Friday, November 5, 2021

झोप विकत घेता येत नाही


जगातील प्रत्येक वस्तूची देवाणघेवाण होऊ शकते.  आपण सुख-दु:ख वाटून घेऊ शकतो, पण झोप ही अशी गोष्ट आहे, जी आपण कधीही शेअर करू शकत नाही.  ती  कुठली संपत्तीही नाही,ज्याचा साठा करून ठेवावा. खरे तर आजच्या युगात, ज्याला चांगली झोप लागते, त्याच्यापेक्षा श्रीमंत आणि आनंदी दुसरा कोणीही नसेल.  जे जागल्या डोळ्यांनी पूर्ण रात्र जागून काढतात त्यांना फुटपाथवर निवांत झोपलेल्या माणसांचा हेवा वाटल्याशिवाय राहणार नाही, पण त्याच्याकडून  काही होऊ शकत नाही.

काहींना सर्व सुविधा असतानाही झोप लागत नाही, तर काहींना नुसती हाताची उशी करून जमिनीवर झोपलं तरी गाढ झोप लागते.  काही लोकं रात्र या अंगावरून त्या अंगावर काढून थकून जातात तर काहींना आडवं व्हायचा अवकाश लगेच घोरायला लागतात. बाजारात झोप  विकत मिळत नाही हे खरे आहे.  कित्येकदा खूप वेळ मेहनत करूनही झोप येत नाही.  डुलकी ही झोपेची छोटी बहीण मानली जाऊ शकते.  दुपारच्या जेवणानंतरची एक छोटीशी डुलकीदेखील अनेक तासांच्या गाढ झोपेइतकीच असते.  शरीरातील अनेक आजार चांगल्या झोपेने दूर होतात.

झोपेचा संबंध थेट मेंदूशी आहे. जन्मानंतर, मूल पूर्णपणे निष्पाप असते, म्हणून अठरा तासांपर्यंत झोपते.  जसजसा तो मोठा व्हायला लागतो, तसतसा तो चुका आणि वाईट विचारांत गुरफटायला लागतो, त्यामुळे त्याच्या वाट्याची झोप त्याला मिळत नाही. ज्याने कधीही कोणाचे नुकसान केलेले नाही, त्याचे घोडे मात्र पूर्णपणे विकले गेलेले असतात, म्हणजेच तो चांगल्या  झोपेला पात्र आहे.  झोपेचा थेट संबंध आपल्या रोजच्या दिनक्रमाशी असतो.  दिवसभर चांगला विचार करा, चांगलं काम करा, कुणाचं वाईट करू नका, वाईट चिंतू नका, कुणालाही वाईट बोलू नका, तर रात्री नक्की खूप चांगली झोप लागेल.  पण आजकाल हे कोणाला जमू शकतं? त्यामुळे तो चांगल्या आणि पूर्ण झोपेपासून वंचित राहतो.

पुरेशी झोप घेण्यासाठी तुम्हाला काहीही द्यावं लागत नाहीत.  फक्त निर्दोष असायला हवं.  पण निर्दोष असणं मोठं कठीण आहे.  चांगल्या झोपेसाठी अंथरुणावर चांगले विचार आणणं आवश्यक आहे.  तुमचा ताण खोलीच्या बाहेर ठेवा.  झोपेचा आणि  टेन्शनचा आकडा छत्तीसचा आहे.  जिथे टेन्शन असेल तिथे झोप येत नाही.  जिथे चांगली झोप लागते तिथे टेन्शन असू शकत नाही.  एकाद्या दिवशी एकाद्या गरजवंताला मदत करण्याचा प्रयत्न करा, बघा त्यादिवशी तुम्हाला चांगली झोप लागल्याचे दिसेल. काही मिळवण्याचा आनंद चांगली झोप देईल अथवा नाही देईल,पण काही देऊन आपण  चांगली झोप मिळवू शकतो. ते देणं चांगल्या विचारांचं का असेना!  एखाद्याला हलके स्माईल देऊनही चांगली झोप येते.  झोप शारीरिक स्थितीपेक्षा मानसिक स्थितीवर अधिक नियंत्रण ठेवते.  मन स्थिर असेल तर उत्तम आणि शांत झोपेसाठी ते अधिक उपयुक्त ठरते.

आपण झोप विकत घेऊ शकत नाही, पण त्यासाठी  गोळ्या घेऊ शकतो.  तेही डॉक्टरांच्या सांगण्यावरून. परंतु यानंतरही झोप येईलच याची शाश्वती नाही.  येऊही शकत नाही. जरी ती आली तरी शरीराला विश्रांती देऊ शकत नाही,उलट ती आपल्या शरीराला दुसऱ्या आजारासाठी तयार करेल. तुम्हाला इच्छा असूनही चांगली झोप येत नाही.  लहानपणी ऐकलेली अंगाई झोपताना गुणगुणल्यास कदाचित तुम्हाला झोप येऊ शकेल. कारण लहानपाणीच्या अंगणात भटकल्याने आपलं बालपणही परत येतं. आपल्या बालपणात झोपेची कधीच वेळ ठरलेली नसते. कित्येकदा असं घडतं की, झोपड्यांमध्ये घोरण्याचा आवाज घुमतो मात्र महाल रात्रभर जागाच असतो.  याचे एकमेव कारण म्हणजे झोपडपट्टीतले लोक आपापसात आणि कुटुंबात प्रेमाने राहतात.  छोट्याशा घरात एक कुटुंब शांततेत राहतं.  पण  राजवाड्यांत किंवा मोठ्या बंगल्यात जाण्यासाठी प्रेम तळमळत राहतं. 

नैसर्गिकरित्या झोपेने पेंगुळलेले डोळे फक्त मुलांचे असतात, कारण ते निष्पाप असतात.  चांगल्या झोपेनंतर जेव्हा डोळे उघडतात तेव्हा त्यातून प्रेम टपकतं. आपल्या आजूबाजूला अनेक निष्पाप डोळे आहेत, त्यांना ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  हे डोळे एक तर लहान मुलांचे असतात किंवा वृद्धांचे!  निरागसतेची भावना तरुणांच्या डोळ्यात क्वचितच दिसते.  त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला चांगली झोप घेण्याची इच्छा असेल, तेव्हा दिवसभरात काही ना काही चांगले काम कराच, त्याचबरोबर  मुलाला तुमच्या शेजारी झोपवा, त्याच्या निरागस डोळ्यांकडे बघून तुम्हालाही चांगली झोप लागेल.  हा एक छोटासा प्रयोग आहे, एकदा करून बघा, तुम्ही चांगल्या झोपेचे धनी व्हाल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment