Monday, November 20, 2017

किशोर वयातील धोके

     असं म्हटलं जातं की, माणसाचे भविष्य बालपण आणि या दरम्यान आत्मसात केल्या गेलेल्या मूल्यांवर अवलंवून असते.2011 च्या जणगणनेनुसार देशात जवळपास 41 टक्के लोकसंख्या ही 20 वर्षे वयापेक्षा कमी आहे. मुलांच्या तीन अवस्था मानल्या जातात.एक म्हणजे पाच वर्षे वयापर्यंत चालणारी शैशावस्था. दुसरी पाच ते बारा वर्षांपर्यंतची बाल्यावस्था आणि बारा ते वीस पर्यंतची किशोरावस्था. या आवस्था त्या त्या देशातल्या प्रकृती,संस्कृतीनुसार थोड्या फार भिन्न असतात. आपल्याकडे अल्पवयीन वय हे मुलींसाठी आठरा वर्षे आणि मुलांसाठी 21 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

     आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, किशोरावस्था प्रत्येकासाठी विविध बदल घेऊन येतो. खासकरून या वयात मुलींमध्ये होणारे बदल महत्त्वपूर्ण असतात आणि त्याचे महत्त्वही तितकेच आहे.या काळात त्यांच्यात होणार्या सगळ्या परिवर्तनाची माहिती घरातल्या मोठ्यांना खासकरून आईला द्यावी लागते.मुलींनी ती द्यायलाच हवी. दुसर्यांकडून मिळालेली चुकीची माहिती किशोर मुलींसाठी नुकसानकारक ठरू शकते.या काळात जबरदस्त मानसिक आणि शारीरिक बदल होत असतात.मुलींना आता आपल्याला लहान मुलगी समजू नये,असे वाटत असते. त्यांच्याशी मोठ्यांबरोबरच आणि सन्मानपूर्वक वागले पाहिजे असेही त्यांना वाटत असते.या काळात त्यांच्यात एकप्रकारची जिद्द येते. काही गोष्टींसाठी मुली अडून बसतात.नवनवीन स्वप्नांचा उदय त्यांच्या अंतरंगात होत असतो. या काळात नवनवीन गोष्टी त्यांच्यात जाणवत असतात. दुसर्यांना दाखवण्यासाठी आणि नटायचे, सजायचे ही इच्छादेखील वाढत असते. आणि मोठ्यांप्रमाणे आपणही आपापले निर्णय घ्यावेत, असे वाटत असते. त्यामुळे एकाद्या गोष्टीत उलटून बोलण्यासारखे वागणे, समजून घ्यायला हवे.हा या अवस्थेचाच परिणाम असतो. या कालावधीत आईने तिच्याशी मैत्रिणीप्रमाणे वागले पाहिजे.तिच्यातला बदल समजून घेतला पाहिजे. या वयात सर्वात मोठा बदल म्हणजे त्यांच्या मनात विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीविषयी आकर्षण वाढायला लागते. संपर्क व्हायला लागल्यावर ते एकमेकांना स्वाभाविकपणे जाणून-समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
     या वयात मुलांचे विश्व वाढत,विस्तारत जाते.शाळेला जाता-येता नवनवीन सहकारी भेटत जातात, त्यांच्याशी संपर्क येत राहतो. या कालावधीत काही जणांच्या वागण्या,बोलण्यावर मुले प्रभावित होतात. यात शिक्षकांचाही समावेश असतो. अशा वेळेला आई-वडिलांची भूमिका महत्त्वाची ठरतेयावेळेला काही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या सटे गुरुग्रामच्या रेयान स्कूलमध्ये घडलेल्या एका मुलाच्या खुनाची आठवण केली जाऊ शकते.ही घटना पालकांना सावध करते, ती यासाठी की, त्यांनी आपल्या मुलांविषयी गंभीर व्हायला हवे.बाहेरच्या कुठल्याही अडचणींच्या विषयांवर मुलांशी अगदी खुल्या मनाने बोला.मग या गोष्टी केव्हा घडतात, ज्यावेळेला पालक आपल्या मुलावर विश्वास ठेवतात तेव्हा! एकादेवेळेस त्याने चूक केली असल्यास ती माफ करावी आणि पुढच्या प्रसंगांवर पडदा टाकण्यासाठी स्वत: पुढाकार घ्यायला हवा.
अशा परिस्थितीत सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे.राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोनुसार बलात्काराच्या साठ टक्के घटनांमध्ये पिडित असलेल्या  या लहान मुलीच आहेत.कदाचित अशाप्रकारच्या घटनांच्याबाबतीत आई-वडील मुलीला सावध करण्यात कमी पडल्या असाव्यात. आजची परिस्थिती फारच वेगळी असून आपल्या नातेवाईकांवरही भरवसा ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे तिच्याबाबतीत काही घडू शकते,याबाबत मुलींशी चर्चा करावी आणि त्या गोष्टींपासून सावध राहण्याचा सल्ला द्यायला हवा. अडचणीच्यावेळी मुलीला कसे वागावे,याचे प्रशिक्षण द्यायला हवे.सहसा मुलीला आईने एकटे-दुकटे सोडू नये,पाठवू नये. आवश्यक त्या ठिकाणी आई तिच्यासोबत असायला हवी. मुलीच्या वागण्या-बोलण्यातला फरक आईने जाणायला हवा. हा कालावधी आई-वडिलांसाठी मोठा परीक्षेचा असतो.जुनी माणसं सांगतात, मुलं ज्यावेळेला आपल्या खांद्याला येतात, त्यावेळेला त्यांच्याशी बाप नव्हे तर मित्रासारखे वागले पाहिजे.
