Friday, November 17, 2017

रस्त्यांवरील अपघात: उपाययोजना शोधायला हव्यात

     आपल्या देशात रस्त्यावरून चालणं आता अवघड होऊन बसलं आहे.गेल्यावर्षी रस्ते अपघातात मरण पावलेल्यांच्या आकडेवारीवरून आपल्याला याचा अंदाज यायला हरकत नाही. 2016 मध्ये आपल्या देशात रोज सरासरी 410 लोकांचा बळी गेला आहे.2015 मध्ये हाच आकडा चारशे होता. अपघातांची कारणे सुसाट वेग असेल किंवा रस्त्यांची दुर्दशा असेल मात्र 2014 मध्ये तासाला सरासरी 16 लोकांचा जीव या रस्ता अपघातात गेला आहे.गेल्या वर्षभरात जवळपास साडेचार लाख अपघात झाले.त्यात सुमारे एक लाख 40 हजार लोकांचा जीव गेला तर 4 लाख 80 हजार लोक जखमी झाले आहेत. 2013 सालाच्या तुलनेत गतवर्षी तीन टक्के अधिक लोकांचा जीव रस्ता अपघातात गेला आहे.त्यावेळेला एक लाख 37 हजार 423 रस्त्यात मरण पावले. 2014 मध्ये हा आकडा एक लाख 41 हजार 526 पर्यंत पोहचला. 2015 मध्ये हाच आकडा एक लाख 46 हजार आणि 2016 मध्ये दीड लाखपेक्षा अधिक लोकांनी आपला जीव रस्ता अपघातात गमावला.2014 मध्ये जे चार लाख 77 हजार 731 रस्ते अपघात झाले होते, त्यातले 36.8 टक्के अपघात हे अतिवेगामुळे झाले होते. यात 48 हजार 654 लोकांचा जीव गेला.ओव्हरटेक करणार्यांनी आणि बेजबाबदार वाहन चालवणार्यांनी 42 हजार 127 लोकांना मारून टाकले.
     एकूण रस्ता अपघातांपैकी जवळपास निम्मे अपघात हे दुचाकी सोडून  मालमोटारी,लॉरीच्या चालकांचा चुकीमुळे झाल्याचे दिसून येते.या वाहनांच्या तावडीत सापडल्याने 23 हजार 529 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आणि एक लाख 40 हजार लोक जखमी झाले आहेत.2014 रस्ता अपघातात मरणार्या दुचाकी चालकांची संख्या 13 हजार 787 होती. जीवघेण्या रस्ता अपघातात दुचाकी 23.3 टक्के, तीनचाकी 4.5 टक्के,कार-जीप-टॅक्सी 18.6 टक्के, मालमोटारी-ट्रॅक्टर-टेंपो 25.6 टक्के आणि बस 8.7 टक्के भागिदार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने भारतातल्या ज्या रस्ता अपघाताचे आकलन केले आहे, त्या आणि नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरो (एनसीआरबी) च्या आकड्यांमध्ये थोडी तफावत आहे. मात्र अपघाताची कारणे दोन्ही अहवालात तीच आहेत.

