Friday, February 15, 2019

प्रेमाचा पारा


प्रेमात अपयशी ठरलेल्या प्रेमी मंडळींची एक सर्वसाधारण तक्रार असते की, त्यांना यात काहीच मिळालं नाही. पण खरे तर प्रेम कधी मिळवण्याचे साधनच नसते, ती तर नेहमी द्यायची वस्तू असते. प्रेम द्यायचं म्हणजेच मिळवायचं, असा त्याचा अर्थ आहे. तत्त्वज्ञ खलील जिब्रान यांनी लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात, जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर त्याला जाऊ द्या,कारण जर ती परत येते, तेव्हा ती तुमची असते. जर ती आली नाही ती तुमची नाही. खलील यांच्या मतानुसार, तुम्ही त्याला जाऊ दिले, म्हणजेच ते तुमचे देणे आहे. हेच तुमचे ग्रहीत. ओशोसुद्धा आशाच  काहीशा शब्दांमध्ये सांगतात की, प्रेम हे एक दान आहे. प्रेम मागायचं नसतं. ती एक भेट आहे. प्रेम भिकारी नाही, सम्राट आहे. जो प्रेम देतो, वाटतो, त्यालाच प्रेम मिळते.

आपला नेहमी एक गोंधळ उडत असतो, आपल्याला वाटत असतं की, आपण प्रेमात आहोत. पण ते प्रेम नसते. फक्त आकर्षण असते. आपण मोहपाशात अडकलेलो असतो. फारच कमी खरे प्रेमी प्रेमाचे सौंदर्य लगेच ओळखतात. प्रेमाची चमक त्याच्या आतमध्ये असते. प्रेमाचा आधार आंतरिक विश्वास आहे. त्याची सर्वात उत्कट मूल्य स्वतंत्रता असते. महात्मा गांधी यांना स्वातंत्र्य आणि प्रेम यासंबधाची मोठी समज होती. ते म्हणाले होते, प्रेम कधीच दावा करत नही, ते नेहमी देत असते, नेहमी सहन करत असते. प्रेम कधी चिडत नाही, रागावत नाही. किंवा कधी बदला घेत नाही. आपण चुकतो इथेच. आपण प्रेमाला अशा वस्तूप्रमाणे मानतो की, जी आपल्या खिशात ठेवली जाऊ शकते. विचारवंत डेरोथी पार्कर सांगतात, प्रेम तळहातावर ठेवलेल्या पार्यासारखे आहे. मूठ खुली ठेवली तर तो थांबतो आणि मूठ मिटली तर तो निघून जाते. हे जग अशा लोकांचेच आहे, ज्यांनी याला खुल्या तळहातावर ठेवले आहे. आज जे म्हणतात ना, प्रेमात काहीच मिळालं नाही, ते मूठ मिटवलेल्यांमधले आहेत, असे समजावे.



No comments:

Post a Comment