Friday, November 10, 2017

सुरेंद्र : गरिबांचा देवदास

     नूरजहां आणि सुरैय्यासोबत अनमोल घडी(1946) मध्ये काम करणारे सुरेंद्रनाथ म्हणजे सुरेंद्र पेशाने वकील होते आणि गायकदेखील. महबूब खान त्यांना कुंदनलाल सैगलच्या तोडीचा गायक बनवण्याच्या प्रयत्नात होते. अनमोल घडीमध्ये नूरजहां-सुरेंद्र यांचे आवाज दे कहां है, दुनिया मेरी जवां है... फारच गाजले. सुरेंद्र यांना गरिबांचा देवदास अशी  उपाधी मिळाली होती. मात्र काळाने आपली कूस बदलली. पार्श्वगायकांची नवी पिढी चित्रपट क्षेत्रात आली आणि पाहता पाहता सुरेंद्र यांचा आवाज पडद्यामागे हरवून गेला.

     सुरेंद्र यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1910 चा. चित्रपट निर्माते महबूब खान यांचा सुरेंद्र यांच्यावर विशेष जीव होता. त्यांनीच सुरेंद्र यांना या क्षेत्रात आणले, असे म्हणायला हरकत नाही. तेव्हाचा चित्रपट नुकताच मूकपटाकडून बोलपटाकडे वळला होता. अशा वेळेला अभिनेताच गाणी गात. त्यामुळे सुरेंद्र यांना पडद्यावर नायक म्हणून काम करण्याबरोबरच त्यांना गाणीही गावे लागायचे. सागर मुव्हीटोनसाठी चित्रपट दिग्दर्शन करत असलेले फिल्मकार महबूब खान यांची मोठी इच्छा होती की, ज्याप्रकारे कोलकाताच्या न्यू थिएटर्सने के.एल. सैगलसारखा गायक दिला, तसा मुंबईतदेखील त्यांच्याच तोडीचा गायक बनवायचे. या हेतूनेच त्यांनी सुरेंद्र यांना 1936 मध्ये डेक्कन क्वीन मध्ये संधी दिली होती. यातले बिरहा की आग लगी मोरे मन में... हे गाणेदेखील सुरेंद्र यांनी सैगल यांच्या बालम आय बसो मोरेमन में... (देवदास) सारखे गायले होते. हे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले आणि सुरेंद्र चित्रपटसृष्टीत स्थिरावले.
     महबूब खान यांच्या मैत्रीचा सुरेंद्र यांच्यावर अक्षरशवर्षाव होत होता.त्यांनी सुरेंद्र यांना आपल्या आठ चित्रपटांचा नायक बनवला, यात 1940 चा औरत हा चित्रपटसुद्धा होता. हाच चित्रपट त्यांनी पुन्हा आहे तसा मदर इंडिया नावाने (1957) बनवला. औरतमध्ये सुरेंद्र यांनी जी भूमिका केली होती, ती भूमिका मदर इंडियामध्ये राजेंद्रकुमार यांनी निभावली होती. 30 दशक म्हणजे असा काळ की, 15-20 दिवसांत वीस ते पन्नास हजारात चित्रपट बनवला जात होता. या चित्रपटांमध्ये हिरो आपली गाणी स्वत: गात होता. गाणी वाजवणारी मंडळी तबला-पेटी, ढोलकी घेऊन कृत्रीम झाडीमध्ये आणि झाडांमागे लपून वाजवत असत. चित्रपटांमध्ये गाण्यांची गरज किती होती, याचा अंदाज काही चित्रपटांमधील गाणी ऐकून यायला हरकत नाही. इंद्रसभामध्ये 72 गाणी होती. देवी देवयानीमध्ये 70च्या आसपास वय असलेल्या भगवानदास यांना फक्त 20 वर्षांच्या गौहर मामाजीवालाची हिरोची भूमिका दिली होती, कारण ते प्रसिद्ध गायक होते. गायकांना चित्रपटसृष्टीत खूप मोठी मागणी होती.त्यांच्यासाठी हिरो बनण्याची सोनेरी संधी होती
     महबूब खान यांनी सुरेंद्र यांना सैगल बनवण्याचा प्रयत्न नंतर चित्रपटांमध्येही केला. पण सुरेंद्र यांना मोठी प्रतिष्ठा अनमोल घडीने मिळाली. भारत-पाकिस्तान अशी फाळणी होण्याअगोदर कोलकाता,मुंबई, पुणे आणि लाहोर ही चित्रपट निर्मितीची केंद्रे होती. फाळणीनंतर लाहोरचा पत्ता कट झाला. याचा फायदा मुंबई फिल्मजगताला मिळाला. देशभरातल्या प्रतिभाशाली लोकांचा ओघ आपोआपच मुंबईकडे वाढला. सुरेंद्र यांच्यापेक्षा प्रतिभावंत गायक चित्रपटसृष्टीत येऊ लागले.पुधे महबूब खान यांचा सुरेंद्र यांना सैगल बनवण्याचे स्वप्नदेखील हळूहळू काळाच्या गर्देत हरवून गेले. सुरेंद्र यांना अभिनेताच्या रुपात काम तर मिळत होतेच,पण गायन मात्र हळूहळू लयाला गेले. कारण रफी,मन्ना डेसारखे गायक चित्रपटसृष्टीत लोकप्रिय होत होते. सुरेंद्रला 1952 मध्ये बैजू बावरामध्ये तानसेनची भूमिका साकारायला मिळाली. चित्रपटात बैजू आणि तानसेन यांच्यात दगडाचे पाणी बनवण्याची स्पर्धा असते. नौशाद यांनी आज गावत मन मेरो झूम के... हे गाणे उस्ताद आमिर अली आणि डी.व्ही. पलूस्कर यांच्याकडून गाऊन घेतले. गायक असूनदेखील सुरेंद्र यांना पडद्यावर फक्त ओठ हलवावे लागले.
     सुरेंद्र यांना दुसर्यांदा तानसेन बनण्याची संधी मिळाली. रानी रुपमती (1957)मध्ये तानसेन बनलेले सुरेंद्र आपल्या गाण्याच्या ताकदीवर (उड जा भंवर माया कमल का आज बंधन तोड के) कळी उमलवतात आणि त्यात बसलेल्या भुंग्याला तिथून उडायची संधी देतात. उत्तरादाखल रुपमती आपल्या गाण्याने ( आजा भंवर सुनी डगर सुना है घर आजा... ) त्याच भुंग्याला पुन्हा परत त्या कळीमध्ये घालवून कळी बंद करतात. या गाण्यामध्येदेखील सुरेंद्रंना ओठ हलवावे लागले. हे गाणे संगीतकार एस.एन. त्रिपाठी यांनी मन्ना डे यांच्याकडून गाऊन घेतले. अशा प्रकारे बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानानुळे गायक असतानादेखील सुरेंद्र यांना न गाणारा तानसेन पडद्यावर साकारावा लागला होता.

No comments:

Post a Comment