     रस्ते अपघातांची वाढती संख्या काही आपल्या प्रचलित धारणांना छेद देताना दिसतात.पूर्वी जुन्या वाहनांमुळे अधिक अपघात होतात, असे म्हटले जायचे. मात्र आकडे याच्या उलट आहेत. परिवहन मंत्रालयाच्या संशोधन शाखेच्या अहवालानुसार 2014 मध्ये दोन ते चार वर्षे जुन्या झालेल्या वाहनांमुळे 86 हजार 956 अपघात झाले आहेत. यात 24 हजार 494 लोकांचा जीव गेला आहे.अपघातांच्याबाबतीत शहरी आणि ग्रामीण असा फरकदेखील मिटला आहे. 2014 मध्ये शहरी रस्त्यांवर झालेल्या अपघातांमध्ये 56 हजार 663 लोकांचा जीव गेला तर ग्रामीण रस्त्यांवरच्या अपघातात हाच आकडा 83 हजाराच्या आसपास आहे. शहर असो वा गाव,प्रत्येक सहापैकी एक रस्ता अपघात हा लोकवस्तीजवळच झाला आहे. गावांमध्ये हा 16.5 टक्के तर शहरांत 16.4 टक्के आकडा आहे. शाळा,महाविद्यालय किंवा अन्य शैक्षणिक संस्थांजवळ 5.3 टक्के झालेले अपघात चिंताजनक म्हणावे लागतील.
     भारतात पहिल्यांदाच रस्ते अपघात आणि त्यातील मृर्तूची कारणे तेरा प्रकारात विभागणी करून शहर आणि राज्य स्तरावर आकडे जमवले आहेत. विविध एजन्सींच्या मिळालेल्या आकड्यांवरून जवळपास 78.8 टक्के अपघात हे ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाले आहेत. आणि 56 टक्क्यांपेक्षा अधिक अपघात हे अतिवेगामुळे झाले आहेत. जगभरात रस्ते अपघातात मृत्यू पावणार्यांची संख्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने वाढत आहे. दारू पिऊन वाहन चालवण्याची वृत्तीदेखील वाढत आहे. हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर न करणे, ही फॅशनच झाली आहे. ही सगळी कारणे वाहन चालवणार्यांच्या मानसिक स्थितीशी जोडले गेले आहेत. मात्र ही परिस्थिती फक्त दुसर्यांसाठी जीवघेणी ठरली नाही तर त्यांच्यासाठी जीवघेणी सिद्ध झाली आहेत.
     2014 मध्ये रस्ता अपघातात जे एक लाख 41 हजार 526 लोक मारले गेले,त्यापैकी 75 टक्के लोक दुसर्यांच्या चुकांचे बळी ठरले आहेत.पण 25 टक्के लोक असेही आहेत की, त्यांना रहदारीचे नियम तोडण्याची शिक्षा मिळाली. आणखी एक दु:खाची गोष्ट अशी की, एक दोषी तीन निर्दोष लोकांचा जीव घेतो.मोठ्या वाहनांच्या कचाट्यात निर्दोषच अधिक येतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी रहदारीच्या नियमांचे पालन निश्चित व्हायला हवे.सर्व मुख्य रस्त्यांवर डिवायडर असायला हवा,प्रकाश व्यवस्था सुस्थितीत असायला हवी.वाहन चालवणार्यांना शिस्त लावणे, सगळ्यात महत्त्वाचे आहे. हे काम फक्त वर्षातून एकदा वाहतूक जागृत सप्ताह किंवा पंधरवडा साजरा करून भागणार नाही. राज्य व केंद्र सरकारांनी रस्ते अपघातात होणारे मृत्यू रोखण्याला अधिक प्राधान्य द्यायला हवे.
     अपघात टाळण्यासाठी रस्त्यांची अवस्था चांगली असण्याची आवश्यकता आहे. रस्त्यांवरील खड्डे, कातरलेले रस्ते यामुळे अपघातात वाढ झाली आहे.काही ठिकाणी विनाकारण स्पीड ब्रेकर किंवा खाली-वर झालेली रस्ते यामुळेही अपघातांना निमंत्रण मिळत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे असे की, रस्ते करताना निष्काळजीपणा आणि घाईगडबड केल्याने रस्ते टिकाऊ होत नाहीत. त्यामुळे रस्त्यांची दशा पार बिघडून जाते. रस्ते बनवताना ठेकेदाराला कुणाकुणाला आणि किती किती पैसे द्यावे लागतात, हे आता लपून राहिलेले नाही. यामुळे रस्त्याच्या कामासाठी निधी किती उरतो, आणि त्यामुळे रस्ते कसे होतात, हा तसा संशोधनाचाच भाग आहे.वास्तविक रस्ते आपल्या देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत. त्यांचीच अशी अवस्था सरकारीबाबू, ठेकेदार आणि राजकीय लोक करत असतील,याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.भ्रष्टाचार ही आपल्या देशाला लागलेली कीड अशी सहजासहजी कमी होणारी नाही,नव्हे ती कदापि संपणार नाही, असे वाटण्यासारखीच परिस्थिती आहे.
     
रस्त्यांची वाईट अवस्था, वाहन चालवताना चालकाचा बेजबाबदारपणा, दारू पिऊन वाहन चालवणे आणि रहदारीचे नियम न पाळणे आदी कारणे रस्ते अपघात वाढण्याची आहेत. पण काही कारणे ही वय आणि हिंसक होत चाललेला मानवी स्वभावाशी जोडलेली आहेत. गेल्या काही वर्षात अतिवेग नडत चालला आहे. आजची तरुणपिढी यासाठी पागल झाली आहे.ही प्रवृत्ती देशाला धोकादायक ठरत आहे. रस्ते अपघातात जे मरण पावतात, त्यांची वये ही 20 ते 35 च्या दरम्यानची आहेत.याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लोकांचा संयम सुटत चालला आहे. सहनशक्ती आता उत्तर द्यायला लागली आहे. याचा परिणाम आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळत आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे,त्याप्रमाणात नव्या रस्त्यांची निर्मिती होताना दिसत नाही. वाहनांच्या गर्दीत माणूस हरवून गेला आहे.
     रस्ते अपघाताच्या बाबतीत भारत जगात एक नंबरला आहे.अन्य कुठल्याही आजारांमध्ये मृत्यू पावणार्या संख्येपेक्षा रस्ते अपघातात मृत्यू पावणार्यांची संख्या आपल्या देशात अधिक आहे. ही फारच मोठी चिंताजनक बाब आहे. ही वैश्विक समस्या आहे. मात्र लोकसंख्या आपल्या देशातच अधिक आहे. रस्त्यावरही माणसांची भयानक  गर्दी असते.त्यामुळे रस्ते अपघाताला आवर घालणे कठीण होऊन बसले आहे.यासाठी काहीतरी उपाययोजना शोधावी लागणार आहे. रस्त्यावरचे अपघात थांबणार नाहीत,पण ते कसे कमी करता येतील किंवा आटोक्यात कसे आणता येतील, यासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न होण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment