Tuesday, February 12, 2019

सोशल मीडियाने खूप काही हिरावून घेतलं


आज सर्वत्र सोशल मीडियाचा दबदबा आहे. तरुणाई यातच व्यस्त आहे.फार विचार न करता तत्कालीन परिस्थितीवर भाष्य अथवा मत व्यक्त करून मोकळी होणारी ही तरुणाई भविष्याचा फार विचार करताना दिसत नाही. मुलां-बाळांपेक्षा करिअरला महत्त्व देणारी आजची पिढी पैशालाच सर्वस्व मानते आहे. मात्र यामुळे आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नसल्याने पुढच्या पिढीचेही काही खरे नाही,अशी परिस्थिती आहे. आज सर्वांच्या हातात स्मार्टफोन आला आहे, त्याच्याशी खेळण्याचा छंद सर्वांना जडला आहे. आज स्मार्टफोनची गरज असली तरी त्याचा किती उपयोग करून घ्यावा, हे आज कळण्याची आवश्यकता आहे. कुणाला कुठे ठेवावे,हे आपल्याला माहीत असले तरी त्याप्रमाणे मोबाईललाही कुठे ठेवावे कळले पाहिजे. आज मोबाईल बेडरूमपासून संडासपर्यंत सर्वत्र वावरत आहे. प्रत्यक्षात समोर असलेली माणसे त्याच्यापासून दूर होत चालली आहेत. नाती-गोती संबंधासह कित्येक गोष्टी त्याने हिरावून नेल्या आहेत. यात महत्त्वाची पुस्तकेदेखील आहेत. 

पूर्वी संध्याकाळी पावले आपोआप वाचनालये, ग्रंथालयांकडे वळायची. तिथे माणसे बसून वृत्तपत्रे, मासिके किंवा अन्य पुस्तके वाचायची. माणसे ज्ञान समृद्ध व्हायची. एकमेकांशी बोलून चर्चा करायची. त्यावेळी एक मोठे आत्मियतेचे वातावरण होते. आज एकाच घरात बसूनही प्रत्येकांची डोळे मोबाईलमध्ये खुपसलेली दिसतात.समोर असलेल्या जिवंत व्यक्तीपेक्षा स्क्रीनवरील व्यक्ती सोबत जास्त संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. पूर्वी पुस्तकांवर प्रेम होते आज मोबाईलवर आहे. मात्र यामुळे आपल्या आयुष्यावर फार मोठे दूरगामी परिणाम होणार आहेत. जर आपण भाषा आणि शब्दांपासून दूर जात असू तर समाज आणि संस्कृती पासूनही आपण दूर जाऊ. आणि सध्याच्या घडीला हेच घडत आहे. आपल्याला पुन्हा पुस्तकांकडे वळावे लागेल. यासाठी आतून व्हायला हवं. हे काम कुणी तरी पुढे येऊन करण्याची गरज आहे आणि त्याला समाजाने साथ द्यायला हवी. आज कुणी तरी चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे,हे सांगणारा कुणी तरी हवा. शिवाय आज पुस्तकांचे महत्त्वदेखील सांगावं लागणार आहे. पुस्तकं आणि शब्द आपल्या जीवनाला कशाप्रकारे नवी दिशा देतात,हे लोकांना समजायला हवं.


No comments:

Post a Comment