Monday, February 18, 2019

प्रत्येक गोष्टीत चिडचिड होत असेल तर


     
आपले काही दिवस सुरळीत जातात, आणि अचानक पुन्हा संतापाचा,चिडचिडेपणाचा  खेळ पहिल्यासारखा सुरू होतो. समस्येत अडकलेले मन छोट्या छोट्या गोष्टींवरदेखील चिडचिड करतं. पण या गोष्टी एवढ्यावरच थांबत नाहीत, याचा परिणाम आपल्या आजूबाजूवरही व्हायला लागतो. मग पुढे असे रोजच व्हायला लागते. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अशा काही अडचणीच्या दिवसांसाठी काही अनुभवी लोकांनी आपल्याला उपाय सुचवले आहेत. त्यांचा अवलंब केल्यास आपल्यातला चिडचिडेपणा कमी होण्यास मदत होतो.
कोणत्या लोकांसोबत राहता?
आपण ज्या लोकांसोबत राहतो आणि ज्या वस्तू,गोष्टी आपण पाहात, ऐकत आपला वेळ घालवत असतो, त्याचा परिणाम आपल्या मूडवरसुद्धा पडत असतो. जर आपण सातत्याने अशाच लोकांबरोबर राहत असू तर प्रत्येक वेळेला आपल्या कामाच्या चुका काढल्या जातील, कामातील खोट काढली जाईल. आपल्या आजूबाजूचे लोक सतत चिडचिडेपणा घेऊन वावरत असतील, तक्रारच करत असतील किंवा सतत वाईटच विचार करत असतील, चिंतीत असतील तर त्याचा साहजिकच आपल्या मूडवरदेखील परिणाम घडणारच! खासकरून अगोदरच काही समस्या असतील किंवा मूड बिघडला असेल तर अशा लोकांपासून दूर राहिलेलेच चांगले
काय कराल?: आपला वेळ फक्त चांगला विचार करणार्या लोकांसोबतच घालवा. टीव्ही किंवा सोशल मिडिया अशा सारख्या गोष्टी अधिक काळ पाहात असाल किंवा वाचत असाल, अशा गोष्टींही तपासून घ्यायला हव्यात.
खरी समस्या काय आहे?
कित्येकदा आपला संताप हा बाहेरचा नव्हे तर आतलाच असतो. अशा वेळेला आपल्या आतले ठीक केल्याशिवाय तुमच्या संतापावर नियंत्रण तुम्ही आणू शकत नाही. यामागे काही गोष्टी अथवा लोकांचे व्यवहार,वागणे असू शकतात. तुम्हाला ओरडायला, संतापायला मजबूर करत असतील,पण प्रत्येक गोष्टीला असे होत असेल तर  स्वत:कडे पाहणं गरजेचं आहे. असंही होऊ शकतं की, जुन्या मागच्या आठवणी, कटू अनुभव आपल्यामध्ये साठत असतील. काही कठीण निर्णय असतील,ज्यांना तोंड देण्यापासून तुम्ही स्वत:ला वाचवत असाल. काही जवळच्या नातेसंबंधांमध्ये झालेला बदल असेल, जो तुम्हाला त्रासदायक ठरत असेल.
काय कराल?: काही काळासाठी शांत चित्त ठेवा आणि स्वत:ला विचारा की, समस्या दिवसाची आहे की,परिस्थितीची का मग तुमची? काही असं तर नसेल ना, काही वस्तू, ज्या तुम्हाला भिती किंवा असुरक्षिततेचेची जाणीव करून देत असतील? जर तुम्ही स्वत: या समस्या सोडवू शकत नसाल तर तुमच्या एकाद्या हितचिंतक किंवा अनुभवी लोकांशी बोलू शकता?
स्वत:ची काळजी घ्या
