्षाने येत राहते. त्यावेळेला या नात्याचे महत्त्व समजून येते आणि नाते आणखी दृढ होते. आपली आठवण यावी,हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सर्वात दीर्घकाळ दाम्पंत्य जीवन जगलेल्या ऑकलंड येथील जेराम यांचे म्हणणे आपल्यासाठी फार मार्गदर्शक आहे. ते म्हणतात की, मी सातत्याने अधेमधे माझ्या बायकोपासून दूर राहत गेलो. आणि त्यामुळे प्रत्येकवेळेला अगोदरपेक्षा माझ्या आयुष्यातले तिचे महत्त्व वाढत गेले. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. मी खूप तिच्याशी भांडतो. काही काही दिवस तिच्याशी बोलतही नाही. मग एकाद्या युवकाप्रमाणे तिचे चुंबन घेतो. आज जेराम 87 वर्षांचे यशस्वी दाम्पंत्य जीवन जगले आहेत. आता त्यांनी या यशस्वी आयुष्याच्या 88 व्या वर्षांत पर्दापण केले आहे.
     आज नव्या तंत्रज्ञानात ही जवळीक कायम ठेवण्यासाठी लांब असलेली मंडळी सतत संपर्कात असतात. नोकरी, शिक्षण अशा अनेक कारणांनी माणसे आपल्या प्रिय व्यक्तींपासून दूर राहात आहेत. वॉट्स अपसारख्या माध्यमातून ही माणसे सतत सानिध्यात असल्याचा अनुभव घेत असतात. ऑनलाइन क्षणाक्षणाला भेटत असतात. पण यामुळेही दुरावा निर्माण व्हायला मदतच होत आहे.त्यामुळे काही काळ यापासूनही लांब राहायला शिकायला हवं. त्यानंतरचं भेटणं, खूप सुखदायक असतं. परस्परांमध्ये विश्वास असेल तर ती दुरावत नाहीत तर यामुळे आणखी जवळ येतात. एकमेकांचं महत्त्व समजायला लागतं. 88 वर्षांचं यशस्वी दाम्पंत्य आयुष्य जगणार्या जेराम यांचा सल्ला जरूर लक्षात ठेवा. दूर व्हा, जवळ या, भरभरून भांडा, यासाठी अगदी तरुण व्हा आणि बघा नातेसंबंध कसे दृढ होतात ते!



No comments:

Post a Comment