आज मुलांचे विश्व नव्या तंत्रज्ञानानुसार बदलले आहे. त्यांच्या हातात मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर यांबरोबरच अनेक प्रकारची गॅजेट्स येत आहेत.व्हिडिओ गेम, सोशल मिडिया त्यांच्या हातात असतो. अशा वेळेला मागचा-पुढचा विचार न करता काहीही करण्याची प्रबळ इच्छा उसळून येत असते. याचा फायदा बरेच लोक,कंपन्या घ्यायला टपलेल्या असतात. ब्लू व्हेल आणि अशासारखी अनेक हिंसक गेम्स मुलांना त्यात गुंतवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात.दुसर्या बाजूला नोकरदार पालक त्यांच्या व्यस्त कामामुळे मुलांकडे लक्ष देऊ शकत नाहीत.त्यांना हवा तसा वेळ देऊ शकत नाहीत. असा वेळेला मुलेदेखील आपला आश्रय मोबाईल, कॉम्प्युटरमध्ये शोधतात. आणि नुकसानकारक खेळांमध्ये फसतात.
     यामुळे पालकांसमोर  मोठे आव्हान आहे ते म्हणजे मुलांजवळ आवश्यक त्या काळात त्यांच्याकडे मोबाईलसारख्या असाव्यात पण त्याचा वापर आवश्यकतेपेक्षा जास्त वापर होऊ नये,याची काळजी घेणे. काही सर्व्हे सांगतात की, गरजेपेक्षा अधिक काळ मोबाईल आणि कॉम्प्युटरचा वापर करणारी मुले चिडचिडी होतात. वेळ तर वाया जातोच,हा भाग वेगळाच आहे.त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर, बुद्धीवर परिणाम होतो.त्यामुळे त्यांना गोडीगुलाबीत या गोष्टींपासून दूर करण्याचे कसब पालकांनी शिकले पाहिजे.मुलांच्या एकटेपणाला पर्याय शोधताना इतर मुलांशी आपली मुले खेळली पाहिजेत, अशी व्यवस्था पालकांनी करायला हवी. मुले शरीराने सशक्त आणि आतून परोपकारी, समजूतदार ,कणखर व्हायला हवीत.त्यांच्या सामाजिक विकासावर भर द्यायला हवा.
     मोबाईल,कॉम्प्युटर,इंटरनेट एकादृष्टीने तोट्याचे आहेत,तितकेच ते फायद्याचे आहेत. ज्ञान आणि माहिती देणार्या वेबसाईट्स अगणीत आहेत. दहावी-बारावी, स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम त्यांमध्ये उपलब्ध आहेत.विज्ञान,गणितसारखे अवघड विषय सोपे करून सांगणार्या अनेक वेबसाईटस आहेत. मुलांच्या डोक्यात ध्येय निश्चित करून त्याचा पाठपुरावा करायसाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. आई-वडील, शिक्षक यांनी मुलांचा कल त्याकडे कसा वाढेल,यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत. आज शिक्षण महाग झाले आहे.मात्र मुलांसाठी कोचिंग क्लास, विविध प्रकाशनाची पुस्तके, नोट्स असं बरंच काही उपलब्ध आहे. पालकांनी आपापल्या परीने त्यांच्या ध्येयासाठी, अभ्यासासाठी आपला पैसा, वेळ खर्च करायला हवा. मुलांना अभ्यासाची गोडी वाढावी, तसे वातावरण त्याच्याभोवती तयार व्हायला हवे, त्यांना हवी ती पुस्तके,नोट्स उपलब्ध करून देण्यासाठी पालक म्हणून आपली जबाबदारी पार पाडायला हवी. मुले बिघडण्याचा काही कालावधी असतो. अर्थात मुले बिघडतात, म्हणजे पाहिजे त्यावेळेलेला पाहिजे ते संस्कार त्यांच्यावर झाले तर मुले आयुष्यात चांगला माणूस बनतात. चांगल्या कामावर, मेहनत,चिकाटी,जिद्द याच्यावर भरवसा ठेवतात. नाहीतर शॉर्टकटचा मार्ग पत्करून वा मार्गाला लागतात.यात मुलांचे नुकसानच आहे. कुठलीही वाईट गोष्ट शेवटपर्यंत जात नाही, असा संस्कार पालकांनी स्वत: आपल्यापासून करायला हवा.मुले घरातून आणि समजातूनच अधिक शिकतात. मित्रांच्या संगतीने मुले वाट्टेल ते करायला तयार होतात.मात्र घरचे संस्कार चांगले असतील तर मुले कितीही दबाव आला तरी त्याला बळी पडत नाही. मुले एकदा वाईट मार्गाला लागली तर लवकर त्यातून बाहेर पडत नाहीत.चैनी,मस्ती आणि पैसा यावर त्यांची अधिक भिस्त असते.त्यामुळे त्यांचे मन कुणाचेच काही ऐकत नाही.त्यामुळे ते बिघडण्यापूर्वीच त्यांना सावरले पाहिजे. इथे आई-वडिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

No comments:

Post a Comment