आपण जितके अधिक व्यस्त होत जाऊ, तितक्याच प्रतिक्रियाही अधिक द्याव्या लागतील. त्यामुळे आपल्या आरोग्याकडेही दुर्लक्ष आपोआप होत जाते. आपल्या शरीराला आरामही मिळायला हवा. आणि त्याचे पोषणही व्हायला हवे. ताजी हवा, योग्य खाणं-पिणं आणि थोडा व्यायाम या गोष्टी काही श्रीमंतीच्या नाहीत, या आपल्या शरीराच्या गरजा आहेत. दीर्घकाळ याकडे दुर्लक्ष, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी आपल्या व्यवहारावर आणि विचारांवर परिणाम करतात. एक न सांगितलेला संताप आपल्या आतमध्ये साठत जातो.
काय कराल?: कितीही झालं तरी आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि आराम या गोष्टींकडे लक्ष द्यावेच लागेल.दिवसभरातील काही वेळ निसर्गासोबत घालवा. योग्य प्रमाणात पाणी प्या. सक्रिय रहा. तळलेले, खूप गोड, खारट खाण्यापेक्षा शरीराला आवश्यक असलेले पदार्थ आपल्या खाण्या-पिण्यात आवर्जून ठेवा.
काही काळ मौन रहा
प्रत्येक बारीक बारीक गोष्टीत आपलं मत व्यक्त करण्याची तशी आवश्यकता नसते. अशा गोष्टींत लक्ष घालण्याची गरज नाही. प्रत्येक दिवशी काही काळ मौन रहा, ध्यान करा, मन शांत ठेवा. खरे तर आपण संतुलित प्रतिक्रिया देऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टींवर आपल्यावरील नियंत्रण गमवायचं नाही, हे स्वत:ला बजावत राहा. काही दिवस राग, क्रोध किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर इगो आडवा येत आहे, या गोष्टीत येत आहेत,का पाहा. याची जाणीव होत असेल तर दिवसभरातील काही वेळ आपल्या मनाच्या शांततेसाठी काढावा.
काय कराल?: दिवसभरातील अर्धा एक तास जाणूनबुजून मौन राहण्याचा निश्चय करा. शांत किंवा एकांत ठिकाणी काही वेळ ध्यान धरा. आपला श्वासांना आपल्या शरीराशी जोडा. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्याचे टाळा.
स्वत:शी प्रेमाने पेश व्हा
असं नाही की, तुम्ही नेहमी आनंदी असावं. प्रत्येक दिवस चांगलाच जावा.  किंवा प्रत्येक वस्तूंवर तुमचेच नियंत्रण असायला हवे, असेही नाही. स्वत:कडून फार अपेक्षा बाळगणं, प्रत्येक कामं आपणच केली पाहिजेत आणि परफेक्ट करण्याचा प्रयत्न करणं, या गोष्टी तुमच्या तणावात वाढ करतात. अशावेळेला स्वत:ला दोष देत राहणं,तुम्हाला त्रासदायक ठरतं.
काय कराल? स्वत:ला थोडे सैल सोडा. तसेच दुसर्यादेखील. काही बाबतीत स्वत:वर विश्वास ठेवा काही बाबतीत दुसर्यावर विश्वास ठेवा. स्वत:ला हे सांगत जा की, काही गोष्टींवर तुमचा जोर आहे, काहींवर नाही.  असं काही आवश्यक नाही की, प्रत्येक दिवस चांगलाच जावा. आज काही तरी गडबड झाली आहे,पण ती उद्या ठीक होऊन जाईल. तुम्ही त्या गोष्टी ठीक कराल. आणि जर बिघडलेल्या मूडमध्ये काही नुकसान झालं तरी चूक समजून येताच, ती सांभाळा.एक गोष्ट लक्षात ठेवा,कधी कधी तुमची मनस्थिती बिघडल्याने तुमचे स्वत:चे किंवा ज्यांना मित्र समजला आहात, अशी माणसेही कशी आहेत, हे समजून येतात.




No comments:

Post a Comment